कॉमन मॅन
ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री आर.के.लक्ष्मण (रासिपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण) यांना डी.एस.के.इंटरनॅशनल कॅम्पस तर्फे डी.एस.कुलकर्णी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं अशी फोटोबातमी डिसेंबरच्याच वृत्तपत्रात वाचली. आनंद झाला होता. यापूर्वीही त्यांना व्यंगचित्रांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, बी.डी.गोएंका अवॉर्ड, शंकराचार्य अवॉर्ड, भारत भूषण पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, मराठवाडा विद्यापीठाची, म्हैसूर व दिल्ली विद्यापीठाची डि.लिट् आणि अनेक मानाचे नागरी पुरस्कारही. सर्वच व्यंगचित्रकारांचं भाष्य सामान्य माणसाला बातमी इतकंच आवडत असतं. परंतु, आर.के.लक्ष्मण यांचं व्यंगचित्र प्रत्येक सामान्याला आपलंच प्रातिनिधिक चित्र वाटत असतं. सर्व सामान्य भारतीयांच्या मानसिकतेचं अचूक भान त्यांच्या कॉमन मॅन मधून व्यक्त होत असतं.
‘कॉमन मॅन’. महागाईनं त्रस्त झालेला, राजकारणाचा बळी ठरणारा, आता रॉकेल ऐवजी गॅस सिलेंडर साठी आणि रेशनसाठी रांगा लावणारा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षणक्षेत्रातील सामान्यांचं आर्थिक शोषण, वीज, पाणी प्रश्न, असे अनेक प्रश्न रोजच सामान्य माणसाला सतावत असतात. कोणीही दखल घेत नाही. असे वर्षानुवर्षे चाललेच आहे. समाजातल्या गर्भश्रीमंत, सेलिब्रेटी, राजकारणी व स्वतःला शिक्षण नसूनही पैश्याच्या जोरावर उच्चभ्रू समजणा-यांना याचं भानही नसतं. शिवाय काही वेळा जो सामान्य नागरिक यात भरडला जात असतो त्यालाही कळत नसतं. याशिवाय सामान्य माणसाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील घडामोडींची माहिती नसते. अशा वेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारी व्यवस्था म्हणजे पत्रकारिता. त्याची माध्यमे आज अनेक आहेत. पण यापूर्वीची प्रभावी माध्यमे वृत्तपत्रेच होती. टाइम्स ग्रुपचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे मोठं साखळी वर्तमानपत्र.
आर.के.लक्ष्मण.लहानपणीच कार्टूनिस्ट व्हायचं ठरवलेला संवेदनशील कलाकार. म्हैसूर युनिव्हर्सीटीतून बी.ए. केल्यानंतर, फ्रीलान्सर म्हणून ‘स्वराज’ या वर्तमानपत्रातून त्याचं व्यंगचित्र प्रसिध्द होऊ लागलं. आर.के.लक्ष्मण फ्री प्रेस जर्नल आणि इलस्ट्रेटेड विकलीत कथांसाठी चित्र, मुलांच्या मासिकासाठी कॉमिक स्ट्रिप्स काढत. पण त्यांचं स्वप्न होतं राजकीय व्यंगचित्र काढणं. त्यामुळे या कामात त्यांना रस वाटत नव्हता. आपली बौद्धिक क्षमता गंजतेय आणि राजकीय व्यंगचित्रांचा प्राण असलेली आपली विडंबन शक्ती मंदावतेय असे त्यांना वाटे. त्याच्या जोडीला व्यंगचित्रांचे चाहते, “टाइम्स मध्ये तुमची व्यंगचित्र कधी प्रकाशित होणार”? असे विचारीत. तेंव्हा त्यांना फार क्लेश व्हायचा. कारण टाइम्स मध्ये ते प्रसिध्द होणं ही अभिमानाची गोष्ट होती. मग त्यांनी स्वान्तसुखाय रोज व्यंगचित्र काढणं चालू केलं. टाइम्स मध्ये नोकरी धरल्यावर सुरुवातीला एकदा, मग आठवड्यातून तीनदा, मग फक्त रविवारच्या पुरवणीसाठी आणि पुढे पुढे रोज ते प्रसिध्दही होऊ लागलं.
