कमलाबाई गोखले
’
भारतीय चित्रपटातली पहिली स्त्री कलाकार
एकोणिसावे शतक
आणि विसावे शतक खरं तर सामाजिक सुधारणांचा काळ. या काळात अनेक सामाजिक स्थित्यंतरे
होत होती. पण तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीचं जगणं तेच राहीलं. स्त्री
घराबाहेर पडून नोकरी करू लागली होती. कतृत्व गाजवू लागली.अनेक दुख आणि अपमान मनात
ठेऊन मुलगी,पत्नी, आई अशा भूमिका समर्थपणे सांभाळू लागली होती. याच काळात जिथे
रंगभूमीवर स्त्रियांच्या भूमिका पुरुष साकारत असत. अशा काळात रंगभूमीची प्रदीर्घ
सेवा करणाऱ्या, स्वताच्या कर्तृत्वाचा वैशिष्ठ्यपूर्ण ठसा उमटविणाऱ्या, रंगभूमीवरच्या
पहिल्या स्त्री कलाकार आणि भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणजेच कमलाबाई
गोखले. रुपेरी पडद्यावरची भारतीय सिनेअभिनेत्री, पूर्वाश्रमीच्या कमला कामत. प्रसिद्ध
नट चंद्रकांत गोखले व प्रसिध्द तबला वादक लालजी गोखले आणि सुर्यकांत गोखले यांच्या
त्या मातोश्री आणि आजचे आघाडीचे लोकप्रिय नट व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या
त्या आजी.
कमलाबाई या,
दुर्गाबाई कामत आणि मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मधील प्रा.आनंद नानोजकर यांची
कन्या. कमलाबाई दिसायला सुंदर. संगीताची उत्तम जाण, आवाज खणखणीत असलेल्या,
लहानपणापासूनच नाटकात कामे करीत. अर्थार्जनासाठी फिरत्या नाटक कंपनीत नोकरी
धरणाऱ्या कमलाबाईंच्या आईं दुर्गाबाई, अभिनयाबरोबर उत्तम पेंटिंग करत. गाणं म्हणत.
बीन, दिलरुबा, सतार पण वाजवीत. त्यामुळे कमलाबाईंवर संगीताचेही संस्कार झालेले होत
होते. अचानक कमलाबाईना चित्रपटात काम करण्याची अभूतपूर्व संधी मिळाली. कमलाबाईंचे
वडील आनंद नानोजकर दादासाहेब फाळके यांचे जवळचे मित्र.भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक
दादासाहेब फाळके यांनी चित्रपट तंत्र अवगत नसलेल्या काळात अत्यंत परिश्रम घेऊन ‘राजा
हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय चित्रपटाची निर्मिती केली. या यशस्वी निर्मितीनंतर
१९१४ मध्ये त्यांनी ‘भस्मासुर मोहिनी’ आणि ‘सत्यवान सावित्री’ या दोन चित्रपटांची
निर्मिती केली.
‘मोहिनी
भस्मासुर’ ची जुळवाजुळव करताना दादासाहेब फाळके दुर्गाबाईंच्या घरी आले होते. तेंव्हा
अंगणात खेळत असलेली लहान कमला त्यांना दिसली.त्यांनी कमला च्या वडिलांना विचारलं,
“मोहिनी भस्मासुर मध्ये मोहिनीची भूमिका करायला कमलाला पाठवता का? वडील
आश्चर्याने म्हणाले, कमल? आणि तीही सिनेमात? दादासाहेब म्हणाले, “अहो, चित्रपट
पौराणिक आणि सात्विक आहे. तिला काम करायला काहीच हरकत नाही. शिवाय काम घराच्या
शेजारीच तर आहे. तिच्याबद्दल काळजी करण्याचं काहीच कारण नाही. माझ्या मुलीसारखीच
ती आहे. बघता बघता तीच काम संपून जाईल. वाटलं तर तुम्हीही या चित्रीकरणाच्या
वेळी”.असे
दादासाहेबांनी समजून सांगितल्यावर त्यांनी कमलाला चित्रपटात मोहिनीच्या कामासाठी परवानगी दिली. एव्हढंच
नाही तर रोज ते स्वतः आपल्या मुलीला घेऊन चित्रीकरणासाठी जात. चित्रीकरण सुरु झालं
खरं, पण आता दादासाहेबांसमोर पार्वतीच्या भूमिकेसाठी स्त्री पात्राचा प्रश्न उभा
राहिला. ओळखीतून खूप प्रयत्न केले पण सगळीकडे नकारच मिळाला. ते वेश्यावास्तीतही
जाऊन आले. त्यांनाही सिनेमात स्त्रीने काम कारण इभ्रतीचं वाटेना. हे प्रयत्न ते
कमलाच्या वडिलांना वेळोवेळी सांगत होते.
