Wednesday, 5 August 2020

बाबूजी आणि रामाची भक्ती

बाबूजी आणि रामाची भक्ती   


जय श्रीराम! राम राम मंडळी! राम राम पाव्हणं! श्रीराम, जय राम, जय जय राम ! असा रामनामाचा जप प्रत्येक रामभक्ताच्या अंतरंगी असतो. संत एकनाथांनी म्हटलंच आहे,

                                          रामनाम ज्याचे मुखी|

                                         तो नर धन्य तिन्ही लोकी ||

  प्रभू श्रीरामचंद्र आणि त्या कथेतील सर्व पात्रे भारतातील प्रत्येक राज्यातल्या लोकांची, प्रत्येक भाषेतून, प्रत्येक राज्यातून आपल्या घरातीलच झाली आहेत. जवळची झाली आहेत. त्यामुळे कुठल्याही भाषेत रामकथा घराघरात लोकप्रिय आहे. शतकानुशतके रामायणातील सांगीतलेली मूल्ये, धर्म (कर्तव्ये) आजही मार्गदर्शक आहेत. प्रबोधन करणारी आहेत. रविंद्रनाथ टागोर यांना म्हणूनच तर, रामायण ही भारताच्या मौलिक भावभावनांची भागीरथी वाटते. त्या त्या भाषेत रामायण कथा अजरामर करण्याचं काम साहित्याने आणि ते लिहिणार्‍या लेखक कवींनी केलं आहे. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा ते प्रचंड लोकप्रिय आहेच. मराठी माणसासाठी तर रामायणाची मोहिनी मराठी मनावर पाडणारे, कविवर्य ग.दि. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणणारे आकाशवाणीचे सीताकांत लाड यांचे खूप उपकार आहेत. कारण गीतरामायणाच्या माध्यमातून लोकांमध्ये रामभक्ती जागृत ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे.

                                      

या गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लागणार ? एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसानी ओतप्रेत भरलेली, मधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी ,चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचे स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे हि रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करणारी आहेत. कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केल आहे. सिद्धहस्त गदिमांच्या कवितेतील शब्दांचा भाव, कवीची भूमिका अत्यंत तन्मयतेने गाण्यातून सादर केली आहे. तरीही गदिमा आणि बाबूजी दोघेही याचे श्रेय घेत नाहीत. ते श्रद्धेने म्हणतात कि, “ गीत रामायण आम्ही केलेले नाही, ते आमच्या हातून झाले आहे”

  पुणे आकाशवाणी केंद्राने १९५४ साली गीतरामायण कार्यक्रमाची निर्मिती केली, त्या कार्यक्रमाला अल्पावधीत खूप लोकप्रियता मिळाली. गायक आणि संगीतकार बाबूजी आणि या कार्यक्रमाच्या निर्मितीतले सर्व कलाकार राममय झाले होते. रामचरितमानस रेडिओवरून कित्येकदा ऐकायचे श्रोते, पण माझ्या मराठी मायबोलीतून हे गीतरामायण  झरझर प्रसार पावत होतं. गाणी ऐकताना सुद्धा जणू काही रामाचं दर्शन होणार आहे या भक्तिभावाने, नमस्कार करून,  धुप-दीप लावून मनोभावे ते ऐकत होते. आणि तितक्याच मनोभावे सुधीर फडके तो कार्यक्रम बसवत होते, गात होते. मग त्याचं सादरीकरण प्रत्यक्ष रंगमंचावर होऊ लागलं. कितीही मध्ये मध्ये अडचणी आल्या तरी सुधीर फडके यांना त्यांचा राम वाचवत होता. तशी त्यांची श्रद्धाच होती. याचे किस्से ललिता ताईंनी त्यांच्या आठवणीमध्ये सांगितले आहेत.   

