Monday, 4 July 2016

दिंडी चालली चालली ....






  पंढरीच्या सावळ्या परब्रह्माच्या भेटीची आस घेऊन निघालाय हा भक्तांचा मेळा. कुणाचा तो पंढरीनाथ आहे, कुणाचा पांडुरंग तर कुणाचा पंढरीराया. कुणाची विठाई तर कुणाची विठुमाऊली.  

  आषाढ शुक्ल एकादशीच्या महापर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह अनेक दिंड्या २० ते २२ दिवसांचा पायी प्रवास करून श्री विठ्ठलाच्या दर्शनास पंढरपूरला पोहोचतात. अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा-कीर्तन करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला दिंडीअसे म्हणतात. काल अशा अनेक दिंड्या पुणे मुक्कामी पोहोचल्या. शहरातले रस्ते या विठ्ठलाच्या भक्तांनी फुलले. सगळीकडे भक्तीचा गजर. भावभक्तिमय वातावरण, जिकडे तिकडे माउली. हा माऊली, तो माऊली, हे माऊली, ते माऊली, सगळीकडे माऊली आणि माऊलींची सेवा करणारे हजारो हात. एरव्ही आम्ही कुठल्या शिबिरांत, कार्यक्रमात चहा देताना काका. मावशी असे हाक मारून चहा घ्या म्हणणार, पण आजची सर्व जनता या वारकरी भक्तांना ‘’माऊली घ्या चहा,’’ असे अदबीनेच म्हणणार.




  अनंत भगवान ठेवील तसे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न
आच्छादनाची व्यवस्था करायची. तहानलेल्या भुकेलेल्या जीवाला अन्न पाणी द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणाचाही मत्सर करायचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करायची, संतावर प्रेम करायचे, गीता भागवत वाचायचे, आपल्या सर्व कार्याचे केन्द्रस्थान भगवंत ठेवायचे, गृहस्थाश्रमाचे पालन करायचे. वर्षातून एकदा आपल्या घरून चालत चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि येताना भगवंताला भेटून यायचे.

संत सेना महाराज म्हणतात,
                        जाता पंढरीस, सुख वाटे जीवा |    
                        आनंदे केशवा भेटताची ||
                        या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी |
                        पाहिली शोधूनी अवघी तीर्थे ||

यामुळेच ऊन पावसाची, गैरसोयींची तमा न बाळगता, सह्याद्रीच्या द-याखो-यातील वारकरी, श्री पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी आतुर झालेला असतो.



  पालखी सोहळ्यात सर्वात पुढे माऊलींचा अश्व असतो. तो अंकली ( बेळगाव )हून आळंदीला परंपरेप्रमाणे पायीच आणला जातो. त्यावर कोणीही स्वार झालेला नसतो. ११ दिवस प्रवास करून आलेल्या या अश्वाचे आळंदीत वाजत गाजत, पायघड्या घालून जोरदार स्वागत केले जाते. या ११ दिवसाच्या प्रवासांत प्रत्येक गावातील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतो आणि त्याला केलेला नमस्कार हा माऊलींपर्यंत व तिथून पुढे पांडुरंगापर्यंत पोहोचतो अशी दृढ श्रद्धा या विठ्ठल भक्तांची असते.
           
  असे हे वारकरी मोठे ट्रक, गाड्या भरून अनेक ठिकाणाहून आलेत. आमच्या घराच्या आसपासच ५० लहान मोठ्या गाडया आहेत. नगर पालिकेची शाळा, मंदिरे, मैदाने, अंगणे, इमारतीची पार्किंग, जिथे जागा मिळेल तिथे उतरले आहेत. शहराच्या व्यवस्थे व्यतिरिक्त गल्लीच्या कोप-या कोप-यांवर आणि दिन्डीतल्याही लोकांनी इथे आवश्यक ती दुकाने थाटली आहेत, ना कुठली भिंत, ना डोक्यावर छप्पर. एका टेबलाचं दुकान. एक चहाचं, इस्त्रीचं, दाढी कटींगचं हवेशीर पार्लर, पोहे-उप्पीट स्टॉल, कुणाच्या घरासमोर सर्व भक्तांना चहा-पोहे नाश्त्याचे वाटप, तर कुठे संस्थांतर्फे जेवणावळी घातल्या जात आहेत, तिकडे हनुमान मंदिरात अखंड हरी नामाचा गजर चालू आहे. शेजारी गल्लीत पेंडॉल टाकून कीर्तन भजन चालू आहे. कोप-या कोप-यांवर भक्तांचे जथ्थे बसले आहेत. वारीत चालल्यानंतर जिथे जिथे विसावा मिळतो तिथे तिथे भक्त मंडळींमध्ये संवाद घडत आहेत.

