Saturday, 1 August 2020

लोकशाहीर - अण्णा भाऊ साठे


                            लोकशाहीर - अण्णा भाऊ साठे
                 १ ऑगस्ट-  लोक शाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती! त्यानिमित्त लेख  

    
      साहित्यिकांच्या गावी जाऊन त्यांच्या साहित्याचा आनंद लुटण्याच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या संस्कार भारतीच्या साहित्य पर्यटन या अभिनव उपक्रमाचे दुसरे पर्व सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे,  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे विविध पैलू उलगडवून दाखवत संपन्न झाले. साहित्य पर्यटनासाठी साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे साहित्यिक निवडले आणि त्यांच्या साहित्याचे वाचनपर्व सुरू झाले. साहित्य पर्यटन संकल्पना सर्व वाचकांसाठी उपयुक्त ठरावी म्हणून काही नियम ठरविले होते. त्यातली पहिली अट होती, सहलीला येणार्‍या वाचकांनी या निवडलेल्या साहित्यिकाचे साहित्य वाचून येणे अनिवार्य आहे. त्यामुळेच हे साहित्य शोधून शोधून वाचता आले.एका साहित्यिकाची ओळख झाली. त्यावर कार्यक्रम बसवता आला. त्यांच्या कुटुंबीयांना भेटता आलं.

     
 

    संस्कार भारती चा साहित्य विधेचा हा प्रांतस्तरावरील कार्यक्रम मिरज आणि सांगली समितीने आयोजित केला होता. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध अंगांचा आढावा यावेळी घेण्यात आला.हा कार्यक्रम वाटेगाव इथल्या आण्णा भाऊ साठे सभागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. मोहन पाटील उपस्थित होते. त्याच बरोबर आण्णा भाऊ यांचे सहकरी असलेले सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तर आण्णा भाऊ साठे यांच्या सूनबाई सावित्री ताई साठे यासाठी दिवसभर वेळ काढून उपस्थित होत्या. तसेच त्यांचे इतर कुटुंबिय सुद्धा हजार होते.

        प्रा.मोहन पाटील यांनी, “अण्णाभाऊ साठे आपल्याला त्यांच्या साहित्यातून भावल्याचे सांगितले.जेमतेम अक्षर ओळख असलेल्या अण्णाभाऊ साठेंनी केलेली साहित्य निर्मिती अचंबित करणारी व समीक्षेच्या पलीकडची असल्याचे सांगून, ते म्हणाले,त्यावेळचे प्रथितयश लेखक, फडके, भावे, खांडेकर यांच्या परंपरेपेक्षा वेगळे साहित्य त्यांनी निर्माण केले.जन्मजात प्रतिभा लाभलेल्या आण्णाभाऊंनी स्वतः अनुभवलेल्या वास्तवातून व सामान्य माणसाला समोर ठेऊन केलेले लेखन हे अस्सल ग्रामीण होते. परंतु दलित साहित्याने त्यांच्या जिवंत शिल्पे साकारणाऱ्या साहित्याची दाखल न घेतल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र मानवी मूल्ये जपणारे त्यांचे सुंदर ‘कोलाज’ सारखे साहित्य सदैव चिरंतन राहील असे गौरवोद्गार त्यांनी काढले”.
  
    यावेळी अण्णाभाऊंच्या लोकनाट्य,पोवाडा,कथा,कादंबऱ्या या साहित्याचे प्रातिनिधिक स्वरुपात सादरीकरण करण्यात आले.  स्मशानातले सोने आणि इतर कथांचे वाचन  शेटजीचे इलेक्शन’ या लोकनाट्याचे वाचन , ‘अण्णाभाऊंचा रशिया प्रवास’ , तर अण्णाभाऊंच्या सात कादंबऱ्यांवर आधारित गाजलेल्या फकीरा, वैजयंता, वारणेचा वाघ, टिळा लाविते मी रक्ताचा अशा विविध चित्रपटांचा आढावा ,‘माझी मैना गावाकडं राहिली’ हि छक्कड आणि ‘जग बदल घालूनी गाव’हा पोवाडा सादर केला. अण्णाभाऊ यांचे राहते घर व त्यांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी ला साहित्यप्रेमींनी भेट दिली.
 , वाटेगाव मधील मान्यवर, मिरज, सांगली, पुणे,चिंचवड, कोल्हापूर, ईश्वरपूर येथील रसिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.
    
