Tuesday, 4 August 2020

विचार–पुष्प,भाग ३०

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका  
                           विचार–पुष्प,भाग ३०  


                             परिव्राजक ८. अलवर

     ‘अलवर हे  राजस्थानातले त्या काळातले एक संस्थान. संस्थानिक तिथले राजे असत आणि सर्व प्रजा त्यांना मानत असे. परंपरागत राजसत्तेचे ऐश्वर्य आणि इंग्रजी सत्तेचा प्रभाव असे मिश्र वातावरण तिथे होते. याचा प्रभाव तिथल्या थोड्या सुशिक्षितांवर होता. पण मोठ्या प्रमाणात प्रजा अशिक्षित, उपेक्षित, दारिद्र्य असणारी, जुन्या परंपरा पाळणारी आणि मर्यादित विश्वात राहणारी अशी होती.
    
अलवर 
    अलवरच्या स्थानकावर उतरून स्वामीजी रस्त्यावरून पायी चालू लागले, संस्थानच्या शासकीय रुग्णालयासमोर ते पोहोचले तेंव्हा तिथे एक बंगाली गृहस्थ गुरुचरण लष्कर उभे होते. ते त्या रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर होते. स्वामीजींनी त्यांना विचारले, इथे संन्याशांना राहण्यास एखादी जागा कोठे मिळेल? हे ऐकताच गुरुचरण स्वत: त्यांना बाजारात घेऊन गेले आणि एक खोली दाखवली. चालेल ना? स्वामीजी म्हणाले, अगदी आनंदाने. त्यांची प्राथमिक सोय करून देऊन डॉक्टर तिथून निघून थेट त्यांच्या मुस्लिम मित्राकडे गेले. ते माध्यमिक शाळेत उर्दू आणि पर्शियन शिकवणारे शिक्षक होते. डॉक्टर उत्साहाने त्यांना सांगत होते की, “मौलवीसाहेब आताच एक बंगाली साधू आला आहे. मी तर असा महात्मा आजपर्यंत पाहिला नाही. तुम्ही लगेच चला. थोडं त्यांच्याशी बोला तोवर मी काम आवरून येतोच. डॉक्टर आणि मौलवी स्वामीजींकडे आले. बोलणे सुरू झाले अर्थातच धर्म विषय निघाला. स्वामीजी म्हणाले, “ कुराणाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे, अकराशे वर्षापूर्वी ते निर्माण झालं, तेंव्हा ते जसं होतं, त्याच स्वरुपात ते जसच्या तसं आजही आपल्या समोर आहे. त्यात कोणताही प्रक्षिप्त भाग शिरलेला नाही.” मौलवी भेटून परत गेले. डॉक्टर आणि मौलवींनी जाता येतं ज्याला त्याला स्वामिजींबद्दल सांगितले. त्याचा परिणाम असा झालं की, दोनच दिवसात अनेकजण स्वामीजींच्या भेटीला येऊ लागले॰ 


अलवरला येथे उतरत असत 
   


    स्वामीजींच्या अमोघ शैलीमुळे सर्वजण भारावून जात. आपले विचार मांडताना ते हिन्दी, संस्कृत,बंगाली, उर्दू  या भाषांचाही उपयोग करत. गीता, उपनिषद,कधी बायबल यांचाही संदर्भ देत असत. विषयाचे विवेचन करताना ते कधी विद्यापती, चंडीदास ,रामप्रसाद ,कबीर, तुलसीदास यांची भजने सुद्धा म्हणत. गौतम बुद्ध , शंकराचार्य यांच्या चरित्रातला प्रसंग सांगत. श्रोत्यांमध्ये कुणी सुशिक्षित दिसला तर इंग्रजी किंवा पाश्चात्य तत्वज्ञान याचा आधार घेत. आणि राजस्थान मध्ये श्रीकृष्ण भक्त असल्याने तिथे विशेषता श्रीकृष्ण चरित्रातील रोमहर्षक प्रसंग सांगत, प्रेम आणि भक्ति सांगत. ते सांगताना तन्मय होत तर श्रोते ऐकताना भावुक होत. असे बरेच दिवस चालले होते. त्यानंतर, अलवर संस्थांनचे निवृत्त इंजिनीअर पंडित शंभुनाथ, स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले. तिथे सकाळी नऊ वाजल्यापासून लोक जमायला सुरुवात होई.
     