गीतरामायण रामनवमी पासून आकाशवाणी पुणे केंद्रावर रोज सादर होणार होतं. पहिल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला आकाशवाणीत सर्व जमले असताना लहानग्या श्रीधरला ताप भरला होता. डॉक्टरांकडे न्यावं लागणार होतं. गाण्याला चाल लावण्यासाठी बाबूजींनी गदिमांकडे गीताचा कागद मागितला, कागद सापडेना शेवटी गदिमांनी पुन्हा गाणं लिहिलं. हे सर्व चालू असताना ललिताबाई श्रीधरला घेऊन दवाखान्यात पोहोचल्या होत्या. घटसर्प असं निदान झालं. इकडे आकाशवाणीत पहिल्या गाण्याला बाबूजींची चाल लावून झाली. मग माणिक वर्मा यांच्याकडून समजलं की श्रीधर तापाने फणफणला होता, त्याला दवाखान्यात अॅडमिट केलं आहे. गाण्याला चाल लागत नाही, तोपर्यंत बाबूजींचं दुसर्‍या कशात लक्ष नव्हतं. आता सगळे दवाखान्यात पोहोचले. श्रीधरला बघून आणि डॉक्टरांना भेटून पुन्हा सर्वजण आकाशवाणीत गेले. ललिताबाईंजवळ त्यांची आई होती. तासाभराने पुन्हा बाबूजींचा ललिताताईंना निरोप आला की ताबडतोब आकाशवणीत ये. “आता माझं काय काम तिथे?”  असं म्हणून त्या जरा वैतागल्याच. निरोप आहे म्हणजे जायलाच हवं. तसं त्या पोहोचल्या आकाशवाणीत. बाबूजी त्यांना म्हणाले, “ पहिलं गाणं कुशलव गात आहेत, समोर कुश आहे पण लव मिळत नव्हता, म्हणून तुला बोलावलं. सुरूवातीला फक्त श्रीराम, श्रीराम म्हणावयाचे आहे”. तर रामाचा जप करायलाच जणू त्या गेल्या होत्या. कुश म्हणजे स्वत: बाबूजीच गाणार होते. गाण्याचं रेकॉर्डिंग होता होता सकाळ उजाडली होती. सकाळी श्रीधरला डिस्चार्ज मिळणार होता दवाखान्यातून. गीतरामायणाचं पहिलंच गाणं आणि सुरुवातीलाच मोठं संकट. हा कार्यक्रम तर वर्षभर चालणार होता. पण प्रभूरामचंद्रची कृपा! श्रीधरचा  पुनर्जन्म झाला आणि गीतरामायण पण सुरळीत पार पडलं असं ललितातईंना वाटलं. अशी प्रत्येक कार्यक्रमात ललिता ताईंची बाबूजींना साथ असे.

 कवि बा.भ. बोरकरांनी म्हटलंय, “वाल्मिकींचे आद्य रामायण आधी लिहिले गेले. मग गायीले गेले. पण हे गीत रामायण गात गातच जन्माला आले. गात गातच वाढले आणि गात गातच यशस्वी झाले. आठवडा उलटेपर्यंतच पुढच्या गीताचा जन्म होत होता”. ती खास आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. त्यामुळे मुंबईला ते ऐकू येत नसे. त्यामुळे गीत रामायणाचा आस्वाद त्यांना मिळत नव्हता. पण मुंबईत हिंदू कॉलनीत गणेश उत्सवात पहिला गीतरामायण कार्यक्रम झाला आणि तेंव्हापासून मुंबईला कार्यक्रम सुरू झाले. ट्रांझिस्टर तर नव्हताच, रेडीओ ठराविक लोकांकडेच .त्यामुळे एकत्र रस्त्यावर जमून गीत रामायण ऐकले जायचे. ते सुरु होण्यापूर्वी लोक रेडिओला हार घालायचे, उदबत्ती ओवाळायचे, नमस्कार करायचे आणि भक्ती भावाने गीत रामायण ऐकायचे. ते संपल्यावर प्रसादही वाटायचे. त्यानंतर मुंबई, नागपूर, इंदोर, भोपाळ, हैद्राबाद, दिल्ली आकाशवाणीवरून अनेक वेळा गीत रामायणाचं प्रसारण झाल. अजूनही होतंय.

