विचार–पुष्प, भाग -४१
परिव्राजक १९. कन्याकुमारी
स्वामीजी धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत.
महाराज चामराजेंद्र वडियार |
महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, यावर महाराजांनी आवश्यक ती सर्व मदत तत्काळ करण्याची तयारी दाखवली होती पण, स्वामीजींनी प्रत्येक वेळेसारखा इथेही नकार दिलेला दिसतो. तरीही महाराजांनी स्वामीजींनी त्यांच्या आवडीची भेटवस्तू आमच्या कडून घ्यावी याचा खूप आग्रह केला आणि बाजारात कारकूनाबरोबर एक हजार रुपये देऊन स्वामीजींबरोबर पाठविले. त्यामुळे स्वामीजी त्यांच्या कौतुकासाठी सर्व बाजार फिरले आणि त्यांना बरं वाटावं म्हणून एक सर्वात उत्तम सिगारेट घेतली. ती एक रुपयाची होती. ती तिथेच ओढून संपवली. असे हे निरिच्छ वृत्तीचे स्वामीजी राजेरजवाड्यात पाहुणचार घेत ठिकठिकाणी राहिले होते पण, तेंव्हाही त्यांच्या डोळ्यासमोर खेडोपाड्यातली दरिद्री जनता आणि राज्यकर्त्याकडून दीन दुबळ्या प्रजेचे काहीतरी कल्याण होईल एव्हढाच विचार असायचा.
म्हैसूर राजवाडा |
क्वचित एखादाच राजा हे करू शकतो असा त्यांचा अनुभव होता. त्यातलेच हे म्हैसूरचे महाराज होते.
त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्याट सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. महाराजांनी स्वामीजींची पाद्यपूजा कराची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी त्यांनी स्वामीजींचा आवाज एखादी आठवण म्हणून ध्वनीमुद्रित करून द्यावा अशी कल्पक मागणी केली. त्याला होकार दिला आणि त्या वेळच्या फोनोग्रामच्या तबकडीवर चार पाच मिनिटांचे बोलणे रेकॉर्ड करून घेतले. बर्याच वर्षांनंतर तो पुसट झाला. मग महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले.
त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्यांंचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत.
(असा स्पष्ट उल्लेख स्वामीजींच्या चरित्र ग्रंथात आहे).
कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.
सुंदरराम |
त्रिवेंद्रमला स्वामीजी सुंदरराम यांच्याकडे राहत असताना घरातील लहान, मोठे, नोकर, चाकर यांच्याशी पण मनमोकळे बोलत असत. एकदा, सुंदरराम यांचा चौदा वर्षांचा मुलगा रामस्वामी याला स्वामीजी म्हणाले, “तू अगदी तरुण आहेस,लहान आहेस. माझी फार इच्छा आहे की तू कधीतरी उपनिषदं, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता यांचा निष्ठापूर्वक अभ्यास कर. या तिन्हीना मिळून प्रस्थानत्रयी म्हणतात. त्याच बरोबर इतिहास पुराणाचा पण अभ्यास कर. या तोलामोलाचे ग्रंथ तुला सार्या जगात दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. कोणतीही गोष्ट कशामुळे निर्माण झाली, तिचं पर्यवसान कशात होणार, ती का अस्तित्वात आली आणि तिची दिशा कोणती? हे जाणून घेण्याची जिज्ञासा केवळ मानवप्राण्यातच असू शकते तिचा पूर्ण उपयोग करून घे”.
कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते.
कन्याकुमारी देवी |
स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरातील कालीमातेचं/जगन्मातेचं दर्शन घेऊन परिव्राजक म्हणून प्रवास सुरू केला तो आता कन्याकुमारी मंदिराच्या दर्शनाने संपणार होता.
या मंदिरात स्वामीजी गेले आणि कन्यारूपातील जगन्मातेचं दर्शन घेऊन बाहेर आले. तशी समोर लांबवर नजर गेली, दीड फर्लांग अंतरावर दोन प्रचंड शिलाखंड दिसले. आपल्याच भूमीवरच्या या शिलाखंडावर जायची त्यांना मनोमन इच्छा झाली. तिथे गेलो तर खर्याह अर्थाने मातृभूमीचे दक्षिण टोक आपण गाठले असा अर्थ होईल. म्हणून कसही करून त्या खडकांवर आपण जाव असं वाटून ते किनार्याअवर आले. जवळच होड्या होत्या. काही कोळी पण उभे होते. स्वामीजींनी चौकशी केली. त्या नावेतून खडकापर्यंत पोहोचविण्यास नावाडी तयार होते, फक्त पैसे द्यावे लागणार होते. स्वामीजी तर निष्कांचन होते. एक पैसा सुद्धा जवळ नव्हता. झळ त्यांनी त्या उंच लाटांमध्ये उडी घेतली पोहत पोहत जाऊन ते खडक गाठले. समुद्राला रोजचे सरावलेले असतांनाही नावाडी स्तब्धच झाले. लाटा उसळणार्याऊ तर होत्याच पण तिथे शार्क माशांपासून पण धोका होता हे त्यांना माहिती होतं. हे पाहून दोन तीन नावाडी पाठोपाठ गेले. सुखरूप पोहोचले हे बघून, त्यांना काही हवे का विचारले. आम्ही आणून देऊ असे सांगीतल्यावर थोडे दूध आणि काही शहाळी पुरेशी आहेत असे स्वामीजींनी सांगितले. स्वामीजी या शिलाखंडावर तीन दिवस, तीन रात्र राहिले.
लाटांच्या अखंड गंभीर नादाबरोबर स्वामीजींचे चिंतन सुरू झाले. कलकत्त्यातून बाहेर पडल्यापासुनचे सर्व दिवस, त्यात आलेले अनुभव, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. जगन्मातेचं ध्यान आणि भारत मातेचं चिंतन तीन दिवसात झालं.
प्रश्नचिन्ह – प्राचीन इतिहास असलेला हा विशाल देश, इतिहासाचे केव्हढे चढउतार, सार्याि जगाला हेवा वाटेल असे प्राचीन काळातील द्रष्ट्या ऋषीमुनींनी दिलेले आध्यात्मिक धन. पण तरीही आज भारत कसा आहे? त्याची अस्मिताच हरवलेली दिसत आहे. सगळ्या मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्यं पूर्वजांकडून लाभली आहेत तरीही त्यातल्या तत्वांचा त्याला विसर पडला आहे. अभिमान वाटावा असं भूतकाळाचा वारसा आहे पण वर्तमानात मात्र घोर दुर्दशा आहे. यातून समाजाचं तेज पुनः कसं प्रकाशात आणता येईल? अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती. उपाय शोधायचे होते.
आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल?त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ चिंतन करत होते.
आज या शिलाखंडावर विवेकानंद स्मारक उभे आहे |
प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. पण या दरिद्री देशात पैसे कुठून मिळणार? त्यांना आलेल्या अनुभवा नुसार धनवान मंडळी उदार नव्हती. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी. आता उरलेले आयुष्य भारतातल्या दीन दलितांच्या सेवेसाठी घालवायचे असा संकल्प स्वामीजींनी केला आणि शिलाखंडावरून ते परतले. तीन दिवस तीन रात्रीच्या चिंतनातून प्रश्नाचं उत्तर स्वामीजींना मिळालं होतं.
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या
playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk
या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा
No comments:
Post a Comment