Thursday, 7 December 2017

मुक्काम पोस्ट रत्नागिरी - भाग १



रत्नागिरीच्या दीर्घ मुक्कामातला पहिलाच दिवस.

भेट द्यायच्या स्थळांची यादी मोठ्ठी होती. रत्नदुर्ग किल्ला, मत्स्यालय, पांढरा समुद्र, काळा समुद्र, पतित पावन मंदिर, विठ्ठल मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, लोकमान्यांचे जन्म स्थान, थिबा पॅलेस, मालगुंड, गणपतीपुळे, नारळ संशोधन केंद्र आणि बरेच काही. पण पहिलं आकर्षण होतं ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी आणि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी असलेली स्थळं डोळेभरून पाहणं. 
मागच्याच गल्लीत असलेले टिळकांचे जन्मस्थान, उतरलेल्या निवासस्थानापासून पायी जाण्यासारखेच. निघालो. अरुंद गल्लीच्या तोंडाशी वळलो. वन वे ट्रफिक होती, दुकानावरील पाट्या वाचत जाताना कळलं की,  ही ‘टिळक आळी’ आहे . इथूनच अभिमानानं उर भरून यायला लागला. मनात कसलातरी आनंद होत होता. तेव्हढ्यात समोर चौकात दिसली श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान गणेशमंडळ टिळक आळी वास्तू. त्याच्या बाजूलाच होतं स्त्रियांचं लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, जिथे भगिनी मंडळ, शिशु विहार, संस्कार वर्ग आणि हेल्थ क्लब होतं. पिंपळपार देवस्थानच्या थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला लागते, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याने जपलेली लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाची वास्तू. जशीच्या तशी, सारवलेली. नीटनेटकी, सर्व खाणाखुणा जिथल्या तिथेच असलेली, डौलाने, अभिमानाने उभी आहे लोकमान्यांचा इतिहास सांगत.



लहानपणापासून लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि जयंतीला भाषणांत ऐकलेलं आणि घोकून घोकून पाठ केलेलं आणि अजूनही मनावर कोरलं गेलेलं वाक्य होतं,

“लोकमान्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी  रत्नागिरीतल्या चिखली या गावी झाला”.

आज या वास्तूला भेट दिल्यावर मोठा खुलासा मला झाला होता तो हा की, टिळक कुटुंबाच्या कुळाचे गाव चिखलगाव होते आणि त्यांचा जन्म रत्नागिरीत ह्याच वास्तूत झाला होता. या क्षणी लगेच मी, टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी  रत्नागिरीतल्या चिखली या गावी झाला.  
हे वाक्य डोक्यातून डीलिट करून टाकले.

त्यांची ही जन्म वास्तू एक मोठा पुरावाच होता डोळ्यासमोर. तिथे कुठेही चिखली हा उल्लेखच नव्हता मुळी. मन बेचैन झालं. आणि आम्ही स्वतः शाळेत असाच चुकीचा इतिहास, चुकीचा संदर्भ शिकत आलो. शिकवीत आलो आणि आमचे शिक्षक? चुकीचं शिकवत होते? मनात या प्रश्नांचा गोंधळ उडाला. कारण पुस्तकात जे दिलं होतं तेच तरत्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं. मी आत्ता शाळेतले, कॉलेजमधले मित्र मैत्रिणी आणि संपर्कातले शिक्षक अशा सर्वजणांना हा प्रश्न विचारून कन्फर्म केलं. सर्वांनी चिखली असच शिकल्याचं सांगितलं. एक मैत्रीण अपर्णा म्हणाली, “शाळेत चिखलीच शिकलो पण परवाच रत्नागिरीला भेट दिल्याने तीन तीनदा वाचलं कि जन्म रत्नागिरीला झाला म्हणून. मलाही हे शॉकिंग होतं.” चला माझ्याप्रमाणे आणखी कुणाचाही गोंधळ दूर झाला होता तर. चिखली/चिखलगाव हा मुद्दा बाजूला ठेऊन जन्म रत्नागिरी येथेच झाला हे महत्वाचे. ह्याची चर्चा करण्याचं कारण म्हणजे सर्वांनी रत्नागिरी हे जन्मगाव लक्षात ठेवावं चिखली नाही, इतकंच.


ही समोरची सुबक सुंदर दोन मजली वास्तू, ओसरी, वर जायचा जिना, घराची मागची बाजू आणि लांब पर्यंत असलेली आंबा, फणस नारळ पोफळी ची झाडं. या टुमदार बंगलीच्या प्रेमात न पडाल तरच नवल. दरवर्षी येथे टिळक जन्मोत्सव साजरा केला जातो. एकूणच टिळक आळी लोकमान्यांच्या आठवणीने भारलेली वाटली.
इथे भेट देऊन चिखली विषयी अज्ञान दूर झाल्यामुळे सार्थक झाल्यासारखं वाटलं.

