Thursday, 7 December 2017

मुक्काम पोस्ट रत्नागिरी - भाग १



रत्नागिरीच्या दीर्घ मुक्कामातला पहिलाच दिवस.

भेट द्यायच्या स्थळांची यादी मोठ्ठी होती. रत्नदुर्ग किल्ला, मत्स्यालय, पांढरा समुद्र, काळा समुद्र, पतित पावन मंदिर, विठ्ठल मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, लोकमान्यांचे जन्म स्थान, थिबा पॅलेस, मालगुंड, गणपतीपुळे, नारळ संशोधन केंद्र आणि बरेच काही. पण पहिलं आकर्षण होतं ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी आणि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी असलेली स्थळं डोळेभरून पाहणं. 
मागच्याच गल्लीत असलेले टिळकांचे जन्मस्थान, उतरलेल्या निवासस्थानापासून पायी जाण्यासारखेच. निघालो. अरुंद गल्लीच्या तोंडाशी वळलो. वन वे ट्रफिक होती, दुकानावरील पाट्या वाचत जाताना कळलं की,  ही ‘टिळक आळी’ आहे . इथूनच अभिमानानं उर भरून यायला लागला. मनात कसलातरी आनंद होत होता. तेव्हढ्यात समोर चौकात दिसली श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान गणेशमंडळ टिळक आळी वास्तू. त्याच्या बाजूलाच होतं स्त्रियांचं लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, जिथे भगिनी मंडळ, शिशु विहार, संस्कार वर्ग आणि हेल्थ क्लब होतं. पिंपळपार देवस्थानच्या थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला लागते, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याने जपलेली लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाची वास्तू. जशीच्या तशी, सारवलेली. नीटनेटकी, सर्व खाणाखुणा जिथल्या तिथेच असलेली, डौलाने, अभिमानाने उभी आहे लोकमान्यांचा इतिहास सांगत.



लहानपणापासून लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि जयंतीला भाषणांत ऐकलेलं आणि घोकून घोकून पाठ केलेलं आणि अजूनही मनावर कोरलं गेलेलं वाक्य होतं,

“लोकमान्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी  रत्नागिरीतल्या चिखली या गावी झाला”.

आज या वास्तूला भेट दिल्यावर मोठा खुलासा मला झाला होता तो हा की, टिळक कुटुंबाच्या कुळाचे गाव चिखलगाव होते आणि त्यांचा जन्म रत्नागिरीत ह्याच वास्तूत झाला होता. या क्षणी लगेच मी, टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी  रत्नागिरीतल्या चिखली या गावी झाला.  
हे वाक्य डोक्यातून डीलिट करून टाकले.

त्यांची ही जन्म वास्तू एक मोठा पुरावाच होता डोळ्यासमोर. तिथे कुठेही चिखली हा उल्लेखच नव्हता मुळी. मन बेचैन झालं. आणि आम्ही स्वतः शाळेत असाच चुकीचा इतिहास, चुकीचा संदर्भ शिकत आलो. शिकवीत आलो आणि आमचे शिक्षक? चुकीचं शिकवत होते? मनात या प्रश्नांचा गोंधळ उडाला. कारण पुस्तकात जे दिलं होतं तेच तरत्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं. मी आत्ता शाळेतले, कॉलेजमधले मित्र मैत्रिणी आणि संपर्कातले शिक्षक अशा सर्वजणांना हा प्रश्न विचारून कन्फर्म केलं. सर्वांनी चिखली असच शिकल्याचं सांगितलं. एक मैत्रीण अपर्णा म्हणाली, “शाळेत चिखलीच शिकलो पण परवाच रत्नागिरीला भेट दिल्याने तीन तीनदा वाचलं कि जन्म रत्नागिरीला झाला म्हणून. मलाही हे शॉकिंग होतं.” चला माझ्याप्रमाणे आणखी कुणाचाही गोंधळ दूर झाला होता तर. चिखली/चिखलगाव हा मुद्दा बाजूला ठेऊन जन्म रत्नागिरी येथेच झाला हे महत्वाचे. ह्याची चर्चा करण्याचं कारण म्हणजे सर्वांनी रत्नागिरी हे जन्मगाव लक्षात ठेवावं चिखली नाही, इतकंच.


ही समोरची सुबक सुंदर दोन मजली वास्तू, ओसरी, वर जायचा जिना, घराची मागची बाजू आणि लांब पर्यंत असलेली आंबा, फणस नारळ पोफळी ची झाडं. या टुमदार बंगलीच्या प्रेमात न पडाल तरच नवल. दरवर्षी येथे टिळक जन्मोत्सव साजरा केला जातो. एकूणच टिळक आळी लोकमान्यांच्या आठवणीने भारलेली वाटली.
इथे भेट देऊन चिखली विषयी अज्ञान दूर झाल्यामुळे सार्थक झाल्यासारखं वाटलं.

