Tuesday, 25 August 2020

विचार–पुष्प .भाग – ४२

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

                                       विचार–पुष्प .भाग – ४२ 

                                      सर्वधर्म परिषदेची तयारी
    संपूर्ण भारत भ्रमण करताना स्वामी विवेकानंद यांनी सत्ताधीशांपासून अगदी गरीब माणसापर्यंतचा भारत उघड्या डोळ्यांनी पाहिला. कान उघडे ठेऊन, त्यासर्वांशी त्यांच्या पातळीवरून संवाद साधला. हे सर्व अनुभव यायला वराहनगर मठ सोडून तीन साडेतीन वर्षाचा काळ मध्ये गेला होता. उघड्या आकाशाखाली आणि भव्य समुद्राने घेरलेल्या शिला खंडावर तीन दिवस तीन रात्री राहून चौथ्या दिवशी सकाळी नावेतून काही लोकांबरोबर स्वामीजी किनार्‍यावर परत आले. त्यांच्या भोवती गोळा झालेल्या लोकांनी त्यांना विचारलं, “तीन दिवस आपण त्या खडकावर कशासाठी ध्यानस्थ बसला होता? स्वामीजींनी त्यांना, आपण श्रीरामकृष्ण यांचे शिष्य आहोत हे सांगून, “गेली दोन अडीच वर्षे देशभर फिरत होतो, माझं मनही अनेक विषयांचा विचार करीत होतं. ज्या प्रश्नाचा शोध या सार्‍या भ्रमंतीत मी घेत होतो, त्याचं उत्तर मला त्या खडकावर मिळालं”. हे सांगितलं. स्वामीजींच्या जीवनातली ही सर्वात मोठी घटना होती. आज कन्याकुमारीच्या समुद्रातल्या त्या शिलाखंडाहून चिंतन करून उठलेले स्वामीजी आणि कलकत्त्याहून बाहेर पडलेले स्वामीजी ही दोन रूपं वेगळी होती. हे आतापर्यंतच्या प्रसंगावरून आपल्याला जाणवतेच.

                                    

   अध्यात्माबरोबरच त्यांच्यातल्या देशभक्तीचा विचार भ्रमण काळात पक्का होत गेला. खरं तर भारत देश पारतंत्र्यात होता, अन्याय अत्याचारांचा सामना करत होता. त्यासाठी अनेक चळवळी सुरू होत्या. पण स्वामीजींच्या मते ही अवस्था तात्पुरती असून आज ना उद्या संपेलच. पण, सर्वसामान्य जनतेची झालेली आजपर्यंतची उपेक्षा थांबवणं हे जास्त महत्वाचं वाटत होतं. त्यांच्या दृष्टीने इंग्रजी सत्ता हे याचं कारण नव्हतं. या उपेक्षेला त्यांच्या दृष्टीने समाजच जबाबदार होता.

आलसिंगा पेरूमाल 

  बेळगावच्या भेटीपासून त्यांचा रामेश्वर इथं जायचा विचार होता तो त्यांनी वेळोवेळी सांगितला होता. कन्याकुमारीहून ते रामेश्वर इथं जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेऊन मनाशी केलेला संकल्प पूर्ण केला. तिथून ते पॉन्डिचरीला गेले. तिथे मन्मथनाथ भट्टाचार्य कामानिमित्त आलेले होते. त्यांच्याकडे स्वामीजी थांबले. त्यानंतर काम आटोपून दोघेही मद्रासला परतले, त्यांना घ्यायला मद्रास स्टेशनवर अलसिंगा पेरूमाल आणि त्यांचे मित्र आणि मन्मथनाथांच्या ओळखीचे  काही उच्चशिक्षित स्वागतासाठी हजर होते. दीड महिना स्वामीजी मद्रासला राहिले पण हे वास्तव्य त्यांना भविष्यातल्या कार्यारंभासाठी खूप महत्वाचे ठरले. त्यांना ह्या कामाला मदत करणारी माणसे प्रथम मद्रासलाच मिळाली. ती झोकून देऊन काम करणारी होती.