श्रीरामासाठी सगळं -- 

एकदा मुंबईला गीत रामायणाचा कार्यक्रम होता त्यासाठी बाबूजी पुण्याहून मुंबईला पोहोचले. टॅक्सीने घरी आले, घाईगर्दीत सामान काढताना लक्षात आलं की गीतरामायणाची वही ठेवलेली शबनम बॅग नाही. तासाभरात कार्यक्रम आणि वही नाही. मोठी पंचाईत. बाबूजींना नुकताच चश्मा लागला होता, तेंव्हा ललिता ताईंनी मोठ्या जाड अक्षरात नीट वाचता यावे अशी गीतं लिहून दिली होती त्या वहीत. ललिता ताईंनी हे आव्हान स्वीकारलं जणू. त्यांनी तासाभरात जेव्हढी गीतं होतील तशी पुन्हा लिहून देते आणि राहतील ती पुस्तकातून बघून म्हणा, म्हणाल्या. बाबूजी म्हणाले, “गाणी म्हणताना प्रेक्षकांकडे बघायचे, परत पुस्तकात बघायचे हे शक्य नाही”. मग ललिता ताईंनी मार्ग काढला. त्यांनी बाबूजीकडून गाण्यांची यादी करून घेतली. आणि ठरवलं की प्रेक्षकांमध्ये जी ओळखीची माणसे भेटतील त्यांच्याकडून कार्यक्रम चालू असताना एकेक गाणं लिहून घ्यायचं. आणि जाताना त्यांनी मोठे फुलस्केप कागद आणि जाड शाईचे बॉल पेन घेतले. प्रेक्षागृहात पोहोचल्यावर उठावदार अक्षरांचे नमुने प्रेक्षकांकडून मागविले. त्यांना गीते लिहावयास सांगितली. पुस्तक एकच. त्यामुळे एकानंतर एक असेच लिहावे लागत होते. असे एकेक गीत लिहून रंगमंचावर बाबूजींना पोहोचत होते. कार्यक्रम रंगत होता. निवेदनात बाबूजींनी सांगितले की, “आपली गाण्याची वही आजच हरवली, त्यामुळे मी जरा अस्वस्थच होतो. पण रामकृपेमुळे तुमच्या मदतीने मला प्रत्येक वेळी मोठ्या अक्षरात गाणं मिळत राहिल्याने कार्यक्रमात खंड पडला नाही”. हे सगळं होतं ते श्रीरामासाठी. प्रेक्षकांना अखंडपणे गीतरामायण ऐकायला मिळावे म्हणून दोघांचीही धडपड होती. 

                             

    धारवाडला गीत रामायण कार्यक्रम ठरला होता. सलग दोन दिवस कार्यक्रम होते. कार्यक्रमाच्या वेळी तो झाल्यावर बाबूजी जेवत असत. कारण आधी जेवल्यामुळे गाताना त्रास होई. आधी फक्त दूध हळद पिऊन जात असत. कार्यक्रमानंतर इतका उशीर झाला की बाबूजी जेवलेच नाहीत. ज्यांच्या घरी उतरले होते त्या बाईंनी आग्रह करून दूध हळद तरी घ्या गरम असे म्हणल्याने ते घेऊन बाबूजी पुढच्या ठिकाणी निघाले. तिथे गेल्यावर बाबूजींची तब्येत बिघडली, पोट बिघडले. औषधे देऊन उपयोग होईना. आता संध्याकाळचा मेडिकल कॉलेज मधला कार्यक्रम होऊ शकत नाही असे सर्व डॉक्टरांना वाटू लागले. अंगात त्राण नाही, चेहरा उतरलेला, ग्लानी आलेली. संध्याकाळी कार्यक्रमाची वेळ झाली तरी बाबूजी झोपलेले. तिकडे स्टेज- वर सर्व तयारी झालेली. वाद्ये लावलेली, हार्मोनियमवर स्टँड व गाण्याची वही लावून जय्यत तयारी झाली होती. कॉलेजचे तीन डॉक्टर बाबूजींना घ्यायला आले, त्यांनी प्यायला गार पाणी दिले. बरे वाटतेय ना आता? असं  विचारल्यावर ते हो म्हणाले. एकाने त्यांचे केस नीट केले, एकाने कपडे नीट केले आणि तिघांनी बाबूजींना उचलून स्टेजवर नेऊन बसविले. स्टेज आणि पेटी पाहिल्यावर ते हसले आणि तंबोरा वाजायला लागला तसा पेटीचा भाता ही सुरू झाला. सूर निघाले आणि गाणे सुरू झाले. डॉक्टर मंडळी जरा घाबरलीच. पण कार्यक्रम तीन तास रंगला. कार्यक्रम झाल्यानंतर डॉक्टर स्टेजवर आले आणि बाबूजींची माफी मागितली तुमची तब्येत बरी नसताना आम्ही असे वागायला नको होते. यावर बाबूजी म्हणाले., बरं झालं तुम्ही मला पेटीजवळ आणलं.त्यामुळे मी गाऊ शकलो. नाहीतर झोपूनच राहिलो असतो. माझ्यावर रामकृपा आहे. त्त्यांच्या मते रामकृपा होती म्हणूनच आपला कार्यक्रम इतकं बरं नसतानाही होऊ शकला.

