Friday, 16 October 2020

विचार–पुष्प, भाग –५८

                                     उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५८

ग्रीनएकर ची रिलीजस कॉन्फरन्स

    नव्या सूर्याच्या चैतन्याने विवेकानंद पुन्हा ताजेतवाने झाले. उदात्त जीवनाकडे घेऊन जाणारे विचार व्याख्यानातून ते मांडतच होते. परिचित व्यक्तींच्या आग्रहाखातर त्यांचे वेगवेगळ्या व्यक्तींकडे वास्तव्य होत होते. शिकागोहून ते आता ग्युएर्न्सी यांच्याकडे न्यूयॉर्कला आले. एव्हढ्या या विचारांच्या लढाईत विवेकानंद यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल कुणी काहीही चांगले लिहिलेले कुठे दिसले, तर ते अत्यंत आनंदी होत असत. त्यांच्या वाचनात एक ख्रिस्त धर्मीय व्यासंगी, संस्कृत भाषेचा अभ्यास असलेले डॉ.मोनियर विल्यम्स यांना हिंदू धर्म कसा दिसतो ते वाचायला मिळाले. ते त्यांनी पत्रातून मिसेस हेल यांना कळविले आहे. त्यात म्हटले आहे,

     “हिंदूधर्माचा विशेष असा आहे की त्याला कोणाही परधर्मीयाला आपल्या धर्मात आणण्याची गरज वाटत नाही आणि तसा कोणताही प्रयत्न तो करीत नाही, हिंदू धर्म सर्वांचा स्वीकार करणारा, सर्वांना जवळ घेणारा आणि सर्व आपल्या ठायी सामावून घेण्याइतका व्यापक आहे. सर्व प्रकारच्या मन:प्रवृत्तीच्या माणसांना मानवेल असे काहीतरी देण्यासारखे या हिंदू धर्माजवळ आहे. मानवी मन, त्याचे स्वरूप आणि प्रवृत्ती यामध्ये जी अमर्याद विविधता आढळते तिच्याशी जुळवून घेण्याची तेव्हढीच अमर्याद अशी जी क्षमता आहे ते त्याचे खरे खुरे सामर्थ्य आहे”. विल्यम पुढे म्हणतात, “नेमके बोलायचे झाले तर, स्पिनोझाचा (डच फिलॉसॉफर,जन्म १६३२ मृत्यू १६७७) जन्म होण्याआधी दोन हजार वर्षे हे हिंदू, स्पिनोझाच्या विचारांचे पुरस्कर्ते होते. डार्विनच्या(जन्म १८०९ मृत्यू १८८२, इव्होल्यूशन सिद्धांत मांडला) जन्माआधी अनेक शतके त्याच्या सिद्धांताचा स्वीकार करणारे होते आणि आताच्या आपल्या काळातील हक्सले (बायोलोजिस्ट -जन्म-१८२५ मृत्यू-१८९५) यांचे विचार मान्य करणार्‍यांच्या शेकडो वर्षे आधी हे हिंदू, उत्क्रांतीवादी होऊन गेले होते किंवा त्यांनी तसे केले त्यावेळी उत्क्रांती या शब्दातील अर्थ व्यक्त करणारा शब्द देखील जगातील कोणत्याही भाषेत नव्हता”. असे सगळे वर्णन वाचून विवेकानंद यांना डॉ. मोनियर विल्यम्स यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे कौतुक वाटले. कारण एका प्रज्ञावंताचे ते निरीक्षण होते. हा आनंद झाला म्हणूनच त्यांनी हेल यांना हे पत्र लिहून कळवलं.

                               
    आता विवेकानंद न्यू यॉर्क जवळच्याच फिशिकल येथील हडसन नदीच्या काठावर असलेल्या ग्युएर्न्सी यांच्या निवासस्थानी राहायला आले होते. इथे त्यांना मन:शान्ती मिळाली होती. याच काळात एक दखल घेण्यासारखी घटना घडली. आपले गाव सोडून आपण परक्या शहरात किंवा गावात गेलो असू आणि तिथे कुणी आपल्या गावचे भेटले तर आपल्याला जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. त्याच्या बद्दल आपल्याला आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो. सर्वधर्म परिषदेत विवेकानंद यांना एक नरसिंहाचारी म्हणून भारतीय तरुण भेटला होता. तिथे तो वाईट संगतीत राहून भरकटला होता. अधून मधून तो विवेकानंद यांना भेटत असे आणि काही मदत मागत असे. पण हे सर्व बघून विवेकानंद फार दुखी झाले. त्याला आपल्या देशात- भारतात- परत पाठवणे योग्य आहे असा विचार स्वामीजींनी केला. मग त्यांनी अलसिंगा यांना पत्र लिहून कळवले आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी करायला सांगितली. त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली. तो भारतात सुखरूप पोहोचला, हे सर्व श्रेय विवेकानंद यांचेच. एक भारतीय तरुण परदेशात भुकेला आणि अनाथ राहू नये असे विवेकानंद यांना वाटले होते.

                  

   
विवेकानंद यांची पुढची भेट इंग्लंडला व्हावी असे एकाने सुचविले होते पण जगन्मातेचा आदेश आल्याशिवाय स्वामीजी थोडेच जाणार? पण सर्वत्र व्याख्याने दौरे, संभाषणे चर्चा मुलाखती असे भरपूर होत होते. आता विवेकानंद यांना वाटत होतं की, प्रत्यक्ष काहीतरी काम इथे सुरू व्हायला हवे. न्यूयॉर्क संस्थानात मिस फिलिप्स यांची कुठेतरी रम्य अशी जागा आहे, असे त्यांना कळले होते आणि तिथे आपण हिमालय उभा करू आणि आश्रमाची स्थापना करू असा विचारही त्यांच्या मनात आला होता. मनात असा विषय येणं ही सकारात्मकता निर्माण झाली होती ती मनस्थिती ठीक झाल्यामुळेच .

    याच दरम्यान  ग्रीनएकर इथले एक आमंत्रण मिळाले. एक वेगळ्या प्रकारचा मेळावा आयोजित केला गेला होता. २७ जुलैला  विवेकानंद ग्रीनएकर इथे मेळाव्यासाठी पोहोचले. दोन दिवस आधी मनात जी आश्रमाची कल्पना आली होती तसाच रम्य परिसर इथे योगायोगाने होता. फार्मर यांच्या मालकीची ग्रीन एकर मेन संस्थानात इलीयटजवळ खूप मोठी जमीन होती.  

                      

  
इथे असे नव्या नव्या कल्पना त्यांना पाहायला आणि अनुभवायला मिळत होत्या. सर्व धर्म परिषद असो, कोलंबियन औद्योगिक प्रदर्शन कल्पना असो, आता हा ग्रीनएकरचा मेळावा सुद्धा एक वेगळीच संकल्पना होती. एखादी कल्पना मनात आली की ती प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी आवश्यक कष्ट घेऊन नियोजन करणे हे पाश्चात्यांचं वैशिष्ट्य स्वामीजींना फार फार भावल होतं. सर्वधर्म परिषदेच्या धर्तीवर वर्षभरातच हा मेळावा आयोजित केला होता. ही कल्पना होती मिस सारा जे.फार्मर यांची. सर्व धर्म परिषद ही औपचारिक होती. तिथे व्याख्याने देऊन सर्व जण आपापल्या स्थानी परत गेले होते. पण आता तसे नव्हते. धर्माची निरनिराळी मते असणार्‍या सर्व व्यक्तींनी पंधरा दिवस एकत्र राहावे, कुठलीही कार्यक्रमाची चौकट असू नये. मुक्त संवाद व्हावा, मोकळेपणाने संभाषण व्हावे आणि सर्वांना मुक्त प्रवेश. सारा फार्मर यांची अशी अभिनव कल्पना स्वामीजींना आवडलीच.

     फार्मर यांच्या मालकीची मोठी जागा होती तिथे हिरवेगार शेत, जवळच वाहणारी नदी, सुसज्ज विश्रामगृह, छोटी छोटी स्वतंत्र निवासस्थाने, बाजूलाच पाईन वृक्षाचे जंगल असा शांत आणि निसर्गरम्य परिसर . शिवाय परिसरात तंबू, त्याला नाव होते हॉल ऑफ पीस /शांतिमंदिरउभे केलेले. कोणी कुठेही रहा, इथे कुठलीही मूर्तिपूजा नव्हती फक्त वैचारिक कार्यक्रम होणार होता. परस्परांना समजून घ्यावे, एकमेकांशी बोलावे, सामूहिक चर्चा करावी, गप्पा गोष्टी माराव्यात, इच्छा असेल तर शांत व निवांत बसावे, असा एकूण विषय होता. सतत औपचारिक व्याख्याने देऊन स्वामी विवेकानंद कंटाळले असताना अशी निसर्गात शांत राहण्याची संधी मिळाली म्हणून ते प्रसन्न झाले होते. इथे ग्रीनएकर मध्ये ख्रिस्त धर्मातील विविध पंथाचे प्रतिनिधी, बुद्धिमंत व विचारवंत सहभागी झाले होते.

