मुक्काम पोस्ट रत्नागिरी - भाग २
रत्नागिरीच्या
मुक्कामात लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीचे
मनापासून दर्शन घेतले. वेगवेगळ्या भेटींमधून एक प्रश्न सारखा विचारला जात होता, थिबा
पॅलेस बघितला? आणि तो बघण्याची उत्सुकता जास्तच ताणली जायची. रत्नागिरीत आल्यावर
बघण्याच्या यादीत पहिल्या टॉप टेन मधलं हे
ठिकाण ‘थिबा राजवाडा’. पण त्याची फारशी माहिती कुणी सांगितली नव्हती. डोळ्यासमोर
म्हैसूर, कोल्हापूर, भोर, इंदौर, बडोदा,जयपूर आणि पुण्यातल्या विश्रामबागवाडा
सारखे वाडे आले. आठवत होती संस्थाने आणि राजघराणी. साधारण असाच असावा थिबा राजवाडा ! पण थिबा? हे कसलं
नाव? ऐकायला विचित्रच वाटलं. म्हटलं असेल, थिबा राजा रत्नागिरीला भेट देऊन गेला
म्हणून त्याच्या नावाने तो प्रसिध्द असेल. कळेलच इतिहास. आज थिबा राजवाडा बघायला
सूर्यास्ताच्या वेळी जायचं असं ठरलं. कारण चांगला व्ह्यू टिपायचा होता.
रत्नागिरी शहराच्या मुख्य
रस्त्यापासून आत वळलो. वळणावळणाच्या रस्त्याने राजवाड्यासमोर आलो. कल्पना केली
होती, गेट मधून शिरताना समोर उत्तम बगीच्याची रचना असेल, आत प्रवेश देणारे गार्ड
असतील. छे तसं काहीच नव्हतं. गाडी थेट आत जाऊन राजवाड्यासमोरच जाऊन थांबली.
राजवाड्यासमोर सर्वत्र गवत वाढलेले. इथे एकेकाळी सुंदर बगीचा असल्याच्या खाणाखुणा
आहेत. भोवतालच्या परिसरात जुनी झाडे अभिमानाने उभी आहेत, इतिहास माहिती
असल्यासारखी. समोर राजवाड्याची तीन मजली ब्रह्मी शैलीतील देखणी वास्तू एकाकी पडल्यासारखी उभी
आहे. होय, एकाकी थीबाचा एकाकी पॅलेस .
आताच्या म्यानमार म्हणजे
पूर्वीच्या ब्रह्म्देशाच्या राजा थिबा मिनला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी
१९१० मध्ये बांधलेला हा राजवाडा, गेली १०७ वर्षे त्याच्या दर्दभऱ्या कहाणीसह रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उभा आहे. ब्रिटीश
राजसत्तेविरुद्ध बंड पुकारल्याने राजा थिबाला आयुष्याची तीस वर्षे रत्नागिरीत
स्थानबद्धतेत काढावी लागली. १९१६ पर्यंत म्यानमारच्या या राजा- राणीचं वास्तव्य या
राजवाड्यात होतं. २७ एकराचा भव्य परिसर, त्याच्या मधोमध कोकणातील जांभा दगड, ब्रह्म
देशाचे बर्मा टिक वूड आणि ब्रिटीशांचे स्थापत्य विशारद यातून एका वेगळ्याच शैलीची
ब्रह्मदेश व भारत यांना जोडणारा दुवा असलेली ही वास्तू तयार झाली आणि इथेच नाती
जुळली ब्रम्हदेश व रत्नागिरी व महाराष्ट्राची.
चौदा खोल्या, दोन मोठाली दालने,
स्वयंपाकघर, सज्जे, कोकणातल्या घरांसारखा कौलारू व्हरांडा, मध्यभागी मोकळा चौक, त्यात
मध्यभागी चुन्याच्या निवळीवर चालणारे
कारंजे, वास्तूच्या पुढे व मागील बाजूस बागेची रचना. जागोजागी कमानी असलेल्या
काचेच्या खिडक्या असा, सुरेख रचना असलेला हा पॅलेस. पश्चिमेची सूर्यकिरणे अंगावर
घेतलेला राजवाडा जसा उजळून निघतो तसाच पूर्वी दिव्यांची सोय नसताना या राजवाड्यात
तेलाचे दिवे लावले जायचे, तेंव्हा हा राजप्रासाद रात्रीसुद्धा उजळून निघायचा. दिवाळीत
दीपोत्सव असायचा. तेंव्हा रत्नागिरीकर या सौंदर्याचे दर्शन घ्यायला आवर्जून यायचे.