टाइम्स ऑफ इंडिया मधून श्री
आर.के.लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ अधून मधून लोकांना भेटत असे. ते तिथे
व्यंगचित्रकार म्हणून नोकरीस होते. त्यांना वाटलं की, सामान्य माणसाच्या समस्यांवर
मल्लिनाथी करण्यासाठी टाइम्स मध्ये रोज एक भाष्य केलं तर ते प्रभावी होईल. त्यासाठी
अर्थातच त्यांचा कॉमन मॅन होताच आणि त्यांनी वर्षाचे ३६५ दिवस ‘एक कॉलम’चं छोटंसं
व्यंगचित्र देण्याचं ठरवलं. वाचकांची राजकीय समज फारशी न ताणता, सोपं, पण
परिणामकारक चित्र कि ज्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक घटना सामान्य
माणसा च्या बौद्धिक पातळीवर नेऊन उभं करायचं आणि अद्भुत कल्पनाशक्तीच्या आधारे
परिस्थितीतील विसंगतीवर अचूक बोट ठेवायचं हा त्यांचा उद्देश होता. हे असं वर्षभर
चालवायचं म्हणजे आव्हानच होतं. या सदराचं नाव होतं, ‘यू सेड इट’
मला आठवतंय, आम्ही लहानपणी रोज सकाळी दुकानातून आजोबांना वर्तमानपत्र आणून दयायचो, तेंव्हा प्रत्येक पेपरच्या घडीवर ‘बाळूकाका बाळराणे’ , ‘जाता जाता’, ‘काय सांगता’? ही एक कॉलमची व्यंगचित्रे रोज बघायचो. त्याचा अर्थ लहानपणी कळायचा नाही. तेंव्हा अशी पहिल्या पानावर व्यंगचित्र म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. याच काळातलं यू सेड इट (कसं बोललात?) हे अत्यंत लोकप्रिय व्यंगचित्र. महाराष्ट्र टाइम्स मध्ये ‘कसं बोलतात’ या शीर्षकाखाली ती प्रसिध्द होऊ लागली. राजकीय स्थितीवर निर्भीडपणे आपल्या चित्रातून भाष्य करणारे व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले.
यू सेड इट या भाष्यातलं चित्र
होतं, धोतर आणि चौकडीचा कोट, डोक्याला टक्कल, नाक फुगीर, आखूड मिशा आणि
डोळ्यावर चष्मा असणारा आणि चेह-यावर भांबावलेले भाव असलेला माणूस. कॉमन मॅन.
हे चित्र भारतातील कोट्यावधी मूक जनतेचं प्रातिनिधिक चित्र होतं. अवती भोवती
घडणा-या घटनांचा तो मूक साक्षीदार असायचा.
ह्या व्यंगचित्राने तब्बल ५० वर्षे सामान्य लोकांच्या भावनांना वाट मोकळी
करून दिली. यू सेड इट हे सदर प्रसिध्द करायची तारीख ठरली आणि त्याच वेळी लंडनच्या ‘इव्हिनिंग
स्टँडर्ड’च्या संपादकांचं आर.के.लक्ष्मण यांना पत्र आलं. डेव्हिड लो ‘डेली मेल’ मध्ये जॉईन झाल्याने त्यांच्या जागी
आर.के.लक्ष्मण यांना काम करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. पत्रात होतं , “ प्रिय
लक्ष्मण, टाईम्स ऑफ इंडियातील तुमची काही व्यंगचित्र पाहून मी प्रभावित झालो. या
देशात येऊन काम करण्याच्या कल्पनेत तुम्हाला कितपत स्वारस्य आहे? जर असेल तर
तुम्ही आमच्या वृत्तपत्रात सामील व्हायचा विचार करावा....”अशा आकर्षक ऑफर चे तेही
परदेशातील. कोणाला नाही आकर्षण वाटणार? तसे आर.केंनाही मनातून जावेसे वाटले.