असाच आणखी एक रामाच्या कृपेचा प्रसंग .

  विदर्भात गीतरामायण कार्यक्रम होता. तो आटोपून भर थंडीत गाडी व तिथून ट्रेन ने मुंबईला सकाळी आले. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईत पुन्हा कार्यक्रम होणार होता.घरी पोहोचल्यावर तोंड धुताना  चूळ भरता येत नव्हती, एक डोळा मिटत नव्हता. काहीतरी वेगळेच आहे हे जाणवले आणि डॉक्टरांकडे गेल्यावर समजले की फेशियल पॅरालिसिस झाला आहे. डोळ्याला गॉगल्स लावायला सांगितला. घरी येता येता गॉगल्स विकत घेतला आणि रात्री कार्यक्रमाला गॉगल्स लावून गेले. स्टेजवर बसल्यानंतर गॉगल्स काढला आणि प्रेक्षकांना विचारले, आज मी तुम्हाला निराळाच दिसतो ना? त्याचं कारण सांगितलं. आणि माझे उच्चार चुकले, स्वर बोबडे आले, तर मी कार्यक्रम तिथेच थांबवेन नाहीतर संपूर्ण कार्यक्रम करीन” बाबूजी स्वत:च निवेदन करत होते. वाणी स्वच्छ होती. पहिल्या गाण्यांनंतर त्यांनी प्रेक्षकांना विचारलं माझं बोलणं तुम्हाला स्वच्छ कळतंय ना? सर्वांनी हो म्हणून सांगितले. बाबूजींना ही रामाचीच कृपा वाटली आणि त्यांनी पुढचा कार्यक्रम सुरू केला.

     सुधीर फडके यांच्या सुस्वर कंठातून बाहेर पडलेले रामायण संपूर्ण महाराष्ट्राने सर्वेन्द्रियांचे कान करून ऐकले, अजूनही ऐकताहेत. यातील गीतांचे करूण रस, रौद्र रस, वीर रस,भयानक, अद्भुत अशा सगळ्या भावनांचे झपाटल्यासारखे सादरीकरण होत असे. आजही ही गाणी ऐकताना श्रोतागणही झपाटून जातो. बाबूजी या गीतातून आपल्यासमोर शोकविव्हल दशरथ, शंकाकुल सीता, चिडलेला लक्ष्मण, संतापी भरत प्रत्यक्ष उभे करतात.या गीत रामायणाचे बाबुजींनी १८०० प्रयोग केले. याची आठ भारतीय भाषेत भाषांतर झाली, पण विशेष असे कि जसेच्या तसे भाषांतर झाले आहे. एका मात्रेचाही फरक नाही आणि बाबूजींच्या मूळ चालीवरच ती गायली जातात.

