‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार–पुष्प, भाग - ४०
परिव्राजक १८. गोमंतक
बेळगावहून स्वामीजी मार्मा गोवा मेलने निघाले
आणि मडगाव येथे उतरले. बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर विष्णुपंत शिरगावकर यांनी
गोव्यातल्या व्यवस्थेसाठी मडगाव इथले त्यांचे विद्वान मित्र सुब्राय लक्ष्मण नायक
यांना परिचय पत्र दिले होते आणि स्वामीजींची निवास आणि भोजन व्यवस्था करायला
सांगितली होती. स्वामीजींना घ्यायला स्टेशनवर नायक स्वत: जातीने हजर होते, तेही शेकडो लोकांच्या समवेत. आणि काय
आश्चर्य त्यांनी स्वामीजींना घोडा गाडीतून मिरवणूक काढून समारंभपूर्वक घरी नेले.
हे सर्व स्वामीजींना खूपच अनपेक्षित होते. आयुष्यात त्यांना असा अनुभव प्रथमच आला
होता. स्वामीजींचा परिचय झाल्यावर त्यांनी सुब्राय नायक यांना आपला गोव्याला येण्याचा
हेतु सांगितला. ख्रिस्त धर्माविषयीचे मूळ ग्रंथ त्यांना इथे अभ्यासायचे होते. ज्या
ज्या प्रांतात जी जी वैशिष्ठ्ये असायची त्याची माहिती ते करून घेत.
सुब्राय नायक हे तीव्र
मेधाशक्ती असलेले वेदान्त आणि आयुर्वेद शास्त्राचे जाणकार होते. शिवाय संस्कृतमधील
न्यायमीमांसा व ज्योतिष यातही पारंगत
होते. नायक हे त्यावेळी धार्मिक आणि सामाजिक नवजागरणाची धुरा वहात होते.
त्यांच्यासाठी तर स्वामीजींचे आपल्या घरात वास्तव्य आणि सहवास म्हणजे एक चांगली
पर्वणीच होती.
मठग्राम म्हणजेच मडगाव हे
पोर्तुगीजांचा प्रभाव असलेले दक्षिण गोव्यातले ऐतिहासिक शहर. महाराष्ट्र आणि
कर्नाटकच्या मध्यभागी पश्चिम घाटात वसलेला
गोवा समुद्र तटावरील रमणीय भूभाग म्हणून सर्वांनाच आकर्षित करतो. १५१० पासून हा
भाग पोर्तुगीजांच्या हुकूमाखाली जवळ जवळ साडेचारशे वर्ष होता. पोर्तुगीजांनी साम, दाम, दंड, भेद य मार्गाने
इथले अनेक तालुके काबीज केले होते. आशियातले सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रा स्थळ, ‘बसिलिका ऑफ बॉम जिझस’ इथे
गोव्यात आहे. प्राचीन मंदिरं आहेत. या वास्तू वैशिष्ठ्यपूर्ण वास्तूकलेसाठीही
प्रसिद्ध आहेत. विवेकानंदांचा गोव्याला भेट देण्याचा हाच उद्देश होता. देवदर्शना
बरोबरच गोव्यातली प्रमुख स्थळे, तिथली धर्मपीठे, जुने चर्च, फोंडा प्रदेशातील मंदिरे, पुरातन देवालये यांची माहिती करून घेणे आणि या प्रदेशातील ग्रामीण आणि
शहरी लोकजीवन, समाजावरील धर्माचा प्रभाव व इतिहास जाणून घेणे
हा पण दूसरा उद्देश होता.