आता मोर्चा होता पतित पावन मंदिराकडे. स्वातंत्र्यलक्ष्मी चौकाजवळ सामाजिक समतेचे प्रतिक असलेले ‘पतित पावन मंदिर’. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर खळबळ उडवून देणारे, विविध जातीतील सुमारे दीड हजार लोकांचे सहभोजन सावरकर यांनी याचं मंदिरात घडवून आणले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचेही सहभोजन कोल्हापूरच्या सत्यशोधक चळवळीतील नेते भाई बागल यांच्या पत्नीच्या अध्यक्षतेखाली पार पडले.



रत्नागिरीच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात या मंदिराला मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सांगण्यानुसार श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी वीस गुंठे जमीन विकत घेऊन, दीड लाख रुपये खर्च करून, १९३१ च्या जानेवारीत हे मंदिर बांधून पूर्ण केले. या मंदिरातल्या लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भागोजी शेठ कीर व त्यांच्या पत्नीच्या हस्ते झाली.सावरकर यांचा समतेचा दृष्टीकोण, पूजा प्रार्थनेचा समान अधिकार आणि स्त्री पुरुष समानता हे या पतित पावन मंदिराच्या रुपात सतत आपल्यासमोर असेल.

मंदिराच्या आवारात आलो, दिवाळीच्या खुणा अजून तशाच होत्या. दिवाळी होऊन १५/२० दिवस झाले होते. बाहेर मोठा आकाशकंदील, होऊन गेलेल्या उत्सवाची साक्ष देत होता, तर मंदिरात प्रवेश करताच मंडपात काढलेल्या रांगोळीतून सौंदर्याचा साक्षात्कार घडत होता. गाभाऱ्यात लक्ष्मी नारायणाची मूर्ती जणू काही स्वातंत्रवीर सावरकर यांचा स्पर्श झाल्याच्या अभिमानात उभी होती.



हे मंदिर बांधण्याचे कारण घडले ते विठ्ठल मंदिरातला लढा. सावरकरांनी सर्वाना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून लढा पुकारला होता आणि या संघर्षामुळे बहुजन लोकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता.

या मंदिरात गेलो आणि  सावरकर चित्रपटाचे शुटींग करतानाचे बाबूजी अर्थात सुधीर फडके आठवले.  स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल जी भक्ती आणि प्रेम मनात होतं तेव्हढीच बाबूजी बद्दल. २० वर्षापूर्वी कोकणात गेलो असताना मालगुंड येथे सकाळी सकाळीच वर्तमान पत्र वाचलं आणि एका बातमीने लक्ष वेधलं. बातमी होती, वीर सावरकर यांच्या वरील चित्रपटाचे शुटींग विठ्ठल मंदिरात चालू आहे. बहुजनांना मंदिर प्रवेश हाच विषय शूट होणार होता. त्यासाठी स्थानिक लोकांनी पारंपारिक वेषात हजर राहावे. असे आवाहन केले होते. ट्रीपला आलो असल्याने पारंपारिक वेष वगैरे जवळ अर्थातच नव्हता. तरी ते शुटींग बघायला आणि बाबूजी आपल्याला भेटतील या ओढीने मालगुंड हून रत्नागिरीला पोहोचलो. 



विठ्ठल मंदिरात गर्दी होती. मोठा मॉब होता. पोहोचलो तेंव्हा नुकताच ब्रेक झाला होता. बाबूजी आणि तेंव्हाचे आमदार डॉ.अशोक मोडक बसले होते. मोडक सरांची ह्यांची ओळख असल्याने आणि अचानक भेट झाल्याने, थोड्या गप्पा झाल्या. बाबुजींशी ओळख परीचय झाला. आता एक आठवण म्हणून फोटो काढू का अशी परवानगी घेऊन सगळे बाबुजींबरोबर पोज देऊन उभे राहिले आणि काय? दुर्दैव ! कॅमेऱ्यातला रोलच संपला. मग हीच पोज कॅमेऱ्या ऐवजी मनातच साठवली.असो. 

पण वीर सावरकर चित्रपट बघताना ,बच्चे कंपनीला आवर्जून नेऊन दाखवताना, बाबुजींनी या वयात घेतलेली मेहनत आठवून ,त्यांचा ध्यास पाहून प्रत्येक वेळी मनोमन नतमस्तक होत होते. आज पुन्हा एकदा त्याच विठ्ठल मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुधीर फडके यांना विनम्र अभिवादन केले. समाधानाने.  

