एक मुलाखत---
बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त संगीतकार
व गायक श्री श्रीधर फडके यांची मुलाखत -----
श्रीधर जी : “1942-43 च्या काळातील म्हणजे, अगदी
सुरुवातीच्या काळातील परिस्थिति जगाच्या पाठीवर मध्ये बाबूजींनी लिहिली आहे. त्यांना सर्वात पहिला चित्रपट
मिळाला तो प्रभातने काढलेला हिन्दी पिक्चर ‘गोकुळ’. त्यातली गाणी फार सुंदर होती. ‘कहां हमारे श्याम चले...., हे अतिशय सुंदर गीत,
जी.एम. दुराणी (गुलाम मुस्तफा दुराणी) म्हणून नामवंत कलाकार होते, त्यांनी गायलंय. त्यांनी बाबूजींचं खुप कौतुक केलं. म्हणाले की, फडके साब आप इतना अच्छा गाते हो, मुझे क्युं गाने
के लिये बुलाया ? जी.एम. दुराणी हे फार प्रसिद्ध व मोठे गायक, अभिनेता व संगीतकार होते त्यावेळचे".
"तुम्ही जगाच्या
पाठीवर हे अभ्यासलं, तर तुम्हाला दिसेल, त्यावेळी बाबूजींच्या आयुष्याचा खूप खडतर प्रवास चालू होता. पण ते जिथे
जिथे फिरले, जिथे जिथे गेले, उत्तर
प्रदेशात, मध्य प्रदेशात, राजस्थान
मध्ये गेले, तिथे तिथे त्यांना जे ऐकायला मिळालं, त्यातून ते समृद्ध होत गेले, शिवाय त्यांची विलक्षण
प्रतिभा आणि प्रचंड बुद्धिमत्ता होती, संगीताचा आवाका मोठ्ठा
होता त्यांचा, क्लासिकल उत्तम गायचे ते. ते कोल्हापूरला
पाध्येबुवांकडे शिकले होते. त्यामुळे चित्रपटाचं गाणं नेमकं कसं करावं हे कौशल्य
त्यांनी फार लवकर अभ्यास करून अवगत केलं. त्यामुळे कुठल्याही चित्रपटातलं त्यांचं
गाणं बघा, अगदी त्यावेळेपासून ते अलीकडच्या चित्रपटापर्यन्त,
वेगळं वाटत नाही . ते चित्रपटाच्या दृश्याला
पोषक असतं, बाबूजींनी त्या वेळेपासून चित्रपट संगीताचा बाज
बदलला. पॅटर्न बदलले. विलक्षण मोहक संगीत असे त्यांचे. मुखडा इतका आकर्षक असतो आणि
अंतरेही खूप आकर्षक असत. एकातून एक असे उलगडत जातात. ते सर्व लॉजिकल असत. हे फार महत्वाचं आहे".
"संगीतकाराला सर्जनशीलताही महत्वाची आहे. या
दोन्ही गोष्टी बाबूजींकडे होत्या. कुठल्याही
निर्मिती साठी प्रतिभा लागते, चाल सुचणं, काव्य समोर असताना एखाद्या कवितेला नेमकी चाल लावणं, ही फार विलक्षण गोष्ट असते. ‘गोकुळ’ नंतर, ‘वंदेमातरम’ चित्रपट आला. कथा एका
स्वातंत्र्यसैनिकावर होती. याची गीते गदिमांची
होती. मुख्य भूमिकेत होते पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई. संगीत बाबूजींच
होतं ,यातली किती तरी गाणी लोकप्रिय झाली. ‘वेदमंत्राहुनी आम्हा, वंद्य वंदे मातरम ..., ‘अपराध मीच केला, शिक्षा
तुझ्या कपाळी .., ‘झडल्या भेरी, झडतो डंका, पुढचे पाऊल पुढेच टाका..., ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती.
देशभक्ती आणि स्वातंत्र्य या पार्श्वभूमीवर ही गाणी देशप्रेम जागविणारी होती.
अजूनही वेद मंत्राहुनी आम्हा हे गाणं लोक आवडीने ऐकतात. हे बाबूजींचं यश आहे. गदिमा
आणि बाबूजी यांची छान जोडी जमली होती. गदिमांच्या गाण्यांना जेंव्हा बाबूजींचं
संगीत लाभायचं ना तेंव्हा ते वेगळच असायचं. इतर संगीतकारांनी पण छान चाली दिल्यात.
