Wednesday, 12 August 2020

विचार–पुष्प,३७

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका 

                         विचार–पुष्प,३७

                              परिव्राजक १५.  महाराष्ट्रात स्वामीजी

    सप्टेंबर १८९२,  विवेकानंद आणि बाळ गंगाधर टिळक यांची पहिली भेट. अजून टिळकांना लोकमान्य ही पदवी मिळायची होती आणि विवेकानंदांचे स्वामी विवेकानंद हे नाव प्रसिद्ध व्हायचे होते. विवेकानंदांपेक्षा टिळक पाच, सहा वर्षानी मोठे होते. डी. ई. सोसायटीचा राजीनामा देऊन त्यांनी नुकतीच सार्वजनिक जीवनास सुरुवात केली होती. तर नरेंद्रनाथांनी या भ्रमंती मध्ये आपले नाव कोणालाच सांगितले नव्हते. ते फक्त मी एक संन्यासी आहे एव्हढीच आपली ओळख देत.

विंचूरकर वाडा 

         मुंबई पुणे प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात टिळकांबरोबर त्यांचे आणखी दोन- तीन मित्र होते. या चौघांची वेगवेगळ्या विषयावर चर्चा आणी वादविवाद सुरू होते. विषय संन्यासी, संन्यास यावरती आला. स्वामीजी एका कोपर्‍यात बसले होते. ते बाहेरचे निरीक्षण करता करता त्यांची ही पण चर्चा ऐकत होते. त्यातल्या दोघांच्या मते, “संन्यास घेणारे भिकारी, ऐतखाऊ, देशाची व समाजाची चिंता नसणारे, भोंदू  असतात”. तर, टिळक म्हणत होते, “संन्याशांनीच हा देश घडवला आहे”. याची त्यांनी अनेक उदाहरणे पण त्यांनी दिली. हा वाद ऐकून अस्वस्थ झालेले स्वामीजी न राहवून बोलते झाले, टिळकांनी  मांडलेले मत त्यांनी अधिक आक्रमकपणे आणी प्रभावीपणे अस्खलित इंग्रजीमध्ये पटवून दिले. स्वामीजींचे इंग्रजीवरचे प्रभुत्व आणि विषयाचा व्यासंग बघून सर्व मित्र थक्क झाले. पुणे स्टेशन आले आणी चर्चा थांबली. टिळकांनी स्वामीजींना उतरवून घेतले आणी टिळक आपल्याबरोबर स्वामीजींना घरी घेऊन गेले. विंचुरकर वाड्यात स्वामीजी त्यांच्याकडे आठ दहा दिवस राहिले .                                                                                              

   या मुक्कामात दोघांची धर्म आणि अद्वैतवेदान्त या दोन विषयावर चर्चा होई. दोघेही देशासाठी लढणारे लढ्वय्ये होते, पण टिळकांचं काम राजकीय मार्गाने असे आणि स्वामीजिंचं आध्यात्मिक मार्गाने. राजकारण विषयावर ते बोलत नसत. गीता हा विषय मात्र दोघांचाही चर्चेचा अवडता विषय होता. भारताची ब्रिटिश राजवटीतली गुलामी हा दोघांचाही चिंतेचा विषय होता.