 |
सुब्राय नायक यांचे घर
|
सुब्राय नायक यांच्या घराला
ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चारशे वर्षापूर्वी धर्मांध ख्रिश्चनांनी मडगावची
ग्रामदेवता असलेल्या श्री दामोदर मंदिराचा आणि गावातल्या इतर हिंदू मंदिरांचा
विध्वंस केला. हिंदूंना गावात एकही मंदिर शिल्लक राहिलं नाही. अशा परिस्थितीत नायक
कुटुंबाने श्री दामोदर या आपल्या कुलदेवतेला राहत्या घराच्या मोठ्या गर्भगृहात
स्थान देऊन वाचविले आणि पुढे सर्व हिंदूंना ते भक्तीसाठी खुले करून दिले. इथेच
नंतर मठग्रामस्थ हिंदू सभेची स्थापना केली गेली. मडगावातल्या आबाद फारीया रोडवरचं ‘नायक मॅन्शन’ सामाजिक संस्कृतिक आणि नियमित उपक्रमाचं स्थान बनलं. याला दामोदर साल
म्हणून ओळखतात. साल म्हणजे हॉल. गोव्यातील काही विशिष्ट घरांपैकी सुब्राय नायक
यांचं पारंपारिक चौसोपी वाड्याचे एक प्रशस्त घर जिथे स्वामीजी काही दिवस राहिले
होते.
 |
स्वामीजी राहिलेली खोली व वस्तू
|
स्वामीजींच्या
सहवासामुळे त्यांची समाजोद्धाराची तळमळ, वैदिक
तत्वज्ञानाद्वारे लोकांची उन्नती करण्याची त्यांची क्षमता,
जीवनातील सर्वोच्च कर्तव्याविषयी असलेली अत्त्युच निष्ठा पाहून सुब्राय नायक
प्रभावित झाले . स्वामीजींच्या गायन वादनातल्या परिपक्वतेचा अनुभव सुद्धा यावेळी
गोवेकर मंडळींनी घेतला.
 |
लयभास्कर खपृमामा पर्वतकर
|
इथल्या वास्तव्यात
स्वामीजींनी एकदा एक चीज काही रागातून पाऊण तास गायली. सर्वजण आश्चर्य चकित झाले.
नायक यांनी, लयकारीची उत्तम जाण असलेले प्रसिद्ध तबला वादक व
संगीतातल्या पिढीजात घराण्यात जन्मलेले खाप्रूजी अर्थात लक्ष्मणराव पर्वतकर, यांना बोलवून घेतले आणि स्वामीजींसमोर तबला वादन करायला सांगितले.
त्यांनी सफाईदार तबलावादन सादर केले. हे ऐकून स्वामीजी म्हणाले, “लाकडाच्या खोक्याच्या कडेवर बोटे फिरवून आवाज काढता, तसाच आवाज वरच्या चामड्याच्या थरातून काढता आला पाहिजे”. खाप्रुजींना हे
काही पटेना. त्यांना वाटलं स्वामी चेष्टाच करताहेत. तोच स्वामीजी उठले, कोचावरून खाली बैठक मारून बसले आणि तबल्याच्या चामड्यातून सुंदर आवाज
काढून दाखविला. हा प्रकार पाहून सर्व श्रोते दि:ग्मूढ झाले. पर्वतकर यांनी
स्वामीजींची क्षमा मागून साष्टांग नमस्कार घातला. याच खाप्रूमामा पर्वतकरांना पुढे
१९३८ मध्ये प्रख्यात गायक अल्लादिया खाँ यांच्या हस्ते ‘लयभास्कर’ पदवीने गौरविण्यात आले. स्वामीजींची भेट ही पर्वतकर मामांच्या आयुष्यातली
भाग्याचीच घटना म्हणायला हवी.
