Friday, 26 December 2014

माजघरातली सोन्याची खाण


माजघरातली सोन्याची खाण



      मराठी काव्यप्रांतात सामान्य लोकांच्या हृदयाला भिडणारे तत्त्वज्ञान बोलीभाषेत सांगून वेगळा ठसा उमटविणा-या बहिणाबाई नथुजी चौधरी. यांची आठवण होण्याच कारण म्हणजे, तीन डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. जळगाव जिल्ह्यातल्या असोदा गावच्या सधन शेतकरी कुटुंबातल्या बहिणाबाईंना चार बहिणी, तीन भाऊ आणि चुलत-आत्ये भावंडांचे मोठे एकत्र कुटुंब होते. वयाच्या तेराव्या वर्षीच जळगावातील वतनदार असलेल्या चौधरी यांच्या नथूजींबरोबर विवाह होऊन त्या महाजन कुटुंबातून चौधरी कुटुंबात दाखल झाल्या. संसाराचा अर्थही कळण्याचे वय नसलेल्या बहिणाईंचा तेराव्या वर्षी संसारही सुरु झाला.

    लौकीकार्थाने काहीही शिक्षण न घेतलेल्या, अक्षर ओळख नसलेल्या, मौखिक परंपरेने आत्मसात केलेल्या गोष्टी, भोवतालच्या निसर्गाचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि जीवन जगताना प्रत्यक्ष घेतलेले अनुभव यातून त्यांनी आपल्या कवितातून जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं आहे. तेराव्या वर्षी लग्न, तरुणपणीच तिशीच्या आंत आलेलं वैधव्य आणि या अल्पशा जीवनात आलेली नैसर्गिक संकटंही समजून घेत त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले, हे त्यांच्या कवितांवरून लक्षात येतं. शेतकरी असल्याने आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकमेकांच्या सुखदु:खाच्या संवेदना त्या जाणत होत्या. बहिणाबाईंनी कुमारिका ते सौभाग्यवती, सौभाग्यवती ते विधवा, कन्या ते सूनबाई, मुलगी, पत्नी, माता, सासू, आजी अशा विविध भूमिका आनंदानं निभावल्या. आपली स्वता:ची त्या त्या भूमिकेतली काय कर्तव्य आहेत ती जाणून घेतली आणि पारही पाडली.

      बहिणाबाईंची कविता म्हणजे जीवन जगण्याचा प्रत्यक्ष अनुभवच. बहिणाबाई म्हणजे आजच्या कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भान असणा-या होत्याच, पण त्या आजच्या संसार करणा-या लेकी-सूना, सासवांना, देवाची भक्ती करणा-या सर्व भक्तांना, अविवेकाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणा-या शेतक-यांना, वैधव्य आलेल्या सर्व स्त्रियांना आदर्श वस्तुपाठ घालून देणा-या होत्या.

    शेतीकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ओव्या रचून त्या गात. सासर-माहेर, संसार, शेतीची अवजारे, शेतकरी जीवनातील विविध प्रसंग, सण, परिचित व्यक्ती त्यांच्या कवितेत आढळतात.

                          
                                             बहिणाबाईंच्या वहाणा आणि इतर वस्तू

      बहिणाबाई कविता लिहित होत्या त्याच काळात आधुनिक मराठी कविता बहरत होती. केशवसुत, बा.सी.मर्ढेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बालकवी, भा.रा.तांबे, शरद्चंद्र मुक्तिबोध यांच्या नवकवितांनी मराठी कविता समृध्द होत होती. रसिकांना भावत होती. कारण या कवितांमधून नवा विचार पुढे येत होता. एकापेक्षा एक कविता निर्माण होत होत्या. याच काळात बहिणाबाईंची लोकभाषेतील अहिराणी कविताही तयार होत होती. विशेष म्हणजेही कविता तितकीच सरस असूनही साहित्य सृष्टीला त्याचा मागमूसही नव्हता.