     टिळक, पुण्यात अनेक संस्थांशी संबधित होते. त्यातल्या हिराबागेतल्या डेक्कन क्लबचे टिळक सदस्य होते. तिथे दर आठवड्याला काही लोक जमून एखाद्या विषयावर बोलणे आणी त्यावर चर्चा असा कार्यक्रम चालत असे. टिळक स्वामीजींना घेऊन या डेक्कन क्लबमध्ये गेले. त्या दिवशी काशीनाथ गोविंद नातू यांनी तत्वज्ञानवर एक निबंध वाचन केलं. यावेळी फारसं कुणी बोलले नाही, पण स्वामीजींनी त्याची दुसरी बाजू इंग्रजीत सुरेखपणे मांडली. एका भटक्या संन्यासाचे अस्खलित इंग्रजी आणि विद्याव्यासंग बघून, नेहमीप्रमाणे सर्वजण अवाक झाले आणि त्यांच्या भोवती गराडा पडला. दुसर्‍या दिवशी पण विंचुरकर वाड्यात स्वामींना भेटणार्‍यान्ची गर्दी झाली. भेटायला येणार्‍या लोकांबरोबर स्वामीजी गीता आणि उपनिषदे यावर बोलत असत. पण ही गर्दी वाढू लागली तसे स्वामीजींनी इथून हलण्याचा निर्णय घेतला. आपण एका राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीच्या घरी  राहिलो आहोत याचं भान स्वामीजींना होतं, त्यामुळे टिळकांशी त्यांचा संवाद तसा कमीच झाला आणि टिळक सुद्धा स्वामीजींकडे एक इंग्रजी जाणणारा आणि गाढा अभ्यास असलेला तरुण संन्यासी याच दृष्टीने पाहत होते. स्वामीजींनी पुण्यातला मुक्काम हलवला. पुण्याहून ते थेट कोल्हापूरला पोहोचले.

कोल्हापूर राजवाडा 

   भावनगरच्या तखतसिंग महाराजांनी त्यांना कोल्हापूरच्या छत्रपतींसाठी परिचय पत्र दिलं होतंच. छत्रपतींनी कोल्हापूरच्या खासबागेत स्वामीजींची व्यवस्था केली होती. त्यांनी अगत्याने स्वामीजींची विचारपूस केली.कोणाकडून काहीही न घेणार्‍या स्वामीजींनी खूपच आग्रह झाला म्हणून, महाराणी साहेबांकडून नवीन भगवी वस्त्रे स्वीकारली. चार पाच दिवस स्वामीजी कोल्हापूरला राहिले होते. यावेळी त्यांची राजरामीय परिषदेत आणि क्लब मध्ये भारतीय तत्वज्ञान आणि धार्मिक प्रबोधनपर प्रभावी भाषणे झाली. आवेशपूर्ण झालेल्या पाहिल्याच भाषणावरून  उपस्थित लोकांना वाटले की, हा इंग्रजी बोलणारा बुद्धीमान संन्यासी पुढे नक्की मोठा नामांकित वक्ता होईल. अशी आठवण कोल्हापूरच्या ग्रंथमाला मासिकाचे संपादक, विष्णु गोविंद विजापूरकर यांनी जुलै १९०२ च्या अंकात सांगितली आहे.

  विष्णु विजापूरकर हे त्यावेळी कोल्हापूरला शिकत होते. ते त्यांच्या मित्रांसमवेत खासबागेत जात असत. खासबागेतले संभाषण ऐकून त्यांनी दुसर्‍या दिवशी आपल्या राजारामीय परिषद या विद्यार्थ्यांच्या संस्थेत बोलावलं. तिथे स्वामीजी दोन वाक्य बोलले ती आपल्या कायम स्मरणात राहिली आहेत असा उल्लेख विजापूरकर यांनी केला. ती वाक्य अशी, “ मी त्या धर्माचा अनुयायी आहे, की बौद्ध धर्म हे ज्याचे एक बंडखोर अपत्य आहे आणि ख्रिस्ती धर्म हे ज्याचे बर्‍याच प्रमाणात केलेले अनुकरण आहे. युरोपिय लोकांना धर्म कसा समजणार? ते भोगविलासमागे धावत आहेत”.      

    यावेळी शाहू महाराजांकडे दक्षिण महाराष्ट्रातील संस्थांनांच्या ब्रिटिश रेसिडेंट चे प्रतिनिधी म्हणून लक्ष्मणराव गोळवलकर कारभार पाहत होते. गोळवलकर यांनी त्यांचे बेळगावचे मित्र आणि प्रसिद्ध वकील सदाशिवराव भाटे यांना परिचय पत्र दिले. ते घेऊन स्वामीजी कोल्हापुरून १५ ऑक्टोबर १८९२ ला बेळगावी भाटे वकिलांच्या घरी गेले.(सर्व फोटो वरून साभार परत) 

© डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा 

No comments:

Post a Comment