Friday, 14 August 2020

विचार–पुष्प,३९

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका                                                                                         

विचार–पुष्प,३९

 
             परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र

  बेळगाव मध्ये स्वामीजींचा सहवास लाभलेले आणखी एक कुटुंब म्हणजे, हरिपद मित्र आणि त्यांच्या पत्नी सौ इंदुमती मित्र. हरिपद मित्र वन खात्यात विभागीय अधिकारी होते. ते बंगाली असल्याने भाटे वकील ओळख करून द्यायला स्वामीजींना त्यांच्या घरी घेऊन गेले. दारात, शांत, सौम्य, तेजस्वी, दाढी केलेला तरुण संन्यासी, पायात मराठी वहाणा, अंगात भगवी कफनी, डोक्याला भगवा फेटा असं आकर्षक व्यक्तिमत्व पाहून, हरिपद यांना क्षणभर भुरळच पडली. पण पुढच्याच क्षणी तो आपल्याकडे काही मागण्यासच आला असावा, कारण संन्यासी म्हणजे लुच्चा लफंगा असे त्यांचे मत झाले. भाटे वकिलांनी परिचय करून दिल्यावर एका महाराष्ट्रियन ब्राम्हणाकडे बंगाल्याचे जमणे कठीणच म्हणून ते आपल्याकडे रहाण्यासाठीच आले असावेत अशीही भावना झाली. म्हणून हरिपदांनी स्वामीजींना विचारले तुमचं सामान इथेच आणून घेऊ का?

    स्वामीजी म्हणाले, “मी वकील साहेबांकडे अगदी आरामात आहे. ते सारे आपल्याला फार प्रेमाने वागवतात. कोणीतरी बंगाली भेटल्यामुळे मी त्यांच्या घरातून हललो तर ते बरं दिसणार नाही. योग्य होणार नाही. त्यांना वाईट वाटेल, सध्या नको, पुढे पाहता येईल.” इथे स्वामी विवेकानंदांचा विवेक दिसतो. यानंतर झालेल्या गप्पांमधून हरिपद यांना स्वामीजींचे व्यक्तिमत्व उलगडत गेले. दुसर्‍या दिवशी स्वामींना त्यांनी फराळाला बोलावले, स्वामीजींनी होकार दिला. दुसर्‍या दिवशी हरिपद स्वामीजींची वाट पाहत होते. बराच वेळ झाला स्वामीजी आलेच नाहीत, म्हणून हरिपद त्यांना बघायला भाटे वकिलांकडे गेले. पाहतात तर काय, त्यांच्या भोवती गावातील अनेक वकील, पंडित आणि इतर प्रतिष्ठित यांचा मेळावा जमलेला. कोणी प्रश्न विचारात होते, कोणाचा मुक्त संवाद चालला होता. स्वामीजी चार भाषांतून सर्वांना कुशलतेने उत्तरे देत होते. या रंगलेल्या धर्मचर्चेत एकाने संस्कृतमध्ये विचारले, “धर्मासंबंधी म्लेंच्छ्  भाषेत चर्चा करणे निषिद्ध आहे. असे अमुक पुराणात संगितले आहे”. त्यावर स्वामीजी म्हणाले, “ भाषा कोणतीही असो, त्या भाषेतून चर्चा करायला काही हरकत नाही. हे सांगताना त्यांनी अनेक वेदादिकांमधील संदर्भासहित स्पष्टीकरण दिले आणि शेवटी सांगितले, हायकोर्टाचा निकाल खालची कोर्टे झिडकारू शकत नाहीत, पुराणापेक्षा वेदांचेच म्हणणे श्रेष्ठ”.

                           

     एका ब्राह्मण वकिलाने विचारले, स्वामीजी संध्या व इतरही आन्हिकांचे सारे मंत्र संस्कृत भाषेत आहेत. ते सारे आम्हाला कळत नाहीत. अशा स्थितीत ते म्हटल्याने आम्हाला काही फळ मिळेल की नाही”? स्वामीजी उत्तरले, “अलबत, तुम्ही ब्राह्मणा पोटी जन्म घेतलेला, थोडासा प्रयत्न केला तर त्या मंत्राचा अर्थ सहज समजून घेऊ शकाल. पण असा प्रयत्नच मुली तुम्ही लोक करत नाहीत. हा दोष सांगा पाहू कुणाचा?आणि अर्थ जरी कळत नसला तरी, संध्या करावयास बसता, तेंव्हा काहीतरी शुभ धर्मकर्म करीत आहोत असे तुम्हाला वाटत असते. धर्मकर्माच्या शुभ भावनेने जर ते आन्हिकं करीत असाल तर तेव्हढ्यानेच त्याचे शुभ फळ तुम्हाला खात्रीने मिळेल”.    

     सर्वजण गेल्यावर स्वामीजींना हरिपद दिसताच त्यांच्या निमंत्रणची आठवण झाली. स्वामीजींनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, “एव्हढ्या मंडळींचा हिरमोड करून येणं मला प्रशस्त नाही वाटलं. गैर मानू नका”. यावेळी हरिपद यांनी पुन्हा घरी राहायला येण्याचा आग्रह केला. तर स्वामीजींनी सांगितलं, आधी भाटे वकिलांची परवानगी घ्या. ते हो म्हणाले तर माझी काही हरकत नाही. हरिपद यांनी महाप्रयत्नाने ही परवानगी मिळवली आणि ते स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले. हरिपद मित्र यांच्या आयुष्यातला स्वामीजींचा हा सहवास क्रांतिकारक ठरला होता.