     जीवनाचं तत्वज्ञान, तेही स्वताच्या अनुभवाने सिध्द झालेल्या आशयसंपन्न व बोलीभाषेतल्या असल्याने, प्रत्येकाच्या मनाला भिडणा-या अशा या रचना त्यांच्या मरणोत्तर प्रकाशात आल्या आणि प्रकाशितही झाल्या. आचार्य अत्रे यांच्या नजरेने हे हेरले नसते तर, बहिणाबाईंचा या महाराष्ट्राला परिचयही झाला नसता. आचर्य अत्रे यांचे या महाराष्ट्रावर केव्हढे उपकार आहेत?

     बहिणाबाईंचे पुत्र, कवी सोपानदेव हे आचार्य अत्रे यांचे मित्र. त्यांच्या २२ वर्षाच्या मैत्रीत सोपानदेवांच्या घरात दडलेला हा तत्वज्ञानाचा खजिना आपल्याला कसा कळला नाही याची अत्रे यांना खूप खंत वाटली होती. बहिणाबाइंच्या अनेक रचनांपैकी कवी सोपानदेव आणि त्यांच्या आतेभावानं लिहिलेल्यापैकी केवळ ३५ रचनाच हाती लागल्या. आचार्य अत्रे यांनी पुढाकार घेऊन संग्रह रुपात त्या प्रकाशित केल्या. १९५२ ला प्रसिध्द झालेल्या या संग्रहाला अत्रे यांची विस्तृत प्रस्तावनाही आहे. यात ते म्हणतात, "बहिणाइंच्या शब्दा- शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस व सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. मौज ही आहे की,' जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल 'असे त्याचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा हा भाषेचा, विचारांचा व कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे आणि 'मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?' या त्यांनी मानवतेला दिलेल्या अमर संदेशाने तर मराठी वाड:मयात त्यांचे स्थान आढळ केले आहे."

     बहिणाबाई निवर्तल्यावर पुढच्याच वर्षी हा संग्रह प्रसिद्ध झाला. त्या हयात असताना हे झालं असतं तर, अशा या बहिणाबाईना याची देही याची डोळा पाहण्याचं, भेटण्याचं भाग्य रसिकांना लाभलं असतं याची हळहळ रसिकांबरोबर जाणकार साहित्याकारांनाही वाटली असेल.

     कणखर स्वभावाच्या बहिणाबाईं यांनी जळगावच्या मातीकडे सोन्याची खाण म्हणूनच पाहिलं आणि जीवन-मरण, सृष्टी व माणसाचे नाते समर्थपणे जोडले. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदु:खाकडे समभावाने पहू शकणारे शहाणपण, प्रत्यक्ष जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ठ्ये.

    बहिणाबाई खेड्यात वाढल्या. शेतात राबल्या. वतनदारी श्रीमंती पासून दारिद्र्यरेषेपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांना व्यवहारज्ञान शिकवून गेला. खेड्यातल्या जीवनचक्राशी त्या एकरूप झाल्या. आपली पारंपारिक भूमिका नेमाने पर पाडली. नाती सांभाळली. कुटुंब, माणस, निसर्ग, शेत,या बरोबरच शेतातील अवजारे, कोयपं, आऊत, पाभर(तिफण),चाहूर, वखर, नांगर ही सुद्धा त्यांच्या चिंतनातून सुटली नाहीत. म्हणूनच ब्राह्मणी आणि वाणी संस्कृतीत ज्याच्यातून पीठ येतं त्याला जातं म्हणतात, पण बहीणाबाईंना हे मान्य नाही. त्या म्हणतात,
     
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'


अरे घरोटे घरोटे, वाणी-बामनाचं जातं,
कसा घर घर वाजे, त्याले म्हनवा घरोटं.

तर,
अरे जोडता सोडलं, त्याले नाते म्हनू नये,

ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नये.

      त्यांच्या शेतातल्या अनुभवावरून जीवनातील वास्तव आणि निसर्ग, शेती, पाणी, प्राणी, माणूस, देव यांच्यातील ताळमेळ कसा आहे, तो कसा असायला हवा?, याचं गणित त्या मांडतात. सरत्याला परतं करणं, तिफणी नं मातीशी करार करणं, पेरणीचा चौघडा वाजवीत बीज मातीच्या कुशीत टाकणं, पेरलेल्या बी-बियाणांवर मायेची शाल पांघरणं ही शेतातल्या प्रक्रियेची जडण-घडण त्यांच्या कवितेत दिसते.

