‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील
घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार–पुष्प, भाग- २८
परिव्राजक
– ६. देवभूमी
जवळ जवळ अडीचशे किलोमीटर
ची आडवी पसरलेली हिमालयची रांग, सव्वीस हजार फुट उंचीवरचे नंदादेवी
चे शिखर असा भव्य दिसणारा देखावा बघून स्वामीजी हरखून गेले. त्यांनी हिमालयाचे असे
दर्शन प्रथमच घेतले होते. मध्यभागी नैनीतालचे शांत आणि विस्तीर्ण सरोवर त्याच्या
काठावर वसलेली वस्ती, आणि सर्व बाजूंनी डोंगर उतारावर असलेले
शंभर फुट उंचीचे वृक्षांचे दाट असे जंगल. नैनीतालच्या कुठल्याही भागातून दिसणारे
हे नयन मनोरम आणि निसर्गरम्य दृश्य भुरळ घालणारे होते.
नैनीताल |
नैनीतालहून अल्मोर्याला
त्यांचा पायी प्रवास सुरू झाला. सर्व पहाडी प्रदेश. निर्जन रस्ता, तुरळक
भेटणारे यात्रेकरू, गंभीर शांततेत फक्त पक्षांचा सतत कानावर
पडणारा किलबिलाट, असा एक डोंगर झाला की दुसरा पार करायचा. रस्त्यात
एखाद दुसरं दुकान दिसायचं. पण पैसे जवळ नसल्यानं त्याचा असूनही उपयोग नाहीच. कुणी
दाता रस्त्यात भेटला आणि त्याने काही दिले तरच खायला मिळणार. धर्मशाळाही खूप कमी
होत्या तेंव्हा. त्यामुळे संध्याकाळ झाली की जिथे अंग टाकायला मिळेल तिथे
थांबायचं. असा हा अवघड प्रवास एक तपश्चर्याच होती. या अडचणीं चा विचार केला तर, आज आम्ही हॉटेल्स, गाड्या,
साइट सींग चे घरूनच बुकिंग करून निघतो. सतत मोबाइल द्वारे संपर्कात असतो. अडचण नाहीच कशाची. तरीही आपण त्या ठिकाणी /शहर/देश बघायला गेलो की तिथे
आपल्याला काय बघायचं हेच माहिती नसतं. फक्त मौज मजा,
खाद्याचा आस्वाद आणि खरेदी आणि महत्वाचं म्हणजे फोटो प्रसिद्धीची हाव. असो, अशा प्रकारे स्वामीजी आणि अखंडानंद यांना अडचणींचा विचार सुद्धा डोक्यात
नसायचा. आध्यात्मिक प्रेरणा मात्र होती.
काकरीघाट |
अल्मोरा |
आता अल्मोरा जवळच होतं. अल्मोरा उंच पर्वताच्या पठारावर वसलेलं
होत. तिथे जाताना तीन,चार किलोमीटरचा चढ चढता चढता स्वामीजी थकले
आणि भुकेने त्यांना चक्कर पण आली. अखंडानंद घाबरले, जवळपास
काही मदत मिळेल का शोधू लागले. समोरच एक कबरस्तान होतं. बाजूला एक झोपडी होती. तिथे
एक मुसलमान फकीर बसला होता. त्याने काकडीचा रस करून तो स्वामीजींच्या देण्यासाठी
पुढे आला एव्हढ्यात त्याच्या लक्षात आलं, अरे हा तर एक हिंदू
संन्यासी दिसतोय आणि तो थांबला. अशा अवस्थेत सुद्धा स्वामीजी त्याला म्हणाले, आपण दोघं एकमेकांचे भाई नाहीत काय? हे ऐकताच त्या फकिराने
स्वामीजींना रस पाजला. स्वामीजींना
थोड्याच वेळात हुशारी वाटली आणि थोड्या विश्रांति नंतर ते तिथून निघाले. ज्या
ठिकाणी स्वामीजींनी ही विश्रांति घेतली त्या ठिकाणी अल्मोर्याचे एक दाम्पत्य श्री
व सौ बोशी सेन यांनी स्वामी विवेकानंद विश्राम स्थान उभं केलं आहे.
अल्मोर्याला लाला बद्री शाह यांच्याकडे राहिले. तिथून
निघून गुहेमध्ये कठोर साधना आणि ध्यानधारणा केली. पुन्हा अल्मोर्याला परतले.
अशातच कलकत्त्याहून तार आली की, त्यांच्या बावीस वर्षीय धाकट्या
बहिणीने योगेंद्रबालाने आत्महत्या केली. स्वामीजी खूप अस्वस्थ झाले. लहानपणापासून
बरोबर वाढलेल्या बहिणीचा अंत स्वामीजींना दु:ख देऊन गेला. तिचे लग्न लहान वयातच
झाले होते तिला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. तिचं घर खूप सनातनी
होतं. धार्मिक पण सनातनी कुटुंब असेल तर स्त्रियांना केव्हढ्या हाल अपेष्टा
आयुष्यभर सहन कराव्या लागतात. अशा स्त्रियांच्या नशिबी केव्हढं दु:ख येतं याची
जाणीव स्वामीजींना यावेळी प्रखरतेने झाली. याचवेळी त्यांच्या मनात स्त्रीविषयक
आधुनिक दृष्टीकोण तयार झाला. पण हे दु:ख त्यांनी जवळ जवळ दहा वर्षानी जाहीर बोलून
दाखवले होते.
स्वामीजी, अलमोर्याहून निघून कौसानी, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग येथे गेले. रुद्रप्रयागचं
सौंदर्य बघून ते प्रसन्न झाले. तिथला अलकनंदाचा खळाळत्या प्रवाहाचा नाद ऐकून ते
म्हणतात, “ही अलकनंदा आता केदार रागाचे
सूर आळवित चालली आहे.”
रुद्रप्रयाग,अलकनंदा |
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You
Tube च्या
playlist link
या लिंकवर जाऊन हा
यू ट्यूब व्हिडिओ बघावा
वा वाह अप्रतिम लेख
ReplyDeleteउत्तम चित्रदर्शी लेखन!
ReplyDelete