मद्रासला अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होत होती, भेटी होत होत्या. श्रोत्यांवर त्याचा प्रभाव पडून तरुण वर्ग आकर्षित होत होता. प्रौढ आणि उच्च शिक्षित वर्ग ही आकृष्ट होत होता. तिथल्या एका साप्ताहिकात स्वामीजीन बद्दल लिहून आले. अशी प्रसिद्धी पहिल्यांदाच त्यांना मिळाली होती. एका ठिकाणी त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यात तर त्यांना, वैदिक धर्माचे स्वरूप, हिंदुधर्मानुसार आदर्श मानवी जीवन, स्त्रीशिक्षण, श्राद्धासारखे धार्मिक विधी, यावरही प्रश्न विचारले लोकांनी. त्यांच्या कडून ऐकलेल्या विचारांच्या प्रकाशात पुढचे आयुष्य चालत राहण्याची जिद्द असणारे तरुण स्वामीजींना मद्रासला भेटले. त्यांना इथे अनुयायी मिळाले. केलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीचे पहिले पाऊल मद्रासला पडले होते. त्याला निमित्त झाले होते मन्मथबाबू भट्टाचार्य आणि आलसिंगा पेरूमाल.मंडम चक्रवर्ती आळसिंगा पेरूमाल हे त्यांचं नाव .

      म्हैसूरचे असलेले आलसिंगा पेरूमाल मद्रासला एका शाळेचे मुख्याध्यापक होते. वेदांताचे अनुयायी आणि कट्टर वैष्णवपंथी. गरीबी असली तरी ध्येयवादा मध्ये ती आली नाही. त्यांनी मुख्याध्यापक असूनसुद्धा स्वामीजींना अमेरिकेत जाता यावे म्हणून दारोदार फिरून पंचवीस पैशांपासून सामान्य लोकांकडून वर्गणी गोळा केली होती, आयुष्यात काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते, ते स्वामीजींची भेट झाल्यावर त्याला दिशा मिळाली होती. अलसिंगांनी घेतलेल्या कष्टामुळे स्वामीजी अमेरिकेत जाऊ शकले.

    स्वामीजींचा मद्रासला असा मोठा जनसंपर्क झाला होता. ही ख्याती हैदराबादला जाऊन पोहोचली होती. आणि स्वामीजींनी हैदराबादला भेट द्यावी असे एक पत्र आल्याने स्वामीजींनी ते निमंत्रण स्वीकारलं. कमी वेळात इतकी सूत्र हलली, की हैदराबाद स्टेशन वर स्वामीजींना घ्यायला पाचशे माणसे आली होती. दुसर्‍या दिवशी सिकंद्राबादहून शंभर जण भेटायला आली आणि “आमच्या कॉलेज मध्ये एक प्रकट व्याख्यान द्यावे” असा आग्रह केला. विषय होता, पाश्चात्य देशात जाण्यातील माझा उद्देश’. या व्याख्यानाला हजार श्रोते उपस्थित होते. स्वामीजींच्या विवेचनात उदात्तता होती, तात्विक चिंतन होते, देशप्रेम होते, आपल्या मातृभूमीचं पुनरुत्थान आणि वेदवेदांन्तातील उत्कृष्ट तत्वे पाश्चात्य जगासमोर ठेवावीत अशी एक भारतीय धर्मप्रवक्ता म्हणून अमेरिकेला जाण्याची आपली भूमिका आहे, असे या व्याख्यानात स्वामीजींनी सांगितले. इथे दहा बारा दिवस ते राहिले. नुकतीच ते वयाची तिशी पूर्ण करत होते. हैद्राबादला पण सार्वजनिक व्यासपीठावर ते पहिल्यांदाच बोलले होते. सर्वा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी त्यांना आदराची वागणूक दिली. त्यांच्या विचारांचे स्वागत केले. ते पुन्हा मद्रासला परतले.