 |
राशेल सेमिनरी,रायतूर
|
स्वामीजींना गोव्यातील
ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुरातन लॅटिन ग्रंथातून ख्रिश्चन धर्माचा इतिहास व
तत्वज्ञान याचा अभ्यास करायचा होता. तिथल्या समाजावर होणार्या धर्मपरिवर्तनाचा
प्रभाव जाणून घ्यायचा होता. असे दुर्मिळ ग्रंथ इथे उपलब्ध होते. रायतूर (राशेल)
येथील सेमिनरी १५७६ मध्ये बांधलेले असे प्राचीन होते, तिथे
प्राचीन हस्तलिखिते आणि मडगावतील प्रसिद्ध वकील जुजे फिलिप अल्वारीस यांना बोलवून
स्वामीजीची ओळख करून दिली आणि सेमिनरी व तिथले ग्रंथ दाखविण्याची सोय नायक यांनी
केली. तिथल्या पाद्रींची ओळख करून दिली, स्वामीजी दोन दिवस
रायतूरला सेमिनरीत राहिले, स्वामीजींनी त्या सेमिनरीतल्या
विद्यार्थ्यांची पण भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. आजही त्या लायब्ररीत
स्वामीजींचा फोटो लावला आहे.
 |
वाचनालय वेंगुर्ला
|
रायतूरच्या भेटीनंतर मडगावात
स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची जिकडे तिकडे चर्चा झाली. दूरदुरून पाद्री लोक तसेच
ख्रिश्चन समाजातील अनेक विद्वान, जज्ज,
बॅरिस्टर मडगावमध्ये त्यांना भेटायला येत. स्वामीजी फ्रेंच,
लॅटिन, इंग्रजी भाषेत त्यांना आपली अभ्यासपूर्ण मतं समजाऊन
सांगत. अशी अधिकारसंपन्न व्यक्ती सर्वजण प्रथमच पाहत होते,
हे बघून सगळीकडे त्यांचं कौतुक होत होतं. सुब्राय नायक यांनी तर स्वामीजींच्या गुण
गौरवासाठी श्री दामोदरच्या प्रांगणात मोठी सभा भरवली. याला लोक प्रचंड संख्येने
हजर होते. त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेला जाण्यासाठी स्वामीजींना शुभेच्छा
दिल्या. स्वामीजी वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयात ‘संचित,प्रारब्ध व क्रियामाण’ या विषयावर व्याख्यान द्यायला
पण गेले होते. वेंगुर्ला हे अरब,डच,
पोर्तुगीज या राजसत्तांनी निर्माण केलेलं महत्त्वाच व्यापारी बंदर होतं. इथे १६३८
मध्ये डच वखार होती. हा इतिहास जाणून घेण्यासाठी स्वामीजी प्रत्यक्ष तिथे गेल्याचे
दिसते.
 |
मंगेशी मंदिर
|
 |
म्हाळसा देवी मंदिर
|
गोवा येथील कवळ्याच्या
शांतादुर्गा मंदिरात त्यांनी काली मातेचं एक पद खड्या आवाजात म्हणून लोकांना
मंत्रमुग्ध केलं होतं. म्हाडदोळच्या म्हाळसादेवी पुढे सुंदर ख्याल गायन केलं, श्री मंगेशाच्या देवळात रागदारीतलं ध्रुपद गायन केलं.
 |
नायक यांच्या घरात लावलेला फोटो
|
असा भरगच्च कार्यक्रम गोवा इथं
पार पाडून स्वामीजी पुढच्या प्रवासासाठी धारवाडला जायला निघाले. तेंव्हा सुब्राय
नायकांबरोबर अनेक प्रतिष्ठित लोक, शेकडो नागरिक, कॅथॉलिक पाद्री निरोप द्यायला आले होते. निघण्यापूर्वी नायकांनी
स्वामीजींना एक फोटो काढून मागितला होता. हाच फोटो आज पण त्या दामोदर साल मध्ये
लावला आहे. ज्या खोलीत ते राहिले ती खोली, त्या वस्तु आज ही
नायकांच्या वारसांनी सुरक्षित जपून ठेवल्या आहेत. सुब्राय नायकांनी पुढे १९१०
मध्ये संन्यास घेतला आणि ते स्वामी सुब्रम्हण्यानंद तीर्थ म्हणून ओळखले जाऊ
लागले. (वेंगुर्ला व मडगाव येथील सर्व फोटो मी काढलेले आहेत बाकी इंटरनेटवरून साभार परत.)
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या
No comments:
Post a Comment