एक दिवस मनाचा हिय्या करून दादासाहेबांनी
त्यांना विचारलं, दुर्गाबाईंना पार्वतीचं काम करायला परवानगी देता का?कमलामुळे स्टुडीओतलं
वातावरण आतापर्यंत दुर्गाबाई आणि आनंदरावांना परिचयाचं झालं होतं. त्यामुळे फार
आढेवेढे न घेता त्यांनी पत्नी दुर्गाबाईंनाही परवानगी दिली आणि पार्वती आणि मोहिनी
या दोन प्रमुख स्त्री भूमिकांसाठी दादासाहेब फाळके यांना खुद्द स्त्रिया मिळाल्या.
अशा तऱ्हेने भारतीय चित्रपटातल्या दुर्गाबाई या पहिल्या नायिका ,तर कमला बाई
पहिल्या बालनटी ठरल्या. खरं तर ही मोठी ऐतिहासिक घटना होती. कारण याआधी ‘राजा
हरिश्चंद्र’ या चित्रपटात तारामती आणि इतर स्त्री भूमिका पुरुषांनीच केल्या
होत्या. मोहिनी भस्मासुर हा चित्रपट २७ डिसेंबर १९१३ ला प्रदर्शित झाला. दादासाहेब
फाळके यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचं भाग्य कमलाबाईंना मिळालं. तो एक
संस्कारच होता आणि याचा, कमला बाईंना खूप अभिमान वाटत होता.
कमलाबाईनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं, ते
हॅम्लेट या नाटकाद्वारे. यावेळी त्यांचं वय होतं अवघं पाच वर्ष. सौंदर्य, आवाजाची
देणगी, उत्तम पाठांतर, यामुळे रंगभूमीवर त्या विविध कामे करीत असत. विशेषता बॅक
स्टेजवर प्रॉम्पटिंग ची जबाबदारी बऱ्याचदा पार पाडीत असत.आईं दुर्गाबाईं बरोबर
कमलाचेही विविध नाटक कंपन्याच्या नाटकात काम करणे चालू होते.
स्वत:ची नाटक
कंपनी, शेतीवाडी, घरदार अशा पिढीजात असलेल्या गोखले घराण्यातील रघुनाथ यांच्याशी
कमला बाईंचा विवाह झाला.आणि अर्थातच रघुनाथ आणि रामभाऊ या दोन भावांच्या चित्ताकर्षक
नाटक मंडळीत मालकीणबाई आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा त्यांचा प्रवेश झाला.रघुनाथ
राव गोखले यांचं घराण चिपळूण गुहागर मार्गावरील वेळणेश्वरचं. पण पोटापाण्यासाठी
कर्नाटकातल्या कागवाड इथं सधन शेतकरी म्हणून स्थायिक झालेलं. पिढीजात श्रीमंती
मुळे रघुनाथ व त्यांचे भाऊ, वामनराव, रामभाऊ व विष्णुपंत या देखण्या भावांनी
शेतीकडे लक्ष न देता, हौस म्हणून नाटकात कामे करण्यास सुरुवात केली.
