गुरुशिष्य परंपरा
नव्या पिढीकडे अध्यात्मिक ज्ञान पोहोचविण्याचा मार्ग म्हणजे गुरुशिष्य परंपरा. प्रथम गुरुकडून शिष्य शिक्षण घेतो आणि हाच शिष्य पुन्हा गुरूच्या रुपात दुस-यांना शिक्षण देतो. हा क्रम एका पिढीकडून दुस-या पिढीकडे चालू असतो यालाच परंपरा म्हणतात. ही परंपरा कोणत्याही क्षेत्रात असू शकते. उदा. संगीत, अध्यात्म, कला, वेद इ. आज प्रामुख्याने कला क्षेत्रात संगीत आणि नृत्य यामध्ये ही परंपरा दिसते.
गुरुकुल शिक्षण पद्धती हे हिंदू धर्माचं विशेष लक्षण मानलं जात असे. प्राचीन भारतात ही व्यापक संकल्पना होती. संस्कार व विद्याग्रहणासाठी शिष्य गुरुगृही राहत असे. वयाच्या पंधरा/सोळा वर्षापर्यंत बाल्यावस्था ते पौगंडावस्थेतील काळ हा संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडण्याचा काळ. या काळातील विकासात गुरूंचा महत्वाचा वाटा असे. आपल्याला राम-वशिष्ठ, कृष्ण-संदिपनी, चंद्रगुप्त मौर्य-चाणक्य, द्रोणाचार्य-अर्जुन, परशुराम-कर्ण, विवेकानंद-परमहंस यांची आदर्श गुरु-शिष्य परंपरा माहिती आहे. महर्षी व्यास तर ज्यांनी महाभारत, पुराणं लिहिली, त्यांना तर भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जाते. आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी आणि थोर व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या जीवनात गुरुंना उच्च स्थान दिलं आहे. म्हणून 'व्यासपोर्णिमा' हीच गुरुपोर्णिमा मानतात.
गुरु आपल्या शिष्याच्या मानसिक, शारीरिक तसेच अध्यात्मिक विकासाचा भार उचलत. एका अर्थाने वडील हे जैविक पिता तर गुरु हे त्या विद्यार्थाचे अध्यात्मिक पिता असत. यात गुरु शिष्याचं नातं निर्व्याज प्रेमाचं असायचं. मानवी जीवनात अनेक प्रकारचे नाते-संबंध पाहायला मिळतात. पण गुरु-शिष्य संबंध हा एका उच्च पातळीवरचा अद्वितीय संबंध असतो. इतर संबंधांच्या तुलनेत तो पूजनीय असतो. 'चांगला गुरु मिळाल्यामुळे शिष्य' तर, 'चांगला शिष्य मिळाल्यामुळे गुरु', असे दोघेही स्वताला कृतार्थ समजत. शिकत असतो शिष्य, पण परीक्षा मात्र गुरूची होत असते. शिष्याकडून हरणे म्हणजे गुरूंना जिंकण्यासारखेच असते. जेंव्हा असे होते तेव्हा गुरूंची मान अभिमानाने ताठ होते, तर त्याउलट शिष्याची काही चूक झालीच तर, तो आपलाच कमीपणा आहे असे गुरूंना वाटते.
एकदा प्रसिध्द सतारवादक उस्ताद उस्मान खां यांना विचारलं, "हुबेहूब आपल्या सारखंच कोणी वाजवावं असं वाटत का? तेंव्हा ते म्हणाले, "माझ्या सारखं माझ्या शिष्याने वाजवावं अस मला कधीच वाटत नाही. छापाचे गणपती तयार करण्यात मला अजिबात रस नाही. माझ्याकडे शिकून एखादा प्रतिभावान शिष्य जर माझ्यापेक्षा वेगळ वाजवत असेल आणि कलेच्या आकाशात माझ्यापेक्षा उंच झेप घेत असेल तर, त्याने तसे का करू नये? " असा हा गुरुसंस्कार.
गुरु शिष्य परंपरेची चर्चा करताना एका जेष्ठ कलावंताने सांगितलेली आठवण, "एकदा अभिषेकी बुवांची(पंडित जितेंद्र अभिषेकी) मैफिलीची तयारी सुरु होती. बुवा तानपुरा लावण्यात मग्न होते. मनासारखा स्वर लागल्यावर आता सुरुवात होणार असे वाटत असतानाच त्यांनी सहज श्रोतृवर्गाकडे पहिले, तो बुवांच्या लक्षात आले की, समोर गानकोकिळा हिराबाई बडोदेकर सुद्धा उपस्थित आहेत. बुवा उठले आणि व्यासपीठावरून उतरून जाऊन हिराबाईना खाली वाकून नमस्कार केला आणि मग रंगमंचावर येऊन गायला सुरुवात केली. गुरुप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा व नम्रतेचा हा एक मोठा संस्कार.