पण गदिमा आणि बाबूजी म्हणजे एक अद्वैत होतं. जसे त्यांचे शब्द तशीच बाबूजींची चाल
यायची. जसेच्या तसे भाव यायचे त्यात. त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे ‘गीतरामायण’. गदिमांनी रामायणात जशा व्यक्तिरेखा
लिहिल्या आहेत, तशाच बाबूजींच्या चाली आल्या आहेत”.
बाबूजींच्या मनातल्या, श्रीरामाच्या प्रतिमेबद्दल श्रीधरजी
सांगतात, “बाबूजी, रामाला, स्वत:च्या करणीने देवत्वाला पोहोचलेला माणूस, असे
मानायचे. राम, रामचंद्र हा माणूसच ना? हा
मानवावतार. पण स्वत:च्या कर्तृत्वाने ते पोहोचले ना? हे
बाबूजींना फार अप्रूप होतं. बाबूजी तसे धार्मिक नव्हते. हिंदुत्व मानायचे, पण अंधश्रद्धा विरोधी होते. त्यांची श्रद्धास्थाने होतीच. शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ हेडगेवार ही त्यांची श्रद्धास्थाने होती. ते रामजन्मभूमीच्या सत्याग्रहातले पहिले अनुयायी होते. या रामानेच
आपल्या देशाला एकत्र केलं अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच रामायण त्यांच्या
हृदयातून आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, विनोबा भावे, गोळवलकर गुरुजी,
डॉ राजेंद्र प्रसाद, या सर्वांनी गीत रामायण ऐकलं. यशवंतराव
चव्हाणांना तर गीतरामायण तोंडपाठ होतं”.
गायक म्हणून बाबूजींची वैशिष्ठ्य
सांगताना ते म्हणाले, “बाबूजींचे चित्रपटातले गाणे चालू झाल्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला
अनुभव सांगितला आहे, जेंव्हा बाबूजी कोल्हापूरला होते
तेंव्हा एचएमव्ही कंपनी नवीन आर्टिस्ट शोधत आले होते, वसंतराव
कामेरकर हे त्यांचे नवे अधिकारी होते. माधवराव माडगावकर रेकॉर्डिस्ट होते.
बाबूजींना त्यांनी गाणं म्हणायला सांगितलं. बाबूजी गायला लागले, जोरात गायलं तर, रेकॉर्डिंग होतांना त्यावर खड्डा
पडायचा, तेंव्हा रेकॉर्ड मेणाच्या असायच्या. 7, 8 रेकॉर्ड खराब झाल्या. काय करावं हे एचएमव्ही च्या
लोकांना कळेना, शेवटी माधवराव माडगावकरांनी बाबूजींना
समजावून सांगितलं की, तुम्ही चांगलं गाता परंतु कंट्रोल्ड
व्हॉईस पाहिजे. कुठला शब्द दाबून म्हणायाचा हे व्हॉईस कल्चर समजून सांगीतले. बाबूजींनी
त्याचा खूप अभ्यास केला. बाबूजींनी माडगावकरांना फार मोठ श्रेय दिलंय आपल्या
गायकीसाठी. विशेषत: रेकॉर्डिंग साठी गाणं
कसं गावं याबद्दल. बाबूजींनी 1948 पासून ते1993 / 94,
पर्यन्त जी चित्रपटगीतं गायली आहेत ना, ती
त्या त्या नटाना, नायकांना, मग राजा
परांजपे असोत, राजा गोसावी, असोत, सूर्यकांत असोत, रमेश देव,
अरुण सरनाईक असोत. ती त्या त्या पात्रांना योग्य वाटतात. चित्रपट पाहताना ती
व्यक्तिरेखाच गीत गातेय असं प्रेक्षकांना वाटतं. तसा आवाज होता बाबूजींचा. विलक्षण
गोड, माधुर्य, दुसरं म्हणजे भाव व्यक्त
करणं. भावनाशील गाणं म्हणणं फार अवघड असतं. मी आता म्हंटलं की भाव ओता, तर तसं होणार नाही, ते इथून हृदयातून आलं पाहिजे.