धरीत्रीच्या कुशीमधी, बी-बियानं नीजली,

वर पसरली माती, जशी शाल पांघरली.

बीय टरारे भूईत, सर्व कोंब आले वर,

गहिवरलं शेत, जसं अंगावरती शहारं.

     बहिणाबाईंनी केलेली ही शेतीची वर्णनं जणू शेती प्रक्रियेची चित्रफितच दाखवताहेत असं वाटतं. पेरणी नंतर आलेला पाऊस शेतक-याला किती आनंद देऊन जातो.हा पाऊस बहिणाबाईना देवाचा प्रसादच वाटतो. त्यानंतर उगवलेलं कोवळं पीक मग बहिणाबाईंची कविता बनतं.


   ऊन वा-याशी खेयता

एका एका कोंबातून

पर्गटले दोन पानं

जसे हात जोडीसन

टाया वाजविती पानं

      बिजांकुरातून उगवलेली कोवळी दोन छोटीशी पान बहिणाबाई ना दोन इवलेसे हात वाटतात.तर वर आल्यानंतर हलणारी पाने जणू, ती टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताहेत. देवाची प्रार्थनाच करताहेत.देवाचं स्मरण करताहेत.अशीच आबादी आबाद होऊदे म्हणून मागणं मागताहेत.या निर्मितीमागच व निसर्ग नियमांचं गूढ त्यांना विचार करायला लावतं. आणि नियंत ,देव कसा अजब गारुडी आहे वाटतं.शेतात बी पेरल्या पासून ते पीक व्यवस्थित हाती येईपर्यंत ,शेतक-याचे कष्ट वाया जायला नकोत अशी काळजी त्यांना वाटते.

                                                          बहिणाबाईंची 'हक्काची' अवजारे

आला आला मार्गेसर ,

आली कापणी कापणी.

आज करे खाले वऱ्हे,

डाव्या डोयाची पापनी.

     आज डावा डोळा लवतोय, काही संकट तर येणार नाही नं? असा संशय येऊन त्या हातातल्या विळ्याशी बोलतात. “आता विळ्या रे बाबा, दाखव तुझी करामत”. अशा प्रकारे त्या अवजारांशी बोलतात, कधी वा-याशी बोलतात. बैलाशी बोलतात. असा सगळ्यांशी संवाद साधून एकेक काम हाता वेगळं करतात. मातीवर बहिणाबाईचं जीवापाड प्रेम आहे. तर धरित्री बद्दल त्यांना अत्यंत आदर. तीच आपली खरी माय आहे. परंपरेने मिळालेलं देणं आहे. असं त्यांना वाटतं.

     सोपानदेव एकदा त्यांना विचारतात, “तू दिवसभर मेहनत करते, थकते, तुझं सगळं लक्ष शेतातल्या जमिनीकडे असतं, तरीही तुला इतक्या सुंदर कविता कशा सुचतात?. त्यावर बहिणाबाई म्हणतात, “ मी धरीत्रीच्या आरशात सरग(स्वर्ग) पाहते रे बाप्पा! केव्हढं त्यांचही मन आरसपानी.

                                                             बहिणाबाईंची वापरातली चूल

      नही दियामधी तेल, चुल्हा पेटता पेटेना, खोकलीमाय या त्यांच्या अत्यंत आशयगर्भी रचना. शेतक-यांना शेतावरून कष्ट करून घरी परतल्यानंतरही अडचणींना तोंड द्यावे लागते.याचे वर्णन तर अप्रतिम, जिवंत आहे. त्यांच्या घरातल्या दिव्याला नेहमी तेलाची कमतरता भासते. एकदाचे तेल मिळाले तर, वात उंदराने पळवलेली असते. चिंधीची नवी वात करून घेतली तर, काडेपेटीच हरवते. काडेपेटी सापडली तर, तिच्यात नवसाने एकच काडी शिल्लक असते. असा तो ‘दिवा’ एका काडीत कौशल्याने उजळे पर्यन्त मनावर केव्हढा ताण येतो. याचाही विचार त्यांच्या संवेदनशील मनाने केला आहे. वस्तुस्थिती आणि वास्तव याचं भान त्यांना आहे. म्हणून संसार कसा आहे? हे अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे.

