Saturday, 3 June 2023

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती |

 

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी सर त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत, त्या निमित्त त्यांच्याशी झालेला हृद्य संवाद.

                                       

         सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठेसारख्या ग्रामीण भागातून येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या नामवंत विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू पदावर नियुक्ती झालेले प्राचार्य डॉ. एन.एस. उमराणी सर! अत्यंत अभिमानास्पद वाटणार्‍या या कामगिरीमागची प्रेरणा काय होती, त्यांचा इथवरचा प्रवास, त्यांची शालेय जीवनातील जडण घडण कशी झाली याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होतीच. साहजिकच त्यांचे मूळ गाव, सामाजिक पार्श्वभूमी, कुटुंब आणि बालपण या विषयाकडे प्रारंभी मोर्चा वळला. तोवर सर त्यांच्या कर्नाटक, विजापूरच्या सीमेवरील दक्षिण सोलापूरमध्ये असलेल्या भंडारकवठे या गावाकडे मनाने पोहोचले सुद्धा!

     रम्य ते बालपण, हा अनुभव सांगताना त्यांना आधी आठवते ती नदी, आईवडील,मित्र, शेतातले घर, शाळा आणि गाव. दुथडी भरून वाहणारी भीमा नदी, गावकर्‍यांना आपल्या नावेतून सुरक्षितपणे वाहतूक करून पलीकडच्या तीरावर पोहोचविणारे, पावसाळ्याआधी नावेची दुरूस्ती करणारे नावाडी, तर नदीवर खेळतांनाच्या आठवणी, पाणी कमी असताना, पेरु बोरं खायला नदीच्या पलीकडे कर्नाटकात जाणारी आम्ही मुले या सर्व आठवणी मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत असे सर म्हणतात.

पूर्वी एकूणच समाज कसा होता, सामाजिक वातावरण, एकोपा, भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम’ चा अनुभव आणि अनुभवलेले प्रसंग सरांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या विचाराने कामे करणारी जनता होती. वेळप्रसंगी एकमेकांसाठी धावून जाणे, सहकार्य करणे, एकमेकांना सुख दु:खात साथ देणे यामुळे समाजात एकोपा व शांतता नांदत असे”.

“माझे आई वडील दोघेही शेतमजूर होते. शिक्षण नसले तरी त्यांचे आचार विचार, सामाजिक जाणीव, शिक्षित लोकांच्या बरोबर असलेली ऊठबस व चांगले संबंध, त्याच प्रमाणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात जे लोक गावासाठी काम करायचे त्यांच्याशी आई वडिलांचे खूप चांगले संबंध होते. आई वडील शेती बटाईने करायचे, जमीन मालकाने शेतातच एक झोपडी बांधून दिलेली होती, तिथे राहूनच शेतीची कामे करायचो. १९७२ला दुष्काळ पडला होता. रस्त्यांची कामे, नाला बंडीग कामे अशी दुष्काळी कामे करायला मी पण जायचो आईवडीलांबरोबर. मी ११ वर्षांचा होतो, मोठ्या माणसांपेक्षा जास्त काम करायचो तेंव्हा लोक कौतुक करायचे. एक रुपया रोज मजुरी मिळायची.पण आठवड्याच्या शेवटी हातावर मिळायचे सात रूपयांऐवजी फक्त साडेतीन रुपये. म्हणजे रोजचे पन्नास पैसेच, निम्मीच मिळायची कारण मी लहान होतो. हे पैसे मोजताना तेव्हा डोळ्यात पाणी आले. माझ्यासाठी हे धक्कादायक होते. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण आणि नंतर दहावी पर्यन्त हायस्कूल होते. दहावी होईपर्यन्त मी सातत्याने काही ना काही शेतीकाम करत असे. शाळेच्या उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीतपण आम्ही काम करून शाळेचा खर्च, युनिफॉर्म, वह्या पुस्तके हा खर्च भरून काढत असू. परिस्थितीमुळे आई वडिलांना तेव्हढाच आर्थिक हातभार!”

आपली आर्थिक बाजू खूप मजबूत पाहिजे याची जाणीव त्यांना अश्या प्रसंगातून झाली होती. १९७२ सालच्या दुष्काळाने आर्थिक पिळवणुक आणि कष्टकर्‍यांचा अवमान याचा आघात त्यांच्या बालमनावर झाला होता.

दहावीनंतर सोलापूर शहरात संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रवेश झाला. नवे शहरी वातावरण, हॉस्टेलला राहणे, परिस्थितीशी जुळवून घेणे यातून जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्याचे ते सांगतात. निम्नआर्थिक स्तरातल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप होती ती आपल्याला मिळायची असे सांगताना, विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव असणारे त्या कॉलेजचे प्राचार्य के. भोगीशयन यांच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. वर्षाच्या शेवटी मिळणारी स्कॉलरशिप दर महिन्याला खर्चायला काही रक्कम मिळावी म्हणून ती अॅडवान्स द्यायची असे ठरवल्याने खूप सोय झाली.