रघुनाथराव,
किर्लोस्कर नाटक कंपनीत संगीतप्रधान नाटकात काम करत असत. तर रामभाऊ शेक्सपियर ची
गद्य नाटके करीत असत. किर्लोस्कर कंपनी डबघाईला आल्यानंतर या दोघांनी मिळून ‘चित्ताकर्षक
नाटक मंडळी’ ही नाटक कंपनी सुरु केली. ही कंपनी म्हणजे एक मोठा संसारच होता. सतत
नाटकाचे दौरे असत. कमलाबाईनी लग्नानंतर घराबरोबर या कंपनीची जबाबदारी स्वतःवर
घेतली. त्यामुळे कंपनीतल्या लोकांचे जेवणखाण, कपडेलत्ते, औषधोपचार व इतर
सोयीसुविधा हे सर्व बिनबोभाट चालायचं. त्यांचे हे दोन्ही संसार समांतर चालू होते.
कमलाबाईना तीन
अपत्ये होती. मधुसूदन उर्फ लालजी,चंद्रकांत आणि सुर्यकांत.मोठ्या लालजीचा जन्म तर
कमलाबाई नाटकाच्या दौऱ्यावर असतांना, प्रवासातच बोटीवर झाला.
कमलाबाई, रघुनाथराव
तीन मुलं, दीर रामभाऊ असा हा परिवार. कागवाड हून शेतीचं धान्य, पैसा, नाटक कंपनीची
मिळकत, असे बरे आनंदाचे दिवस चालले होते. त्यातच
अचानक अल्पशा आजाराने रघुनाथ रावांना ऐन पंचविशीत देवाज्ञा झाली आणि १७ वर्षे
चाललेल्या चित्ताकर्षक नाटक मंडळीचा कणाच मोडला. पैसा बंद झाला. त्या काळी ज्या
वैभवशाली नाटक कंपन्या होत्या, त्यात चित्ताकर्षक मंडळी सुद्धा होती.
रघुनाथ रावांच्या निधनाने कंपनी बंद पडली
तरी, खचून न जाता, स्वस्थ बसायचं नाही असं म्हणून कमलाबाई धीराने कंबर कसून उभ्या
राहिल्या. वेगवेगळ्या नाटक कंपन्यांकडे कामे मिळवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आई
दुर्गाबाई, स्वताची तीन मुलं, दीर रामभाऊ व स्वतःचा कुत्रा पण यांची जबाबदारी
त्यांच्यावर होती आणि एक दिवस मिरजेच्या तवन्नापा चिवटे यांच्या ‘मनोहर स्त्री
संगीत मंडळी’ या कंपनीत कमलाबाईंना काम मिळालं. सौंदर्य, आवाज, अभिनय आणि संगीत या
गुणांमुळे त्यांना प्रमुख भूमिका मिळाल्या. खड्या आणि सुरेल आवाजामुळे स्त्री नाटक
कंपनीत, कमलाबाई पुरुषांच्या भूमिकाच करत.
मानापमान मधला धैर्यधर. संशयकल्लोळ मधला
अश्विन शेठ, सौभद्र मधला कृष्ण, मृच्छकटिक मधला चारुदत्त या प्रमुख पुरुष भूमिका
त्या रंगवत. ज्या काळात स्त्री भूमिकाही पुरुषच साकारायचे त्या काळात प्रवाहाच्या
विरुध्दपुरुष भूमिका एका स्त्रीनं करणं हि केव्हढी धैर्याची गोष्ट होती. ही
भूमिकाही इतकी बेमालूम असायची कि मानापमान मधल्या धैर्यधराची भूमिका बघून एक मुलगी
कमलाबाई ना पुरुष समजून त्यांच्या प्रेमात पडली. ती इतकी कि,या दौऱ्यात तीने या
धैर्यधराला भेटायला दोन चार गावांपर्यंत प्रवास करून पाठलाग देखील केला.