     हरिपद मित्र अगदी मॅट्रिक होईपर्यंत इंग्रजी शाळेत शिकत असल्याने त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास उडत चालला होता. कॉलेजच्या विषयांबरोबर हक्स्ले, डार्विन, मिल.टिंडॉल, स्पेन्सर प्रभृती या पाश्चात्य पंडितांचा त्यांच्या ग्रंथावरून परिचय झाला होता. अती इंग्रजी शिक्षणामुळे ते नास्तिक बनले, कशावरही श्रद्धा नाही, भक्ति नाही. सर्वच धर्मात त्यांना दोष दिसे. याच वेळी मिशनर्यांचे त्यांच्याकडे येणे जाणे सुरू झाले. ख्रिस्ती धर्म स्वीकारावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले. इतर धर्माची निंदा करून वेगवेगळे डावपेच रचून, आधी ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवा मग तो श्रेष्ठ वाटेल, मन लावून बायबल वाचा म्हणजे आपोआप श्रद्धा बसेल, असे त्यांच्या गळी ऊतरवू लागले होते मिशनरी. पण प्रमाणाखेरीज कशावरही विश्वास ठेऊ नये हे तत्व पाश्चात्य विद्येमुळेच त्यांना कळले होते आणि ते त्याच्यावर ठाम पण होते. परंतु मिशनरी आता नेमकं याच्या विरुद्धच सांगू लागले होते. शेवटी गोष्ट इतक्या ठरला गेली की, हरिपदांच्या शंका असलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत मग बाप्तिस्मा करून ते ख्रिस्ती धर्म स्वीकारतील. परंतु सुदैवाने हरिपद यांना तीन प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच कॉलेज सोडलं आणि संसार सुरू झाला त्यामुळे हे धर्मांतर वाचलं. पण यानंतर ही त्यांचा सर्व धर्माचा अभ्यास चालूच होता. चर्चमध्ये जाणं, देवळात जाणं, ब्राह्म समाजात जाणं हे चालू होतं. तरीही सत्य धर्म कोणता, असत्य कोणता, चांगला कोणता, वाईट कोणता हे हरिपद यांना ठरवता आले नव्हते. पण कोणत्यातरी धर्मावर दृढ श्रद्धा ठेवल्यास आयुष्य सुखासमाधानाने  घालवता येईल हे त्यांना पटलं होतं. तरीही चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम स्थिति असताना सुद्धा मन मात्र बेचैन होतं. शांत नव्हतं. सतत कसली तरी हुरहूर असे. स्वामीजींच्या संपर्कात आल्याने त्यांना धर्मासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळाले. धर्म वादावादीत नाही. धर्म म्हणजे प्रत्यक्षा अनुभूतीची बाब आहे. ही गोष्ट पटवून देण्यासाठी स्वामीजी म्हणत, मिठाईची पारख होणार ती मिठाई खाऊनच, धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घ्या, एरव्ही काहीही कळणे कधी शक्य नाही.   

    धर्मजीवनाविषयी अशा प्रकारे त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. अनेक संशय होते  त्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामीजींनी दिली होती. सत्य, धर्म आणि श्रद्धा या विषयावरच्या चर्चेतून आणखी गोष्टींचा खुलासा हरिपद यांना झाला होता. जेंव्हा जेंव्हा सवड मिळे संवाद होई तेंव्हा तेंव्हा हरिपद मित्र ही संधी घेत असत. याबरोबरच स्वामीजी त्यांना आलेले अनुभव पण सांगत.

    हरिपद यांच्या पत्नी इंदुमती यांना बर्‍याच दिवसांपासून गुरुमंत्र घेण्याची इच्छा होती.पण हरिपद धर्माच्या बाबतीत साशंक होते आणि योग्य व्यक्ती भेटेपर्यंत वाट पाहूया असे त्यांनी पत्नीला सांगीतले होते.    स्वामीजींन कडून ती घेण्याचा योग आल्याने दोघं ही कृतकृत्य झाले. शिष्यत्व पत्करल्यावर स्वामीजी तीन वेळा फक्त भेटले . प्रथम बेळगावला. नंतर स्वामीजी अमेरिका प्रवासाला गेले त्या आधी आणि नंतर देहत्यागच्या सहा महीने आधी. स्वामीजींनी दीक्षा दिल्यानंतर दोघांचेही सतत स्मरण ठेवल्याचे दिसते.अमेरिकेत जाण्याआधी त्यांनी इंदुमतींच्या पत्रात लिहिले होते, “तुमचे उभयतांचे कल्याण असावे अशी प्रार्थना मी नित्या परमेश्वराला करत असतो. परमेश्वराची कृपा असेल तर मी अमेरिकेतून परत आल्यावर आपली भेट होईल. आपण परमेश्वराच्या हातातली केवळ बाहुली आहोत. याचे सदैव स्मरण ठेवा. मन सदैव शुद्ध असावे, विचार उच्चार वा आचार यापैकी कशातही अशुद्धतेचा स्पर्श होऊ देऊ नये. गीतेचे पठण करीत राहा”. अशा प्रकारे हरिपद यांना स्वामीजींचे वैयक्तिक सहवासातून दर्शन झाले होते. बोलता बोलताना स्वामीजींनी हरिपद बाबूंना आपला सर्वधर्म परिषदेला अमेरिकेला जाण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता.                                   

स्वामीजी आता इथला प्रवास संपवून निघाले. हरिपद यांनी त्यांना प्रेमपूर्वक निरोप दिला बेळगावमध्ये असताना शिरगावकर यांची ओळख झाल्याने जाताना त्यांनी मडगावच्या सुब्राय नायक यांच्या नावे  परिचय पत्र दिले होते. ते घेऊन स्वामीजी गोव्याकडे रेल्वेने रवाना झाले.

 © डॉ.नयना कासखेडीकर   

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk                

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा 

No comments:

Post a Comment