संगमेश्वर कॉलेज मधून १९८२ ला बी.कॉम. होत असताना वडिलांचे अचानक निधन झाले. पुढे एम.कॉम. होऊन प्राध्यापक होण्याचे स्वप्न बघितलेल्या उमराणी सरांच्या समोर आता पुढे काय? असा प्रश्न उभा राहिला आणि साहजिकच नोकरी शोधावी लागली. स्पर्धा परीक्षा देऊन बँक, रेल्वे, एअर इंडिया यांच्या परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि मुंबईत एअर इंडियातली नोकरी स्वीकारली. मोठे शहर, नावाजलेली कंपनी, वातानुकूलित चकचकीत ऑफिस अशा एकदम नव्या वातावरणामुळे अनेक नव्या गोष्टींची ओळख झाली. रहाणीमान सुधारलं. आईला दरमहा पैसे पाठवता येऊ लागले. आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर त्यांच्या कुटुंबाची तेव्हढीच भक्कम साथ होती.

एअर इंडिया सारखी चांगली स्थैर्य असलेली सोडून शिक्षण क्षेत्रात स्थिर होण्याचा निर्णय घेण्याचे कारण सांगताना ते म्हणतात, “ एम.कॉम. होऊन प्राध्यापकी करायची हे पहिल्यापासूनच मनात होत, ते स्वप्न होतं माझं. ते पूर्ण करण्यासाठी १९८८ ला एअर इंडिया सोडण्याचा निर्णय घेतला. आर्थिक स्थिति थोडी सुधारली होती, मग स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा पुन्हा उफाळून आली. तो विचार गप्प बसू देईना. मुंबई विद्यापीठातून एम.कॉम. केलं. पुढे शिवाजी विद्यापीठातूनपण एम.कॉम. केलं. बार्शीच्या सुलाखे कॉलेज मध्ये इंस्ट्रक्टरची नोकरी मिळाली. सन १९८८ ते १९९४ पर्यन्त ही नोकरी केली. याच काळात NET परीक्षा पास झालो”.

“सीनियर कॉलेजमध्ये काम करायची इच्छा होतीच. १९९४ला शाहू कॉलेजमध्ये रुजू झालो. १४ वर्षे काम केल्यानंतर म.ए.सो. जाहिरात आली आणि अर्ज केला. २००८ ते २०२३ गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या सेवेत प्राचार्य म्हणून काम केले. या काळात महाविद्यालायला विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGCचे) मानांकन मिळाले, तर महाविद्यालायाची शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक स्वावलंबन याची घडी सरांनी बसवली. म ए.सो.च्या दहा वर्षांच्या सेवेत शैक्षणिक गुणवत्ता वाढवली. इन्फ्रास्ट्रक्चर चांगले झाले. रिसर्च सेंटर सुरू झाले. विद्यार्थी संख्या वाढली.

आपल्या सेवेच्या काळात कॉलेजला नॅक कमिटीकडून ए श्रेणीचं मानांकन २०१० साली ३.३९ स्कोअर आणि २०१६साली ३.४५ स्कोअर असं दोनदा मिळालं, हे सांगताना सरांना समाधान आहे. ते म्हणतात, “शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाचा दर्जा चांगला राहण्यासाठी, व्यवस्थापन, प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांचाच चांगला सहभाग आवश्यक असतो. महाविद्यालयाचे नाव मोठे होण्यासाठी आवश्यक ते कष्ट घेण्याची तयारी असायला लागते, ती सर्वांची जबाबदारी असते. एकमेकात सुसंवाद असणं महत्वाच असतं आणि काम करण्याची प्रेरणा देणंही गरजेचं असतं. तेच आम्ही केलं. भारतात आणि परदेशात महाविद्यालय पाहणीसाठी अभ्यास दौरे केले.

या पाहणीतून उच्च शिक्षण अभ्यासक्रम कसा असावा याची दृष्टी मिळाली, शिकविण्याच्या पद्धती कशा असाव्यात, आधुनिक काळात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा द्यायला पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसे असावे, प्रशासन कसे असावे, परीक्षा पद्धत कशी असावी याबद्दल एक दृष्टी आली. विद्यार्थ्यांचा पाठिंबापण महत्वाचा असतो. विद्यार्थ्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्या कशा पूर्ण करायच्या हा ही महत्वाचा विषय या दौर्‍यात समजला. कारण या व्यवस्थेतला विद्यार्थी हा एक महत्वाचा घटक असतो. नॅक कमिटीच्या अपेक्षा समजून घेऊन त्यावर अभ्यास करून निर्णय घेतले. नियोजन केले. या काळात UGC ने पण स्वायत्तता दिली. तसेच पुणे विद्यपीठा कडून २०१४ ला बेस्ट कॉलेज आवर्ड म्हणून गौरव झाला.