    प्रभू रामचंद्रांचे चरित्र म्हणजे हिंदू संस्कृतीचा गौरवशाली इतिहास आहे.आणि तो बाबूजींच्या आवाजात मराठी मनावर कायम राज्य करत राहणार. सर्वश्रेष्ठ आदिकवी महर्षी वाल्मिकींनी चोवीस हजार श्लोकांचे रामायण लिहिले. भारतीयांच्या मनावर या रामायणाने हजारो वर्षे राज्य केलंय. श्रीरामकथा तर भारताच्या दश दिशांमध्ये सहस्त्र वर्षे दुमदुमते आहे.

    संस्कृत मध्ये ९४ रामायणे आहेत. मराठी, हिंदी, तामिळ, कानडी, तेलुगु, गुजराती, डोगरी, बंगाली, ओडिसी, असामी, फारसी, प्राकृत, अशा प्रादेशिक भाषेतून रामायण सर्व भाषिकांपर्यंत पोहोचले आहे. संत एकनाथ, श्री समर्थ रामदास, अशा संत आणि अनेक साहित्यिकांनी रामायणाच्या माध्यमातून जनतेच्या मनाची जडणघडण केली आहे. जगाच्या इतर भाषात सुद्धा- इंग्लिश, जर्मन, इटालियन भाषेतही रामायण आहे. इतके सगळे रामायणाचे अवतार पण, गदिमांची रससिद्ध प्रज्ञा आणि बाबूजींची सांगीतिक प्रतिभा यांचा अजोड अविष्कार म्हणजे मराठी गीतरामायण.

   गीत रामायणातली ५६ गीते ही भूप, मिश्र काफी, जोगिया, भैरवी, पिलु, शंकरा, केदार, मारू बिहाग, मधुवंती, तोडी, सारंग, मालकंस अशा विविध रागांवर आधारित आहेत. ही गीते इतकी लोकप्रिय झाली की, त्याची आजपर्यंत हिन्दी, गुजराती, कानडी, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोंकणी या भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. विशेष म्हणजे ही त्या भाषात सुद्धा बाबूजींनी दिलेल्या मूळ चालींवरच गायली जातात. यावरून गीत रामायणाची प्रादेशिक भाषातही असलेली लोकप्रियता लक्षात येते.

   बाबूजींची यावर इतकी भक्ति होती, प्रेम होतं की त्यांना कुठल्याही कार्यक्रमात मधेच एखादं रामायणातलं गीत कुणी म्हटलेलं आवडत नसे किंवा गाण्याच्या कार्यक्रमात सुद्धा मध्ये एक रामायणाचे गीत म्हणायचे नाही असं त्यांचा नियम होता. रामायणाचा पूर्ण अर्थ कळणे आणि रामायणाचे पावित्र्य टिकवणे, हे झालच पाहिजे. त्यासाठी पूर्ण रामायण म्हटलं गेलं पाहिजे.

   बाबूजींच्या मनातल्या, श्रीरामाची कशी प्रतिमा होती ते श्रीधरजी फडके यांनी सांगितलं आहे. ते म्हणतात, “बाबूजी, रामाला, स्वत:च्या करणीने देवत्वाला पोहोचलेला माणूस मानायचे. राम, रामचंद्र हा माणूसच ना? हा मानवावतार. पण स्वत:च्या कर्तृत्वाने ते पोहोचले ना? हे बाबूजींना फार अप्रूप होतं. बाबूजी तसे धार्मिक नव्हते. हिंदुत्व मानायचे, पण अंधश्रद्धा विरोधी होते. त्यांची श्रद्धास्थाने होतीच. शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ हेडगेवार ही त्यांची श्रद्धास्थाने. ते रामजन्मभूमीच्या सत्याग्रहातले पहिले अनुयायी होते. या रामानेच आपल्या देशाला एकत्र केलं अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच रामायण त्यांच्या हृदयातून आलंय. असे रामभक्त बाबूजी. रामकथे बरोबर तेही आपल्या चिरंतन स्मरणात राहतील .

     © डॉ. नयना कासखेडीकर.   

                               -----------------------------------------------------------


No comments:

Post a Comment