चिवटेंच्या
नाटक कंपनीतल्या व्यवहाराची शिस्त त्यांना फार आवडे. काम सुरु होते. पण जीवन
संघर्षाला आता सुरुवात झाली होती. मग त्यांनी मनोहर स्त्री मंडळीत काम केलं. ही पण
कंपनी बंद पडल्यावर सामाजिक विषयावर नाटक करणारी लेले बंधूंची ‘नाट्यकला प्रसारक
मंडळी’ या मोठ्या कंपनीत कमला बाईना बोलावणं आलं. एव्हाना त्यांना चांगली
प्रसिद्धी मिळाली होतीच. या कंपनीत सारोळकरांच्या ‘पेशव्यांचा पेशवा’ या नाटकातील
कमलाबाईचं काम अत्यंत गाजलं. पुण्यातल्या थिएटर मध्ये तर हाउस फुल्ल बोर्ड लागायचा.
निम्मा प्रेक्षक वर्ग कमलाबाईंचाच असायचा.
या कंपनीत आल्यावर कमलाबाईना अभिनय
दृष्ट्या व वैचारिक दृष्ट्या उत्तम मार्गदर्शन मिळालं. रंगभूमीवर नट कसा दिसावा,
रंगमंचावर कसं वावरावं, अभिनय कसा करावा, गाणं म्हणताना, सुरुवात व शेवट कशी
करावी, या महत्वाच्या गोष्टी तिथल्या तालीम मास्तरांनी शिकवल्या.
याच कंपनीत
स्वातंत्रवीर सावरकर यांचे संगीत ‘उ:शाप’ नाटकही चालू होते. त्यातही कमलाबाईनी काम
केले. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानहून सुटल्यानंतर, रत्नागिरी ला नजर कैदेत
असतानाही त्यांनी हिंदू समाज संघटीत व एकजीव होण्यासाठी काम केले. रत्नागिरी येथे
पतितपावन मंदिराची स्थापना केली. अस्पृशता निवारणावरील उशाप हे नाटक बसविताना
त्याच्या तालमी सुद्धा पोलीस संरक्षणात होत असत. या तालमी पतित पावन मंदिरातच होत
असत. ब्रिटीश गव्हर्नर ने त्यावर आक्षेप घेऊन या नाटकाच्या स्क्रिप्ट चे ताबडतोब
इंग्रजीत भाषांतर करून मागितले होते.अशा प्रकारे कमला बाईंचा इतक्या अडचणींवर मात
करून रंगभूमीसाठी आणि नंतर पोटापाण्याची सोय म्हणून प्रवास चालूच होता .
पुढे नंदू
खोटे यांची रेडिओ स्टार्स कंपनी, त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांची डेक्कन स्पार्क,
मग गुर्जर गंधर्वांची हिंदप्रताप थिएट्रिकल कंपनी असा प्रवास चालू होता. एकदा तर त्या
सरळ कर्नाटकात जाऊन गरुड नाटक मंडळीत दाखल झाल्या. ‘लंकादहन’ या नाटकातल्या
सीतेच्या भूमिकेसाठी जिद्दीने कानडी भाषा शिकल्या. कुटुंबापासून दूर राहावे लागे
म्हणून पुन्हा ही कंपनी सोडली. पुढची नोकरी मिळेपर्यंत कुटुंबाचे हाल
व्हायचे.कागवाड ची शेतीवाडी ,दुर्लक्ष्य झाल्यामुळे कुणीतरी गिळंकृत केली. यावेळी
चक्क धर्मशाळेचा आश्रय घ्यावा लागला. काही वेळा नाटकातील प्रवेश व गाणी सादर करून
पैसे मिळवत त्या.पण ही व्यवस्था कायमची नव्हती. त्यामुळे पुढे पुढे कुटुंब घेऊन
देवळात जाऊन त्या राहू लागल्या. अशी तात्पुरती सोय व्हायची. कर्ज काढून घर चालविणे
हा प्रकार त्यांना अजिबात मान्य नव्हता. कष्ट करून जेव्हढे पैसे मिळतील तेव्हढ्यावरच
भागवायचे असा बाणा.
