Monday, 24 August 2020

हलधारी बलराम

हलधारी बलराम 

श्रीकृष्ण आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करतो आहे गेली अनेक वर्षे. त्याच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण त्याचा भाऊ बलराम याबद्दल फारशी माहिती नाही. यदू कुळात जन्मलेला बलराम म्हणजेच बलभद्र हा कृष्णाचा मोठा (सावत्र) भाऊ. कृष्णाला विष्णुचा अवतार, तर बलरामला शेषनाग अवतार मानले जाते. दोन्ही भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. प्रत्येक अडचण आणि संकटाच्या वेळी श्रीकृष्णाच्या बरोबर बलराम असायचा.बलरामाची हलधर, हलायुध, आणि संकर्षण ही नावे पण आहेत. बलरामाला सात सख्खे भाऊ आणि एक बहीण सुभद्रा होती. त्याची पत्नी रेवती. रेवती ही रेवत राजाची कन्या होती. बलरामाच्या शक्तीच्या अनेक आख्यायिका आहेत. बलवानांमधला तो सर्व शक्तिवान होता म्हणून त्याला बलभद्र पण म्हणतात. लहानपणापासूनच तो शांत आणि गंभीर वृत्तीचा होता. कृष्ण त्याचा सदैव आदर करत असे.
Add caption

महाभारतातील युद्धात काहीजण सामील झाले नव्हते त्यात बलराम हा सुद्धा एक होता. 

उत्तरेत बलरामाला बलदाऊ म्हणतात. बलदाऊ शक्तीशाली होता.नांगर हे बलरामाचे हत्यार असून खांद्यावर घेऊन तो हिंडत असे. त्याचा पराक्रम पुराणातल्या अनेक कथांमध्ये वर्णन केला आहे. त्याने जरासंधला अनेक वेळा पराजित केले होते. तो गदा युद्धात विशेष प्रवीण होता. शिवाय तो उत्तम कुस्तीपटू होता आणि मुष्टियुद्धातही तरबेज होता. कंसाच्या तालमीमध्ये कृष्णाने चाण्णूरला तर बलरामाने मुष्टिकाला ठोसे मारून ठार मारले होते. त्याने अनेक लढाया लढल्या होत्या. दुर्योधन त्याचा शिष्य होता. महाभारताच्या युद्धात कृष्णाने विनंती करूनही त्याने भाग घेतला नाही, कारण त्याच्या मते, दुर्योधन आणि अर्जुन आमचे चांगले मित्र आहेत.अशा धर्म संकटावेळी दोघांचीही बाजू न घेणंच उत्तम.

एकदा युद्धाची तयारी चालू असताना एक दिवस बलराम पांडवांच्या छावणीत अचानक पोहोचले. दाऊभैय्याला पाहून श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर आनंदीत झाले. सर्वांनी त्यांना वंदन केले. बलराम धर्मराजाच्या जवळ बसले आणि दु:खी अंतकरणाने म्हणाले, मी किती वेळा कृष्णाला सांगितलं की, पांडव आणि कौरव दोन्हीही आम्हाला सारखेच आहेत. दोघांनीही मूर्खपणा करायचे ठरवले आहे. त्यात आपल्याला पडायची आवश्यकता नाही. पण कृष्ण माझं ऐकेल तर ना? कृष्णाचं अर्जुनावर इतकं प्रेम आहे की तो कौरवांच्या विरुद्ध बाजूने लढणार आहे. आता ज्या पक्षात कृष्ण आहे त्याच्या विरुद्ध पक्षात मी कसा जाऊ? भीम आणि दुर्योधन या दोघांनीही माझ्याकडूनच तर गदा शिकली आहे. दोघेही माझे शिष्य आहेत. दोघांवरही माझे सारखेच प्रेम आहे. या दोघा कुरुवंशाचे आपसात लढणे मला मनाला पटत नाही. त्यामुळे मी तीर्थयात्रेला चाललोय.असे सांगून तो युद्ध सुरू होण्यापूर्वीच तीर्थयात्रेला निघून गेला. 