त्या गाण्यात तो भाव दिसला पाहिजे”.
पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावर गीत
रामायणाचे पहिले गीत 1 एप्रिल 1955 ला ‘स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती’. प्रसारित झालं. ही गीतांची
मालिका 19 एप्रिल 1956 पर्यन्त रामनवमी पर्यन्त वर्षभर चालू होती. वाल्मिकिंच
रामायण जसं अजरामर झालं आहे तेव्हढच गदिमां नी रचलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध
केलेलं हे गीत रामायण चिरंजीव झालं आहे.
गदिमांची रससिद्ध प्रज्ञा आणि बाबूजींची सांगीतिक प्रतिभा यांचा अजोड
आविष्कार म्हणजे गीतरामायण. या गीत रामायणाने निर्मितीनंतर गेली पासष्ट वर्षे
मराठी मनावर अधिराज्य केलंय. गदिमा आणि बाबूजी यांनी श्रीरामाचे मूर्तीमंत चित्र
या कथेतून उभं केलंय. कवीच्या शब्दातील भावना बाबूजींनी जशाच्या तशा रसिकांपर्यंत
पोहोचवल्या आहेत. आजही लोकप्रिय असलेल्या बाबूजींच्या गीतरामायणा बद्दल श्रीधर
फडके यांनी समाधान व्यक्त केले आणि गीतरामायण बाबूजींसारखं दुसरं कोणीच म्हणू शकत
नाही असा दृढ विश्वास ही व्यक्त केला. ते म्हणतात, “ते इतक विलक्षण आहे,
की त्यातलं वर्णन गाण्यातून व्यक्त करताना त्यातले भाव तसेच व्यक्त करावे लागतात. शूर्पणखेचं गाणं
असेल, शूर्पणखा रावणाकडे गेल्यानंतरच वर्णन, तिचे नाक कापल्यानंतरचे वर्णन, तर राम किती सुंदर
होता हे तिच्या तोंडून निघलेल वर्णन हे गदिमांनी एका अंतर्यात आणलय. कुंभकर्णाचं गाणं आहे, ‘योग्य समयी जागविले ... , नंतर प्रभू रामचंद्रांची
गाणी, सीतेच गाणं, लक्ष्मण, भरत, कौसल्या या सगळ्या व्यक्तिरेखांची गाणी
तशीच्या तशी भावपूर्ण मांडल्यामुळे त्या प्रसंगाची चित्रे डोळ्यासमोर
उभी राहतात. म्हणून ती लोकांना भावली आहेत. गदिमांचं वैशिष्ठ्य काय की शब्दात ते
चित्र दिसायचे आणि बाबूजींचं वैशिष्ठ्य म्हणजे ते चित्र स्वरातून दिसायचे. हे
महत्वाच आहे. मी गीत रामायण चालू ठेवलं आहे ते टिकण्यासाठीच,
मी माझ्या परीने ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. पण बाबूजींसारखं ते कोणीच म्हणू शकत
नाहीत”.
गीत रामायणातली 56 गीते ही भूप.
मिश्र काफी, जोगिया, भैरवी, पिलु, शंकरा, केदार, मारू बिहाग, मधुवंती तोडी, सारंग, मालकंस
अशा विविध रागांवर आधारित आहेत. ही गीते इतकी लोकप्रिय झाली की, त्याची आजपर्यंत हिन्दी, गुजराती, कानडी, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोंकणी या भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. विशेष म्हणजे ही त्या भाषात
सुद्धा बाबूजींनी दिलेल्या मूळ चालींवरच गायली जातात. यावरून गीत रामायणाची प्रादेशिक
भाषातही असलेली लोकप्रियता लक्षात येते.
भविष्यात गीतरामायण टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगताना श्रीधर
फडके म्हणाले, “ गीत रामायण आतापर्यंत टिकल आहे, ते टिकणारच आहे, पण पुढच्या पिढीने ते टिकवण्यासाठी त्याचा त्यांनी नीट अभ्यास करावा.