दिल्लीला टाइम्स सुरु झाल्यानंतर त्याचा खप वाढविण्यासाठी आर.के.लक्ष्मण यांनी काढलेल्या आठ वर्षातल्या भारतीय आणि परदेशी घटनांवरील व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवलं गेलं. या प्रकारचं प्रदर्शन प्रथमच दिल्लीत भरत होतं. लोकांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला होता. हे प्रदर्शन पाह्यला एक प्रख्यात व्यंगचित्रकार सुद्धा आले होते. त्यांनी आर.के.लक्ष्मण यांची चित्रे पाहून त्यांचे कौतुक करताना हेही सांगितले कि, “तुमच्या व्यंगचित्रातून तो चौकडीचा कोट घातलेला, मिशा असलेला,चष्मा लावणारा सामान्य माणूस काढून टाका. हा गरीब सामान्य माणूस तुमच्या कलेच्या विकासाआड येत आहे”. पण आर.के.यांनी हा सल्ला न मानता आपले काम चालूच ठेवले आणि तीन दशका नंतर टाईम्स ऑफ इंडियाच्या १५० व्या वर्धापनदिना निमित्त टपाल खात्याने जे खास तिकीट प्रसिध्द केले त्यावर हा कॉमन मॅन झळकला. ही या कॉमन मॅन च्या आणि आर.के.लक्ष्मण यांच्याही गौरवाचीच गोष्ट होती.
आर.के यांची विषयाची हाताळणी, विनोदबुद्धी, रेखाटन कौशल्य वेगळंच आहे. अतिशय संयमित. त्यामुळेच चोखंदळ वाचकांना ती व्यंगचित्रे आवडतात. पण या कॉमन मॅन ने लोकांना इतकं जिंकलं होतं की पुढे पुढे आर.के.लक्ष्मण यांना, टपाल खात्यातील उशीर, सदोष टेलिफोन यंत्रणा, अव्वाच्या सव्वा येणारी विजेची बिले, शाळेतील भ्रष्टाचार याविषयी तक्रार करणारी पत्रे येऊ लागली. एक तर पत्र मजेशीर होतं. त्यात म्हटलं होतं, ‘कृपया ४७ डाऊन ही गाडी अमुक ठिकाणी काही मिनिटे थांबवावी. त्यामुळे ऑफिसातून घरी जाण्यासाठी पुढच्या गाडीची मला चार तास मला वाट पहावी लागणार नाही.’ बिच्चारा सामान्य माणूस?जीवन जगण्याच्या रोजच्या लढाईत हतबल झालेला असतो. आपल्या समस्येवर कोण उपाय करू शकतो?आपल्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कोण देऊ शकतं?याचं व्यासपीठ कॉमनमॅन शोधत असतो. आश्चर्य म्हणजे या लोकशाहीच्या दरबारात त्याला प्रशासनापेक्षा, नेत्या-पुढा-यांपेक्षा कलाकाराबद्दल जास्त विश्वास वाटतो.
एकाने तर व्यंगचित्र आवडलं म्हणून तीन रुपये मनीऑर्डर ने आर.के.ना पाठविले होते. त्यांच्याकडे म्हणे आनंद व्यक्त करण्याची ही पद्धत होती. पण आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्याने एव्हढीच रक्कम तो पाठवू शकला होता.
एका ख्रिश्चन चाहत्याने आर.के.ना, आपल्या प्रिय पत्नीचा चेहरा संगमरवरात कोरून द्यावा अशी विनंती केली होती. कारण त्याची पत्नी आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची चाहती होती. ती गेल्याने तिच्या थडग्यावर चेहेरा खोदावा, तोही स्वतः आर.केंनी. अशी या पतीची इच्छा होती.
अशा काय कोणाच्या इच्छा असतील
सांगता येत नाही. कॉमन मॅन च्या प्रभावामुळे सामान्य लोकांना आर.के.लक्ष्मण च
आपल्याला न्याय मिळवून देतील असे वाटत असे. जुगारी मंडळीना तर म्हणे यांच्या
व्यंगचित्रांचं गूढ आकर्षण वाटायचं. त्यांना वाटायचं आर.के.लक्ष्मण यांच्या
व्यंगचित्रात भाग्यशाली आकडा लपलेला आहे. त्यांचं लॉजीकच वेगळं होतं. व्यंगचित्रात
हाताची दिसणारी दोन बोटे, दिव्यांच्या खांबांची संख्या, दृश्यातील एकूण मोटारी,
बसच्या रांगेतील माणसांचा आकडा असा काहीही संबंध ते लावत असत. एकेदिवशी एक गलेलठ्ठ
श्रीमंत आर.कें ना भेटायला आला आणि उद्या प्रसिध्द होणारं व्यंगचित्र पाहायला
मिळेल का ? अशी पैशाच्या मोबदल्यात विनंती
करू लागला. जेणे करून त्यात लपलेला आकडा सर्वांच्या आधीच समजून प्रतिस्पर्ध्यावर
मात करता येईल. मग अशांना समजून सांगणं, कायदा सांगणं हे काम त्यांना करावं लागे.