  या दिंड्यांचं नियोजन बघाल तर थक्क व्हायला होतं. दैनंदिन व्यवहारात लागणा-या सर्व वस्तू यांच्या गाडीत सजवलेल्या घरात बरोबर आणल्या असतात.

  वर्षातून चार यात्रा असतात. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी यात्रा. त्यापैकी आषाढीची ही महायात्रा. पश्चिम महाराष्ट्रातला चैतन्य सोहळाच असतो.   


  पंढरीची वारी.... लाखो वारकरी आणि भक्त यांचा महासंगम. प्रचंड उलाढाल. अर्थात सुनियोजित. वारीत सामील असलेल्या दिंड्यांना क्रमांक दिले असतात. हे क्रमांक हेच त्यांचे पोस्टल अॅड्रेस असतात महिन्यापुरते. या पत्त्यावर त्या भक्तांना पोस्टाद्वारे आलेली पत्रे मिळण्याची सोय असते. आज मोबाईल पण आहेतच. मानाच्या काही दिंड्या पालखीपुढे असतात. वारीचा मार्ग ठरलेला असतो. मुक्कामाचे ठिकाण ठरलेले. मुक्कामाच्या ठिकाणी, माऊलींच्या घोड्यांची रिंगणे होतील. पहिले उभे रिंगण 'चांदोबाचा लिंब' येथे, दुसरे गोल रिंगण ठाकूरबुवांच्या  समाधीजवळ, खुड्रसफाटा येथे आणि वाखरी या गावी शेवटचे रिंगण होईल. वाखरी  येथील संतनगरला सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतील. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतील. इथून आषाढ शुद्ध दशमीला  सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतील आणि आषाढीला सारे वारकरी   पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा  करतील. सर्व काही शिस्तीत .
वाटेत माऊलीच्या पादुकांना नीरा नदीत स्नान व पौर्णिमेला स्नानानंतर विट्ठल रखुमाई यांच्या चरणी भेट हा महत्त्वाचा  कार्यक्रम,  ही परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे.
दिंडी, रिंगण, कीर्तन आणि प्रदक्षिणा ही वारीची प्रमुख वैशिष्ठ्ये.



  यंदाही देहूतून संत तुकारामांच्या पालखीसह आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वरांच्या पालखी रथासह, पुढे मानाच्या सत्तावीस दिंड्या आणि रथाच्या मागे मान्यता असलेल्या इतर दिंड्या असा हजारो भक्तांचा सागर पुण्यात पोहोचला. आषाढीला अवघी पंढरी दुमदुमते, तर काल-परवा पुण्यनगरी आनंदाने दुमदुमली. दोन दिवस पालख्यांचा मुक्काम पुण्यात होता. तुकोबारायांची पालखी नाना पेठेतील ‘निवडुंग्या विठ्ठल मंदिरा’त आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेत ‘पालखी विठोबा मंदिरा’त. समस्त पुणेकर आणि बाहेरून दाखल झालेल्या भक्तांनी पादुकांचे दर्शन घेतले. रात्रभर भजन कीर्तन, भक्तीसंगीत, गाण्याचे कार्यक्रम आणि विठू नामाचा गजर. २-४ तास विश्रांती, नंतर पहाटे तीनलाच लगबग, लाखो वारकरी शुचिर्भूत होऊन, नव्या उत्साहाने, ताजेतवाने होऊन हरिनामाच्या गजरांत पहाटे पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे रवाना होतात.

  वारकरी संप्रदायातील वारकरी यात असतातच, पण दरवर्षी यात नव्याने भक्तांची भर पडते.आज तर तरुणाईलाही ही वारी खुणावते. आकर्षित करते. कोणी आळंदी ते पुणे, कोणी पुणे ते सासवड, जेजुरी, असे पायी वारीचा अनुभव घेतात. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच ..  
                 
                 अवघीच तीर्थे घडली एक वेळा | चंद्रभागा डोळा देखिलिया ||
                 अवघीच पापे गेली दिंगंतरी | वैकुंठ पंढरी देखिलिया ||
                 अवघिया संता एक वेळा भेटी | पुंडलिक दृष्टी देखिलिया ||
                 तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक | विठ्ठलचि एक देखिलिया || 









ले – डॉ. नयना कासखेडीकर