काही जण गीतरामायण गातात. अवश्य गावं. कौतुकच आहे. पण ते पूर्ण गाणं गात नाहीत. चार
अंतरे नका म्हणू. जेंव्हा गदिमांनी तो प्रसंग रामायणातून,
गीतात उभा केलेला आहे, त्याचे दहा अंतरे असतील, तर ते
दहाही अंतरे म्हटलेच पाहिजेत. त्याशिवाय ती कथा, तो
संपूर्ण प्रसंग आणि वातावरण निर्मिती होणारच नाही . गीताचा अर्थ लोकांना कळणार
नाही. आणि अजून एक, एखादा भावगीत किंवा भक्तीगीताचा
कार्यक्रम चालू आहे, त्यात एक रामायणातल गीत म्हणायचं. अजिबात
नाही करायच. बाबूजी कधीही करायचे नाहीत असं. त्यांचा तो नियम होता आणि तो मीही पाळतो.
रामायणाचा पूर्ण अर्थ कळणे आणि रामायणाचे पावित्र्य टिकवणे, हे
झालच पाहिजे. त्यासाठी पूर्ण रामायण म्हटलं गेलं पाहिजे”.
‘वीर सावरकर’ या महत्वाकांशी चित्रपटची निर्मिती बाबूजींनी
केली. हा निर्मितीचा प्रवास आत्यंतिक खडतर झाला, संकटांनी
बाबूजींची परीक्षाच पाहिली पण कोणत्याही अडचणीला न जुमानता,
त्यांनी हे अडथळ्यांचे डोंगर पार केले, निर्मितीची ही एकहाती
लढाई चिवटपणे लढत बाबुजी जिंकले आणि ही अप्रतिम कलाकृती रसिकांना सादर केली. बाबूजींची
अतूट श्रद्धा होती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर....या विषयी
श्रीधर म्हणतात, “घरात
ताण असायचाच ! गंभीर वातावरण होत, पण बाबुजी खंबीर होते आणि
दुसरं म्हणजे आईची त्यांना संपूर्ण साथ होती, ती त्यांच्या
मागे उभी होती, मला वाटतं हे महत्वाचे होते. मी नोकरीस होतो
आणि मला फारसे काही करता येण्यासारखे नव्हते, पण माझी आई, पत्नी, काका, काकू, मुली सगळे त्यांच्या पाठीशी होते. त्यांच्या पाठीशी लोक ही उभे होते
खंबीरपणे, त्यांचा बाबूजींवर विश्वास होता. बाबूजींवर टीकाही
झाली. या कामासाठी दादरहून पार्ल्याच्या कार्यालयात ते बसने जात असत. पण एकदा
प्रवासात ते पडले, त्यांना ओळखणार्या एक माणसाने त्यांना
मदत केली पण मग ट्रस्टने ठरवले की त्यांना वाहन द्यायलाच पाहिजे. ही निर्मिती
त्यांनी एका ध्येयाप्रती केली. ते अतिशय साधेपणाने,
तत्वनिष्ठेने जगले.
बाबूजीन्चे कुटुंबियांसाठी व्यक्तिमत्व कसे होते
सांगताना श्रीधरजी म्हणतात , “बाबूजींना मी अण्णा म्हणायचो. घरात त्यांचा दबदबा होता.
त्यांच्या बद्दल भितियुक्त आदर होता मनात. त्यांच्याशी थेट बोलायची हिम्मत होत
नसे. मग मध्यस्थ असायची आई. तिच्या मार्फत बाबूजींना सांगायचे. काही मुले वडीलांशी, मित्रा सारखे बोलतात वागतात, आईवडिलांविषयी
सर्वांनाच प्रेम असतं, पण बाबूजींबद्दल त्यांच्या
स्वभावामुळे स्वच्छता टापटीप, शिस्त,
त्यांची तत्त्वे यामुळे त्यांच्याशी बोलण्याची हिम्मत व्हायची नाही. जराशी भीती
वाटायची. धाक वाटायचा.
स्वच्छता आणि नीटनेटकेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात भरलेला होता. स्वच्छतेचे धडे त्यांनीच आम्हाला दिले, नीटनेटकेपणा अतिशय प्रिय, धूळ आवडत नसे, हे सगळे धडे त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच दिले, गादी घालतांना चादरीला सुरकुत्या पडता कामा नयेत,
गादीवर पाय देऊन चालायचे नाही, पाणी वाया घालवावायचे नाही, आंघोळ करणे, दात घासणे,
याबाबतीत तर ते फारच जागरूक होते. साध्या साध्या
गोष्टी व्यवस्थित करण्यावर त्यांचा भर असायचा. संध्याकाळी जेवण झाल्यावर
भांडी आवरणे, घासणे, लावून ठेवणे ई.