    हे लोक म्हणजे सर्व प्रकारचे, हिंदू, मुसलमान, शैव, वैष्णव, कुणी गाढे अभ्यासक, वेदांती, कुणी परंपरावादी, तर कुणी आधुनिक सुद्धा असत. गावातले श्रीमंत, गरीब, प्रतिष्ठित, सामान्य असे सर्वच लोक स्वामीजींकडे  येत. अनेक विषयांवर संवाद चालत असे. काही वेळा नेहमीप्रमाणे भक्तीगीत होई. श्रोते धुंद होत आणि संगीताची बैठक असलेली पाहून आश्चर्य चकित होत. हे सर्व ऐकून हा तरुण संन्यासी प्रेमळ, विद्वान, विनम्र बघून काही जणांना त्यांच्या जातीबद्दल उत्सुकता असे. ते विचारत, स्वामीजी आपण कोणत्या जातीचे? पण स्वामी विवेकानंद कसलाही संकोच न करता स्पष्ट सांगत, मी कायस्थ होतो.” आपण ब्राम्हण आहोत असा गैरसमज होऊ नये आणि तो झालाच तर विनाकारण श्रेष्ठ जातीमुळे मिळणारा आदर आपल्याला देऊ नये म्हणून ते स्पष्ट सांगत.
  
    असे प्रश्न आले की, यावरून त्यांना आपला समाज कसा आहे, तो एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो? कोणत्या जातीत त्यांच्या परांपरानुसार कोणते विचार आहेत? ते त्यांच्या वागण्यातून कसे उमटतात हे त्यांना अनुभवायला येत होते. अशा प्रकारे भारतीय समाजाचे खरेखुरे दर्शन अशा ठिकाणी त्यांना होत होते. लोकांना जसे स्वामीजींकडून मोलाचे विचार ऐकायला मिळत होते. तसेच स्वामीजींना पण त्यांचे विचार कळत. त्यांच्याही ज्ञानात भर पडेल . 
आताचे अलवर येथील  स्मारक 
  मौलवी तर सुरुवाती पासूनच स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले होते. त्यांना मनापासून वाटत होतं की अशा तपस्वी माणसाचे पाय आपल्या घरालाही लागले पाहिजेत. त्यांनी हे, शंभुनाथांना सांगितलं, म्हणाले, मी कोणातरी ब्राम्हणाकडून माझी खोली स्वच्छ करून घेईन, खुर्च्या सुद्धा पुसून घेईन, भांडीकुंडी ब्राम्हणाच्या हातून पाणी घालून शुद्ध करून घेईन. कोणीतरी ब्राह्मण शिधा घेऊन येईल, त्याच्याकडूनच स्वयंपाक करून घेईन. पण स्वामीजींनी माझ्या घरी एकदा येऊन भोजन करावं अशी माझी इच्छा आहे. मी लांब उभा राहून त्यांना जेवताना पाहीन.”
    
   केव्हढा हा प्रभाव? शंभु नाथांनी त्यांना सांगितलं ते संन्यासी आहेत, धर्म, जात,पंथ या भेदापलीकडे आहेत. ते नक्की येतील अशी खात्रीच दिली त्यांनी. कारण शंभुनाथ पण उदार दृष्टीकोनाचे होते.
आणि खरच एकदा दोघही मौलवींकडे जेवायला गेले. त्यानंतर अनेक जणांकडे जेवायला जात होते. आसपासच्या परिसरात स्वामीजींची ख्याती वाढत चालली होती. लोकसंपर्क वाढत होता.

© डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा

No comments:

Post a Comment