    या उपक्रमानिमित्त वाचकांना आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची ओळख झाली. तर नियोजन करणार्‍या व सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना, कलाकारांना आण्णा भाऊ साठे यांचे साहित्य शोधून ते वाचावे लागले, समजून घ्यावे लागले. सुरूवातीला मुख्य अडचण आली की त्यांचे साहित्य जवळ जवळ शंभर वर्षे जुनं. त्यामुळे ग्रंथालयात सुद्धा मिळाले नाही. दुकानात तर नव्हतेच. पुणे नगर वाचन मंदिरात मात्र खूप सहकार्य मिळाले आणि ही दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून देऊन त्याच्या झेरॉक्स मिळाल्या.
   
    हे वाचत असताना या साहित्याचा आढावा घेतला. आण्णा भाऊ यांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. पोवाडा व लावणी याने तर लोकांना वेड लावले. याच्या नावावरूनच म्हणजे, महाराष्ट्राची परंपरा, स्टॅलिन ग्राडचा पोवाडा, मुंबईचा गिरणी कामगार, पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक, मुंबईची लावणी यावरून त्यांच्या साहित्यात सामाजिक जाणीव दिसते.तसेच त्यांनी गितं ,कथा कादंबरी, प्रवास वर्णन नाटक , लोकनाट्य अशा साहित्याची निर्मिती केली. यातील विषय वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी याच सुत्रावर आधारित होते.
आण्णा भाऊ म्हणतात, “जुन्या चालीरीती दूर कराव्या आणि जुन्या पण लोप पावलेल्या प्रगत प्रथांना पुन्हा पुढे आणावं. हेवेदावे, दुष्टावे, वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि या नव महाराष्ट्रात प्रेम सलोखा यांची वाढ व्हावी,जनता सुखी व संपन्न व्हावी आणि महाराष्ट्रात विषमता नष्ट झालेली नी समजसत्ता वादाचा अरुणोदय झालेला आपण पहावा अशी श्रद्धा हृदयात घेऊन मी लिहितो”. त्या काळात असलेल्या परिस्थितीवर आण्णा भाऊ यांचे लिखाण होते. त्यांचं म्हणणं होतं की, “मी जे जीवन जगतो,जगत आहे नी अनुभवले आहे, तेच मी लिहितो. माझी माणसं मला कुठे ना कुठे भेटलेली असतात. त्यांचा जगणं मरणं मला ठाऊक असतं”. खरंच कोणत्याही लेखकाचे त्याच्या साहित्यातील भाष्य हे त्या वेळचा इतिहास असतो.

    त्यांनी लिहीलेल्या लोकनाट्याचे विषय पण समाज प्रबोधन करणारे होते. शेटजीचे इलेक्शन ,  बेकायदेशीर’, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?’,’लोकमंत्र्याचा दौरा’, पुढारी मिळाला या लोकनाट्यातून त्यांनी स्वत: घेतलेला व अनुभवलेला विषय मांडला आणि जागृती केली. समाजातील  व्यवहारची भाषा त्यांनी अवगत केली. त्यातूनच धडे घेतले आणि लोकांपुढे ठेवले.

    वाटेगावहून ते मुंबईत आले. खूप कष्टाची कामे त्यांनी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख यांच्या बरोबर तर आपल्या पोवड्यांनी महाराष्ट्र गाजवला.वस्तुस्थिति अशी होती की, त्यांच्या समाजातून  वैचारिक वा शैक्षणिक वारसा नव्हता. पण ढोलकी तुणतुणे आणि तमाशा याची परंपरा वारश्याने होती.त्यामुळे आण्णा भाऊंनी कलेच्या माध्यमातून आपली प्रतिभा फुलवली. तिला एक आकार दिला. मुंबईत ते माटुंगा लेबर कॅम्प मध्ये राहत होते, तिथे कम्युनिस्ट चळवळीत सामील झाले. त्यामुळे त्या वातावरणात ते वाढत होते.
  