मिरजेच्या
कृष्णेश्वराच्या देवळात राहात असतांना औंध चे पंतप्रतिनिधीनी लिहिलेला ‘कीर्तन
सुमनहार’ हा ग्रंथ व काही पुस्तके कमलाबाईंच्या दिरांनी, रामभाऊंनी त्यांना आणून
दिली आणि सांगितले, “ही पुस्तकं वाच,पाठ कर आणि गावोगावी कीर्तन कर.
कीर्तनकाराच्या अंगी बहुरुपिपणा असावा लागतो.रसाळ वाणी गायन, नृत्य आणि आख्यान या
विषयावर विलक्षण हुकुमत असावी लागते”. अशा प्रकारे भगवी कफनी घालून त्या देवळातून
कीर्तन करून पैसा मिळवीत.अशा परिस्थितीत तिन्ही मुलांचे शिक्षण आपल्याला करता येत
नाही याचं दु:ख कमलाबाईना होई. त्यांना लिहिता वाचता येत होतं. मराठी,
हिंदी,उर्दू, कानडी या भाषा पण येत होत्या. त्यामुळे त्यांनी घरच्या घरीच मुलांना
लिहायला वाचायला शिकविले.
कमला बाईंच्या
गाण्यातले प्राविण्य बघून व कीर्तने ऐकून,पुण्याजवळच्या भोर संस्थानच्या
महाराजांनी त्यांची दरबार गायिका म्हणून नेमणूक केली होती. दोन ते तीन वर्ष त्या
तिथे राहिल्या. नाटकातून
प्रदीर्घ काळ काम केलेल्या कमला बाईंची आपल्या कलेवर, विद्येवर आणि मायबाप
प्रेक्षकांवर किती निष्ठा होती त्याचा हृदयद्रावक प्रसंग आहे. केळकरांच्या नाटक
कंपनीचा दौरा सोलापूरला होता. तिथल्या नूतन संगीत थिएटरात नाटक मंडळींची राहण्याची
सोय होती. दीर रामभाऊ खूप आजारी होते.
कमलाबाई :
माझे दीर आता शेवटच्या अवस्थेत आहेत.केंव्हा जातील याचा भरवसा नाही.जेंव्हा नाटक
असेल तेंव्हा त्यांची विंगमध्ये कॉट टाकून झोपण्याची व्यवस्था करा. असे केळकरांना
सांगून व्यवस्था करवून घेतली.नाटक चालू असताना ,मधून मधून त्या रामभाऊन्ची चौकशी
करून पुन्हा रंगभूमीवर आपला प्रवेश करत असत.अशा स्थितीत पहिला अंक संपला आणि
रामभाउनी प्राण सोडला.केळकर म्हणाले,
केळकर: आता
पुढलं नाटक बंद करूया.प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत देऊन टाकू.मी प्रेक्षकांना
घडलेला प्रकार सांगतो.
कमलाबाई :
थांबा,कुठल्याही कारणांन नाटक बंद होतं कामा नये.प्रेक्षक आपला वेळ,पैसा,खर्च करून
नाटक बघायला आलेले असतात,त्यांचा विरस होता कामा नये.माझ्या वैयक्तिक दु:खासाठी
त्यांना परत पाठवणं योग्य नाही. माझे दीर आता गेलेलेच आहेत ते काही आता परत येणार
नाहीत.” असं म्हणत कमला बाईनी काळजावर दगड ठेऊन अशाही परिस्थितीत संपूर्ण नाटक
सादर केलं आणि प्रयोगानंतरच आपल्या दु:खाला मोकळी वाट करून दिली. एव्हढी निष्ठा .
