नंदनवनातील पक्षी – मोर
इतिहासातला आणि ललित कलांतला
भाग- दोन
मोर हा पृथ्वीवरचा सर्वात सुंदर
पक्षी. तो तर नंदनवनातला पक्षी. भारतात सर्वत्र आढळणारा, दोन हजार पक्ष्यांच्या जातीतला सर्वात सुंदर, ऐटबाज आणि नृत्यविशारद पक्षी. त्याच्या मोहक सौंदर्या मुळे जगातल्या
सर्वांना तो आवडतो. भारतीयांनी तर मोराला १९६३ मध्ये राष्ट्रीय पक्ष्याचं मानाचं
स्थान दिलं.
राजचिन्ह-
राज घराण्यातल्या ऐश्वर्य संपन्नतेत अनेक ठिकाणी मोराला स्थान दिलं असायचं. अशी अनेक उदाहरणे आहेत. मुघल बादशहा शहाजहान मोठा रसिक होता. तो मोराच्या सौंदर्याने इतका प्रभावित झाला होता की, त्याने स्वत:साठी ‘मयूर सिंहासन’ तयार करवून घेतलं होतं.याच प्रमाणे वेगवेगळ्या काळात ते ते राज्यकर्ते नाणी पाडत असत. त्यावर अर्थातच काहीतरी विशेष प्रतिक असणारच. इ.स. पाचव्या शतकातल्या गुप्त घराण्याच्या राजांच्या सोन्या व चांदीच्या नाण्यांवर मोर कोरलेला असायचा. प्रथम कुमारगुप्त ने त्याच्या काळात जी नाणी काढली त्यात सुवर्ण नाणी, रजत नाणी, तांब्याची नाणी आणि शिशाची नाणी होती. रजत नाण्यावर गरुड, मोर, त्रिशूल यांचे छाप होते. हर्षवर्धन राजाच्या नाण्यांवर सुद्धा मोराची प्रतिमा कोरलेली होती.
प्राचीन काळी राजांच्या छत्रावर सोने आणि रत्नांनी मढवलेली नाचणार्या मोराची चित्रे असत. त्याला मायूरातपत्र म्हणायचे.या छत्रावर सर्व बाजूंनी मोराची चित्रे सोने आणि रत्नांनी मढवलेली असत.
दहाव्या शतकात पण अनेक ठिकाणी कास्य शिल्पांमध्ये मोर प्रतिकृती आढळतात. मोराच्या आपल्या संस्कृतीतल्या अस्तित्वाचे असे अनेक ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे दिसतात. सांची येथील स्तुपाच्या प्रवेश दारावरील पाषाणाच्या स्तंभांवर मोराच्या आकृत्या दिसतात.
सांची स्तूप प्रवेशद्वार |
कातळशिल्पे |
रत्नजडित मयूर सिंहासन |
दक्षिण भारतात वेगवेगळ्या समया, दिवे यांच्यावर सुंदर मोर घडवलेले दिसतात. एखाद्या म्युझियम मध्ये असे दिव्यांचे प्रकार आपण नेहमी बघतो. शिवाय आपल्याकडची चांदीची उपकरणे अत्तरदाणी, गुलाबदाणी, करंडा, कोयरी, निरांजन, समई यावर मोराची नक्षी असतेच.
राजप्रासाद-
प्राचीन काळी राजप्रासाद आणि वाड्यात मोर पाळलेले असत. त्यांना भवनशिखी किंवा क्रीडामयूर म्हणत. प्रासादाबाहेरील उद्यानात, मोरांसाठी छोट्या छोट्या टेकड्या तयार करवून छान सोय केलेली असे. त्यांना सांभाळण्यासाठी सेवक नेमलेले असायचे. इजिप्त मध्ये ही राजे आपल्या उद्यानात मोर पाळायचे.
आपल्या कडे जसे कार्तिकेयचे आणि सरस्वतीचे वाहन मोर आहे, तसेच ग्रीक संस्कृतीत हेरा या देवतेच्या संदर्भात सुद्धा मोराचे अस्तित्व आहे. घराबाहेरच्या उद्यानात मोर बागडताहेत ही कल्पनाच किती मोहून टाकणारी आहे ना? मला इथे एक महत्वाचा संदर्भ द्यावासा वाटतो तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रासादाबाहेरील उद्यानातील मोर.