                     

 
डॉ. एडवर्ड एव्हरेट हेल, मिस जोसेफाईन लॉक, अर्नेस्ट  एफ.फेनोलेसा, फ्रॅंकलिन बी. सॅनबोर्न, मिसेस आर्थर स्मिथ, मिसेस ओली बुल, गायिका मिस एम्मा थर्स्बी, हे उपस्थित होते. रोज सकाळचे प्रमुख भाषण झाले की जो तो आपल्याला हव्या त्या विषयाकडे वळे, वक्ता आणि श्रोता यांच्यात अनौपचारिक नाते असे. पाईन वृक्षाखाली व्याख्याने चालत. विवेकानंद याच्या भोवती खूप जण गोळा होत आणि त्यांचे आध्यात्मिक विचार तन्मयतेने ऐकत असत. इथे श्रोत्यांना वेदान्त विचारांचा लाभ होत असे. सर्व धर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष हिंदू धर्म ते सांगत असत. त्यासाठी ते उपनिषद, भगवतगीता, अवधूतगीता, भतृहरी, संत मीराबाई, शंकराचार्यांचे निर्वाणषटक यातील दाखले देत असत. सर्व श्रोते एकरूप होऊन जात आणि विवेकानंद त्यांच्याकडून चिदानंदरूप: शिवोहम!  शिवोहम!  हे चरण आळवून घेत, हे म्हणत म्हणतच श्रोते आपल्या स्थानी परतत असत. जिथे बसून पाईन वृक्षाखाली विवेकानंद यांनी व्याख्यान दिले होते तो पाईन वृक्ष पुढे विवेकानंद यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. हा ग्रीन एकरचा उपक्रम पुढे काही वर्ष चालू होता. नंतर याच वृक्षाखाली बसून सारदानंद आणि अभेदानंद यांनी तिथे प्रवचन दिले होते.

                            
   ‘हॉल ऑफ पीस मध्ये म्हणजे तंबू मध्ये विवेकानंद यांचे स्वतंत्र व्याख्यान झाले होते. त्याला मिसेस बुल उपस्थित होत्या. विवेकानंद यांनी मुख्य धडा दिला की, “सर्व धर्माच्या प्रेषितांचा आपण मान ठेवला पाहिजे. त्यांच्या शिकवणुकीचा आदरपूर्वक अभ्यास केला पाहिजे, त्या त्या धर्माच्या अनुयायांनी हे जपले पाहिजे की, आपल्या वर्तनामुळे,आपल्या महापुरुषांनी दाखवून दिलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मार्गात कोणतेही किल्मिष मिसळले जाऊ नये. प्रत्येक धर्मातील दोष उणिवा आणि काही ठिकाणी भयानक असलेले भाग आपल्याला आढळतील ते भाग बाजूला ठेवावेत आणि मानवाच्या आत्मिक विकासासाठी पोषक असणारे असे एक ईश्वर, आत्म्याचे अमरत्व, सारे प्रेषित आदरार्ह आणि सारे धर्म विचारात घेण्यासारखे आहेत. या गोष्टींवर भर द्यावा. जसे एखाद्या कुटुंबात प्रत्येकाला कामे वाटून दिलेली असतात, तसेच मानव जातीच्या या कुटुंबात प्रत्येक धर्माकडे काही कामगिरी सोपविली आहे. सर्व मानवांना देण्यासारखा सत्याचा काही अंश प्रत्येक धर्माजवळ आहे त्याचा स्वीकार करा आणि तशी दृष्टी धारण करा. हीच सर्वधर्म समन्वयाची दिशा ठरेल. तिचा खरा उपयोग आहे”. अशी स्पष्ट आणि रेखीव मांडणी विवेकानंद यांनी केली असल्याचा बुल यांनी म्हटलं आहे.

सारा फार्मर यांच्यासमवेत

    ग्रीनएकरला स्वामी विवेकानंद सात-सात, आठ-आठ तास बोलत असत. असे नवे नवे आयाम विवेकानंद यांना कळत जात होते तस तसे त्यांना अमेरिकेतल्या पुढच्या कार्याची दिशा ठरवायला मदत होत होती. अशा प्रकारे ग्रीनएकरचा  कार्यक्रम छान पार पडला. आता विवेकानंद १३ ऑगस्टला ग्रीनएकरहून प्लायमाउथ आले, तिथे फ्री रिलीजस असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमासाठी कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिन्सन यांनी निमंत्रण दिले होते. केव्हढी मानाची गोष्ट होती की, अशा वार्षिक कार्यक्रमांना प्रमुख अतिथि म्हणून स्वामीजींना बोलवले जात होते. एव्हढा लौकिक त्यांना मिळाला होता. रामकृष्ण परमहंस यांनी महासामद्धी घेऊन आता आठ वर्षांचा काळ लोटला होता. त्यांनी सांगितलेल्या कामाच्या शोधात स्वामीजी भारतात फिरल्या नंतर आता ते अमेरिकेत आले होते. त्यांनी इथवरच्या प्रवासात अनेक अनुभव घेतले, अनेक घटना घडल्या, पण त्यांचे अंतर्मन नव्या दिशेचा शोध घेतच होते. ग्रीनएकरचा त्यांचा अनुभव खूप चांगला होता. याचवेळी त्यांना, आपण आपल्या धर्माबद्दल काही लिहावे असे वाटले होते. त्यासाठी  शांतता हवी आणि वेळ सुद्धा. असे त्यांनी अलसिंगा यांना पत्रात म्हटले आहे की, “ ज्या दिवसात व्याख्याने नसतात तेंव्हा हातात लेखणी घ्यावी असे मनात आहे”. हेच त्यांनी मिसेस स्मिथ यांनाही पत्रात कळवले आणि ते सारा बुल यांच्या कानावर गेले आणि त्यांनी विवेकानंद यांना लगेच आपल्या घरी केंब्रिजला बोलावले. त्याप्रमाणे ते ऑक्टोबर मध्ये सारा बुल यांच्याकडे गेले. सारा बुल यांचे घर असलेले केंब्रिज अतिशय शांत, गर्दी नाही असे होते. तिथे त्यांनी विवेकानंद यांना स्वस्थपणे राहता येईल अशी व्यवस्था केली. सारा चॅपमन बुल. कोण होत्या त्या?......  क्रमश:

(यातील सर्व फोटो इंटरनेट वरून साभार)

 © डॉ.नयना कासखेडीकर    

---------------------------------------- 

Monday, 5 October 2020

विचार–पुष्प, भाग –५७

                                               उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५७

                     नवा सूर्य

     गेल्या दिडदोन महिन्यांची काळरात्र संपून, आता नवा सूर्य उगवला होता.एप्रिलमध्ये मद्रास येथे घडलेल्या घटना विवेकानंद यांना कळता कळता दोन महीने लागले. जुलै प्रसन्नता घेऊन उजाडली. विवेकानंद मनातून सुखावले. त्यांच्या मनात एकच सल होती ती म्हणजे, अमेरिकेत परिचय झालेल्या लोकांसमोर आपली वैयक्तिक प्रतिमा खराब करण्याचा झालेला घृणास्पद प्रकार. पण वैयक्तिक पेक्षाही त्याच बरोबर हिंदू धर्माचीही प्रतिमा ? ती पुसून काढली तरच त्यांना आपल्या धर्माबद्दल पुढे काम करता येणार होतं. नाहीतर सुरू केलेलं काम, त्याचं काय भविष्य? आणि उज्ज्वल भारत घडवायच स्वप्न होतं ते ? म्हणून सत्य काय ते सर्वांना कळलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांचे गुरु बंधु ही कामाला लागले होते. विशेषत: अलासिंगा पेरूमल खूप धडपड करत होते.

मद्रासला एका जाहीर सभेचा आयोजन केलं गेलं. पंचायप्पा सभागृह खचाखच भरून गेलं होतं. अध्यक्ष होते दिवाण बहादुर एस सुब्रम्हण्यम अय्यर. राजा सर रामस्वामी मुदलीयार यांनी सूचना केली आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या परिषदेत केलेल्या उज्ज्वल कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला, सी रायचंद्र रावसाहेब यांनी. त्या बरोबरच अमेरिकेतल्या नागरिकांना धन्यवाद देणारा ही ठराव मांडला गेला.रामनद च्या राजेसाहेबांनी अभिनंदनाची तार पाठवली. किती विशेष गोष्ट आहे की, ज्या व्यक्तीसाठी अभिनंदन म्हणून कार्यक्रम करायचा ती इथे प्रत्यक्षात हजर नाही पण तरी एव्हढा मोठा कार्यक्रम? त्याला मोठ्या संख्येने सर्व थरातील लोक उपस्थित राहिले होते. काय होतं हे सगळं? हिंदू धर्माच्या जागरणासाठी विवेकानंद यांनी केलेल्या कामाची ही तर फलनिष्पत्ती होती.