पतिनिधना नंतर
मुलांना मोठं करत ,आई व दीर यांनाही सांभाळत कमला बाईनी खूप कष्ट घेतले. अनेक संकटाशी
धैर्याने सामना केला. मानाने जगल्या. मुलंही मोठी झाली. लालजींना संगीताची आवड
असल्याने त्यांनी प्रसिध्द तबला नवाज थिरकवाँ साहेबांची शागिर्दी पत्करली. सुर्यकांत
गोखलेनीही पंडित लालजी आणि थिरकवाँ साहेबांकडे तबल्याचे धडे गिरविले. आणि दोघेही
प्रसिध्द तबला वादक झाले.
तर चंद्रकांत
गोखलेंनी नाट्य व सिनेमा क्षेत्रात जवळ जवळ पाऊण शतक गाजवलं. या सृष्टीत चतुरस्त्र
अभिनेता म्हणून आपला ठसा उमटविला. मोठा झाल्यावर स्वतः या क्षेत्रात उडी घेऊन
आईच्या कष्टांना पूर्ण विराम दिला होता. चंद्रकांत सात-आठ वर्षांचे असताना मनोहर
स्त्री नाटक कंपनीत कमला बाई नोकरी करत होत्या. तेंव्हा पुन्हा हिंदू हे नाटक चालू
होते. या नाटकात महादाजींच काम करणारा मुलगा आजारी झाल्यानं अचानक ते काम करण्याची
संधी चंद्रकांत यांना मिळाली. रंगभूमीवरच त्याचं हे पहिलच पाऊल होतं. पण चंद्रकांत
नी सुंदर काम केलं इतकं कि, स्टेजवर त्यांच्या अंगावर चांदीच्या व इतर नाण्यांचा
पाऊस पडला. इतकं नाटक उत्तम रंगलं. नाटक संपल्यानंतर कमला बाईनी त्याला जवळ घेतलं
आणि म्हणाल्या, “किट्या लवकर घरी चल,आज तुझी मी दृष्ट काढणार आहे.”रंगभूमीवरच्या
या पहिल्याच पदार्पणाला आईचा इतका भरभरून आशीर्वाद मिळाल्यानं चंद्रकांतला खूप
आनंद झाला.
कमला बाईनी
नाटक,मूकपट आणि चित्रपट यातील प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करून दिला.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत २०० हून अधिक नाटकांत, मूकपट व ३५ पेक्षाही अधिक चित्रपटातून भूमिका
साकारल्या. त्या सगळ्याच नायिका रसिकांच्या कायम लक्षात राहतील. त्यांनी भूमिका
केलेले हिंदी चित्रपट होते ,
अफ़गान अबला (१९३४),अंबरीश (१९३४),अल्लादीन और जादुई
चिराग (१९५२),आख़री ग़लती (१९३६),एक नज़र (१९७२),औरत का दिल (१९३३),कृष्ण सुदामा
(१९३३),ग़रीब का लाल (१९३९),गहराई (१९८०),गुणसुंदरी सुशीला
(१९३४),चंद्रहास (१९३३),चाबुकवाली (१९३८),चार चक्रम (१९३२),देवी देवयानी शर्मिष्ठा
(१९३१),नवजीवनम कमला (१९४९),नास्तिक कमला (१९५४),नीति विजय (१९३२),प्रभुका प्यारा
(१९३६),बॅरिस्टर्स वाईफ़ (१९३५),बाल्यकालसखी
(१९६७),बिख़रे मोती (१९३५),बे ख़राब जन
(१९३६),भूतियो महाल (१९३२),भूल
भुलैयाँ (१९३३),भोला शिकार (१९३३),मिर्ज़ा साहिबाँ
(१९३३),मोहिनी भस्मासुर (१९३१),राजरानी मीरा
(१९३३),लाल-ए-यमन लालारुख (१९३३),शैल बाला (१९३२),सोना
चाँदी (१९४६),स्टंट किंग (१९४४),स्ट्रीट सिंगर
(१९३८),हक़दार (१९४६),हलचल (१९७१).
