पोहे इंदौरी ? की ...
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची बॉर्डर गाठलीत कि
या पोह्यांचा सिलसिला सुरु होतो. ३० वर्षापूर्वी आम्ही जळगावहून देवासला जात होतो. पहाटे पावणेपाचला
बडवाहला गाडी आली. सर्व प्रवासी उतरून गरम-गरम पोहे खात होते. रात्रभराच्या
प्रवासाने डोळे तारवटलेले होते. मी बसमध्ये बसल्या बसल्याच, "काय मूर्खपणा
आहे हा? " अशा अविर्भावात ते दृश्य नाईलाज म्हणून पाहत होते. या पोह्यांची
प्रसिद्धी आम्हाला माहिती नव्हती. देवासला
गेल्यावर मध्य प्रदेशातील पोह्यांची महती कळली. आपण याला मुकलो असे क्षणभर दुःख
झाले. त्याची भरपाई इंदौरला केली.
तीस वर्षानंतर पुन्हा इंदौरला जाण्याचा योग आला.
यावेळी मांडव पाहायला जायचे होते. अचानक ठरलेल्या दोन दिवसाच्या ट्रीपमध्ये
मांडवला मुक्कामी जाण्यापेक्षा इंदौरला मुक्काम करावा म्हणून ठरले आणि खरेदी
करण्यापेक्षा सराफ्यातल्या खाऊ गल्लीला भेट देऊ व जेवणाऐवजी प्रसिद्ध पोहे-जिलेबी चा आणि इतर पदार्थांचा बढीया आस्वाद लेऊ असे उद्दिष्ट ठरविले. कारण
‘सराफा – सराफा’. हा सराफा काय आहे आणि इंदौरची खाद्यसंस्कृती काय आहे हे बघायचेच
होते.
इंदौर मुक्कामी पोहोचलो. हॉटेलच्या वेटरने उद्या सकाळच्या चहा व ब्रेकफास्ट
बद्दल विचारले होते. त्याला फक्त चहा हवा असे सांगितले , कारण बाहेर जाऊन इंदौरी
पोह्यांची चव घ्यायची होती. चक्क सकाळी उठून, चहा घेऊन, हॉटेल खालीच समोर एका
गल्लीत टपरीवजा दुकाने थाटली होती. तिथे आमची टीम दाखल झाली. दुकानात इतर पदार्थही
होते. पण पोहे नक्की असतात कसे? आपल्यापेक्षा काय वेगळे आहे त्यात? उत्सुकता होती.
मुलांना दटावलं. वडा-पाव वगैरे काहीही घ्यायचं नाही. फक्त पोहे आणि पोहेच घ्यायचे.
सर्व मुलांची
नाराजी होतीच. “पोहे काय घरी कायमच असतात. इथेही तेच का खायचे?” त्यांचं बरोबरच
होतं. “वेगळं ट्राय करू”.
कोणी म्हणालं,
“इथे छपन्न भोग आहेत तिथे आपल्याला जायचंय” .
“म्हणजे
हॉटेलचं नाव का बाबा?”
“अरे ५६ भोग
म्हणजे ५६ प्रकारची मिठाई असते”.
“नाही नाही,
५६ मिठाईंची दुकाने आहेत त्या भागात”. असा प्रत्यकाने स्वताचा अर्थ काढला होता.
पण या ठिकाणी संध्याकाळी
जायचे होते. हा विषय थांबवत पोहे खायला समोरच्या टपरीवर आम्ही गेलो. बागेत भेळ
खातो तसे कागदात पोहे, त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू असे प्रत्येकाने हातात घेऊन खाल्ले. गरम जिलबी
ची चव घेतली. इंदौरी पोहे असं म्हटलं कि माझ्या मनात मराठी अस्मिता जागी व्हायची.
पोहे ‘आमचे’ आणि नाव ‘इंदौरी’? कुठेतरी मराठीपणाची सूक्ष्म शंका वाटायची .
या पोटभर
केलेल्या ब्रेक फास्ट वर सबंध दिवस निघाला. शहरात फेरफटका मारला. प्रसिध्द राजवाडा,
होळकर साम्राज्याचा इतिहास असलेल म्युझियम पाहिलं. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास
वाचताना आमची मान उंचावली. पण पोहे? अहिल्याबाई होळकरांकडे करत असतील नं पोहे?
तुम्हाला हा प्रश्न म्हणजे मूर्खपणा वाटेल. होय, होळकर परिवारासाठी पोहे बनवले जात
होते अण्णा उर्फ श्री.पुरुषोत्तम जोशी यांच्या प्रशांत उपहार गृहात.
श्री
पुरुषोत्तम जोशी. लागली लिंक. मराठी माणूस जिथे जाईल तिथे आपली मराठी संस्कृती
रुजते. जोशी आपल्या आत्याकडे इंदौर ला गेले आणि तिकडचेच झाले. गोदरेज कंपनीत
सेल्समनशिप केली. पण स्वतःचा उद्योग सुरु
करावा असं मनात होत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षांनी त्यांचे स्नॅक्स
सेंटर सुरु झाले. इंदौर मधल्या मिल कामगारांसाठी पोहे सुरु झाले. महाराष्ट्रातील
पोहे इथे आले आणि इंदौरच्या खवय्या रसिकांवर राज्य करू लागले. अजूनही करताहेत.
