श्रीकृष्णाचं मोहक रूप सर्वाना आवडतं.मोठ्यांना
आणि छोट्यांनाही. आई-बाबांना वाटतं आपला मुलगा असाच व्हावा. कारण त्यांना कृष्ण
कसा होता हे माहित असतं. मुलानो तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो बघितलात तर तुम्हालाही
त्याचं आकर्षण वाटेल. तुमची आजी किंवा आई रोज देवपूजा करते, त्या देवघरातला
बाळकृष्ण कधी बघितलांत तुम्ही? तो तुमच्या आमच्या घराघरांत आहे. पण तुम्हाला
माहिती आहे ती फक्त दहीहंडी आणि आज गावा-गावात दहीहंडी फोडणारे स्पर्धेतले
गोविंदा.
गोकुळाष्टमी म्हणजे
,भाद्रपद महिना, कृष्ण पक्ष, अष्टमी, रोहिणी नक्षत्र. या मुहूर्तावर श्रीकृष्णाचा
जन्म झाला तो दिवस. वृंदावन, मथुरा, गोकुळ, नंदगाव या ठिकाणी हा दिवस खूप मोठ्या
प्रमाणात साजरा केला जातो. वासुदेव आणि देवकीचा हा पुत्र, भगवान विष्णूंचा आठवा
अवतार मानतात. श्रीकृष्ण म्हणजे अज्ञानाच्या घोर अंधकारात तळपणारा दिव्य प्रकाश, ज्याने
सगळ्या भारत वर्षाला दिशा दाखविली आजही ती आपल्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे.
मुलांनो आज तुम्हाला तुमचे आई-बाबा
तुम्हाला हवे ते आणून देतात. म्हणजे, कॉम्प्यूटर, मोबाईल, वेगवेगळे गेम , आय पॉड,
आता नवीन निघालेला टॅब, नवे तऱ्हेतऱ्हेचे कपडे आणि मागाल ते. या साधनांचा उपयोग
तुम्ही करता. आपल्या मोबाईल वरून मैत्रीचे मेसेज पाठवता. मित्रानो, मैत्रीचा
एव्हढाच अर्थ तुम्हाला ठाऊक आहे. मैत्री फक्त एक दिवसांचीच असते का? नाही. मैत्रीचा
अर्थ कळण्यासाठी सुदामा आणि श्रीकृष्ण यांची मैत्री कशी होती ते माहित करून घ्या.
सुदामा एक गरीब ब्राह्मण होता. श्रीकृष्ण
आणि बलराम जिथे सांदिपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेत होते, त्यांच्या बरोबर
सुदाम सुद्धा शिक्षण घेत होता. त्यांची घट्ट मैत्री होती. शिक्षण पूर्ण करून
श्रीकृष्ण आधीच निघून गेले होते.पाठोपाठ सुदामाही आपल्या जन्मभूमी असलेल्या गावाला
जाऊन गृहस्थाश्रमी राहू लागला. आपल्या पत्नीला तो नेहमी आपल्या उदार मित्रासंबंधी
कृष्णासंबंधी सांगत असे. आनंदी आणि समाधानी स्वभावाचा सुदामा कधीही कुणाकडे काही
मागत नसे. कुणी काही दिलेच तर देवाला अर्पण करायचा. असे गरीबीतच दिवस चालले होते.एकदा
त्याची पत्नी सुदामाला म्हणाली," तुम्ही तुमच्या मित्राच्या कृष्णाच्या
उदारतेबद्दल आणि मैत्रीबद्दल सतत सांगता, तसंच ब्राह्मणांचे परमभक्त साक्षात
लक्ष्मीपति श्रीकृष्णचंद्र तुमचे परम मित्र आहेत, मग एकदा जाऊन सांगा त्याला आपली
गरीब परिस्थिती. ते आपल्याला नक्की मदत करतील".
पत्नीच्या
आग्रहामुळे सुदाम्यालाही मित्राच्या भेटीची ओढ लागली. सुदामा बरेच दिवस प्रवास
करून द्वारकेला पोहोचला. फाटक्या कपड्यातील एक दरिद्री ब्राम्हण पाहून
द्वारपालांनी श्रीकृष्णांना जाऊन सांगितलं," कि हा दरिद्री ब्राम्हण स्वताला
आपला मित्र म्हणवतो आहे व नाव सुदामा सांगतो आहे". 'सुदामा' हे नाव ऐकताच कृष्ण
आहे तसाच धावत बाहेर आला आणि आपल्या मित्राला मिठी मारली. श्रीकृष्णाच हे वत्सल
रूप पाहून सुदाम्याच्या डोळ्यातले आनंदाश्रू थांबेनात. नंतर श्रीकृष्णाने सुदाम्याला
आपल्या महालात नेले आणि त्याला राजमहालातल्या
पलंगावर बसवून त्याची पाद्यपूजा करू लागले. पाय धुण्यासाठी आणलेले पाणी घ्यायची
गरजच पडली नाही, कारण आपल्या प्रिय मित्राची दीनवाणी अवस्था पाहून श्रीकृष्णाच्या
अश्रूंच्या वर्षावातच मित्राचे पाय ओले झाले होते. असा होता करुणेचा सागर
श्रीकृष्ण. या मित्र भेटी नंतर सुदामा घरी येऊन पाहतो तर घर ऐश्वर्य संपन्न झाले
होते, पण कुठल्याही ऐश्वर्याच त्याला कधीच आकर्षण नव्हतं.आसक्ती नव्हती. अशी होती
त्यांची निस्वार्थी मैत्री. सुदामाने श्रीकृष्णाला फ्रेन्डशिप बेल्ट बांधला नव्हता
. मित्र
मैत्रिणींची गरज एकच दिवस नाही , आयुष्यात नेहमीच लागते. खरा मित्र तो असतो जो
संकटातही साथ देतो.