आपापसातील यादवीमुळे यदूवंशाचा नाश झाला तेंव्हा बलरामाने आपला अवतार संपवला असे म्हणतात. मथुरेजवळ बलदेव शहरात, बलरामाचे मंदिर आहे.मथुरेमध्ये हे सर्वात प्राचीन असे वल्लभ संप्रदायचे मंदिर मानले जाते. ते यमुनेच्या काठावर वसले आहे. या गावात बलदेवाचे राज्य होते, त्याचे शासन होते. त्यामुळे मथुरा आणि आसपासच्या गावात त्याला दाऊजी पण म्हटले जाते. त्या मंदिरात भगवान बलदेव आणि रेवतीची मूर्ती आहे. असं म्हणतात की, त्या मूर्ती इ.स. १५८० च्या आसपास तयार केल्या गेल्या. तिथेच बलभद्र सरोवर पण आहे. दर मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठा उत्सव भरतो.इथे होळी (हुरंगा)आणि दीपावली तसेच गुरु पौर्णिमा उत्साहाने साजरे केले जातात. 

ओरिसा राज्यातील पुरी येथे मोठा रथयात्रेचा ऊत्सव साजरा केला जातो.भारतातले हे एक प्रसिद्धमंदिर आहे. लाखो भाविक येथे यात्रेच्या वेळी येतात. आणि जगन्नाथाचे दर्शन घेतात. जगन्नाथपुरी च्या त्रिमूर्ति मधे कृष्ण, सुभद्रा आणि बलराम तिघेही विराजमान असतात. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयाच्या दिवशी रथयात्रा सुरू होते. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ती नीमवृक्षाच्या लकडापासून बनवली जाते. विविध रंग, फुलाने, रत्न, दागिन्याने सजवले जाते. पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी ओडिशाच्या पुरी इथं असलेल्या जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते. हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव असतो. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा संपन्न होते.
जगन्नाथ मंदिर देशातील चार धाम पैकी एक आहे. भगवान जगन्नाथची रथयात्रा जगन्नाथपुरी येथे आषाढ शुक्ल द्वितीयापासून सुरू होते आणि दशमी तिथीला संपते.

Add caption

रथयात्रा फक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी पुरी येथे जगभरातून भाविक दाखल होतात. ओडिशातील पुरी इथल्या रस्त्यावरून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढली जाते. या पवित्र यात्रेत भगवान बालभद्रचा रथ सर्वात पुढे असतो, याला तालध्वज म्हटलं जातं. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मा रथ असं संबोधलं जातं. सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो, ज्याला नंदी गरुडध्वज म्हटलं जातं.

ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे तीन रथांत बसून जातात, अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे दोन रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपआपल्या रथात बसून निघतात. भारतभरांतून आणि परदेशांतूनही आलेली सर्व जाति-धर्म-संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मीसन्निद्ध राहतात अशी व्यवस्था आहे. या उत्सवात विविध धार्मिक विधी संपन्न होतात. खरं पाहिलं तर ही रथयात्रा भगवान विष्णूचे अवतार जगन्नाथ देवालाच समर्पित असते.

बलरामाच्या खांद्यावर असलेला नांगर कृषीचा अर्थात धनशक्तीचं प्रतीक आहे. तर मुसळ हे बळाचं म्हणजेच संघटनशक्तीचं म्हणजेच जनशक्तीचं प्रतीक आहे. म्हणजेच बलरामांचे नांगर हे नवनिर्मितीचं, सृजनाचं तर मुसळ हे दुष्टांच्या निर्दालनाचं व सज्जनांच्या रक्षणाचं आश्वासक प्रतीक आहे.

जयदेव यांनी आपल्या 'गीत गोविंद' या काव्यात म्हणलं आहे की, ‘केशव धृतहलधर रूप धरे, जय जगदीश हरे’। म्हणजेच जगदीश्वराने हलधारी बलरामाचं रूप धारण केलं आहे. त्यावरून आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की, हलधर हा जगदीश्वर आहे, म्हणजेच आपल्या देशातला शेतकरी हाच भारताचा भाग्यविधाता आहे.

अशा या बलरामांना जयंती निमित्त अभिवादन!

©डॉ.नयना कासखेडीकर

No comments:

Post a Comment