साठी आईला मदत करीत. कोणी भेटायला आले तर त्यांच्यासाठी चहा करणे अशी अनेक कामे ते
करीत. माझ्या मते आमच्यावर झालेले हे संस्कार होत.
दुसरं म्हणजे स्वभाव निश्चयी होता. एखादे काम
करायचे ठरवले की ठरविले. त्यात बदल नाही. एखाद्या
गाण्याची चाल ठरविली की त्यात बदल नसे. एखादा निर्माता किंवा दिग्दर्शकाने त्यांना
एखादी चाल अशी नको, अशी हवी असे सुचविले आणि त्यांना वाटले की तो बदल आवश्यक वाटला तरच ते
करीत अन्यथा तीच चाल कायम ठेवत, नि म्हणत, की तुम्ही संगीतकार बदला, पण मी चाल नाही बदलणार.
अशी गाणीच पुढे खूप
लोकप्रिय झाली ...त्यांनी बालगंधर्वांच्या गायकीचा अभ्यास केला होता. पुलं नी लिहून ठेवलंय की, ‘गायकी आत्मसात केलेले म्हणजे सुधीर फडके’...बालगंधर्व
त्यांच्याकडे गायलेत ! याशिवाय हिराबाई बडोदेकर, आशाबाई
(भोसले) ...गाणे बसवून घ्यायचे, जागा नि जागा घोटवून
घ्यायचे...आशाबाईंनी याचा विशेष उल्लेख केला आहे.. जागा,
शब्दोच्चार ...म्हणूनच तर त्यांच्या गाण्यात फडकेंचे बाबूजी दिसतात !
संघ स्वयंसेवक बाबूजी कसे होते हे
सांगताना, ते म्हणाले, “संघाचा स्वयंसेवक म्हणून बाबूजींचा
पहिल्यापासूनच संबंध. यामुळे मा. अटलजी, मा. बाळासाहेब देवरस
आदि अनेक थोर आमच्या घरी आलेले आहेत..वेळ असेल तेव्हा ते शिवाजी पार्कच्या शाखेत
जात असत..उत्सवासाठी जात असत..तळजाईच्या शिबिरासाठी त्यांनी ‘हिंदू सारा एक ..’ हे गीत म्हंटले होते..(प.पू.
डॉक्टर हेडगेवार यांचेवरील ) ‘लो श्रद्धांजली
राष्ट्रपुरुष... तसेच ‘चाहीये आशीष माधव’ (मा. श्रीगुरूजीवरील गीत) ही गीतंही लोकांच्या स्मरणात आहेत !
बाबूजींच्या कार्यकर्ता म्हणून गोवा
मुक्ति संग्रामच्या आठवणी श्रीधर फडके यांनी जागविल्या. “या संग्रामात ते संघ
स्वयंसेवक म्हणूनच गेले होते आणि बाकी स्वयंसेवकांना एकत्र आणून त्यांनी गोवा, दादरा नगर हवेली हा भाग पोर्तुगीजांच्या
ताब्यातून मुक्त केला आणि भारत सरकारला परत दिला...आपल्या देशाचा भूभाग गत
साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे आणि मुक्त करणे आपले कर्तव्य
आहे..त्यासाठी घर दर मुलगा सगळे सोडून ते
त्यात सहभागी झाले.. माझी आई सुद्धा त्यात होती..त्यात राजा वाकणकर, नाना काजरेकर, बाबूजी,
बाबासाहेब पुरंदरे असे अनेक जण होते.. तसेच गोवा स्वातंत्र्यवीर मोहन रानडे, तेलू मस्कारेन्हास् यांच्या मुक्ततेसाठी सुद्धा पुष्कळ लढले.... या
लढ्यासाठी बाबूजी लंडनला २-३ वेळा, आणखी इतर ठिकाणी बरेच
वेळा जाऊन आले..मला वाटते हेगला सुद्धा गेले होते..त्यांच्या मुक्ततेसाठी समिति
स्थापन केली होती.. त्यासाठी ते तत्कालीन पंतप्रधान
श्रीमती इंदिराजींना सुद्धा भेटले होते”.