यानंतर सरांनी २०१७ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून साडेचार वर्षे पदभार सांभाळला. MES मध्ये जे चांगलं काम केलं, त्याची ही पोचपावती मिळाली असे सरांना वाटते. कॉमर्स चा पहिला प्र-कुलगुरू होण्याचा मान सरांना मिळाला. ही नियुक्ती म्हणजे पत्नी महानंदा आणि मी- आमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण हाच होता, असे सर म्हणतात.

कोविड काळ सर्वांनाच काहीतरी शिकवून गेला. विद्यापीठही त्याला अपवाद नव्हते. उपचारांसाठी प्रारंभी रोग्याची चाचणी ही मोठीच समस्या होती. आवश्यक ती यंत्रणा उभी करून कोविड टेस्टिंग प्रयोगशाळा उभी केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील टेक्नॉलॉजी विभागाने व्हेंटीलेटर निर्मितीसुद्धा केली. सर्व्हे घेतले, या काळात जागृती निर्माण केली, शिक्षणाशिवाय अशी विधायक कामे सुद्धा विद्यापीठाने या काळात केली. प्रशासन, कर्मचारी, प्राध्यापक आणि त्यांच्यावरील कामाचा ताण, विद्यार्थ्यांसकट सर्वांच्या वाढलेल्या अपेक्षा विचारात घेऊन आत्मियतेने त्यावर तोडगा काढावा लागतो. समस्या कालही होत्या, आजही असणारच”. संवादावर सरांचा भर असतो. “कुलगुरू आणि मी असे दोघांनी मिळून विद्यापीठ आपले एक कुटुंब आहे अशा नात्याने एकत्र सांभाळले, त्याचे खूप समाधान वाटते”. असे सर म्हणतात.

जाता जाता त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण चांगलं असल्याच सांगितले. पुणे विद्यापीठाचे मोठे नाव आहे. संविधानिक मूल्ये जोपासण्यासाठी, लोकशाही अधिकाधिक बलशाली करण्यासाठी, तसेच ज्ञान निर्मितीद्वारे संपत्ती निर्माण करण्यासाठी उच्चशिक्षणाचा पसारा भरभक्कम असणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या सक्रिय आर्थिक सहभागाशिवाय उच्च शिक्षणाची आव्हाने पेलणे अशक्य आहे असेही ते म्हणाले.

सरांना ट्रेकिंगची आवड आहे. २००५ पासून आजपर्यन्त नियमितपणे दर रविवारी सर सिंहगड चढतात. त्यांचे महाराष्ट्रातील सर्व महत्वाचे किल्ले चढून झाले आहेत. मार्च २०२३मध्ये भूतानमधला टायगर नेस्ट ट्रेक त्यांनी केला. ट्रेकमुळे आपण ताजे तवाने होतो, कुठलाही ताण येत नाही, आत्मविश्वास वाढतो, व्यायाम होतो, स्ट्रेस टेस्ट आपोआपच होते आपली ! तर ग्रामीण साहित्य सरांना वाचायला आवडते. मराठीत व्यंकटेश माडगूळकर आणि इंग्रजीत आर. के. नारायण हे त्यांचे आवडते साहित्यिक. प्रामाणिकपणा आणि योग्य दिशेने कष्ट करत राहणं हा मंत्र सर सर्वांना देतात.

शैक्षणिक क्षेत्रात सर्वांना सामावून घेणारे, सामाजिक भान ठेवणारे, नेहमीच सर्वांना उत्तमोत्तम कामाची प्रेरणा देणारे, प्रगती करण्याची उर्मी देणारे नेतृत्व असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे. बा.भ. बोरकरांची कविता ‘लावण्य रेखा’ याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे |
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे |

देखणी ती पाऊले जी, ध्यासपंथे चालती |
वाळ्वंटातूनीसुध्दा, स्वस्तिपद्मे रेखिती |

अध्यापनाचा ध्यास घेऊन त्याच मार्गावर यशस्वीपणे चालत राहिलेले उमराणी सर या महिन्यात लौकीकार्थाने निवृत्त होत आहेत. पण त्यांचा सामाजिक कामाचा ध्यास त्यांना निवृत्त होऊ देणार नाही. म्हणूनच पुढच्या योजलेल्या कामासाठी सरांना अनेक शुभेच्छा !(ही मुलाखत 29 मे 23 ला ई-विवेक व साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध झाली.)

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे .

------------------------------