कलकत्त्यात अजून असं काही नियोजन झालं नव्हतं. पण शिकागो च्या सर्वधर्म परिषदेत उपस्थित असलेले धर्मपाल, आलमबझार मठात गेले आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या सर्व कार्याचे व यशाचे वृत्त त्यांच्या गुरु बंधूंना सांगीतले. शिवाय धर्मपाल यांचे कलकत्त्यात, हिंदुधर्म अमेरिकेत आणि स्वामी विवेकानंद या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले गेले. याला अध्यक्ष होते महाराजा बहादुर सर नरेंद्र कृष्ण, याशिवाय जपान मधील बुद्धधर्माचे प्रमुख आचार्य, उटोकी यांचे ही या सभेत भाषण झाले. हा कार्यक्रम मिनर्व्हा चित्रमंदिरात झाला. याला नामवंत लोक उपस्थित होते. हे सर्व वृत्त इंडियन मिरर मध्ये प्रसिद्ध झाले होते,  आपोआपच विवेकानंद यांच्या विरुद्ध प्रचारा ला एक उत्तर दिलं गेलं होतं.सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी संगितले होते की, हिंदुधर्माला बुद्ध धर्माची गरज आहे आणि बुद्ध धर्माला हिंदू धर्माची गरज आहे आणि हे ध्यानात घेऊन दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. हे म्हणणे धर्मपाल यांना पटले होते हे आता सिद्ध झाले होते.

या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांचे वृत्त प्रसिद्ध झालेले ही वृत्त आणि ठरावांच्या संमत झालेल्या प्रती अलासिंगा यांनी अमेरिकेतिल वृत्तपत्रांना पाठवल्या.प्रा.राइट,मिसेस बॅगले  आणि मिसेस हेल यांनाही प्रती पाठवल्या गेल्या, औगस्टच्या बोस्टन इव्हिंनिंग ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये मद्रासला झालेल्या सभेचे वृत्त आले. हे स्वामीजींना कळले. तसेच शिकागो इंटर ओशन यातही गौरवपूर्ण असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. हजारो मैल दूर,  एकट्या असणार्‍या,सनातनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारकांच्या  विरुद्ध लढणार्‍या विवेकानंद यांना हे समजल्यानंतर हायसे वाटले. थोडा शीण हलका झाला. या नेटाने केलेल्या कामाबद्दल त्यांनी अलसिंगा यांचे कौतुक केले.

अलसिंगा पेरूमल 
आणि ..... मग इतर लोकांना पण जाग आली. आता मद्रास नंतर कुंभकोणम, बंगलोर या ठिकाणी सुद्धा अशा सभा झाल्या. मधल्या दोन महिन्यात सारी सामसुम होती. त्यावेळी विवेकानंद यांनी मिसेस हेल यांना पत्र लिहिले आणि विनवणी केली की, “मला आईसारखे समजून घ्या म्हणून, वात्सल्याची विनवणी! माणूस अशा प्रसंगी किती एकाकी पडतो, त्याची मानसिक स्थिति कशी होते, अशा प्रसंगामुळे नैराश्य आणणारी खरी स्थिति होती. अशाच काळात आधार हवा असतो.अशाच मनस्थितीत विवेकानंद मिसेस बॅगले  यांच्या कडे त्यांनी बोलावलं म्हणून अनिस्क्वामला गेले.जवळ जवळ २० दिवस तिथे राहिले. याचवेळी प्रा. राइट पण तिथे होते. योगायोगाने भारतातील वृत्ते पोहोचली ती या दोघांनंही समजली. या आधी जुनागडच्या दिवाण साहेबांनी प्रा. राइट यांना आणि मिसेस हेल यांनाही पत्रे लिहिली होती ती मिळाली होती. त्यात विवेकानंद यांना असलेला भारतीयांचा पाठिंबा लिहिला होता.पाठोपाठ म्हैसूरच्या राजांचेही पत्र आले. हे राइट आणि बॅगले यांना दिसल्यामुळे विवेकानंद समाधानी झाले.

याला उत्तर म्हणून विवेकानंद मन्मथनाथ भट्टाचार्य यांना लिहितात, “अमेरिकेतील स्त्रिया आणि पुरुष, तेथील चालीरीती आणि सामाजिक जीवन याविषयी सांगून, ते म्हणतात, "मद्रासला झालेल्या सभेचा वृत्तान्त देणारे सारे कागदपत्र व्यवस्थित मिळाले. शत्रू आता चूप झाला आहे. असे पहा की, येथील अनेक कुटुंबामधून मी एक अपरिचित तरुण असूनही त्यांच्या घरातील तरुण मुलींच्या बरोबर मला मोकळेपणाने वावरू देतात. आणि माझेच एक देशबांधव असलेले मजुमदार मी एक ठक आहे असे सांगत असताना ते त्याकडे लक्षही देत नाहीत, केव्हढ्या मोठ्या मनाची माणसे आहेत ही. मी शंभर एक जन्म घेतले तरी त्यांच्या या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही.हा उभा देश आता मला ओळखतो. चर्चमधील काही सुशिक्षित धर्मोपाध्याय यांनाही माझे विचार मानवतात. बहुसंख्यांना मान्य होत नाहीत. पण ते स्वाभाविक आहे. माझ्याविरुद्ध गरळ ओकून मजुमदार येथील समाजात त्यांना याआधी असलेली, तीन चतुर्थांश लोकप्रियता गमावून बसले आहेत. माझी जर कोणी निंदा केली, तर येथील सर्व स्त्रिया त्याचा धिक्कार करतात. या पत्राची कोठेही वाच्यता करू नये. तुम्हीही समजू शकाल की, तोंडाने कोणताही शब्द उच्चारताना मला अतिशय सावध राहावयास हवे. माझ्यावर प्रत्येकाचे लक्ष आहे. विशेषता मिशनरी लोकांचे”

“कलकत्त्यामद्धे माझ्या भाषणाचे वृत्त छापले आहे त्यात राजकीय पद्धतीने माझे विचार व्यक्त होतील अशा पद्धतीने सादर केले आहेत. मी राजकरणी नाही आणि चळवळ करणारा कुणी नाही मी चिंता करतो फक्त, भारताच्या आत्म्याची, त्याच्या स्वत्वाची, ती जाग आली की सर्व गोष्टी आपोआप होतील.कलकत्त्यातील मंडळींना सूचना द्यावी की, माझी भाषणे व लेखन यांना खोटेपणाने कोणताही राजकीय अर्थ चिटकवला जाऊ नये. हा सारा मूर्खपणा आहे”. असे त्यांनी अलासिंगना कळवले आहे.

अभेदानंद 
यानंतर सप्टेंबरला कलकत्ता येथे ही विवेकानंद यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारि प्रचंड सभा झाली. यासाठी अभेदानंद यांनी घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते.अपार कष्ट घेतले. सर्व थरातील चार हजार नागरिक याला उपस्थित होते .राष्ट्रीय पातळीवरील विवेकानंदांच्या गौरवाचा हा कार्यक्रम होता. अध्यक्ष होते, पियारी मोहन मुखर्जी . कळकतत्यातील थोर व नामवंत व्यक्ति. दुसरे होते कळकतत्यातील नामवंत संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य माहेश्चंद्र न्यायरत्न . याची दखल इंडियन मिरर ने खूप छान घेतली .यात अभिनंदांनचे ठराव तर होतेच, पण कलकत्त्याच्या नागरिकांनी विवेकानंद यांना लिहिलेली पत्रे होती. कलकत्ता ही विवेकानंद यांची जन्मभूमी होती त्यामुळे या घटनेला खूप महत्व होतच .शिवाय असत्य प्रचार केलेल्या प्रतापचंद्र मजुमदार यांचीही कर्मभूमि होती. ब्राह्मसमाजाचे धर्मपीठ पण कलकत्ताच होते. हे वृत्त विवेकानंद यांच्या हातात पडले आणि ते कृतकृत्य झाले बस्स.... जगन्मातेचा विजय झाला होता.आपलीम मातृभूमी आपल्या पाठीशी उभी आहे अशा पूर्ण विश्वासाने स्वामी विवेकानंद यांच्या डोळ्यातून, हेल भगिनींना हे कळवताना अश्रूंचा पूर लोटला होता. मनस्ताप आणि निराशा काळाच्या पडद्याआड गेलं आणि नव्या चैतन्याने. उत्साहाने विवेकानंद ताजेतवाने झाले पुढच्या कार्याला लागायचे होते ना? गुरुबंधूंना ते म्हणतात, “तुम्ही सारे कंबर कसून जर माझ्याभोवती उभे राहिलात तर, सारे जग जारी एकत्र आले तरी आपल्याला त्याचे भय मानण्याचे कारण नाही”. असा यानंतर उगवलेला नवा सूर्य त्यांना आत्मविश्वास देत होता. 