अशा
तल्लख स्मरणशक्ती, तत्वनिष्ठ, निडर, शूर, कष्टाळू, काम तत्पर, धैर्यशील, चाणाक्ष
अशा जवळ जवळ ८० वर्षे रंगभूमीची इमाने इतबारे सेवा केलेल्या, भारतीय चित्रपट आणि
मराठी रंगभूमीवरची पहिली अभिनेत्री कमलाबाई गोखले १८ मे १९९७ रोजी वयाच्या
शहाण्णव्या वर्षी हे जग सोडून गेल्या, नाही मृत्युनंतर देहदान करून अमर जाहल्या.
या आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला शतश: नमन!
आठवण --- आकाशवाणीसाठी तेजशलाका या मालिकेत कमला बाई गोखले या
विषयावर लेखन करण्यासाठी मा.चंद्रकांत गोखले यांना पुण्यात त्यांच्या राहत्या घरी
भेटले होते. कमलाबाई यांच्याबद्दल माहिती हवी असे सांगितले. उद्या सकाळी अमुक
वाजता या म्हणाले. बसने लांब उतरून, घर शोधत येईपर्यंत २०-२५ मिनिटे उशीर झाला
होता. flat सापडला एकदाचा. जरा घाबरतच गेले. उशीर झालाय तेंव्हा जावे कि नाही असे
वाटत होते. पण आज टाळलं तरी नंतर जावं लागणारच होतं. म्हणून तशीच गेले.
दारावरची
बेल वाजवली. मुख्य दार उघडच होतं. फक्त जाळीचं दार लावलं होतं. ती वेळ मला दिलेली
असल्याने ते वाट बघत होतेच. मनात धाकधूक चालली होती. जरा वेळाने ते स्वतः दार
उघडायला आले. दार उघडले, मी नाव सांगितलं, काल फोन केला होता त्याप्रमाणे आले आहे
सांगितलं. काहीही बोलले नाहीत ,या नाही, काहीच नाही. त्यांच्या पाठोपाठ मीही आत
गेले. प्रचंड दडपण आलं होतं. आत आल्यावर म्हणाले, आता माझ्या जेवणाची वेळ झाली
आहे, बसावं लागेल तुम्हांला. म्हटलं चालेल. मी थांबते.
एका अर्थी बरेच झाले उशीर
झाला ते. कारण मला बराच वेळ थांबता आलं, त्याचं जेवण होईपर्यंत त्या खोलीतील पुरस्कार
पाहत बसले. जणू लायब्ररीच होती ती. त्यामुळे घरात कपाटाच्या कपाटं भरून भिंतीभर
मानचिन्हे ,पुरस्कार ,ढाली,आणि गौरवच गौरव असलेल्या भिंती बघायला मिळाल्या. ते
सर्व वाचत थांबले तेव्हढा वेळ. बघता बघता मनात विचार आला कि एव्हढी ही बक्षिसे आहेत,
ही लिहून ठेवली असतील का? याची सूची करायला पाहिजे. एकदा प्रसिध्द भावगीत गायक
गजाननराव वाटवे यांची मुलाखत घेताना त्यांनी हीच खंत व्यक्त केली होती. ही बक्षिसे,
फोटो,पुरस्कार यांची आम्ही गेल्यानंतर किंमत शून्य, फक्त राहते अडगळ नाहीतर जागा
भंगारमध्ये आणि हे सर्व बघताना मला ते आठवलं.चंद्रकांत गोखले यांच्या घरातील हे
दृश्य डोळे दिपवणार होतं. घराणंच नाट्य-सिनेमा-संगीत या कलाक्षेत्रातल्या कारकीर्दीचं.