    एकदा घडलेली गोष्ट,  कॅम्पच्या नाक्यावर इराण्याचे हॉटेल होते तिथे परिसरात खूप डास झाले होते. गमतीने आण्णा भाऊंनी त्यावर एक पोवाडा लिहिला. आणि तो कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना ऐकविला. तो ऐकून सगळे कार्यकर्ते प्रभावित झाले. आण्णा भाऊंचे शब्दांचे सामर्थ्य ओळखून कार्यकर्त्यांनी त्यांना कलापथकात घेतले. कम्युनिस्ट कार्यकर्ते आण्णा भाऊंना लिहिते करण्यासाठी मागे लागत . आण्णा भाऊंनी  गण लिहावा म्हणून मागे लागले, “गण लिहून दिला तर पाच रुपये बक्षीस देईन” असे सांगून त्यांच्याकडून प्रथम मायभूच्या चरणा हा गण लिहून घेतला. तर पुढची पायरी म्हणजे, आता , “तू वगनाट्य लिहिलेस तर तुला नवीन शर्ट आणि लेंगा शिवून देईन” असे कॉम्रेड पगारे यांनी सांगितले.मग एक कथा ठरवून आण्णा भाऊंनी अकलेची गोष्ट हा वग लिहिला.१९४५ च्या सुमारास. त्याचा प्रयोग परळ च्या दळवी बिल्डिंग मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झाला.उपस्थित सर्वजण खूप प्रभावित झाले. मग इप्टा चे आंदोलन, लालबावटा कलापथकाची स्थापना यातून आण्णा भाऊंचे विविध पैलू व्यक्तिमत्व तयार होत गेले.

    जीवनात सुरूवातीला वारणेच्या खोर्‍यात वाढलेले आण्णा भाऊ, मग मुंबईसारख्या शहरात वाढलेले व घडलेले आण्णा भाऊ, मग एक विचारधारा स्वीकारून पददलित जनतेसाठी लेखणीतून प्रकाश टाकणारे आण्णा भाऊ ,शोषित जनतेवर फकिरा सारखी कादंबरी लिहिणारे आण्णा भाऊ असे घडत गेले. त्यांनी चित्रा, माकडीचा माळ, संघर्ष, वैजयंता या गाजलेल्या कादंबरी लिहिल्या. त्यांच्या वैजयंता कादंबरीवर- वैजयंता चित्रपट,आवडी वर- टिळा लविते मी रक्ताचा ,माकडीचा माळ यावर डोंगरची मैना तर,चिखलतील कमळ- या कादंबरीवर मुरली मल्हारी रायाची,वारणेचा वाघ यावर वारणेचा वाघ, अलगुज कादंबरीवर अशी ही सातार्‍याची तर्‍हा,आणि फकिरा वर फकिरा असे चित्रपट निघाले. ते सर्व गाजले. इतके हे साहित्य कसदार होते. या चित्रपटांना गजानन जहागीरदार, वसंत पेंटर, अनंत माने, गोविंद कुलकर्णी, दत्ताराम गायकवाड, मुरलीधर कापडी, कुमार चंद्रशेखर असे दिग्दर्शक लाभले. त्याचे गीतकार म्हणून, ग.दि.माडगुळकर, जगदीश खेबुडकर, हे दिग्गज कवी लाभले. वसंत कदम, राम कदम, प्रभाकर जोग, विश्वनाथ मोरे, राम वढावकर या संगीतकारांनी चित्रपटाला संगीत देण्याचं काम केले. वारणेचा वाघ, वैजयंता आणि अशी ही सातार्‍याची तर्‍हा या तर पुरस्कार प्राप्त कलाकृती ठरल्या. चित्रा या कादंबरीचे कन्नड, रशियन, पोलिश भाषेत भाषांतर झालं आहे. वारणेच्या खोर्‍यात चे गुजराथीत भाषांतर झाले आहे . तर, फकिरा कादंबरी हिन्दी आणि पंजाबी भाषेत खूप गाजली.