               

                                   

© डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

Saturday, 3 October 2020

विचार–पुष्प, भाग –५६

                                          उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५६ 

आपलेच झाले परके


      अमेरिकेत मत्सराचा अग्नी कसा भडकला होता ते आपण पाहिले. जे लोक जागतिक स्तरावर सर्व धर्म भेद ओलांडण्याचा विचार मांडत होते ते यात सहभागी होते हे दुर्दैवच म्हणायचे. भारतात सुद्धा त्याची री...ओढत हिंदू धर्म कसा संकुचित व बुरसटलेला आहे, हे ओरडून सांगितले जात होते. पण स्वामी विवेकानंद मात्र हिंदू धर्मातील प्राचीन ऋषींचे उदात्त विचार परदेशात समजावून देत होते. त्यात कुठल्या धर्माची सीमा आडवी येत नव्हती. वा देशाची नाही. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आज पण आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

भारतात प्रसिद्ध झालेले विवेकानंद यांच्या विरोधातले लेख अमेरिकेत पुन्हा प्रसिद्ध केले जात. हे लेख तिथल्या ‘लॉरेन्स अमेरिकन’, ‘आऊटलुक’ आणि ‘डेट्रॉईट फ्री प्रेस’ मध्ये छापून आल्याने सगळ्या लोकांना वाचायला मिळत असत. या विषारी प्रचारामुळे लोक दुरावत चालले होते. परिषदेवेळी मित्र झालेले डॉ.बॅरोज बोलेनसे झाले. एव्हढा सतत प्रचार वाचून प्रा. राईट सुद्धा थोडे साशंक झाले. हे बघून विवेकानंद अस्वस्थ झाले. होणारच ना. कलकत्त्यात इंडियन मिरर या वृत्तपत्रात याचा प्रतिवाद होत असायचा. यात विवेकानंद यांच्या कार्याचे वर्णन, परिषदेची माहिती, चर्चा, त्यांनी मिळवलेले यश हे सर्व छापून येत होतं. माध्यमे कसं जनमत घडवतात याचं हे उत्तम ऊदाहरण आहे. म्हटलं तर चांगल्या कामासाठी माध्यमांचा खूप चांगला उपयोग आहे पण वाईट कामांना किंवा विघातक कामाला प्रसिद्धी देऊन खतपाणी घालणे हे समाजाला अत्यंत घातक आहे. पण भारतात. जगातल्या प्रसिद्धी माध्यमांची ओळख भारतीय लोकांना नव्हती. त्यामुळे इथे आलेली वृत्त अमेरिकेतल्या लोकांनाही अधिकृतरीत्या कळावित असे कोणाच्या लक्षात आले नाही. कलकत्त्यात ‘इंडियन मिरर’ मध्ये १० एप्रिल १८९४ या दिवशीच्या अग्रलेखात विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते.ते असे होते, “अमेरिकेला जाऊन हिंदू धर्माचा एक प्रवक्ता म्हणून विवेकानंदांनी जे नेत्रदीपक यश मिळवले आहे, त्याबद्दल त्यांना एक सन्मानपत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. ज्यांनी सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले त्या अमेरिकन लोकांचेही आपण कृतज्ञ असावयास हवे. कारण त्यांनी त्या परिषदेच्या निमित्ताने विवेकानंदांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळे, त्यांना आपले पुढील कार्य करण्यासाठी पाया भरता आला”. विवेकानंद यांना जे अपेक्षित होते तेचं यात म्हटले होते, पण हा मजकूर त्यांच्या हातात नव्हता. तसाच मधेच बोस्टन मध्ये भारतातील आलेला मजकूर छापला होता ते कात्रण मिसेस बॅगले यांनी विवेकानंद यांना पाठवले. त्याबरोबर बोटभर चिठ्ठी सुद्धा नव्हती यावरून त्यांची गंभीरता लक्षात आली. उत्तम परीचय झालेली ही मोठ्या मनाची लोकं, त्या क्षणी अशी वागली याचे स्वामीजींना किती दु:ख झाले असेल.

आता हे सारं त्यांना असह्य होत होतं. शेवटी त्यांनी एक मार्ग निवडला आणि त्याबद्दल मद्रासला आलसिंगा आणि कलकत्त्याला गुरुबंधूंना पत्र पाठवले. त्यात लिहिले होते, मद्रास व कलकत्त्यात दोन सार्वजनिक सभा घ्याव्यात, त्यात नामवंतांचा सहभाग असावा. त्यांची विवेकानंद यांच्या कार्याची पावती देणारी प्रातिनिधिक भाषणे व्हावीत, अभिनंदन करणारा ठराव संमत करावा, आणि अमेरिकेतील लोकांना धन्यवाद देणारा दूसरा ठराव असावा. या सभांचे वृत्त भारतीय वृत्त पत्रात प्रसिद्ध व्हावे. आणि त्यांच्या प्रती इथे अमेरिकेत डॉ बॅरोज आणि प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक यांना पाठवावीत अशी विनंतीपर पत्र पाठवली.

स्वत:ची प्रसिद्धी हा भाग यात नव्हता. पण हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जी लोकं त्यांच्या बरोबर आदराने उभी होती, मदत करत होती त्यांच्या मनातून संदेह निर्माण झाला तर, केलेल्या कामावर पाणी च फिरणार ही भीती होती. कारण हिंदू धर्माची ध्वजा एका चारित्र्यहीन माणसाने हातात घेतली आहे असे चित्र तिथे रंगविले जात होते. हा ध्वजाचा अपमान होता. मिशनर्‍यांचा काही भरवसा राहिला नव्हता. काय करतील ते सांगता येत नाही अशी परिस्थिति उद्भवली होती.

डेट्रॉईट मध्ये आयोजित एका भोजन समारंभात घडलेला प्रसंग. यावेळी विवेकानंद यांनी कॉफीचा पेला उचलला तर त्यांना आपल्या शेजारी एकदम श्रीरामकृष्ण उभे असल्याचे दिसले, ते म्हणत होते, “ ती कॉफी घेऊ नकोस, त्यात विष आहे. विवेकानंदांनी एक शब्दही न बोलता तो कॉफीचा पेला खाली ठेवला. अशी आठवण गुरुबंधुनी सांगितली आहे. यावरून केव्हढी गंभीर परिस्थिति तिथे झाली होती याची कल्पना येते. एका सर्वसंग परित्यागी संन्याशाला स्वत:च्या अभिनंदनाचे ठराव करून अमेरिकेत पाठवावेत असे स्वत:च लिहावे लागले होते. यामुळे त्यांच्या मनाची काय अवस्था व किती घालमेल झाली असेल ?

त्यांनी जुनागड चे दिवाण साहेब, खेतडी चे राजे, यांनाही पत्र लिहिली. मेरी हेल यांनाही पत्र लिहून आपल मन मोकळं केलं. सर्वधर्म परिषदेचं महाद्वार ज्यांनी आपल्यासाठी उघडलं होतं त्या प्रा. राईट यांच्या मनात तरी आपल्याबद्दल संशयाची सुई राहू नये असे विवेकानंद यांना वाटत होते. ती दूर करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे असेही त्यांना वाटले म्हणून त्यांनी तसे पत्र राईट यांनाही लिहिले. ते लिहितात, “ मी धर्माचा प्रचारक कधीही नव्हतो, आणि होऊ ही शकणार नाही. माझी जागा हिमालयात आहे, माझ्या मनाला एक समाधान आहे की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी परमेश्वराला म्हणू शकतो की, हे भगवन, माझ्या बांधवांची भयानक दैन्यवस्था मी पहिली, ती दूर करण्यासाठी मी मार्ग शोधला, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी पराकाष्ठेचा प्रयत्न केला. पण माला यश आले नाही. तेंव्हा तुझी इच्छा असेल तसे होवो”. तर मिसेस हेल यांना विवेकानंद लिहितात. “या सार्वजनिक जीवनाला आपण कंटाळून गेलो आहोत. माताजी तुमच्या सहानुभूतीचा मला लाभ होईल? शेकडो बंधनांच्या ओझ्याखाली माझे हृदय आक्रंदत आहे”.

दरम्यान विवेकानंद यांच्या हातात जुनागड चे हरिभाई देसाई आणि खेतडीचे अजित सिंग यांची पत्रे आली. लगेच ती प्रा. राईट यांना पाठवली.

अगदी एकाकी पडले होते ते. महिनाखेरीस विवेकानंद हेल यांच्या कडे आले. या सर्व घटनांनी ते अतिशय थकून गेले होते. शरीराने नाही तर मनाने. याचवेळी हेल यांना एक अनामिक पत्र आले की, विवेकानंद यांना तुमच्या घरी ठेऊन घेऊ नका म्हणून, हा एक खोटा आणि चारित्र्यहीन माणूस आहे. हेल यांनी हे पत्र घेतले आणि फाडून ,तुकडे करून पेटत्या शेगडीत टाकले.

प्रतापचंद्र यांची मजल तर पुढे गेली होती. त्यांनी श्री रामकृष्ण यांच्यावरही प्रतिकूल शब्दात टीका करण्याचे सोडले नव्हते. वास्तविक त्यांनी नरेंद्रला या आधी पहिले होते, रामकृष्ण यांच्यावर तर श्रेष्ठत्व सांगणारा सुंदर लेख लिहिला होता. एकदा संध्याकाळी मेळाव्यात प्रतापचंद्र बोलत असताना श्रीराम कृष्ण आणि विवेकानंद यांच्याबद्दल निंदा करणारे काही बोलले.

हे दीड दोन महीने जणू काळ रात्रच होती स्वामीजींसाठी. पण ती आता संपत आली होती. नवा सूर्य उगवणार होता आणि मनातल्या व्यथा नाहीशा होऊन क्षितिजावर प्रसन्नता प्रकाशमान होणार होती.

© डॉ.नयना कासखेडीकर

----------------------------------------

Wednesday, 30 September 2020

विचार–पुष्प, भाग –५५

 उत्तरार्ध

   स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५५
                               मार्था ब्राऊन फिंके

    शिकागो मध्ये मत्सराग्नि भडकलेला होता. मिशनरी तर विरोधात गेले होतेच पण बोस्टनला जेंव्हा स्वामीजी महाविद्यालयात व्याख्यान द्यायला गेले होते त्यावेळी च्या व्याख्यानाने विद्यार्थी भारावून गेले होते. इतके की,त्या दोन दिवसांच्या भेटीमुळे म्हणा किंवा स्वामींच्या दर्शनाने वा ऐकलेल्या विचाराने म्हणा, भविष्यात काहींचे जीवनच प्रभावित झाले होते. त्यातालीच एक विद्यार्थिनी होती, मार्था ब्राऊन फिंके. त्या दोन दिवसांच्या आठवणीवर मार्था तिचे आयुष्य बदलवू शकली. 

मार्था ब्राऊन फिंके 
मार्था ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती ते स्मिथ कॉलेज म्हणून ओळखलं जात होतं.स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी १८७५ मध्ये सोफाया स्मिथ यांनी हे महाविद्यालय स्थापन केले होते. हे कॉलेज एक वैचारिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. न्यू यॉर्क आणि बॉस्टन च्या बरोबर मध्यावर नॉर्थअॅम्प्टन हे मॅसॅच्युसेटस राज्यातले टुमदार गाव होतं. त्या गावात हे कॉलेज होतं. मार्थाचं घर थोडं जुन्या वळणाचं होतं. जुन्या संस्काराच होतं. प्रोटेस्टंट ख्रिश्चन होते ते. त्यामुळे कॉलेजला बाहेर पाठवताना तिच्या आईवडिलांना तिची काळजी वाटत होती.बाहेर पडलेल्या मुली मुक्त विचारांच्या होतात असा सर्वांचा समज होता. कॉलेजला गेलेल्या मुली धर्म वगैरे मानत नाहीत असा अनुभव काहींचा होता.तिथे वसतिगृहात मुली राहत असत. वसतिगृहात जागा शिल्लक नसल्याने मार्था कॉलेज परिसरातच भाड्याने राहत होती.

स्मिथ कॉलेज

ज्यांच्या घरात राहत होती ती घरमालकिण स्वभावाने कडक होती. पण चांगली होती. त्या कॉलेजमध्ये अधून मधून विचारवंत भेटी देत असत. असेच एकदा स्वामी विवेकानंद यांची नोहेंबर मध्ये दोन व्याख्याने असल्याचे तिथल्या सूचना फलकावर लिहिले होते. ते एक हिंदू साधू आहेत एव्हढेच त्यांच्या बद्दल आम्हाला माहिती होते असे मार्थाने तिच्या आठवणीत म्हटले आहे.ते एव्हढे मोठे आहेत हे माहिती नव्हते. त्यांची सर्व धर्म परिषदेतील किर्ति यांच्या पर्यन्त पोहोचलेलीही नव्हती.पण कुठून तरी कानावर आल की हे हिंदू साधू, मार्था राहत असलेल्या घरमालकिणी कडेच उतरणार आहेत आणि त्यांच्या बरोबर या मुलींचे जेवण पण असणार आहे. त्यांच्या बरोबर आम्ही मुली चर्चा पण करू शकणार होतो याचे तिला फार अप्रूप वाटले होते.त्यामुळे सर्वजणी घरमालकिणीवर जाम खुश होत्या. त्यांनी आपल्या या मालकिणीला उदार मतवादी म्हटले आहे कारण आपल्याकडे एका काळ्या माणसाची राहण्याची सोय करायची म्हणजे त्याला काळी हिम्मतच असावी लागते असे त्यांना वाटत होते.बहुतेक गावातील हॉटेलांनी त्यांना प्रवेश नाकारला असेल असेही त्यांना वाटलं.

    मार्था म्हणते, आम्ही लहानपणापासूनच भारताचे नाव ऐकतं होतो कारण माझी आईसुद्धा हिंदुस्थानात जाणार्‍या मिशनर्‍याशी लग्न करणार होती.आमच्या चर्चमधून दरवर्षी भारतीय स्त्रियांसाठी मदतीची एक भली मोठी पेटी पाठवली जात असे. शिवाय त्यान काळात भारतबद्दल इतर माहिती अशी होती की, भारत हा एक उष्ण देश आहे. तिथे सगळीकडे साप फिरत असतात. तिथले लोक इतके अडाणी आहेत की, दगडा समोर किंवा लाकडासमोर डोके टेकवतात. बापरे!  मार्थाचे वाचन चांगले होते तरी सुद्धा तिला भारता बद्दल फारशी माहिती नव्हती. ख्रिश्चन धर्मियांच्या दृष्टीकोणातून लिहिलेली भारताबद्दलची माहिती फक्त तिला माहिती होती. एखादा भारतीय भेटून त्याच्याशी बोलायला कधी संधी नव्हती मिळाली.

                                    

त्यामुळे मार्था च्या घरमालकिण बाईंकडे विवेकानंद हे हिंदू साधू उतरणार तो दिवस आला. त्या दिवशी पाहिलेले स्वामी विवेकानंद कसे होते याचं तिने वर्णन केलय की, ते उतरणार ती खोली तयार करण्यात आली. भारदस्त व्यक्तिमत्व,एक कला प्रिन्स अल्बर्ट कोट,काळी पॅंट ,डोक्यावर डौलदार फेटा घातलेला, अलौकिक चेहर्‍याचा, डोळ्यात विलक्षण चमक असलेला,असा हिंदू साधू ! घरी आल्यावर सर्व जणी भारावून गेल्या. मार्था म्हणते, मला तर तोंडून काही शब्दच फुटत नव्हते. इतकी भक्तिभावाने ती हे व्यक्तिमत्व बघत होती. संध्याकाळी व्याख्यान झाले त्यानंतर प्रश्नोत्तरे.

 घरी त्यांना भेटायाला तत्वज्ञानाची  प्राध्यापक मंडळी, चर्चचे धर्माधिकारी, प्रसिद्ध लेखक, आले होते. चर्चा सुरू होती. सर्व मुली एका कोपर्‍यात बसून ऐकत होत्या. विषय होता, ख्रिश्चन धर्म - खरा धर्म. हा विषय स्वामीजींनी नव्हता निवडला, आलेल्या विचारवंत मंडळींनी निवडला होता. ते सर्व स्वामीजींना आव्हान देत होते. त्यांच्या त्यांच्या धर्माची माहिती असलेले मर्मज्ञ विषय मांडित. मार्थाला वाटले होते की स्वामीजी तर हिंदू त्यांना काय इकडचे कळणार व त्यावर कसे तोंड देणार? पण उलटेच झाले होते. स्वामी विवेकानंद आपली बाजू मांडताना, प्रती उत्तर देताना बायबल, इंग्रजी तत्वज्ञान, धर्मज्ञान, वर्डस्वर्थ, व थॉमस ग्रे यांचे  काव्य संदर्भ देऊन बोलत होते. ठामपणे बोलत होते. स्वामीजींनी त्यांच्या बोलण्यातून धर्माच्या कक्षा अशा रुंद केल्या की त्यात सर्व मानवजात सामील झाली आणि वातावरण बदलून गेले. मुक्त विचारांनी  दिवाणखान्यातील वातावरण भारावून गेले.या हिंदू साधुनेच बाजी मारली. त्यामुळे मी पण उल्हसित झाले असे मार्था ने लिहून ठेवले आहे. मार्था म्हणते आमच्या कॉलेज मधली मंडळी धर्माच्या बाबतीत फार संकुचित विचारांची होती. स्वतालाच ती शहाणी समजत. या बौद्धिक पातळीवरील चर्चेत स्वामीजींचा झालेला विजय मार्था च्या कायम लक्षात राहिला होता.

मार्थाने आणखी एक विशेष आठवण सांगितली आहे. तिथल्या वास्तव्यात दुसर्‍या दिवशी सकाळी, बाथरूममधून पाण्याचा आवाज व त्याबरोबर अनोळखी भाषेतले स्तोत्रपठण ऐकू येत होते. ते ऐकण्यासाठी सर्व मुली घोळक्याने दाराबाहेर उभ्या राहिल्या. एकत्र ब्रेकफास्ट च्या वेळी मुलींनी या स्तोत्राचा अर्थ स्वामीजींना विचारला.त्यांनी उत्तर दिलं, “प्रथम मी डोक्यावर पाणी ओततो . नंतर अंगाखांद्यावर. प्रत्येक वेळी सर्व प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून मी ते स्तोत्र म्हणतो”. हे ऐकून मार्था आणि मुली भारावून गेल्या. मार्था म्हणते, “मीही प्रार्थना करत असे पण ती स्वतसाठी आणि नंतर कुटुंबासाठी. समस्त मानवजातीसाठी व प्राणिमात्रासाठी आपलेच कुटुंब आहे असे समजून प्रार्थना करावी असे कधीच मनात आले नव्हते आमच्या”. 

ब्रेक फास्ट नंतर स्वामीजी म्हणाले चला बाहेर फिरून येऊन थोडं, म्हणून आम्ही चार मुली त्यांच्या बरोबर गेलो . गप्पा मारत चाललो होतो, मला एव्हढेच आठवते की, 'ख्रिस्ताचे रक्त' हा शब्दप्रयोग वारंवार केला जातो. हे शब्द मला कसेचेच वाटतात असे ते म्हणाले होते.यावर मीही विचार करू लागले. मलाही हे उल्लेख आवडत नव्हते. पण चर्चच्या तत्वांच्या विरुद्ध उघडपणे बोलायचे धैर्य हवे. पण इथेच माझ्यातील स्वच्छंद आत्म्याने, मुक्त चिंतांनाचा स्त्रोत त्या क्षणी खुला केला आणि मी कायमची मुक्तचिंतक झाले. विषय बदलून मी त्यांना वेदांबद्दल विचारले कारण त्यांनी आपल्या भाषणात वेदांचा उल्लेख केला होता. मी वेद मुळातून वाचावेत असे त्यांनी मला सांगितले. मी त्याच क्षणी संस्कृत शिकण्याचे ठरविले .पण ते शक्य झाले नाही पुढे.

यावरून एक गोष्ट गमतीची आठवली. उन्हाळ्यात आमच्याकडे नवीन गुर्नसी पारडू पाळीव प्राण्यांमध्ये समाविष्ट झाले. माझ्या वडिलांनी तो माझ्याकडे सोपविला. त्याचे नाव मी वेद ठेवले. दुर्दैवाने ते वासरू लवकरच मेले. माझे वडील गमतीने म्हणाले की तू त्याचे नाव वेद ठेवले म्हणूनच ते गेले.

नंतर स्वामीजी परत एकदा अमेरिकेत येऊन गेले, ते कळले नाही. मग काहीच संबंध नाही आला. पण त्या दोन दिवसात स्वामीजींच्या विचाराने मार्था चे जीवनच उजळून गेले असे ती म्हणते. तिने वडिलांना पत्र लिहून हा वृत्तान्त कळवला तर ते घाबरून गेले. आपल्या घराण्याचा धर्म सोडून ही स्वामीजींबरोबर त्यांची शिष्या होऊन निघून जाते की काय अशी त्यांना भीती वाटली .

बेलुर मठ

   मार्था ने तिचे हे स्वतंत्र विचार तिच्यापुरतेच मर्यादित ठेवले. तिच्या मते, 'मी लगेच हे अमलात आणले असते तर, जीवनात मला लगेच त्याचा उपयोग झाला असता. खूप वेळ वाया गेला'. पण ती निराश नाही झाली. आतापर्यंत जरी चाचपडली असली तरी विचार पेरले गेले आहेत ते उगवणारच असा तिला विश्वास होता.  स्वामीजींनी सांगितलेला वैश्विक धर्म तिच्या अंतकरणात जाऊन बसला होता. ती १९३५ मध्ये जवळ जवळ ४२ वर्षानी, भारतात पहिल्यांदा कलकत्त्यात आली तेंव्हा, प्रथम ती एक प्रवासी म्हणून तिचा प्रवास सुरू झाला तर भारतात पोहोचल्यावर गंगेच्या काठावरील बेलुर मठात स्वामी विवेकानंदांच्या पवित्र स्मृतीचे, समाधीचे दर्शन घेतल्यावर आपण एक विश्वधर्माचे यात्रेकरू आहोत याची मनोमन खात्री झाली. तिथेच आत्मिक आणि मानसिक उन्नतीची ओढ असणार्‍या मार्था ने या आठवणी सगळ्यांच्या आग्रहाखातर सांगितल्या आहेत.मार्था जर दोन दिवसांच्या विचाराने एव्हढी प्रभावित झाली असेल तर आपल्याकडे हे तत्वज्ञान बारा महीने चोवीस तास उपलब्ध आहे विचार करण्याची गोष्ट आहे .  

  © डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

Friday, 25 September 2020

विचार–पुष्प, भाग –५४

                                                                 उत्तरार्ध

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५४

                                 मत्सराचा अग्नी

   हुश्श! स्वामी विवेकानंद यांचा स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरोशी केलेला व्याख्यानांचा करार आता संपला होता. तरीही त्यांची व्याख्याने सतत होत होती आणि अनेकजण त्यांच्या विचारांकडे आकृष्ट होत होते. ही संख्या वाढतच होती. त्यामुळे यातून आपले खरे अंतरंगशिष्य त्यांना शोधायचे होते. तिथल्या सामाजिक कामाची पाहणी केल्यावर त्यांना आपल्या कामासाठी संघटना किंवा संस्था उभी करावी हे मनोमन पटले होतेच. असे त्यांनी एकदा मिसेस लायन यांना बोलूनही दाखवले होते. म्हणजेच त्यांच्या मनात अशी संघटना कोणाची करायची? त्याचे उद्दिष्ट्य काय असेल? कार्यपद्धती कशी असेल याचे विचारमंथन सुरू होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, शब्दात आणि मनात देशभक्तीच होती. त्यांचे ध्येय फार मोठे होते. त्यांना भारताचे पुनरुत्थान घडवायचे होते. हे घडवून आणण्यासाठी आत्म्याला जाग आणणे महत्वाचे होतेती जाग आणण्यासाठीचे अध्यात्म ज्ञान आवश्यक आणि त्यांच्या दृष्टीने हे अध्यात्म ज्ञान फक्त भारतच सार्‍या जगाला देऊ शकत होता. म्हणून ही जाग सर्वांमध्ये निर्माण करणे हेच स्वामीजींचे ध्येय होते.

  तिथे अमेरिकेत त्यांच्या व्याख्यानांशिवाय असे काही प्रसंगही घडत होते, घटना घडत होत्या .एकदा घडलेली घटना आहे. अमेरिकेत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्या तुलनेत स्वामीजी कृष्णवर्णीय वाटत असत. एका गावात ते स्थानकावर उतरले आणि त्यावेळी काही समिति सदस्य त्यांना घ्यायला आले होते. हे तिथल्या एका निग्रोने पाहिले. त्याच्या दृष्टीने हा माणूस आपल्यापैकी एक कृष्णवर्णीयच होता.मग आपल्या पैकी एका बांधवाचा गौरवर्णीय लोक एव्हढा आदर करताहेत हे पाहून तो मोहरून गेला. तो खर तर एक हमाल होता. तो स्वामीजींजवळ येऊन म्हणाला, “मला तुमच्याशी हस्तांदोलन करण्याची ईच्छा आहे. मी भारतीय आहे असे काहीही न सांगता स्वामीजींनी त्याचा हात प्रेमभराने हातात घेतला आणि त्याला म्हणाले, “ धन्यवाद माझे बंधो, धन्यवाद! तो निग्रो खूप भारावून गेला होता.  स्वत:चे देशबांधव प्रेम आणि अखिल मानवजातीचे वाटणारे प्रेम एकाच ठिकाणी ? तर या उलट काही ठिकाणी स्वामीजींना निग्रो समजून केशकर्तनालयात बाहेर काढून अपमान केल्याचाही प्रसंग घडला.

                                   
  अमेरिकेत आता स्वामीजींना न्यूयॉर्क मध्ये जाण्याचे आमंत्रण मिळाले होते. तत्वज्ञानाच्या अभ्यासात गोडी असणार्‍या काही जणांचा हा गट होता, त्यांनी बोलवले होते.त्यात डॉ.एगबर्ट ग्युएर्न्सि,मिसेस स्मिथ,मिस हेलन गौल्ड हे लोक  होते, ग्युएर्न्सि यांच्या कडे स्वामीजी राहायला होते. हेल आणि बॅगले यांच्या प्रमाणेच ग्युएर्न्सि पतिपत्नी यांचे स्वामीजींशी घरगुती संबंध तयार झाले.ग्युएर्न्सि व्यवसायाने डॉक्टर होते. लेखक, नियतकालिकाचे संपादक होते. ब्रुकलीन डेली टाईम्स आणि न्यू यॉर्क मेडिकल न्यूज टाईम्स याचे संस्थापक पण होते. वय एक्काहत्तर ,विवेकानंदां च्याच वयाचा त्यांचा तरुण मुलगा नुकताच स्वर्गवासी झालेला. त्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हतेच,मिस गौल्ड सुद्धा अफाट श्रीमंत होत्या त्यांच्याकडेही स्वामीजी राहण्यास गेले. अशा या न्यूयॉर्कच्या मुक्कामात त्यांचा अनेक मोठमोठ्या लोकांशी सबंध येत होता. बोलवले की जात, व्याख्याने देत, भेटत, चर्चा करत. शिवाय तिथल्या महत्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. सहा-सात दिवस भुररर्कन निघून गेले, 

बोस्टन कॉलेज 
  आता ते बोस्टनला आले होते. तिथे अठवडाभरात महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समोर विचार व्यक्त केले, त्यावेळी मार्था ब्राऊन फिंके महाविद्यालयात शिकत होती. तिथे पहिल्यांदा विवेकानंद यांना तिने पाहिले. विचार समजण्याचे वय नव्हते पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव आपल्यावर पडला असे तिने आठवणीत लिहून ठेवले आहे. एव्हढे श्रेष्ठ असूनही ते आम्हा विद्यार्थ्यात मिळून मिसळून वागले हे तिला विशेष वाटले होते. पुन्हा न्यूयॉर्क, परत बोस्टन व जवळपास फिरणे चालू होते.

मार्था ब्राऊन फिंके 
प्रा राइट यांच्या निमंत्रणावरून स्वामीजी बोस्टनला पुन्हा आले होते. हार्वर्ड आणि बोस्टन इथे त्यांची व्याख्याने झाली होती. इथे बोस्टनला मिसेस ओली बुल यांची पहिली भेट झाली होती. ज्या पुढील कार्यात सहभागी झाल्या आहेत.तसेच इथे त्यांना कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिनसन्स जे सर्वधर्म परिषदेत पण भेटले होते ते भेटले. विमेन्स क्लब मध्ये मिसेस ज्युलिया वॉर्ड होवे यांनी स्वामीजींचे व्याख्यान ठेवले होते. त्याही भेटल्या. असे दौरे चालू होते॰ स्वामीजी फार थकून गेले. नंतर हेल यांच्या कडे ते विश्रांतीसाठी थांबले.

सारा बुल
कर्नल हिगिनसन्स 

 इझाबेला मॅककिंडले हिने स्वामीजींना भारतातून आलेला सर्व पत्रव्यवहार पाठवला. यात होती भारतात झालेली वृत्तपत्रीय प्रसिद्धीची कात्रणे .काहींमध्ये अमेरिकेतला गौरव होता. ते ठीक होते , पण भारतात आपल्याबद्दल जो विरोधी प्रचार चालला होता त्याचीही कात्रणे त्यात होती.ती वाचून स्वामी विवेकानंद यांना फार फार वाईट वाटले. त्यांनी इझाबेलाला कळवले की, “माझ्याविषयी माझ्याच देशातील लोक काय म्हणतील याची मी फार फिकीर करीत नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की, माझी आई वृद्ध आहे, सार्‍या आयुष्यभर तिने कष्ट उपसले आहेत.असे सारे असूनही जिच्या सार्‍या अशा ज्याच्यावर केन्द्रित झाल्या होत्या असा आपला मुलगा ईश्वराच्या आणि मानवाच्या सेवेसाठी देऊन टाकण्याचा भार तिने सहन केला. पण मजूमदार कलकत्त्यात सर्वत्र सांगत आहेत, त्याप्रमाणे दूर परदेशात कोठेतरी गेलेला हा आपला मुलगा तेथे पशुसारखे जीवन घालवत आहे ,अनीतिमान झाला आहे, हे जर का तिच्या कानावर गेलं,तर त्या धक्क्याने ती प्राण सोडेल, पण परमेश्वर दयाघन आहे. त्याच्या मुलांना कोणीही अपाय करू शकत नाही”. हे प्रतापचंद्र मजूमदार यांचे कलकत्त्यातले प्रताप वाचून स्वामीजी, आईच्या आठवणीने बेचैन झाले. खरे तर ते स्वत: शांतपणे या सर्वांना अजूनही तोंड देत होते.

 प्रतापचंद्र मजुमदार कलकत्त्यात आपल्याबद्दल एव्हढे भयानक सांगत आहेत. या वृत्तपत्राचे संपादक मजुमदारांचा चुलत भाऊ आहे. ज्याने याआधी आपले एव्हढे कौतुक केले ते आता?

याचा पहिला धक्का स्वामीजींना परिषदेच्या वेळी बसला होताच. ज्या प्रतापचंद्र मजुमदारांनी ब्राहमो समाजात उपासना संगीत गाणारा नरेंद्र पाहिला होता ,एव्हढ्या लांबच्या देशात त्यांना नरेंद्र पुन्हा भेटल्यानंतर आपल्याला जणू घरातले वडीलधारी भेटल्याचा आनंद नरेंद्रला झाला होता. पण घडलं होतं उलटच . पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते नरेंद्रशी अगत्याने बोलले होते. पण जेंव्हा सर्व माणसे प्रचंड संख्येने नरेंद्र भोवती गोळा होऊ लागली, तसतसे मजुमदार यांना मत्सर वाटू लागलापरिषदेतल्या मिशनर्‍यांजवळ त्यांनी स्वामीजींची निंदा करणं सुरू केलं. नरेंद्र हा तसा कोणीच नाही तो एक लुच्चा आणि ठक आहे, येथे येऊन संन्यासी असल्याचे ढोंग करीत आहे. असे सांगून त्यांची मने कलुषित केली. त्यात ते यशस्वी झाले. या सगळ्यावर मात करून स्वामीजी पुढे निघून गेले होते.

 विवेकानंद यांचे विचार, त्यांचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व यामुळे तिथले सगळेजण भारले गेले होते, तसे , मत्सराची दुसरी वाईट बाजुही त्याला होती. विरुद्ध प्रचार. आता मात्र विवेकानंद यांनी या वृत्तपत्रांकडे लक्षच द्यायचे नाही असे ठरवले होते.काहीही छापून आल तर ते मनावर घेत नसत. त्यातून आता भारतात सुद्धा हा अपप्रचार चालू आहे आणि हे सर्व प्रतापचंद्र करीत आहेत हे कळल्यापासून तर त्यांना खरे विश्वासच बसत नव्हता. प्रतापचंद्र या पातळीला जातील हे स्वप्नातही वाटले नाही. खेतडी चे राजेसाहेब आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून आपण निश्चिंत पणे इथे आलो. पण आता? आपण दूर्वर्तनी आहोत, शिलभ्रष्ट आहोत असे प्रतापचंद्र सर्वत्र सांगत आहेत. हे ऐकून आपल्या आईला काय वाटेल? ही वेदना त्यांना सतावत होती.

मत्सर भावनेतून चक्क चारित्र्य हनन सुरू होते. सुरूवातीला फक्त विरोध! मग विरोधाचे तीव्र स्वरूप, मग प्रचार! आणि स्वामीजींची किर्ति जशीजशी वाढली तशी विरोधासाठी पद्धतशीर मोहिमच सुरू झाली होती. मग सुरू झाला छुपा खोटा प्रचार. विवेकानंद यांचे चारित्र्य शुद्ध नाही. ते तरुण सुंदर मुलींना फूस लावून आपल्या जाळ्यात ओढतात वगैरे सांगू लागले. यात मिशनरी, ब्राह्मसमाजी आणि थिओसोफिस्ट आघाडीवर होते. हे अमेरिकेत सुरू होते पण प्रतापचंद्र भारतात काही दिवसांनी परत आल्यावर भारतात सुद्धा ही मोहीम त्यांनी सुरू ठेवली होती. ब्राह्म समाजाच्या मुखपत्रात विवेकानंद यांच्या विरोधात लेख येत असत. इतर नियतकालिकात सुद्धा असे लेख येत होते आणि हे सर्व लेख अमेरिकेत पाठवले जात, तिथेही ते प्रसिद्ध करत. अशा प्रकारे मत्सराचा अग्नि पेटला होता.याचा विवेकानंद यांना किती त्रास होत असेल याची नुसती कल्पना केली तरी आपल्याला सहन होत नाही या क्षणाला सारं विचित्रच !  

  © डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------

Tuesday, 22 September 2020

विचार–पुष्प, भाग –५३

                                                             उत्तरार्ध

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना- घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार–पुष्प, भाग –५३


                                          सायक्लोनिक हिंदू ?
  वृत्तपत्रातील विवेकानंद यांच्या बद्दल आलेल्या, मजकुरामुळे अस्वस्थ झालेल्या बॅगले यांनी अॅनिस्क्व्याम हून पत्रात लिहिलं, “विवेकानंद यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे.याचा माला फार आनंद वाटतो. जे कोणी त्यांच्या विरूद्ध  लिहीत आहेत,त्यांच्या मनात विवेकानंदांची श्रेष्ठता आणि आध्यात्मिक धारणा यांबद्दलचा  मत्सर आहे. धर्माचा उपदेष्टा आणि सर्वांनी ज्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे अशी त्यांच्या तुलनेची दुसरी योग्य व्यक्ती मला दिसत नाही.ते संतापी आहेत हे साफ खोटे आहे. माझ्या घरी त्यांचे तीन आठवड्याहून जास्त काळ वास्तव्य होते. माझ्या कुटुंबातील सर्वांशी त्यांचे वागणे अतिशय सौजन्याशील होते. आनंद देणारा एक मित्र आणि हवाहवासा वाटणारा पाहुणा असे त्यांचे वागणे बोलणे असे”.

   “ शिकागोचे हेल कुटुंब अशीच साक्ष देणारे आहेत. ते प्रेस्बिटेरियन आहेत,पण विवेकानंदन यांना आपल्यापासून दुसरीकडे कोठे जाऊ देण्यास ते तयार नसत. विवेकानंद हे असे एक सामर्थ्यसंपन्न आणि अतिशय थोर व्यक्तिमत्व आहे की जे ईश्वराचा हात धरून चालत राहणारे आहे. त्यांची भाषणे ऐकून अनेकजण उद्गार काढतात की, असे बोलणारा दुसरा वक्ता आपण या आधी कधी ऐकला नाही.ते श्रोत्यांना एका उदात्त विश्वात घेऊन जातात आणि ऐकणारे सारेजण त्यांच्या धर्माविषयक श्रद्धेशी तद्रूप पावतात. माणसाने निर्माण केलेले पंथ आणि संप्रदाय या सर्वांच्या अतीत असणारे असे काहीतरी श्रोत्यांना जाणवते . विवेकानंदांना समजून घेतले आणि त्यांच्या सहवासात एका घरात राहता आले तर , प्रत्येक व्यक्ती उन्नत होऊन जाईल.प्रत्येक अमेरिकन माणसाने विवेकानंद जाणून घ्यावेत. आणि भारताजवळ असतील तर असेच आणखी विवेकानंद त्याने आमच्याकडे पाठवावेत. हे मला हवे आहे”.

मिसेस बॅगले 

    प्रा.राईट यांनी विवेकानंद यांच्या असामान्य योग्यतेबद्दल सर्व धर्म परिषदेसाठी पत्र लिहिलं होतं, त्याच अॅनिस्क्व्याम मधून बॅगले यांनी हे पत्र लिहिलं होतं.मिसेस स्मिथ यांनी विवेकानंद यांच्या बद्दल छुपा प्रचार चालुच आहे हे ऐकून पुन्हा बॅगले यांना न राहवून विचारले होते. बॅगले यांनी पुन्हा उत्तर दिले ,त्यात आधीच्या पत्रातील मजकूर होताच पण त्यात चिडून म्हटले होते, “ माझे अनेक नोकर आहेत. मोलकरणी आहेत. सारे जण माझ्याकडे अनेक वर्षे काम करीत आहेत”.म्हणजे बदनामी करण्याची किती हीन पातळी गाठली होती. त्यांनी काही तक्रार नाही केली आणि हे सांगणारी ही कोण? त्याच्या नंतर बॅगले यांच्या मुलीनं स्मिथ यांना कडक पत्र लिहून कानउघडणी केली.

चारित्रहननाची ही मोहिम सव्वा वर्ष सुरू होती पण विवेकानंद यांनी काहीही व्यक्त केले नव्हते, शांतपणे ते सहन करत होते.

आपणही असे अनुभव घेत असतो. मत्सरी लोक आपल्या आसपासच असतात. त्यामुळे इतर लोकांचे आपल्याबद्दल कान फुंकायचे ,विरोधी मत तयार करायचे अशा चुकीच्या गोष्टी लोक करत असतात. पण बॅगले यांच्या सारख्या सत्यासाठी परखड शब्दात कान उघडणी करणारे असले की किमान दुसरी बाजू लोकांसमोर येते आणि न्याय अन्याय ,खरे खोटे, काय? कोणाचे? हे स्पष्ट होते, हेही तितकेच खरे आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे!     

    डेट्रॉईटला विवेकानंद यांची आणखी व्याख्याने होत होती. इतक वादळ उठलं होतं पण स्वामीजी धर्म, परंपरा, स्त्रिया, निर्बंध ,त्यातून तयार झालेल्या रूढी यावर भारत व अमेरिका यांच्यावर तुलनात्मक बोलत होते.त्यांनी वाचलेला आणि पाहिलेला अमेरिका आणि आपल्या देशाची  मूल्ये आणि शिकवणूक त्या लोकांना, श्रोत्यांना समजून सांगत होते.त्यांच्यात आणि श्रोत्यांमध्ये मनमोकळा संवाद होत होता. गप्पा होत होत्या. भारतातील धार्मिक आणि सामाजिक अस्वस्थेवर प्रश्न विचारून लोक स्वामीजींकडून समाधान करून घेत. विवेकानंद सर्व प्रश्नांची उत्तरे प्रांजळपणे देत असत. काही दोष तर सरल मान्य करत आणि काही प्रश्न सुटणे अवघड आहे हेही सांगत. राजकीय आक्रमणामुळे सामाजिक निर्बंध स्वीकारावे कसे लागतात ते समजावून देत. हेच निर्बंध मग पुढे जाऊन कशा रूढीत बदलतात हे सविस्तर सांगत .

भारतातील स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल लोक जाणून घ्यायला उत्सुक असत.

इथे एका व्याख्यानात विवेकानंद सांगत होते, “ भारतातील स्त्रिया काही शतकांपूर्वी मोकळेपणाने फिरत असत. सिकंदराने केलेल्या स्वारीच्या वेळी तर राजकन्याही इकडे तिकडे संचार करीत होत्या. पण पुढे मुसलमानांच्या उगारलेल्या तलवारीमुळे आणि इंग्रजांच्या रोखलेल्या बंदुकांमुळे आन्तरगृहाचे दरवाजे बंद करावे लागले होते. पुढे विनोदाने म्हणाले दाराशी वाघ आला तेंव्हा दार लावून घेतले. असे निर्बंध पुढे रूढी झाल्या.

भारतातील स्त्रिया या विषयवार विवेकानंद यांनी व्याख्यान दिले. ते खूप गाजले. अमेरिकेतील बुद्धीमान आणि कर्तृत्व संपन्न स्त्रियांबद्दल त्यांनी कौतुक केले. पण ते करताना हेही बजावले की, वैवाहिक जीवनात चारित्र्याचा आणि पतिपत्नीच्या नात्यातील निष्ठेचा अभाव हा पाश्चात्य संस्कृतीचा एक महान दोष आहे. वृत्तपत्रीय वादळात ही डेट्रॉईट मध्ये विवेकानंद यांच्या विचारांनी लख्ख प्रकाश पडला होता. तीन आठवड्याचा हा काळ भरगच्च कार्यक्रमांचा झाला.

मिसेस बॅगले यांच्याकडे विवेकानंद राहत होते पण थॉमस विदरेल पामर यांच्या आग्रहाखातर काही दिवस स्वामीजी त्यांच्याकडे राहायला गेले होते. पामर मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे सिनेट सदस्य होते.तिथल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी ४० वर्षे प्रयत्न केले होते.कोलंबियन एक्सपोझिशन चे चीफ कमिशनर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी तर डेट्रॉईट मधल्या अनेक लोकांना सतत आमंत्रित करून भोजन समारंभ केले. सर्व क्षेत्रातल्या नामवंतांसहित कोणीही स्वामीजींना जवळून बघितले नाही असा कोणी बाकी राहिला नाही. स्वामीजींच्या एव्हढ्या प्रेमात ते पडले होते.

विवेकानंद यांची व्याख्याने १८९३ च्या नोहेंबर पासून स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो यांच्या झालेल्या कारारा नुसार झाली होती.पण दोन महीने होत नाहीत तो विवेकानंद यांना शंका येऊ लागली. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आलं. एका कार्यक्रमाचे उत्पन्न दोन हजार डॉलर्स झाले असताना विवेकानंदांना फक्त दोनशे डॉलर्स देण्यात आले होते. त्यांनी हेल यांचा सल्ला घेतला. पामर यांनाही सांगितले . या करारा बाबत वकिलांचा सल्ला ही घेतला. आणि सरळ स्लेटन यांना रीतसर सांगून ते या करारातून मुक्त झाले. यात पामर यांनी स्वता शिकागोला जाऊन मदत केली. तीन वर्षांचा झालेला करार तीन महिन्यातच संपला होता. अतिशय वाईट अनुभावातून एकच चांगली गोष्ट घडली होती की, तिथल्या थोरा मोठ्यांचा परिचय व भेटी झाल्या होत्या. प्रसिद्धीही भरपूर मिळाली होती.

तिथल्या जाहिरात बाजी आणि धावपळीला ते कंटाळलेच होते. सायक्लॉनिक हिंदू म्हणून त्यांची जाहिरात केली होती. जी स्वामीजींच्या शांत आणि गंभीर व्यक्तिमत्वाला शोभेशी नव्हतीच.ते हेल भगिनींना याविषयी पत्रात म्हणतात , “ मी तुफानी वगैरे काही नाही त्याहीपेक्षा वेगळा आहे. मला जे हवे आहे ते या करारा नुसार कराव्या लागणार्‍या कामात नाही. हे तुफानी वातावरण मी आता फार काळ सहन करू शकत नाही. स्वता पूर्णत्व प्राप्त करून घेणे आणि काही मोजक्या स्त्री पुरूषांना पूर्णत्वाकडे नेणे हा माझा मार्ग आहे. असीम कर्तृत्वाची माणसे तयार करावीत अशी माझी कल्पना आहे. आलतूफालतू माणसांमध्ये आपली विचार रत्ने विखरून टाकावीत आणि वेळ, शक्ति आणि आयुष्य व्यर्थ घालवणे हा माझा मार्ग नाही”

व्याख्यानच्या द्वारे पैसे मिळवायचे नाहीत असा निर्णय विवेकानंद यांनी घेतला.भारतात जाऊन एखादी  शिक्षण संस्था उभी करायची ही योजना पण बाजूला  ठेवली. आपण योजना प्रत्यक्षात आणणार नसलो तर मिळालेल्या देणग्या ठेऊन घ्यायचा काय अधिकार ? म्हणून ज्यांनी पैसे दिले होते त्यांना ते परत करू लागले तर त्या लोकांनी ते नाकारले. त्यांना बाकीच्या तपशीलाशी काही देणे घेणे नव्हते. स्वामीजींवरील प्रेम आणि आदरापोटी ते पैसे दिले होते. भारतात आता परत जावे इथला मुक्काम हलवावा असे मनात आले होते पण विवेकानंद यांना आता न्यूयॉर्क चे आमंत्रण आले होते...क्रमश:

 

  © डॉ.नयना कासखेडीकर    

----------------------------------------