जवळ जवळ ८५ वर्षांची चार पिढ्यांची कारकीर्द होती ती. मला मनापासून वाटत होतं कि
याचं काहीतरी डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. नव्हे आपणच करूया त्यांना विचारून.
तेव्हढ्यात
चंद्रकांतजी त्यांचा डबा खाऊन मी बसले होते तिथे आले आणि मी भानावर आले कि अरे
आपल्याला मुलाखत घ्यायची आहे, गप्पा मारायच्या आहेत. कमलाबाई गोखले यांच्या बद्दल.
त्यांना मी पुन्हा विषय सांगितला. ते म्हणाले बेबी बद्दल ? माझा प्रश्नार्थक चेहरा
बघून त्यांनी खुलासा केला मी माझ्या आईला बेबी म्हणूनच हाका मारत असे. थोड्या
गप्पा झाल्या. काही माहिती त्यांनी दिली. कारण कुठेही संदर्भासाठी मला कमलाबाई
गोखले यांची माहिती मिळत नव्हती. मी म्हटलं हो त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती हवी आहे.तुम्ही
सांगा मी लिहिते. मला खूप उत्सुकता होती, कधी संवाद सुरु होईल असे वाटत होते. म्हटलं
पुस्तक, स्मरणिका असं काही असेल तर ते पण द्याल का?
बोलण्यापेक्षा मी बेबीवर लिहिलं
आहे ते आधी वाचा, आणखी काही लागलं तर सांगीन. असं म्हणून त्यांनी एक मासिक वजा
पुस्तक आणून दिलं. आणि ते आत निघून गेले. कदाचित आताच वाचावं आणि परत द्यावं
म्हणून? ते मी चाळल. इतके जुने संदर्भ लक्षात थोडे राहणार होते? मी विचारल हे
पुस्तक घेऊन जाते, परत आणून देते. चेहऱ्यावर त्यांची नाराजी दिसली .मग म्हटलं
झेरोक्स काढून घेते, पण त्यासाठी ते बाहेर न्यावं लागणार होतं. त्यांना विश्वास नाही
वाटला, बरोबरच आहे. हि संपदाच आहे ,ती परत नाही मिळाली तर?ते म्हणाले झेरॉक्स
काढून लगेच आणून द्या, नाही आलात तर? हो आता लगेच आणून देते. त्यांची शिस्त आणि
काळजी याची मला जाणीव होती. मला त्यांच्या बोलण्याचं काही वाटलं नाही. झेरॉक्स
काढून आणून द्यायला अर्धा तास गेला. त्यांच्या हातात परत पुस्तक आणून दिलं, त्याच्या बद्दल त्यांना हायसं वाटलं असणार नक्की. पण माझ्या बद्दल चा विश्वास दृढ
झालेला दिसला. पुन्हा मौन. काहीच बोलले नाहीत.फक्त एक कटाक्ष. त्यांच्या कटाक्षात
मला दिसला आनंद आणि धन्यवादाची भावना, त्यांना मिळालेला त्यांच्या आईचा आठवणींचा शब्दरूपी
ठेवा खरच मौल्यवान होता. त्यामुळे सुरुवातीला मला वाटलेली शिस्त मोडल्याची
अपराधीपणाची भावना, आदरयुक्त भीती नाहीशी होऊन त्या जागी विश्वास संपादन केल्याचा
आनंद होता, त्या आनंदातच मी घरी परतले पुढचं स्क्रिप्ट लिहायला. मनातल्या मनात या
वयातले चंद्रकांत जी, त्यांची एव्हढी मोठी कारकीर्द, अनेकविध अनुभवांनी काठोकाठ भरलेल
जीवन, आईं कमलाबाई यांच्या रंगभूमीचा वारसा चालवणाऱ्या ,आईची शब्बासकी मिळवणाऱ्या
.आईबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर असलेल्या चंद्रकांत गोखले यांना मनोमन मानाचा मुजरा!
---------------------------------------------------------
डॉ.नयना कासखेडीकर ,पुणे.