आता मोर्चा होता पतित पावन मंदिराकडे. स्वातंत्र्यलक्ष्मी चौकाजवळ सामाजिक समतेचे प्रतिक असलेले ‘पतित पावन मंदिर’. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर खळबळ उडवून देणारे, विविध जातीतील सुमारे दीड हजार लोकांचे सहभोजन सावरकर यांनी याचं मंदिरात घडवून आणले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचेही सहभोजन कोल्हापूरच्या सत्यशोधक चळवळीतील नेते भाई बागल यांच्या पत्नीच्या अध्यक्षतेखाली पार पडले.



रत्नागिरीच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात या मंदिराला मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सांगण्यानुसार श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी वीस गुंठे जमीन विकत घेऊन, दीड लाख रुपये खर्च करून, १९३१ च्या जानेवारीत हे मंदिर बांधून पूर्ण केले. या मंदिरातल्या लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भागोजी शेठ कीर व त्यांच्या पत्नीच्या हस्ते झाली.सावरकर यांचा समतेचा दृष्टीकोण, पूजा प्रार्थनेचा समान अधिकार आणि स्त्री पुरुष समानता हे या पतित पावन मंदिराच्या रुपात सतत आपल्यासमोर असेल.

मंदिराच्या आवारात आलो, दिवाळीच्या खुणा अजून तशाच होत्या. दिवाळी होऊन १५/२० दिवस झाले होते. बाहेर मोठा आकाशकंदील, होऊन गेलेल्या उत्सवाची साक्ष देत होता, तर मंदिरात प्रवेश करताच मंडपात काढलेल्या रांगोळीतून सौंदर्याचा साक्षात्कार घडत होता. गाभाऱ्यात लक्ष्मी नारायणाची मूर्ती जणू काही स्वातंत्रवीर सावरकर यांचा स्पर्श झाल्याच्या अभिमानात उभी होती.



हे मंदिर बांधण्याचे कारण घडले ते विठ्ठल मंदिरातला लढा. सावरकरांनी सर्वाना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून लढा पुकारला होता आणि या संघर्षामुळे बहुजन लोकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता.

या मंदिरात गेलो आणि  सावरकर चित्रपटाचे शुटींग करतानाचे बाबूजी अर्थात सुधीर फडके आठवले.  स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल जी भक्ती आणि प्रेम मनात होतं तेव्हढीच बाबूजी बद्दल. २० वर्षापूर्वी कोकणात गेलो असताना मालगुंड येथे सकाळी सकाळीच वर्तमान पत्र वाचलं आणि एका बातमीने लक्ष वेधलं. बातमी होती, वीर सावरकर यांच्या वरील चित्रपटाचे शुटींग विठ्ठल मंदिरात चालू आहे. बहुजनांना मंदिर प्रवेश हाच विषय शूट होणार होता. त्यासाठी स्थानिक लोकांनी पारंपारिक वेषात हजर राहावे. असे आवाहन केले होते. ट्रीपला आलो असल्याने पारंपारिक वेष वगैरे जवळ अर्थातच नव्हता. तरी ते शुटींग बघायला आणि बाबूजी आपल्याला भेटतील या ओढीने मालगुंड हून रत्नागिरीला पोहोचलो. 



विठ्ठल मंदिरात गर्दी होती. मोठा मॉब होता. पोहोचलो तेंव्हा नुकताच ब्रेक झाला होता. बाबूजी आणि तेंव्हाचे आमदार डॉ.अशोक मोडक बसले होते. मोडक सरांची ह्यांची ओळख असल्याने आणि अचानक भेट झाल्याने, थोड्या गप्पा झाल्या. बाबुजींशी ओळख परीचय झाला. आता एक आठवण म्हणून फोटो काढू का अशी परवानगी घेऊन सगळे बाबुजींबरोबर पोज देऊन उभे राहिले आणि काय? दुर्दैव ! कॅमेऱ्यातला रोलच संपला. मग हीच पोज कॅमेऱ्या ऐवजी मनातच साठवली.असो. 

पण वीर सावरकर चित्रपट बघताना ,बच्चे कंपनीला आवर्जून नेऊन दाखवताना, बाबुजींनी या वयात घेतलेली मेहनत आठवून ,त्यांचा ध्यास पाहून प्रत्येक वेळी मनोमन नतमस्तक होत होते. आज पुन्हा एकदा त्याच विठ्ठल मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुधीर फडके यांना विनम्र अभिवादन केले. समाधानाने.  

अशा ऐतिहासिक रत्नागिरीचा अन्य फेरफटका पुढच्या भागात.  क्रमश:
                                             ----------------------------



-  डॉ. नयना कासखेडीकर, पुणे