आता वर्षातून एकदा २६ जानेवारीला थिबा राजवाड्यात कला संगीत महोत्सवाचे आयोजन केले
जाते तेंव्हा हा पॅलेस प्रकाशझोतात येऊन त्याच्या अस्तित्वाची मोहर
रत्नागीरीकरांवर उमटवत असतो. या पॅलेसच्या सौंदर्यावर ‘कहाणी थिबा राजाची’, ’ग्लास
पॅलेस’ अशा कथा कादंबऱ्याही प्रसिध्द आहेत.
या सुंदर राजवाड्याचा इतिहास
मात्र मनाला वेदना देणारा आहे. ब्रह्मदेशातील कोनबाँग या राजघराण्यात थिबाचा जन्म
१ जानेवारी १८५९ रोजी मंडाले येथे झाला. वडील राजा मिन्डॉन आणि आई सिम्बुमाशीन.
१८७८ मध्ये थिबाला राजघराण्याचे वारस म्हणून घोषित केलं आणि पंधरा दिवसात राजा
मिन्डॉन यांचा मृत्यू झाला. तर वयाच्या १९
व्या वर्षी युवराज थिबा राज्याच्या गादीवर बसला. ब्रम्ह्देशाच्या राजवटीतला ‘थिबा
मिन’ हा शेवटचा राजा ठरला. वय लहान असलं तरी
जनतेच्या कल्याणाची अनेक कामे त्याने केली होती. कायदा व सुव्यवस्था याची
घडी बसवली. देशातली गुलामगिरी संपवली. त्या देशाचा थिबा हा सर्वोच्च पाली पदवीधर
होता. ब्रह्मदेशाचा राजा म्हणून त्याला केवळ सात वर्षे राज्य करता आलं.
१८८५ मध्ये ब्रिटिशांनी आपल्या
साम्राज्याचा विस्तार करताना आपला मोर्चा ब्रम्हदेशाकडे वळवला होता. सलग ३ वर्ष राजा
थिबाने ब्रिटिशांशी टक्कर दिली. शरण जाणं किंवा युध्द करणं यापैकी एक पर्याय
त्याला निवडायचा होता ! घराण्याचा वारसा टिकवणं महत्वाच होतं. त्यामुळे
ब्रिटीशांशी युद्धाला सामोरं जायचं त्याने ठरवले. दुर्दैवाने पंधरा दिवसातच त्याचा
पराभव झाला.२९ नोहेंबर १८८५ ला राजा थिबा शरण आला आणि त्याचे भविष्य बदलले. एप्रिल
१८८६ ला ब्रिटिशांनी त्याला देशापासून आणि जनतेपासून लांब ठेवण्यासाठी, कुटुंबासह भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर
रत्नागिरी शहरात आणून ठेवले. तो महत्वाचा राजबंदी असल्याने, ब्रिटीशांनी त्याला राहायला
बंगला, मानधन, काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला दिलेला बंगला
जुना आणि अपुरा आहे अशी तक्रार व्हॉइसरॉयकडे केल्यानंतर ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरीच्या दक्षिणेला
भाट्ये खाडीच्या कडेला नवा मोठा बंगला १९१० मध्ये बांधून दिला. तोच हा ‘थिबा
राजवाडा’. तो थिबाच्या पसंतीने आणि त्याच्या देखरेखेखाली बांधला असे म्हणतात.
या नव्या राजवाड्यात राहण्याचे
भाग्य थिबाला फक्त पाच ते सहा वर्षेच मिळालं. डिसेंबर १९१६ मध्ये त्याचा मृत्यू झाला. शेवटचा श्वाससुद्धा या
राजाने नजरकैदेतच घेतला. धोरणी ब्रिटिशांनी थिबाचा अंत्यसंस्कार म्यानमारमध्ये
म्हणजे ब्रह्मदेशात नेऊन करण्यास बंदी घातली. असेच बहादुरशाह जफर ह्याला अटक करून
रंगूनला कैदेत ठेवले होते. त्याच्या मृत्यूनंतरही मृतदेह भारतात आणण्यास ब्रिटिशांनी
बंदी घातली आणि रंगूनमधेच दफन करायला लावले. या दोन्ही घटनेत ब्रिटिशांना भीती
होती कि त्या त्या देशात जाऊ दिल्यास, त्यांची मोठी स्मारके होतील आणि ती लोकांची
स्फूर्तिस्थाने होतील. आपल्या राजवटीस विरोध वाढेल.
मातृभूमीपासून तुटलेल्या थिबाचे
अंत्यसंस्कार तरी त्याच्या देशात - म्यानमारमध्ये व्हावेत म्हणून राणीने खूप प्रयत्न केले. ब्रिटीश सरकारबरोबर
अडीच वर्ष पत्रव्यवहार चालू होता. ती अडीच वर्ष थिबाचे पार्थिव सांभाळण्यात आले,
पण शेवटपर्यंत ब्रिटिशांनी मागणी धुडकावून लावली. शेवटी १९ मार्च १९१९ ला
रत्नागिरीतच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्युनंतर हा राजवाडा
ब्रिटिशांच्या ताब्यात होता.
