Tuesday, 11 April 2017

जालियनवाला बाग


घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जायचे तेंव्हा किमान अमृतसरला तरी भेट द्यायची असे ठरवले होतेच. तिथल्या इतिहासाच्या पाऊलखुणा बघायच्या. लहानपणी शालेय पाठ्यपुस्तकात इतिहासात जालियानवाला हत्याकांड यांवर धडा होता. त्या धड्यातला एक प्रसंग मनावर कोरला गेला होता तो म्हणजे, ब्रिटिशानी अंदाधुंद चालवलेल्या गोळीबारात अमृतसर मध्ये लोकांनी जीवाच्या भीतीने विहिरीत उड्या टाकल्या. बापरे ! या विषयाचं गांभीर्य त्या लहान वयात काही फारस नव्हतं. मात्र आज त्या विहिरीसमोर आम्ही उभे होतो अत्यंत गंभीरपणे. वरवर बघता ही जालियानवाला बाग छान, सुंदर निगराणीत ठेवलेली बाग. पण आत जाताच या काळ्या इतिहासाच्या खुणानी भरलेली, दु:खाने भारलेली, विश्वातल्या सर्वात मोठ्या नरसंहाराची वेदना सोसलेली ही जागा.




१०,११,१२ एप्रिल १९१९ पंजाब धुमसत होताच. लोकप्रिय नेते डॉ.सत्यपाल आणि सैफ़ुद्दिन किचलू आणि महात्मा गांधी यांना पंजाब मध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती. जाळपोळ सुरु होती. कर्फ्यू लावला गेला होता. संतप्त झालेल्या लोकांनी मोर्चा काढला, त्यावर सैनिकांनी गोळीबार केला, परिस्थिती आणखीनच चिघळली. लोकांना न्याय हवा होता.  



१३ एप्रिल १९१९ चा रविवार, बैसाखी चा सण. त्यामुळे अमृतसरच्या आजूबाजूच्या गावातील अनेक शेतकरी व इतर लोक बैसाखी साजरा करायला अमृतसरला आले होते. दुपारी साडेचारची वेळ: जालियानवाला बाग-ब्रिटीश सरकारने केलेल्या रौलेक्ट कायद्या विरोधात शांततापूर्ण निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. यासाठी २०,००० लोक एकत्र आले होते. सैनिकांनी बागेला संपूर्ण वेढा दिला होता. आत जाण्यासाठी एकच अरुंद रस्ता होता. तिथपासून चारी बाजूला सैनिकांचा वेढा. जनरल डायर १५० सैनिकांबरोबर बागेत पोहोचला. मुख्य प्रवेश दारावर एका उंच ठिकाणी त्याने स्वत:ची जागा निश्चित केली. सूर्यास्ताला सहा मिनिटे बाकी असताना त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता सैनिकांना जमलेल्या लोकांवर बंदूक चालवण्याचे आदेश दिले. जमलेल्या लोकांमध्ये स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे सुद्धा होती. १० ते १५ मिनिटांत एक हजार सहाशे पन्नास गोळ्या चालल्या. गोळ्या संपेपर्यंत सैनिकांच्या बंदुका चालूच  होत्या. जीव वाचविण्यासाठी सगळे जण बाहेरचा रस्ता शोधत, दिसेल तिकडे पळत होते. जीवाच्या आकांताने जखमी लोक सैरावैरा पळत होते. काही चेंगराचेंगरीत गेले. शेकडो लोकांनी विहिरीत उड्या घेतल्या. मृतांचे आणि जखमींचे ढीग पडले होते. बैसाखी सणाच्या दिवशीचे हे हत्याकांड.




या हत्याकांडात हजारो निरपराध लोक मारले गेले. दोन हजारावर जखमी झाले. या हत्याकांडानंतर इंग्रजांनी मार्शल लॉं लागू केला. अनेकांची धरपकड केली, भारतीय सदस्य शंकर नायर यांनी या हत्याकांड विरोधात व्हाइसरॉय च्या कार्यकारिणी समितीचा राजीनामा दिला. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली ‘सर’ ही उपाधी परत केली. जालियानवाला बाग या ठिकाणी होणाऱ्या जनसभेत भाग घ्यायला महात्मा गांधी सुद्धा निघाले होते, परंतु त्याआधीच त्यांना पलवल रेल्वे स्टेशनवर १० एप्रिलला अटक करण्यात आली. ब्रिटीश सरकारच्या या क्रूर आणि निर्दयी  अत्याचाराची ही करणी नुसते पंजाबच नाही तर संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा वन्ही चेतवण्यास कारणीभूत ठरली. असे हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचे एक महत्वाचे प्रतिक म्हणजे जालियानवाला बाग !




हे ठिकाण अमृतसर शहराच्या मध्यभागी असून कुठूनही येथे पोहोचण्यासाठी सायकल रिक्षा, रिक्षा उपलब्ध आहेत. अशा या बागेत मुख्य प्रवेशदारातून एकदा आत गेलं कि डोक्यात फक्त विचार असतो तो इथे असे काय घडले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा. इथे दिसतात, घडलेल्या हत्याकांडांचे दुख:द आठवण करून देणाऱ्या खुणा, घडलेल्या घटनेच्या साक्षीदार असलेल्या प्रतिमा. डावीकडे शहीदी चित्र कलादालन आहे ज्यात या घटनेच्या इतिहासाची ओळख होते. पुढे गेल्यावर अंदाधुंद गोळीबार होत असताना उड्या घेतल्या ती विहीर आहे. जी आज स्मारक म्हणून उभी आहे. त्याच्या शेजारीच पुढे लागून असलेल्या घरांच्या भिंतीवर अजूनही बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा तशाच असलेल्या भिंती. बुलेट मार्क असलेल्या एका भिंतीवर तर गोळ्यांच्या २८ खुणा स्पष्ट दिसतात. एक हजार सहाशे पन्नास राउंड फायर केले गेले होते. समोर शहिदांचे स्मारक आणि ‘अमर ज्योती’ -निरपराध लोकांच्या हत्येची सतत आठवण करून देणारी धगधगती ज्योती ! सारंच कसं अंगावर शहारे आणणारे !




शहीदि चित्रशाला मध्ये मोठ्ठं पेंटिंग लावलंय, मन घट्ट करून ते पाहावं लागतं. हत्याकांडा वेळी काय दृश्य होतं ते बघून मन थरकापतं. पेंटिंग बारकाईने बघितले तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या त्या क्षणाच्या भावना, भीती, हे  चित्रकाराने हुबेहूब रंगवलंय. या प्रसंगाची भयानक वास्तवता हे पेंटिंग दाखवतं.

अमृतसर हे अखंड भारतातलं पंजाब प्रांतातील एक मुख्य शहर. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर सहभाग असलेले. पंजाब आणि लाहोर च्या फाळणीची झळ सोसलेले.





संत नामदेवांची कर्मभूमी घुमानला गेल्यावर, आमच्या संतांचे दुसऱ्या प्रांतात केलेले अतुलनीय काम बघून मन जेव्हढे अभिमानाने भरून आले, तेव्हढेच जालियानवाला बाग बघून स्वातंत्र्य योद्ध्यांपुढे मन अभिमानाने  नतमस्तक ही झाले. देशासाठी जीव गमवाव्या लागलेल्या या निरपराध लोकांना शतश: प्रणाम!
                                                     _________________
   

-  डॉ. नयना कासखेडीकर.