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके, तवा मियते भाकर
 
ह्या रचनेने तर अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली ही बहिणाबाईंची हृदयस्पर्शी रचना घराघरांत पोहोचली आहे. एव्हढ्या छोट्याशा कवितेतून त्यांनी मानवी जीवनाचं मर्म आणि वर्म सांगितले आहे त्याला तोड नाही.
आधुनिक काव्य, नवकाव्य, कुठलीही शैली किंवा अलंकार याचं कसलंही ज्ञान नसलेल्या त्यांच्या या कविता श्रेष्ठ दर्जाची जानपदं मानली जातात.
बहिणाबाईंच्या नणंदे नं, राजस आत्यांनी एकदा त्यांना विचारलं, “तुला एव्हढे हे शिकवितो कोण?माझ्या सारखीच तू न शिकलेली, ना पढलेली, तुला हि गाणी सुचतात तरी कशी? हि बोली तुला कोण शिकवितो?” त्यावर बहिणाबाई म्हणतात,

“ माझी माय सरोसती, माले शिकविते बोली.

लेक बहिनाच्या मनी, किती गुपितं पेरली.

माझ्या साठी पांडुरंग, तुझं गीता-भागवत ,

पावसांत समावतं, माटीमधी उगवतं.

अरे देवाचं दर्शन, झालं झालं आपसूकच.

हिरीदात सुर्यबापा , दाये अरुपाच रूप.”

बहिणाबाईं च्या रचनांत स्वताच्या वैधव्याचे हृदय भेदक वर्णन वाचायला मिळते. ऐन तारुण्यात सौभाग्य गमावल्यावर त्या लिहितात,

लपे करमाची रेखा, माझ्या कुंकवाच्या खाली.

पुसोनिया गेलं कुंकू, रेखा उघडी पडली.

                                                        बहिणाबाई च्या संसारातील भांडी
 
         मुलं पोरकी झाली. संकट कोसळलं. पण दुख बाजूला सारून, कंबर कसली आणि स्वतालाच धीर दिला. कुंकू पुसलं तरी माहेरचं कपाळावरचं गोंदण कायम आहे. मनगटावरच्या बांगड्या फुटल्या, तरी कर्तृत्व थोडीच फुटणार आहे. मंगळसूत्र तुटलं तर तुटू देत, पतीच्या गळ्याची शपथ हेच मंगळसूत्र. असं म्हणून संसारात सुख कशात आहे ते शोधलं. आपल्या जीवाभावाच्या सखीला, धरित्रीला त्या विचारतात,

सांग सांग धरतीमाता, अशी कशी जादू झाली?

झाड गेलं निघीसन, मागे सावली उरली.

      आईची एक आठवण सोपानदेवांनी सांगितली आहे, “ कर्जबाजारी झाल्याने आईच देवदर्शन कथाकीर्तन बंद होतं. आईची साठी उलटल्यावर, पायदुखीचा त्रास होता. तेंव्हाही ती कथा कीर्तनाला जात नसे. मी विचारलं, “ हल्ली कथा कीर्तनाला जात का नाहीस ?” तेंव्हा बहिणाबाईं चे उत्तर होते, “ अरे ते कथेकरी बोवा, नामा म्हणे, तुका म्हणे, तेच ते सांगतो. आरं पन भल्या मानसा तू काय म्हणे, ते एकदा तरी सांगशीन का नाही? तुले सोताचं आसं सांगण्यासाठी देवानं धाडलं नाही का? याला असं वाटतं, त्याला तसं वाटतं, यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय वाटतं, यातून तुमचं त्या विषयांच ज्ञान दिसतं, चिंतन दिसतं. हे बहिणाबाईंना अभिप्रेत होतं. कथा कीर्तनाने त्यांना बहुश्रुतता लाभली होती. भजन कीर्तन ऐकणे हेच त्यांचे देवदर्शन होते. विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलापेक्षा नामदेवाच्या कीर्तनात नाचणारा, जनाईबरोबर दळणारा, सावताजी बरोबर निंदणारा विठ्ठलच त्यांना आवडे.