    अमेरिकेला जाण्याच्या संकल्पाला अजून श्री रामकृष्णांचा आदेश मिळत नव्हता, तोपर्यंत त्यांचे निश्चित होत नव्हते. त्यातच एक घटना घडली. त्यांना एकदा रात्री स्वप्न पडलं की आपल्या आईचं निधन झालं. त्यांना आईबद्दल खूप आदर आणि प्रेम होतं. पण घरदार सोडून आल्यामुळे आणि प्रपंचाच्या गोष्टीत अडकू नये म्हणून ते संपर्क ठेवत नसत. पत्रही पाठवत नसत. मन दोलायमान झाले, कलकत्त्याहून काहीतरी कळणे आवश्यक होते. हे त्यांनी मन्मथबाबूंना सांगितलं. मन्मथबाबूंनी मनाचे समाधान व्हावे म्हणून स्वामीजींना एका भविष्य सांगणार्‍या व्यक्तीकडे नेले. त्या सिद्ध माणसाने स्वामीजीची पूर्ण माहिती सांगीतली, धर्मोपदेशाच्या कामासाठी तुम्ही लवकरच कुठेतरी दूरदेशी जाल, तुमच्या बरोबर सतत तुमचे गुरु असतील आणि आई बद्दल विचारले आई कुशल आहे हे ही सांगीतले आणि स्वामीजींचा जीव भांड्यात पडला. मन हलक झालं. थोड्याच वेळात कलकत्त्याहून तार आली, भुवनेश्वरीदेवी कुशल आहेत. मनाचा वारू कसा धावत असतो. संवेदनशील मनात किती आणि कसे विचार येत असतात. त्याचा परिणाम कसा होतो हे स्वामीजींच्या या घटनेवरून दिसतो. हा एव्हढा उद्योग ते देशातील लोकांसाठी करत होते पण आई, जन्मदात्री माता, तिचं स्थान हृदयामध्ये कायम असतं. तिचा विसर जराही पडला नव्हता. हीच ती भारतीय मूल्यं. आज याची पण शिकवण गरजेची आहे.     

गुरुमाता सारदा देवी 
आई भुवनेश्वरी देवी 

  आता मन निश्चिंत झालं होतं. दूर जायचे तर गुरुमाता श्री सारदादेवींचा आशीर्वाद घेणं पण आवश्यक होतं. माताजींना पत्र लिहून आशीर्वाद मागितला. अमेरिकेला जाण्याचा संकल्प कळवला. त्यांनी आशीर्वादाचे पत्र पाठवले. हे पत्र मिळाले आणि स्वामीजीचे मन हर्षभरीत झाले. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. कोणाला कळू नये म्हणून स्वामीजी समुद्रावर एकटेच गेले आणि मन शांत झाल्यावर परत आले. तोवर सर्व भक्तगण जमा झाले होते. “माताजींनी आशीर्वाद दिला आहे, आता कोणतीही अडचण नाही. निर्णय ठरला. मी सर्वधर्म परिषदेला अमेरिकेस जाणार”हे जाहीर केले. अनुयायी तर खूप खुश झाले. निधि संकलन कामाला जोरात सुरुवात झाली. आता एकदम दिशाच बदलून गेली. उत्साहाचे वातावरण तयार झाले. पैसे गोळा करण्याचा प्रयत्न अलसिंगा यांच्या पुढाकाराने जोरदार सुरू झाला.

    एक दिवस अचानक खेतडीचे महाराज राजा अजितसिंग आणि त्यांचे सचिव जगमोहनलाल स्वामीजींना भेटायला दत्त म्हणून हजर.अजितसिंग यांना मुलगा झाला होता आणि त्याप्रीत्यर्थ त्यांनी एक समारंभ ठेवला होता. त्यासाठी स्वामीजींना आमंत्रण द्यायला स्वत: आले होते.पण आपण ३१ मेला अमेरिकेला जाण्याच्या गडबडीत आहोत त्यामुळे शक्य नाही होणार असे स्वामीजींनी सांगीतले, जगमोहनलाल यांनी आपण एक दिवस तरी यावे असा आग्रह केला आणि आपण पश्चिमेकडे जाणार आहात हे महाराजांना खूप आवडले आहे. जो काही पैसा लागेल तो महाराज व्यवस्था करतील, आपण फक्त चलावे असे म्हटले.

    आतपर्यंत म्हैसूर बंगलोर, हैद्राबाद इथून काही पैसे गोळा झाले होते.म्हैसूरच्या राजांनी पण मोठी रक्कम दिली. स्वामीजींचा खेतडीला जाण्याचं बेत ठरला आता पैसे गोळा करण्याचे प्रयत्न कराची आवश्यकता नव्हती. अलसिंगा आनंदित झाले, स्वामीजींची आर्थिक सोय पूर्ण होणार होती. स्वामीजी सर्वांचा निरोप घेऊन जगमोहनलाल यांच्या बरोबर खेतडीला निघाले. मुंबईहून जहाजाने अमेरिकेला निघण्याचे आधीच ठरले होते. त्यासाठी मुंबईत काही तयारीसाठी स्वामीजी थांबले. तिथे ब्रम्हानंद, तुरीयानंद यांची भेट झाली.स्वामीजींच्या जाण्याची बातमी सगळीकडे पोहोचली.