इंदौरच्या ८० % लोकांची आवडती डिश पोहेच आहे. आज सुद्धा इथे तयार झालेले पोहे
मुंबई आणि दिल्लीच्या अनेक कुटुंबासाठी विमानाने पाठवले जातात. ही डिश सर्व
थरातल्या लोकांसाठी तेव्हढीच आवडती आहे. त्यामुळे गरीब श्रीमंत असा भेदच उरत नाही.
छुट्टी हो या वर्किंग डे इंदौरच्या हजारो घरांमध्ये रोज पोह्यांचा आस्वाद घेतला
जातो. आज मितीला वीस हजार किलो पोहे रोज खाल्ले जातात, असे एका पाहणीत समजले आहे. नवी
जीवनशैली आणि नव्या संस्कृतीचा काहीही परिणाम न झालेले असे पोहे हे इंदौरचे आयकॉन आहे.
इंदौरच्या मिल
कामगारांसाठी सुरु केलेलं हे मेस वजा पोह्याचं दुकान आज त्यांची तिसरी पिढी
चालवतेय जेलरोड, ए.बी.रोड, यशवंत रोड,आणि नवरतन बाग असे चार आऊटलेट्स. इथे पोहे
रसिकांसाठी रोज सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत ४० ते ५० किलो पोहे तयार होतात. जवळ
जवळ ६५ माणसे हे काम करतात. १९५० मध्ये पंडित नेहरू कॉंग्रेस अधिवेशनासाठी इंदौरला
आले असताना त्यांनी या पोह्यांचा आस्वाद घेतला.त्यांनी प्रभावित होऊन अण्णांना
बोलावले आणि सांगितले, “यह तो अवाम का नाश्ता है”. इंदिरा गांधी, अटल बिहारी
वाजपेयी, माधवराव सिंधिया आणि ब-याच जणांनी याचा आस्वाद घेतला आहे. असा हा
पोह्यांचा इंदौरी प्रवास.
रायपूर
शहरातही जयस्तंभ चौकात कांदा पोह्याचा ठेला आहे. सकाळी सहा ते दहा या वेळेत पोहे
विक्रेते साहू महिना दोन लाख रुपये कमावतात. नागपूरच्या ‘के.पी की टपरी’ वाले
प्रसिध्द पोहे विक्रेते रूपम साखरे पोहे व्यवसायातून वर्षाला लाखो रुपये कमावतात
आणि दरवर्षी कुटुंब घेऊन वर्ल्ड टूर ला जातात. गेली ३५ वर्षे ते हा व्यवसाय करतात.
रोज सकाळी भाजी घ्यायला आपल्या होंडा सिटी गाडीने जातात. त्यांची ‘चना पोहा डिश’
प्रसिध्द आहे. बघा आपल्या पोह्यांनी कसा बिझिनेस दिलाय. हे झालं मराठी पोह्याचं
राज्याबाहेरील चित्र .
कोकणातल्या
वाडीत डोकावलं तर पोह्यांची परंपरा अजून वेगळी दिसेल. परंपरेनुसार दिवाळीत
फराळाच्या पदार्थांमध्ये लाडू, चकली, चिवडा, करंज्या,..ही यादी. पण कोकणातल्या
दिवाळीत म्हणजे नरक चतुर्दशी ‘चावदिस’ या दिवशी या फराळाच्या पदार्थांना स्थान
नाही, तर फराळाला आलेल्या लोकांसाठी केलेले पारंपारिक पद्धतीचे पोहे याचे महत्व
असते. या दिवशी सकाळी नातेवाईक आणि शेजा-यांना एकमेकांच्या घरी पोहे खायला यायचं
आमंत्रण दिलं जातं. तिखट पोहे, गोड पोहे, दुध पोहे, गुळ पोहे, बटाटा पोहे असे
प्रकार आणि त्या बरोबर केळीच्या पानात
सजवलेली रताळी, काळ्या वाटण्याची उसळ देतात. सिंधूदुर्गात ही प्रथा आजही पाळतात.
म्हणजे घरात भातापासून तयार केलेले पोहेच या दिवशी वापरतात.
हा सिझन भाताचं
नवं पीक येण्याचा असतो. हा भात, पोहे तयार करण्यासाठी आदल्या दिवशी भिजत घालतात,
तो सकाळी गाळून घेऊन, मडक्यात भाजला जातो. नंतर उखळीत मुसळीने कांडला जातो. या
कांडपणी नंतर तयार झालेले हे पोहे चुलीवरच शिजवले जातात. या वाफाळलेल्या अस्सल
गावठी भाताच्या पोह्यांची चव असते निराळीच. या सिझनच्या पहिल्या पोह्यांचा नेवैद्य
देवाला दाखवून मग आस्वाद घायची ही परंपरा.
इंदौरी
पोह्यांचे ‘उर्ध्वयू’ अण्णा उर्फ पुरुषोत्तम जोशी कोकणातलेच हो.
ले – डॉ. नयना कासखेडीकर .
Very nice. Excellent write up.
ReplyDeleteधन्यवाद मनोजजी !
DeleteSundar lekh. Pohyancha ha itihas khupach manoranjak ahe.
ReplyDeletethank you
Deletethank you
DeleteThis comment has been removed by the author.
Deletemastach tai.. kadhi yeu pohe khayala??
ReplyDeleteया केंव्हाही ,कोकणातले स्पेशल पोहे ही मिळतील.धन्यवाद,पण आपलं नाव सांगाल म्हणजे आमंत्रण द्यायला सोपे .तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे माझा लिखाणाचा उत्साह .
Deleteनयनाताई लेख खूपच अप्रतिम👌👌वाचता वाचताच पोहे करायची व खायची इच्छा झाली.
ReplyDeleteधन्यवाद !
Delete