“बाबूजी अष्टपैलू होते.. संगीतकार..
सर्वोत्तम , गायक म्हणून सर्वोत्तम.. त्यांची
देशभक्तीची भावना प्रखर होती.. आपण देशाचे, समाजाचे देणे
लागतो ही भावना त्यांच्या मनात सदैव जागृत होती.. देशासाठी काहीही त्याग करायची
तयारी होती.. अगदी प्राण देण्याची आवश्यकता असेल तर त्यालाही ते सदैव तयार होते”.
‘जगाच्या पाठीवर’ या अपूर्ण
आत्मचरित्रातील उल्लेख फार हृदयस्पर्शी आहेत, त्यामुळे वाचतांना
मन भरून येते (असे त्यांना अनुभव आल्यामुळे )... पुढे काय काय घडले त्याबद्दल
उत्सुकता आहे हे विचारताच , “त्यांच्या आयुष्यावर लवकरच एक चरित्रपट येतोय. दोन तासांच्या अवधीचा... त्याची
तयारी झाली आहे, लतादीदी, आशाबाई यांच्याकडूनही
माहिती विचारली आहे ... पण दोन तासांत काय
मांडायचे असा प्रश्न पडलाय”.
एखाद्या वटवृक्षाच्या छायेत बाकी झाडं वाढत
नाहीत, खुरटतात, असा जगाचा अनुभव असतांना तुम्ही मात्र बाबूजींच्या सारखच काम केलय... यावर
प्रसन्नपणे स्मित हास्य करीत श्रीधर फडके म्हणाले, “मी
त्यांच्याकडून गाण नाही शिकलो, मी शास्त्रीय संगीत नाही शिकलो हे मला जाणवतं .. पण माझी शैली - ‘स्टाईल’ आपोआप तयार झाली, हे
मुद्दाम करून काही होत नाही, तर आपोआप होते.... ऐकून ऐकून जे
कानावर पडले तेच काय ते शिक्षण .. तेच संस्कार ..पण जे काही
केल त्याचं दोघांना (म्हणजे बाबूजी आणि मातोश्री) फारच अप्रूप होते, समाधान होत..त्यांनी गाणं कस करायला पाहिजे, मुखडा, नंतर अंतरा, त्याबद्दल संगितले ..पण एकदा
सांगितल्यावर नंतर पुन्हा विचारायला गेलो असताना, “यापुढे
तुझ्या चाली तुच बांधल्या पाहिजेत. तरच तुझी शैली तयार होईल” म्हणून संगितले...आणि
बाबूजींनी मला कधीही गाणं शिक असा आग्रह केला नाही. तुझ्या आवडीचं जे आहे ते आधी
शिक. कारण त्यांना इंजिनियर व्हायचं होतं पण ते शक्य नाही झालं. त्यांचं म्हणणं
होतं विद्यार्थ्यानी आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. मला करियर बद्दल स्वातंत्र्य
दिल होतं. म्हणूनच मी आवडीच्या क्षेत्रात शिक्षण, नोकरी करून
मग निवृत्तींनंतर आता पूर्ण वेळ गाणं च करतोय”.
"जन्म शताब्दीच्या निमित्ताने एक
सांगावेसे वाटते की, बाबूजींचे
गाणे आणि त्यांनी समाजासाठी केलेले काम सर्वांपर्यंत पोहोचावे आणि त्यांचे पुतळे
उभे करू नका त्याऐवजी एखादे नवे होणारे कलामंदीर किंवा नाट्यगृह असेल त्याला
बाबूजींचे नाव द्या, तिथे एखादी संगीताची लायब्ररी करा ज्यात
भारतीय आणि अमेरिकन, क्यारेबियन, चायनीज, यूरोपियन अशा आणि इतर देशांच्या संगीताचा अभ्यास करता येईल. काव्याची
पुस्तके ठेवावी, त्याचा अभ्यास करावा. संगीताचे विविध फॉर्म्स
ऐकता येतील अशी व्यवस्था करावी”.
अशा या पिता
पुत्रांनी मराठी संगीत क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. या अनुभवाच्या आणि
तत्वांच्या आधारावर नव्या पिढीला ती तत्वं नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
मुलाखत – डॉ.
नयना कासखेडीकर, पुणे.