प्राचीन काळात ग्रीक, रोम आणि भारताच्या
उद्यानांमध्ये मोराचे वास्तव्य असायचे असे इतिहास सांगतो. इ.स. पूर्व चौथ्या शतकात ग्रीस राजा सिकंदर ने
भारतावर आक्रमण केले तेंव्हा त्याने पंजाबमध्ये मोरांचे अनेक थवे पहिले, त्यांचे लोभस नृत्य पाहिले. त्यांच्या प्रेमात पडून त्याने सैनिकांना सांगितले
की मोरांना मारू नये. आणि परत भारतातून
जाताना दोनशे मोर आणि लांडोरी बरोबर घेऊन गेला. इथूनच मग अमेरिका, आफ्रिका, युरोप इथे भारतीय मोरांचा प्रसार झाला. प्राचीन
कला पासूनच मोराने त्याच्या डौलदार सौंदर्याने आणि तोर्याने कवींचे योद्ध्यांचे आणि
राजे रजवाड्यांचे लक्ष आकर्षित केले आहे.
ताऊस (Taus) -
तर रोमन लोक, इंग्लंड मध्ये जाताना बरोबर
मोर घेऊन गेले होते. कारण ते आक्रमण करायला गेले होते आणि
मोर हे चिन्ह ख्रिस्ती लोक पुनरुत्थानाचे प्रतिक मनात असत. शुभ चिन्ह म्हणून
त्याकडे ते पाहत. तर चीनमध्ये मोराला सौंदर्याचा, शोभेचा, उन्नतीचा आणि शांततेच दूतच मानतात.
मोर हे पारशी लोकांचे धार्मिक प्रतिक असते.‘मलक - ए - ताऊस’ या तांब्याच्या भांड्यातून अग्यारीत आलेल्या भक्तांना तिर्थ दिले जाते. प्राचीन काळात मोर भारतातून निर्यात केले जात असत. भारत आणि श्रीलंका हे मोराचे मूळ स्थान. तेंव्हापासून मोरांची निर्यात पाश्चिमात्य देशांमध्ये होत होती. ताऊस हा शब्द पर्शियन भाषेतला शब्द आहे. ताऊस म्हणजे मोर.
शास्त्रीय संगीतात वीणा व त्याचे इतर प्रकार स्वतंत्र वादनासाठी असतात. त्यातलच ताऊस हे एक तंतुवाद्य आहे. दक्षिणेत या वाद्याला मयूरी किंवा बालासरस्वती पण म्हणतात. हे तंतु वाद्य म्हणजे मोराच्या आकाराची चामड्याचे कंपित्र असलेली, गजाने उभी धरून वाजवण्याची सतारच. ताऊस चा रंगही मोरासारखाच. हे वाद्य स्वतंत्र वादनासाठी असते. बंगाल मध्ये मोरा ऐवजी माशाचा आकार असतो तेंव्हा त्याला मीन सारंगी म्हणतात.
मयूर नृत्य -
भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीला आहेत त्यातलीच एक मयूरनृत्य लीला आहे. असं म्हणतात, राधेच्या जन्मानंतर होणार्या द्वापारकालीन लिलांना बुढी लीला म्हणतात. या बुढी लीला दरम्यान मथुरेत मोर कुटी मध्ये मयूर लीला साजरी होते. एकदा कृष्णाची प्राणप्रिय राधा रुसून बसली होती, तिला अनेक प्रकारे कृष्णाने मनवलं पण राधा काही प्रसन्न होईना, शेवटी भगवान श्री कृष्णाने मोराचे रूप घेऊन राधेच्या समोर नृत्य केले, त्या नृत्याने राधा, मोरावर अर्थात कृष्णावर प्रसन्न झाली. हा ‘बुढी लीला महोत्सव’ ब्रज प्रांतात अनेक वर्षे सुरू आहे. राधा रानीने बुलायौ, कान्हा मोर बन आयौ ... याचं महत्व म्हणून, ब्रज प्रांतात अनेक सण आणि उत्सवांमध्ये किंवा विशेष प्रसंगी अतिथींच्या स्वागतासाठी मयूर नृत्याचं आयोजन केलं जातं. मथुरेचं हे पारंपरिक नृत्य आहे. आपल्याकडे म्हणजे भारतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आले होते, तेंव्हा त्यांचं स्वागत ब्रजच्या या पारंपरिक मयूर नृत्यानेच झालं होतं.
मोराचा नयनमनोहर नाच - लिंक
- https://www.youtube.com/watch?v=NKY1OOwnHEY
क्रमश:
© ले. डॉ.नयना कासखेडीकर.पुणे
--------------
No comments:
Post a Comment