पण आपल्या लक्षात राहतो तो
बाललीला करणारा, म्हणजे शिंक्यावरच्या मटक्यातून लोणी चोरून खाणारा बाल श्रीकृष्ण.
त्याच्या अनेक लीला आपल्याला थक्क करतात. माखनचोर कन्हैया का होता माहिती आहे?
श्रीकृष्णाच म्हणणं होतं की गायीच्या दुधावर सर्व प्रथम हक्क आहे तो वासरांचा. पण
जे असे लोक होते कि खाण्यापिण्यात कंजुषपणा करून लोणी जमवून ते विकण्याचा उद्योग
करायचे. अशा घरांत कृष्ण लोणी चोरत असे. गोपिकांनी तक्रार केल्यानंतर मी लोणी
खाल्लंच नाही असा कांगावा करत असे. इथे कृष्ण सामाजिक न्यायासाठी या लीला करायचा.
एकदा बाल श्रीकृष्णाने माती खाल्ली होती,
बलरामाने हे यशोदेला सांगितले, मग यशोदा माता रागावली, "दाखव माती खाल्लीस का?" कृष्णाने तोंड उघडायला नकार दिला. त्यामुळे यशोदेची खात्री पटली कि नक्कीच माती
खाल्ली आहे. पण पुन्हा तोंड दाखव या तिच्या आग्रहामुळे कृष्णाने आपले तोंड उघडले
आणि यशोदेला संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन झाले. गीतेतला कृष्ण विश्व व्यापी स्वरूप
होता.
श्रीकृष्णाचं आणखी एक नाव आहे
'गिरिधारी'.कृष्ण. लहान असताना ब्रज प्रांतात लोक इंद्राची पूजा करत असत.कारण इंद्र
पृथ्वीवर पाऊस पडत असे.पण कृष्ण म्हणाला,भले इंद्र स्वर्गाचा राजा असेल पण
त्याहीपेक्षा गोवर्धन पर्वत आम्हाला जास्त महत्वाचा आहे कारण आमच्या गायींचं पोषण
करून तोच तर गायींना वाढवितो, त्यामुळे पूजा करायचीच असेल तर गोवर्धनाची करा आणि
त्यावर्षी लोकांनी इंद्राच्या ऐवजी गोवर्धनाची पूजा केली. तेंव्हा इंद्राने रागाने
मुसळधार पाऊस पाडला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. लोक कृष्णाकडे धावत आले. कृष्ण
म्हणाला चला गोवार्धनाजवळ जाऊ. त्याची पूजा केली आहे. तोच आपले रक्षण करेल आणि
सगळ्यांनी मिळून गोवर्धन उचलला व त्याखाली ब्रज लोकांनी त्यांच्या गायींसकट आश्रय
घेतला. आपल्या भूमीवरच्या लहानात लहान वस्तू बद्दल सुद्धा आपल्याला अभिमान हवा आणि
सर्वांनी मिळून एखादी गोष्ट केली तर ती अशक्य नक्कीच नसते. या गोष्टींचा बोध आपण
घ्यायला पाहिजे.
श्रीकृष्णावर त्याच्या आयुष्यात
जन्मापासूनच अनेक संकटे आली, पण तो कधी व्यथित झाला नाही. प्रत्येक वेळी धीरानं
सामोरा गेला. नेतृत्व,मैत्री, संकटात
तारणारा, सामाजिक न्याय देणारा, प्रेम देणारा, गोकुळातल्या लोकांना आनंद आणि
उल्हास वाटणारा, अशी कृष्णाची अनेक रूपं आहेत.
मित्रांनो, आपले सण आणि उत्सव शिकवण देणारे
आहेत. आजच्या गोकुळाष्टमीला तुम्ही निश्चय करा कि मी फक्त दहीहंडी उत्सवात सामील
होणार नाही, तर कृष्णाच्या कथा असलेली
पुस्तके वाचून त्यातले गुण समजावून घेईन आणि त्याप्रमाणे कृती करेन .
( सदर लेख 'बालनगरी' या मासिकात प्रसिद्ध झाला होता )
( सदर लेख 'बालनगरी' या मासिकात प्रसिद्ध झाला होता )
- डॉ.नयना कासखेडीकर, पुणे.