     बहिणाबाईंना सर्वात चीड आहे ती माणसाच्या स्वार्थी वृत्तीची. कृतघ्नतेची. त्या संतापून म्हणतात, “माणसा, तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा गोठ्यातल जनावर बरं. गाय-म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. तुझं पोट एकदा भरलं की तू उपकार साफ विसरतोस. कुत्रा त्याचं शेपूट इमानीपणा दाखवण्यासाठी हलवतो. तर, माणसा तू तुझं मतलब साधण्यासाठी मान डोलवतोस. लोभामुळे तू माणूस असूनही काणूस (पशू) झाला आहेस”. हे सांगून, त्या हृदय पिळवटून विचारतात, “ मानसा मानसा कधी व्हशील मानूस?” ही त्यांची आर्तता आजच्या पिढीला समजेल का?

       गाव व्यवस्था, कृषी संस्कृती, बारा बलुतेदार पद्धती, यामुळे त्या काळात समाज व्यवस्थेचा कारभार सुरळीत चालत असे. पण सुधारणा आली आणि ही व्यवस्था कोलमडली. प्रत्येकच त्याच्या त्याच्या क्षेत्रात निष्णात होता. त्यामुळे गाव कसं स्वयंभू होतं. मात्र नवे बदल झालेले बहिणाबाईना रुचले नाहीत. त्याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या ‘अनागोंदी कारभार’ या कवितेत दिसतं. त्या याबद्दल म्हणतात, “ चाले महाराची पोथी, ढोरे बामन ओढतो.”

      बहिणाबाईंच्या स्त्रीसुलभ जाणीवाही किती प्रगल्भ होत्या, हे त्यांच्या कवितेतून जाणवतं. ‘माहेर’, ‘माहेरची वाट’, ‘सासुरवाशीन’ या कवितेतून माहेरचा अभिमान, सासरच्या लोकांविषयी च्या भावना, नाती, व्यावहारिकता, कर्तव्य याची ओळख होते.बहिणाबाई त्यांच्या स्त्री संबंधी कविता, ओव्या, व्यक्तिचित्रे यातून स्त्रीधर्म नीती उलगडून दाखवतात.सासू या नात्याकडे सहानुभावाने सह्संवेदनेने, पहा म्हणजे तिच्याशीही सुनेचे नाते जवळीकतेचे, जिव्हाळ्याचे होईल असा सल्ला त्या देतात. त्या काळातला हा सल्ला आजच्या सुनांनाही लागू आहे. परस्पर संवादाचं महत्व त्यांनीही जाणलं होतं.

     भारतीय समाजरचनेतल्या प्रत्येक सांस्कृतिक नात्याच्या मूळापर्यंत त्या पोहोचल्या होत्या. मानवी मन हा त्यांच्या चिंतनाचा आवडता विषय. मन वढाय-वढाय, मोकाट-मोकाट, लहरी-लहरी अशा प्रतिमांनी त्यांनी घडवलेलं मनाचं दर्शन चिरकाल टिकणारं आहे. ‘विषारी मन’ हे साप-विंचूच्या विषापेक्षाही वाईट आहे. हे सत्य त्यांनी सांगितले आहे.

     बहिणाबाईंचे काव्य तुंम्हा आंम्हा सर्वांचे काव्य आहे. त्यातला भाव, प्रवाहीपणा तत्वचिंतन ,बोधकता यामुळे हे काव्य उच्च दर्जाचे ठरले आहे. त्यात कारुण्य आहे. पती भक्ती आहे. निसर्गाच्या लीला आहेत. माया, कौतुक, असे अनेक रस आहेत. या कविता आशय संपन्न आहेत. त्यात नाद आहे. लय आहे. मधुरता आहे. हाती लागलेल्या एव्हढ्याशा कवितात जीवनाचे सारे सार सामावले आहे. असं हे आचार्य अत्रे यांना सोपानदेव चौधरी यांच्याकडे सापडलेलं बावनकशी सोनं.

                           बहिणाबाईंच्या कुटुंबीयांसमवेत बहिणाबाईंच्याच घरात -चौधरी वाडा, जळगाव 


( टीप :- या लेखातील सर्व फोटो मी बहिणाबाई चौधरी यांच्या जळगाव येथील 'चौधरी' वाड्यास भेट देऊन प्रत्यक्ष काढले आहेत. )


-डॉ.नयना कासखेडीकर
                                          -------------------------------------------------