प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात असलेल्या सुप्त शक्तींचा विकास केवळ गुरूंच्या कृपेमुळेच होत असतो. विशुध्द चारित्र्य, नीतिमत्तेचा आदर्श, एकात्मज्ञान, तसेच अध्यात्म प्रवणता यांच्या सामर्थ्यावर गुरु आपल्या शिष्याला सन्मार्गाला नेऊ शकतो.
रामकृष्ण परमहंसांमुळेच स्वामी विवेकानंदांना आत्मसाक्षात्कार झाला होता. त्यांच्या स्पर्शानेच दिव्यदर्शनही झाले होते. त्यामुळेच गुरूंची आवश्यकता सांगताना ते म्हणतात, "सर्वात श्रेष्ठ विद्या व सर्वोच्च ज्ञान असा जो धर्म, ही पैशांच्या मोबदल्यात मिळण्यासारखी जिन्नस नाहीत. ती ग्रंथालायातूनही लाभण शक्य नाही. सा-या दुनियेचे काने-कोपरे धुंडाळा, हिमालय, आल्प्स शोधून काढा, अथांग सागराचे तळ हुडका, सारा तिबेट पायदळी तुडवा, वाळवंटात हिंडा, पण जोपर्यंत तुमचे स्वता:चे हृदय, धर्म ग्रहणास पात्र झालेले नाही आणि जोवर तुम्हाला गुरु लाभलेला नाही, तोवर काय हवे ते केलेत तरी धर्म तुम्हाला कुठेही गवसायचा नाही, म्हणून विधात्यानेच नेमून दिलेल्या तुमच्या गुरुदेवांशी तुमची गाठ पडताच निष्पाप, निष्कपट, बालकाच्या विश्वासाने व सरलतेने त्यांची सेवा करा".
"तीर्णा: स्वयं भीमभवार्णवं जनानहेतूनान्यानपि तारयंत:"|
जो स्वत: दुस्तर असा भवसागर तरुन गेलेला असतो व स्वतः कोणत्याच लाभाची अपेक्षा न ठेवता दुस-यांना तरून जाण्यास सहाय्य करतो त्यालाच गुरु म्हणतात. अन्य कोणीही गुरु होऊ शकत नाही, अशा गुरूंच्या परीसस्पर्शाने पावन झालेल्या अनेक शिष्यांच्या आठवणी आहेत. आचार्य चाणक्य यांनी आदर्श शिष्याचे गुण सांगितले आहेत. ते म्हणतात,
'' काकचेष्टा बकुल ध्यानं श्वानं निद्रा तथेव च
अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थीनाम पंचलक्षणं ''
गुरुशिष्यांमध्ये केवळ शाब्दिक ज्ञानाचे आदान प्रदान होत नसे, तर गुरु आपल्या शिष्याचा सर्वांगीण विकास पाहात असे, तर शिष्याचा आपल्या गुरूंवर श्रद्धा, विश्वास आणि समर्पण भाव असे, कारण त्याला खात्री असायची कि गुरु आपलं नेहमीच हित पाहतील.
गुरुशिष्य परंपरेत, आपले सर्वांचे लाडके, भारतरत्न पंडित.भीमसेन जोशी, उस्ताद.झाकीर हुसेन, पंडित.गोपीकृष्ण, लयभास्कर खाप्रुमाम पर्वतकर, पंडित.रामकृष्णबुवा वझे अशी संगीत क्षेत्रातील कितीतरी नावे आहेत.
आपण जे शिकत आहोत ते योग्य आहे का, शास्त्रशुद्ध आहे का हे कळण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते. 'गुरु बिन कोन बतावे बांट' असे म्हणूनच म्हटले आहे. चांगला समाज घडण्यासाठी गुरु-शिष्य परंपरा महत्वाची होती, आजही आहे. या पुढच्या काळात तर ती आणखीनच महत्वाची ठरणार आहे. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा हे जागतिक परिमाण ठरू शकेल. ही गरज आणि सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील बदल, नवे पायंडे, दिशाहीनता लक्षात घेऊन आपली मूल्ये रुजवली पाहिजेत, टिकविली पाहिजेत. आई वडिल, घरातील व बाहेरील वडीलधारी मंडळी, शिक्षक, यांचा आदर करायला, कृतज्ञता व्यक्त करायला, त्यांच्याशी नम्रपणे बोलायला लहान मुलांना आणि युवकांना घरातून सांगितलं गेलं पाहिजे. शाळेत शिकविलं गेलं पाहिजे. हे सर्व आधी स्वत:च्या घरापासून सुरु व्हायला हवे. आता पूर्वीसारखे आश्रम नाहीत. तेंव्हा जबाबदारी आपली आहे, ती आपण स्वीकारुया.
(सर्व फोटो इंटरनेट वरून साभार परत.)
- डॉ.नयना कासखेडीकर
----------------------------
Excellent article
ReplyDelete