  आण्णा भाऊंच्या साहित्यात स्त्रियांचं दर्शन  होतं ते दारिद्र्याशी झुंजणारी ,नवरा, मुलं, आणि कुटुंबावर मनापासून प्रेम करणारी, गरिबीशी चिवटपणे तोंड देणारी, बाणेदार, धाडसी. तर वेळप्रसंगी न्याय मिळवण्यासाठी हातात हत्यार घेणारी अशी क्रांतिकारक स्त्री दिसते.मंगला कादंबरी मध्ये वारणेच्या खोर्‍यात स्वातंत्र्य लढ्यातील कारवायात मंगला या घरंदाज स्त्रीला आलेले कटू अनुभव आणि त्याला तिचं सामोरे जाणं हे  चित्रण आहे. तमाशातील  नायीकांचे चित्रण रानमेवा यात केलं आहे.संघर्ष कादंबरीत स्त्रियांच्या गुणदोषांवर, पण भारत पाकिस्तान युद्धावर असल्याने,देशभक्त प्रियकरासाठी सर्वस्व अर्पण करणारी नायिका सुलभा आहे. तर अग्निदिव्या मधली चंद्रा करारी आणि लढवय्यी दाखवली आहे.             

     बरबादया कंजारी, मरिआईचा गाडा, रक्ताचा टिळा, स्मशांनातील सोनं, भुताचा मळा, जोगीण, तमासगीर अशी अनेक कथारूपे लिहिली. वि. स. खांडेकर त्यांचा या कथां विषयी लिहितात, “झणझणीत पण फक्कड कांद्याच्या पिठल्याला जी रुची असते तास काहीतरी आण्णा भाऊंच्या कथा वाचून वाटतं. समाजाच्या तळाच्या थरांतली माणसं, घटना आणि जीवन हे सारं आण्णाभाऊंनी अनुभवलं आहे. माझ्यासारखे पांढरपेशे लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीत टाकलेल्या आरामखुर्चीतून बाहेरचं जीवन अनुभवतात, तसं आण्णा भाऊंचं नाही. या थरातच त्यांचा जन्म झाला. टीपकागद जसा झटकन ओली अक्षरे टिपतो, त्याप्रमाणे लहानपणापासून खेडेगावातील दलितांच्या आयुष्यातील आसवं आण्णा भाऊंच्या कलावंत मनाने टिपून घेतली आहेत. नुसती आसवंच नाहीत, तर त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे राग-लोभ, सारं काही त्यांनी आत्मसात केलं आहे. या सार्‍या अनुभवातून त्यांच्या कथा निर्माण झाल्या आहेत”.

   आण्णा भाऊंनी १९४९ साली मशाल साप्ताहिकात माझी दिवाळी ही पहिली कथा लिहिली. आणि मग एका मागून एक कथासंग्रह प्रसिद्ध होऊ लागले.यातून मराठी मातीतल्या रांगड्या जीवनाचे मतांचे, मनाचे आणि मातीचेही सत्यचित्र रेखाटले .या कथा जगण्यासाठी लढणार्‍या माणसांच्या कथा होत्या.          

 इनामदार हे नाटक त्यांचेच. त्यांनी प्रवासवर्णन लिहिले. माझा रशियाचा प्रवास यात परदेश वारीचा सुंदर अनुभव त्यांनी लिहिला आहे.

     आण्णा भाऊंच्या साहित्यात मराठी संस्कृती,चालीरीती, वाडा संस्कृती व बड्यांच्या दहशती, तिथली पडदा पद्धत, पडद्याआड घुसमटलेल्या स्त्रीचे अश्रु, अब्रू रक्षणासाठी तिने दिलेली शर्थीची झुंज, असे सर्व गुण, दोष मर्यादा, वैभव, दारिद्र्य, सामर्थ्य याचं अस्सल दर्शन साहित्यातून आपल्याला वाचायला मिळतं.
समाजाचे हे त्यांच्या साहित्यातील जीवन ओळखीचे झालेच पण त्यांचे कुटुंबीय पण ओळखीचे झाले. त्यांच्या घरी भेट देता आली. ते सर्व दिवसभर आमच्याबरोबर राहिले.
अशा या साहित्य पर्यटन संकल्पने मुळे येणार्‍या वाचकांची साहित्यिकाशी अशी ओळख होते आणि मन समाधानाने भरून पावतं .

©  डॉ. नयना कासखेडीकर, पुणे . (साहित्य विधा पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख,संस्कार भारती)

1 comment: