Friday, 24 April 2020

व्यंग लेखक डॉ. शंकर पुणतांबेकर


                        व्यंग लेखक डॉ. शंकर पुणतांबेकर

           हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध व्यंगकार, साहित्यिक, कादंबरीकार, दिवंगत डॉ. शंकरराव पुणतांबेकर यांच्या येथे शब्द माझे जळती या पुस्तकाचे प्रकाशन, शुक्रवार  दिनांक २७ डिसेंबर २०१९, रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते संध्याकाळी ५ वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. त्या निमित्त पुस्तकाचा परिचय करून देणारा हा  लेख.   

          
                         


           ‘येथे शब्द माझे जळती हा पुस्तकाचे नाव वाचून, वाचक नक्कीच संभ्रमात पडले असतील की शब्द जळती... ?  म्हणजे काय. नक्कीच हे पुस्तक वेगळे आहे. यातल्या सर्व रचना समाजातल्या व्यंग्यावर, विरोधाभासावर  विचार करायला लावणार्‍या आहेत. आपण रोजच दैनिकांमध्ये, मासिकांमध्ये व्यंगचित्र बघत असतो, वाचत असतो. हे चित्र अत्यंत बोलक असत. त्या व्यंगचित्रकाराला काय सांगायचं आहे ते तो चित्राच्या भाषेत मांडतो. ते बघून आपणही मनातल्या मनात हसतो. कारण ते परिणामकारक असतं. तुमच्या डोळ्यासमोर आर. के.  लक्ष्मण, शि. द. फडणीस यांची व्यंगचित्रे आली असणार. एखादं चित्र किंवा फोटो हजार शब्दाचं काम करतं. हाच परिणाम साधत असतं व्यग्यकाराचं व्यंग लेखन. फक्त ते चित्रांऐवजी शब्दातून भाष्य करतं. ते वाचकांना बोचणारं असतं.
           
         या पुस्तकात लेखक डॉ. पुणतांबेकर सरांनी व्यंगछटा असलेल्या छोट्या छोट्या रचनांचा रूपबंध मांडला आहे. तो वाचकांशी प्रत्यक्ष हितगुज करतो. व्यंगप्रकार, व्यंगत्मक लेखन हिन्दी साहित्यात आपल्याला दिसतो. मराठीत शब्दात आला नाही. मराठीत जो  विनोद प्रकार आहे ते व्यंग नाही, तो ह्युमर आहे. व्यंग म्हणजे विडंबन. या दोन्ही प्रकारांची निर्मिती विसंगती आणि विकृती यामुळेच होते. विनोदामुळे हसू येते पण व्यंगामुळे वाचक गंभीर होतो. मनोरंजनाबरोबर तो अंतर्मुखही होतो. झेंडूची फुले या केशवकुमार अर्थात आचार्य अत्रे यांच्या विडंबन काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेत स.ग. मालशे म्हणतात, “विडंबनकार आणि त्याचा वाचक हे दोघेही समंजस आणि अभिरुचिसंपन्न, कल्पक आणि बुद्धीमान असावे लागतात”.
           
           पुणतांबेकर सरांच्या शैलीतले उदाहरण म्हणजे, हर बिरबल को अकबर नही मिलता’, किंवा, वह प्रोफेसर हो कर भी विद्वान है यातला उपहास आपल्याला  गंभीरपणे विचार करायला भाग पाडतो.
डॉ. शंकरराव रघुनाथ पुणतांबेकर ! प्रसिद्धीपरांगमुख व्यक्तिमत्व, मराठी असले तरी हिन्दी साहित्य विश्वातले एक अत्यंत महत्वाचे नाव. अत्यंत संवेदनशील. जन्माने मध्यप्रदेशातील गुणा जिल्ह्यातले म्हणजे हिन्दी भाषिक प्रदेशातलेच. पण त्यांचा शैक्षणिक प्रवास मात्र, ग्वाल्हेरला बीए, आग्र्याहुन एल॰ एल॰ बी., आग्र्यातच हिन्दी व इतिहासात एम.ए., पुण्यातून हिंदीत पीएच डी आणि मग विदिशा आणि जळगाव येथील महाविद्यलयांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा. सर्व शिक्षण हिंदीतूनच झाले. त्यामुळे की काय पण त्यांची साहित्य निर्मितीही साहजिकच हिंदीत झाली.  
          अगदी सुरूवातीला त्यांनी हिन्दी एकांकिका आणि लघुकथा, हास्य व्यंग, व्यंग निबंध, कादंबरी, कथा असे अनेक व्यंग प्रकार हाताळले. १९५६ साली प्रथम कल्याणी ही एकांकिका लिहून आपल्या साहित्य निर्मितीला सुरुवात केली. व्यंगचा अभ्यासपूर्ण परिचय करून देण्याच्या दृष्टीने केलेल्या श्रमाचा परिपाक म्हणजे व्यंग अमरकोश हा सुमारे नऊ हजार पेक्षा जास्त हिन्दी शब्दांचा कोश. हिन्दी साहित्यात त्यांनी हा नवा प्रयोग केला.
               सरांना १९९५ साली हिन्दी व्यंगात्मक लेखनासाठी दिला जाणारा अखिल भारतीय चकल्लस पुरस्कार मिळाला तेंव्हा त्यांची मुलाखत मी घेतली होती. ते स्वता:च्या व्यंग लेखन प्रवासाबद्दल म्हणाले होते, “आपल्या आसपास घडणार्‍य घटना, प्रसंग, विविध व्यक्तींच्या वागणुकीतून आढळणार्‍य विसंगतीचे लोकांपुढे केलेले भेदक दर्शन म्हणजे व्यंग. हे लिखाण एका वेगळ्या शैलीत व्हायला हवे. त्यामुळे त्यात परिणमकरकता येते, केवळ विनोद निर्माण करणे एव्हढेच यात अभिप्रेत नाही. तर त्यात वास्तवाचे चित्रण हे एक विशिष्ट परिणाम साधण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर, उमेदीच्या काळात विशेषत:  व्यावहारिक आयुष्याला सुरुवात करताना ज्या अनेकानेक विसंगतीपूर्ण अनुभवांना मला सामोरे जावे लागले, त्यामुळे या प्रकारात आकर्षित होऊन, मी लिहिण्यास उद्युक्त झालो.
               
           व्यंग हा काही केवळ हास्य निर्मिती साठी केलेला विनोद नसतो. त्यापेक्षाही काहीतरी वेगळं असतं. हास्य’, दर्द भूलनेका नशा जगाता है’,  तो, व्यंग’, नशा भुलने का दर्द जगाता है.  कोणतीही विसंगती समाजासाठी, समाजरचनेतील अनेक घटकांसाठी नुकसानकारक व हानिकारक असते. त्याचे दर्शन तेव्हढ्याच उत्कटतेने समोर यायला हवे. लेखणीच्या फटकार्‍यातून ही तीव्रता समजू शकते. हा आसूड, फटका, प्रहार आमच्या मनात क्षोभ व चीड निर्माण करु शकतो. ही माणसाला अंतर्मुख करायला लावणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे विचारांची आंदोलने व भावनांचे कल्लोळ उसळतात. व्यंग लेखनाला भाषेची समृद्धी आहे पण विषय विविधता नाही. आपल्याकडे तर जातीप्रथा, शिक्षण, नैतिक मूल्यांचे अध:पतन असे महत्वाचे विषय आहेत की त्यांचे विदारक स्वरूप तेव्हढ्याच तीव्रतेने लोकांपुढे यावयास हवे. पण तसे होत नाही, कारण परिणांकरकता आणि कसदार विचारांपेक्षा लिखाणाद्वारे मिळणारी लोकप्रियताच महत्वाची वाटते।               
  
        व्यंगात इतकी शक्ति आहे की, लेखक व टीकाकारांनी उपरोध आणि वक्रोक्तिपूर्ण लिखाण समजाऊन घेतले  पाहिजे. तेंव्हाच त्याची शक्ति आणि परिणामकारकता कळेल. तेंव्हाच हा साहित्य प्रकार आणखी लोकप्रिय होईल. व्यंग लिखाण मातब्बरांच्या लेखणीतून अक्षररूप घेण्याची वाट पाहत आहे.”  सरांच्या मते, व्यंगाच्या व्याख्येत मुख्य तीन घटक आहेत ते म्हणजे, विसंगती, त्यातून निर्माण झालेले विसंगतीचे दर्शन आणि ते मांडण्याचे कौशल्य .

          सरांनी कादंबरी, निबंध, नाटक हे प्रकार हाताळले. व्यंग लेखनास त्यांचे प्राधान्य होतेच. यावर त्यांची जवळ जवळ 30 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.व्यंग अमर कोशा बरोबरच शतरंग के खिलाडी, व्यंग संग्रहाचे आठ खंड, की ज्यात एक हजार रचना आहेत. एक मंत्री स्वर्ग लोक मे , जहा देवता मरते है , या कादंबर्‍या. यातले एक मंत्री स्वर्गलोकमे चे मराठीत भाषांतर डॉ. ओमप्रकाश शर्मा यांनी केल आहे. श्रीधर दिक्षित यांनी सरांच्या कथा मराठीत भाषांतरित केल्या आहेत. रावण तूम बाहर आओ’, माल रोड मर्डर’, सफेद कौए काले हंस’, दरखास्त ही नाटके त्यांनी लिहिली आहेत. व्यंग लेखनाचे बहुतेक सर्व पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

          हरियाली और काटे या कादंबरीला केंद्रीय हिन्दी निदेशलायचा पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा हिन्दी साहित्य अकादमीचा पुरस्कार, मध्यप्रदेश साहित्य संघ, भोपालचा अक्षर साहित्य पुरस्कार, तसेच अखिल भारतीय चकल्लस पुरस्कार मिळाला आहे.

           एव्हढे मोठे साहित्यिक असूनही ते सहजच आमच्यात मिसळत, गप्पा मारत, भेटायला येत, नेहमी पत्राला उत्तर देत. सणावाराला पत्ररूपी ग्रिटींग आणि आशीर्वाद पाठवत, कधीही घरी गेलं की कायम त्यांच्या पुस्तक खोलीत लिखाण करत असायचे. हसतमुखाने स्वागत करत गप्पांच्या महफिलीत सामील व्हायचे. आपल्या सहकारी आणि मित्र मंडळीत मनमोकळ्या आणि धीरगंभीर, पारदर्शक स्वभावामुळे त्यांनी प्रेमादर संपादन केला होता. कोणताही भपका आणि प्रसिद्धीच्या झोतापासून ते नेहमीच दूर असायचे. त्यामुळेच ज्ञानपीठ पुरस्करपासून ते वंचित राहिले याची हळहळ साहित्य क्षेत्रात सुद्धा व्यक्त होते. त्यांच्या अकृत्रिम वागण्यामुळे आणि सहज वृत्ती मुळे आम्ही सर्व च प्रभावित झाल्यावाचून राहायचो नाही. एकदा तर पत्रकारितेच्या कोर्स साठी त्यांची मुलाखत घ्यायची होती तर चक्क ते स्वत:च आमच्या घरी आले मुलाखत द्यायला. 

         


आज ते नाहीत. पण ते असतानाच तेथे शब्द माझे जळती हे पुस्तक तयार झाले होते. पण प्रकाशन राहिले होते करायचे . हे पुस्तक म्हणजे आकाशवाणी जळगाव केंद्रासाठी रोज सकाळी प्रसारित होणार्‍या विचारपुष्प या वैचारिक मालिकेसाठी केलेलं त्यांच्या शैलीतील लिखाण आहे. त्यांचीच प्रस्तावना आहे.  ६८ रचनांचा खजिनाच आहे यात. गावठी मालती, एक होते बाळासाहेब, आमच जगणं, पडदा, आत्मा जीवंत आहे, एक अदृश्य तारा, सोमनाथ, मध्यमवर्गीय जीवनशैली, श्रद्धा अंधश्रद्धा प्रवास असे कटू वास्तव सांगणार्‍या व्यंगछ्टा यात आहेत, हरिभाऊ आपटे, भाऊसाहेब खांडेकर, ना.सी.फडके, टॉलस्टॉय यांच्याही छटा आहेत.हे पुस्तक मराठी वाचकांना व्यंग्य कळावे आणि त्यांना आस्वाद घेता यावा, तसेच मराठी लेखकाने व्यंग्य लेखांकडे वळावे म्हणून त्यांनी लिहिले आहे.

--- डॉ. नयना कासखेडीकर

                       ----------------------------------------------------------------------