    स्वामीजी खेतडीला समारंभाला पोहोचले. समारंभ थाटामाटात पार पडला. स्वामीजींनी नव्या युवराजांना  आशीर्वाद दिले. या मुक्कामात आणि याआधीही स्वामीजींच्या महाराजांशी घरगुती गप्पा पण व्हायच्या. श्रीरामकृष्ण यांची समाधी घरदारचे पाश तोडून बाहेर पडणे हा इतिहास महाराजांना माहिती होतं. संन्यास घेतला तरी मनाच्या कोपर्‍यात भावंडांची काळजी, आईची मनाची चिंता आणि त्यांचे कसे चालले आहे याचं शल्य त्यांना बोचत होतं हे महाराजांना माहिती होतं. बोलता बोलता मद्रासला आताच पडलेल स्वप्न कदाचित महाराजांना स्वामीजींनी संगितले असेल, महाराज अजितसिंग यांचं मनही द्रवलं. स्वामीजींचे मन किती पोळत असेल या विचारांनी असं अजितसिंग यांच्याही मनात आलं. त्यांनी स्वामीजींना आश्वस्त केलं, “मी तुमच्या मातोश्रींना दरमहा शंभर रुपये पाठवत जाईन. आपण ही चिंता मनातून काढून टाका”. हे उत्स्फूर्त बोलणे ऐकून क्षणभर स्वामीजी आनंदित झाले. नरेंद्रने घर सोडल्यावर सात वर्षानी ही अडचण दूर होणार होती.तेही अजितसिंग यांच्या औदार्यामुळे. पुढे स्वामीजींनी त्यांना पत्र पाठवून म्हटले आहे की, मी जो काही आज या जगत आहे तो तुम्ही केलेल्या सहाय्यामुळे आहे. एका घोर चिंतेतून मुक्त होणं हे मला तुमच्यामुळे शक्य झाले. त्यामुळे मी जगाला सामोरे जाऊ शकलो. ही मदत अजितसिंग यांच्याकडून १९०१ पर्यन्त त्यांचे निधन होईपर्यंत शंभर रुपये दरमहा मिळत होते. त्यामुळे स्वामीजींची खेतडीची ही भेट महत्वाचीच ठरली होती.  

स्वामीजींची सर्व व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी जगमोहनलाला यांना त्यांच्या बरोबर मुंबईला पाठवले होते. अमेरिकेला जाताना, अंगावर गुढग्यापर्यन्त पोहोचणारा रेशमी झुळझुळीत भगव्या रंगाचा झगा, कमरेभोवती गुंडाळलेला तशाच रंगाच्या कापडाचा आडवा पट्टा, आणि मस्तकावर केशरी रंगाचा फेटा, हा विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारा वेष, ही राजा अजितसिंग यांनी दिलेली एक राजेशाही देणगी होती आणि विविदिशानंद चे स्वामी विवेकानंद हे नाव सुद्धा खेतडीच्या अजितसिंगानीच अमेरिकेला जाताना बदलायला लावले होतं.   

मुंबईला मद्रासहून आलसिंगा आले होते, मुंबईला जगमोहनलाल यांनी बाजारात नेऊन स्वामीजींना झगा आणि फेटा यासाठी उत्तम भारीपैकी रेशमी कापड घेतलेतसेच तुम्ही महाराजांचे गुरु आहात महाराजांना शोभेल अशा राजेशाही थाटात तुमचा प्रवास झाला पाहिजे.म्हणून जहाजाचे आधीचे दुसर्‍या वर्गाचे तिकीट बदलून त्यांनी पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. आपल्या गुरुच्या व्यवस्थेत काहीही कमी पडू दिले नाही महाराजांनी .

   ३१ मे या दिवशी विवेकानंद यांनी मुंबई सोडली.पी अँड ओ कंपनीच्या पेनिन्शूलर जहाजातून ते जाणार होते. थेट जहाजपर्यंत सोडायला अलसिंगा आणि जगमोहनलाल गेले होते. भोंगा वाजला, दोघांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला. दोघांच्याही डोळ्यात आसवं तरळली. स्वामीजी अखेर अमेरिकेला निघाले हे पाहून अलसिंगांना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान झाले. जहाजाने किनारा सोडला. विवेकानंदांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा मागे पडला होता आणि जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.      

© डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

 

No comments:

Post a Comment