बापरे कॉमन मॅनची अजबच लोकप्रियता.
असा हा कॉमन मॅन चा ब्रॅन्ड भारतात तर होताच पण परदेशातही प्रसिध्द होता. आर.के.लक्ष्मण अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया या देशात व्याख्यानासाठी जात असत. एकदा त्यांना फ्रांकफुर्ट च्या हायडलबर्ग विद्यापीठाने आमंत्रित केलं होतं. ४० किलोमीटरवर असलेल्या हायडलबर्ग ला जाण्यासाठी फ्रांकफुर्ट विमानतळावर आर.कें.ना घ्यायला येणार होते. विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी खूप रस्ते असल्याने नेमकं कुठून बाहेर जायचं या विचारात असताना आर.कें.ना एका पॅसेजमध्ये एकजण मोठा
फलक /Placard हातात धरून उभा असलेला दिसला. त्या फलकावर आर.केंचे नाव लिहिण्याऐवजी त्यांच्या व्यंगचित्रातील कॉमन मॅन चं चित्र काढलं होतं. ते आर.केंना विद्यापीठात घेऊन जायला आलेले प्राध्यापक होते. त्यांनी ही युक्ती वापरली होती. असं हे कॉमन मॅन चं भारतीय व्यक्तिमत्व जगात ओळखलं जात होतं. आर.के.यांनी जिथे जिथे प्रवास केला तिथे तिथे हा कॉमन मॅन पोहोचला.
आपल्या जन्मगावी म्हैसूर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली. टाईम्स मध्ये त्यांनी जवळ जवळ ५० वर्षे नोकरी केली. यू सेड इट हे व्यंगचित्र सदर ५० वर्षे चालवलं. सदर सुरु करताना मात्र त्यांना, आपण निदान वर्षभर तरी हे सदर सलग चालविले पाहिजे अशी काळजी वाटत होती. मिश्कील, खट्याळ, खुमासदार या वैशिष्ट्यांमुळे ते किती लोकप्रिय ठरले ते यावरून कळतेच.
याशिवाय त्यांनी अनेक निबंध,प्रवासवर्णन व
लघुकथा लिहिल्या आहेत. द मेसेंजर आणि द हॉटेल रिव्हिएरा या दोन कादंब-याही
लिहिल्या आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांची ,बेस्ट ऑफ लक्ष्मण, टाईम्स ची द इलोक़्वंट
ब्रश आणि फिफ्टी इयर्स ऑफ इंडिपेंडन्स थ्रू द आईज ऑफ लक्ष्मण ही पुस्तकेही आहेत. द
टनेल ऑफ टाईम हे त्याचं आत्मचरित्र मराठीत लक्ष्मणरेषा म्हणून आहे. हे पुस्तक
वाचल्यानंतर अनेक गोष्टी कळल्या. त्यापैकी एक, त्यांचा चित्राचा आवडता विषय म्हणजे
गणपती आणि कावळे. कावळ्याचं त्यांना लहानपणापासूनच आकर्षण होतं. कावळा म्हटलं कि बहुतेक
त्याच्याकडे आपण तिरस्कारानेच बघतो. पण
आर.के.यांना हा कावळा म्हणजे सर्वोत्कृष्ट पक्षी वाटतो. कारण तो कुठेही कसल्याही
पार्श्वभूमीवर उठून दिसतो. तो हुशार, धूर्त आणि सावध असतो. विविध मूडमध्ये आढळतो. त्यांनी
वाशिंग्टन मधील संग्रहालयातून कावळ्या वर माहिती मिळवली. अभ्यास केला. कावळ्याच्या
चित्रांची प्रदर्शनेही भरविली. रसिकांना हे नवीनच होते. मी सुद्धा हे वाचल्यापासून
माझी कावळ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली. खरंच त्यांच्या व्यंगचित्रांनी कॉमन मॅनला
पण दृष्टी दिली, शिकविलं. असा हा कलाकार म्हणजे एक लखलखता हिराच. हे लखलखलेपण आज
निस्तेज झालं आहे.
- डॉ.नयना कासखेडीकर