हातात सत्ता असेल, त्याबरोबरच
विवेक, संवेदनशीलता व चांगला दृष्टीकोण असेल तर अनेक चांगल्या घटना घडू शकतात. याचं
उदाहरण म्हणजे, जनता पक्षाच्या राजवटीत परराष्ट्रमंत्री या नात्याने मा.अटल बिहारी
वाजपेयी, ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर गेले असताना, एकेकाळचा भारताचा सम्राट व थोर कवी
म्हणून बहादुरशाह जफर यांच्या स्मृतीस्थळास
त्यांनी भेट दिली. त्यावेळी तिथे सगळ्यांना राजा थिबा व त्याच्या भारतात असलेल्या
वंशजांची आठवण झाली. भारत व ब्राह्म्देशाच्या या दोन महान व्यक्तींच्या आठवणी व
स्मृती अवशेष यांची आता अदलाबदल करण्याचा विचार झाला. इथल्या टूटू चा अर्ज
मागविण्यात आला. मानधन मंजूर केलं गेलं. तिला काही प्रॉपर्टी देण्याचे ठरले...पण
हाय! जनता सरकार पडलं. आणि राजा थिबाला मिळणारा न्याय तिथेच गोठला. नाहीतर हा
निर्णय देशाच्या सांस्कृतिक धोरणाचा खूप मोठा व महत्वाचा टप्पा ठरला असता.
आपला देश आणि राज्य सोडून दुसऱ्या
देशातल्या एका लहान शहरांत ३३ वर्ष आयुष्य काढलं. तेही ऐन उमेदीच्या वयात असताना.
वैवाहिक जीवन पण दुखा:तच गेलं. त्याची पत्नी राणी सुपायालत, तिची बहिण आणि त्याच्या
चार मुली इथे राहत होत्या. फाया गाई, फाया लत, फाया, फाया गलाय अशा चार मुली. यातल्या
फाया गाईने राजवाड्यात असलेल्या रखवालदाराबरोबर लग्न केले. गोपाळ सावंत त्यांचे
नाव, त्यांना दोन मुले होती. त्यापैकी थोरली मुलगी म्हणजे टूटू !
थिबा राजाच्या मृत्युनंतर राणी
सुपायलात मुलींना घेऊन रंगूनला परत गेली. फाया गाई (१९४७ ला इंग्रज गेल्यानंतर) रंगूनला
परतली, परंतु परधर्मीयाशी लग्न केले म्हणून तिला ब्रह्मदेशात स्वीकारले नाही आणि
तिचे जगातले एकमेव माहितीचे ठिकाण असलेल्या रत्नागिरीत ती पुन्हा परतली.
वडिलांप्रमाणे तिचे दुर्दैवाचे फेरे चालूच होते. विपन्नावस्थेत असतानाच, ती पण
निधन पावली. नवरा गोपाळ यांचे आधीच निधन झाले होते. तिचे अंत्यसंस्कार
जिल्हाधिका-यांनी नी वर्गणी गोळा करून केले.
गरीब, अशिक्षित टूटू राजघराण्यातील
असून सुद्धा पोरकी झाली. टूटू ला आपण राजवंशातील आहोत याचीही कल्पना नव्हती. टूटू
आता महाराष्ट्रीयन झाली. तिला फक्त ग्रामीण मराठी भाषा येत होती. पुढे तिने
व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या शंकर पवार याच्याशी लग्न केले. तिला सात मुले होती.
गोधड्या शिवणं, कागदी फुले करून विकणे, शेणाच्या गोवऱ्या थापून त्या विकणं अशी
कष्टाची कामे करून आयुष्य काढलं. स्वत:च्या मुलांबरोबर अनाथ मुलांचा सांभाळ सुद्धा
केला टूटू ने ! १७ वर्षापूर्वी, ऑक्टोबर २००० ला वयाच्या ९४ वर्षी तिने जगाचा
निरोप घेतला. सोनं, हिरे, माणके वापरणारा राजा थिबा, त्याची नात टूटू यांचं प्रारब्ध कसं होतं ? टूटू ची मुलं,
नातवंडे भारतीय/मराठी आहेत. थिबाचा वंश आजही भारतात अस्तित्वात आहे. थिबा राजाच्या
आयुष्याची शोकांतिका मनाला चटका लावून जाते.
(सर्व फोटो वरील पहिले दोन राजवाड्याचे सोडून इंटरनेट वरून साभार परत)
-----------------------------
- डॉ नयना
कासखेडीकर, पुणे.