Friday, 19 June 2015

ती

                                  
 ती
               परवाच इंटरनेट वर एक बातमी वाचली. वरवर पाहिलं तर बातमी साधीच. दोन बहिणींनी कष्टाने नोकरी करून आपल्या आईवर हृदयशस्त्रक्रिया करून घेतली. वाटलं त्यात काय नवल? साधारणता असं मुलं करतातच ना. पण नाही, ती आई मुलांना घेऊन कुठल्या भागात राहतेय आणि काय परिस्थितीत राहतेय हे  इथे महत्वाचं. नवरा कुठे निघून गेलाय माहिती नाही. तो तीन वर्षे बेपत्ता आहे. ४२ वर्षाची ती, पदरी आठ मुलं. १२ ते २१ वयोगटातील. नव-याच्या पश्चात चार वर्षे प्रतिकूल परिस्थितीत लढा दिला आणि आपल्या आठ मुलांना घेऊन तिनं सिरीया गाठलं. सीरियाच्या राजधानीत दमास्कस मध्ये ती खान दानून शेल्टर मध्ये गेल्या वर्षा पासून राहतेय. इथे तिला खूप सुरक्षित वाटतं.

              आपल्या जीवनात सुरक्षा महत्वाची असतेच. ऊन, वारा, पाऊस, थंडी,यापासून सुरक्षा म्हणून आपण शेल्टर मिळवतोच. पण, आज माणसांपासून माणसाला भीती आहे. जर ती स्त्री असेल आणि तीही अशी एकटी, घरदार नसलेली, वा-यावर सोडून दिलेली, वैधव्य आलेली, एकेरी पालकत्व स्वीकारलेली असेल. तर, तिला कायम धास्ती असते जगण्याची. तिला गरज असते पैशांची आणि आधाराची.

              सिरीयातल्या या सत्य घटनेतली ‘ती’ खंबीर होती. डगमगली नाही. कोणाच्याही आधाराशिवाय आठ मुलांना घेऊन कुठ जायचं? कसं सांभाळायचं? या सगळ्यांना खाऊ काय आणि कुठून घालायचं? केव्हढे अवघड प्रश्न तिच्या समोर होते. पण तिने मुलांना बापाची उणीव भासू दिली नाही. मुलांना काही कमी पडू दिले नाही. कष्ट करून सगळ्यांना शिक्षण दिलं. मुलांचं खाणं-पिणं  अभ्यास, शाळा, कपडे अशा मुलभूत गरजा नेटाने पूर्ण केल्या. घरकाम, शिवणकाम, विणकाम, भरतकाम करून मुलांना चांगलं जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला.

             जगातली प्रत्येक आई जे करते तेच तिनेही केलं. या सगळ्या आयुष्याच्या धकाधकीत स्वताकडे दुर्लक्ष केलं किंवा झालं. अशी अवस्था सगळ्या तीं ची असते. मग त्या ‘ती’ चा संसार आलिशान बंगल्यातला असो, मध्यम वर्गीय घरातला असो कि झोपडीतला असो. राबणे अतिशय समर्पक शब्द. सगळ्यांची राबण्याची पातळी वेगळी एव्हढंच. नवरा असेल तरी किंवा नसेल तरी, कधी ती शरीराने मोडलेली असते, मनाने खचलेली असते, भीतीने धास्तावलेली असते. स्वताकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नसतो. ती अशिक्षित आणि गरीब असेल तर काय मृत्यूच समोर असतो. ‘ती’ला धर्म नसतो, जात नसते, माणुसकी हा धर्म आणि स्त्री ही जात. संसार संभाळणे, मुलांचे भविष्य घडविणे हेच तिचे कर्म. मग जीव पणाला लागला तरी चालेल. उद्याची आशाच आज आलेल्या संकटाला समर्थपणे तोंड द्यायला तिला बळ देते.

             आज सिरीयातल्या ‘ति’नं  केलेल्या कष्टाचं चीज झालं. मोठ्या दोन्ही मुली नोकरीला लागल्या.एक सायकॉलॉजी ची पदवी घेऊन शिक्षिका झाली आहे. दुसरी एका NGO मध्ये काम करून पैसे मिळवतेय. दिवस पालटले खरे पण ‘ति’ची तब्येत खालावली. आठ आठ बाळंतपणं ,घर चालविणे, सोपी गोष्ट नव्हतीच. अखेर जो परिणाम व्हायचा तो झालाच. मधुमेह झाला, आता हृदय रोगाचा सामना. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं. एव्हढा मोठा खर्च त्या लहान मुलांनी पेलला. प्रतिकूल परिस्थितीत रोज मुलांना शाळेत नेलं. सगळे जण शिकून मोठे झाले आणि या लहानग्यांच्या जीवावर तिचं ऑपरेशन झालं. या घटनेनं तिला धन्य वाटतं. त्या माउलीला समाधान वाटणारच. चांगली बरी झाल्यावर ‘ती’ पुन्हा तिच्या पहिल्या आयुष्याला नव्यानं सुरुवात करणार आहे. शेल्टर मधल्या महिलांना व्यावहारिक सल्ला ती देणारं आहे.

            ‘ती’ला सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे इथे शेल्टर मध्ये इतकं सुरक्षित का वाटतंय आणि आनंदही का होतोय याचं कारण, ज्या प्रांतात ती राहतेय तिथं सुरक्षितता म्हणजे काय हे तिला चांगलं माहिती आहे. इराक आणि सिरियात, पळवून आणलेल्या किशोरवयीन मुली किरकोळ किमतीला विकल्या जात आहेत. ऐकून धक्काच बसेल अशी परिस्थिती आहे. सिगारेटच्या पाकिटाच्या बदल्यात तेथे मुली मिळतात. इथे इसीसने गुलामांचे बाजार सुरु केले आहेत. मुलींचे अपहरण हा त्यांच्या धोरणाचा भाग आहे. याच्याच जोरावर तरुणांना इसिसमध्ये आकृष्ट केले जाते. महिलांच्या बदल्यात तिथे युध्द खेळले जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या लैंगिक हिंसाचार विरोधी दूत झैनाब बानगुरा यांनी मध्यंतरी एप्रिल मध्ये इराक आणि सिरीयाला भेटी दिली. तेथील इसीस सैनिकांनी चालवलेल्या लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्याचा कृती आराखडा त्या तयार करीत आहेत

            तिला ज्या ठिकाणी आसरा मिळाला तिथे UNHCR तर्फे महिला आणि मुलांसाठी अनेक उपक्रम चालविले जातात. वोकेशनल ट्रेनिंग, मानसिक आधार, मनोरंजनात्मक कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण मिळते. अशा ठिकाणी तिला आणि तिच्या मुलांना आयुष्य जगण्याचा अनुभव आणि आधार मिळाला. इथं  तिला जे मिळालंय त्यामुळे तिचा विश्वास आणखी वाढलाय. इथून चांगली बरी झाल्यावर ती स्वताच्या घरी जाऊन पहिलं जीवन पुन्हा सुरु करणार आहे. बातमीतल्या ‘ती’ ला पुढच्या जीवन प्रवासासाठी शुभेच्छा. माझ्या शुभेच्छा तिच्या पर्यंत पोहोचणार नाहीत माहिती आहे मला.

                                 हे माते, ‘सलाम’ तुझ्या शक्तीला आणि धीराला.

- डॉ.नयना कासखेडीकर