अशा ऐतिहासिक रत्नागिरीचा अन्य फेरफटका पुढच्या भागात.  क्रमश:
                                             ----------------------------



-  डॉ. नयना कासखेडीकर, पुणे               

Thursday, 2 November 2017

रहस्यमय हॅलोवीन

                                

                               रहस्यमय हॅलोवीन   


       अंतराळवीरांनी चंद्रावर जेंव्हा पहिले पाउल ठेवले तेंव्हा त्यांना जो आनंद झाला असेल तेव्हढा किंवा त्यापेक्षा जरा जास्तच आनंद झाला होता, जेंव्हा आम्ही अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ( विमानातून  उतरल्यावर ) ठेवले तेंव्हा. साहजिकच होते. ऐकलेल्या आणि सिनेमात पाहिलेल्या, बातम्यात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पाहणार होतो. त्यामुळे कमालीची उत्सुकता होती, कुतूहल होते. विमानतळावरून घरी पोहोचायला कमीत कमी १०० च्या स्पीड ने  एक दीड तास लागणार होता. अमुक एका अव्हेन्यू कडे जाण्यास हायवे वरील रस्त्याला नंबर दिले होते. ज्या भागात जायचे आहे त्या भागाचा नंबर माहिती हवा आणि अर्थात शहराचा भूगोलही माहिती हवा, घरी जाताना मोठ्या इमारती, रस्ते, शिस्तीत जाणाऱ्या मोटारी, अटलांटा विमानतळावरचे प्रचंड मोठे पार्किंग, विमानतळावरचा प्रवेश किंवा निकास (exit) फी,  पेट्रोल पंप, पार्किंग फी, हे सगळे रोकड विरहित व्यवहार ( cashless) ,सगळीकडे cardने व्यवहार .पैसे सांभाळण्याचे अजिबात टेन्शन नाही. केव्हढा रिलीफ वाटला.

               

      गाडी कॉलनीत शिरली .कॉलनी कसली हो? नंदनवनच वाटले. शिरल्यापासून अगदी आत टोकापर्यंत च्या  परिसरातील, घरांप्रमाणेच घराबाहेरील चढ-उतारावरील कटिंग केलेली लॉन्स, कटिंग केलेली लहान मोठी झाडे, झुडुपे, रस्त्याशेजारील फूटपाथ सगळं सगळं नीट नेटकं. एखाद्या चित्रकाराने काढलेल्या निसर्ग चित्रापेक्षाही सुंदर.
गॅरेज मध्ये गाडी विसावली, त्याच दाराने आम्ही घरांत प्रवेश केला. आत गेल्यावर ही जाहिरात आहे का घर? असे वाटावे. मात्र संपूर्ण रस्त्यांवर घरी येईपर्यंत कुठलीही जाहिरात बाजी. बोर्ड, होर्डींग्स, साइन्स चे दर्शन नाही. वास्तविक ट्रम्प आणि हिलरी यांच्या निवडणुकीच्या जाहिराती तरी नक्की दिसतील असे वाटले होते. ते पण नाही.

     अत्यंत घाईत ठरविलेल्या अमेरिका वारीचे नियोजन आम्ही, बहिण आणि मेव्हणे यांच्यावरच सोपविले होते. कमीत कमी वेळात, सर्व सांभाळून जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग आणि समाधान कसे देता येईल याचा, कष्ट घेऊन त्यांनी विचार केला होता आणि नियोजन सुद्धा. विश्रांती नंतरचा पहिला दिवस उजाडला. अजून औत्सुक्य संपले नव्हते. अनिता (माझी बहिण) म्हणाली चला चक्कर मारून येऊ. अक्षरधाम पाहून येऊ. नवे हिंदू टेम्पल झाले आहे. इथेही मंदिरेच पहायची? मुलांचा कडवट चेहरा. पण निघालो. अप्रतिम मंदिर व परिसर पाहून, बाहेरच असलेल्या दुकानात शिरलो. आमच्या पाठोपाठच आत शिरलेल्या व्यक्तीने आम्हाला विचारले आपण याआधी भेटलोय कुठेतरी. आम्ही भारतातून आलो आहोत, हे सांगितल्यावर मग हिंदीतून संवाद सुरु झाला बराच वेळ तो चालला. या प्रसंगाने आम्हीही सुखावलो होतो हे खरे. भारतीय असल्याची ओढ आणि एकमेकांविषयी वाटणारे प्रेम.. दुसरे काय? दिवाळीत होणाऱ्या महाप्रसादाला येण्याचे निमंत्रण घेऊन बाहेर पडलो.

              

मुख्य रस्त्याला लागलो. पुढेच नर्सरी होती. अनिताला लॉन कापणा-या  माळ्याला भेटायचे होते आणि पम्पकिन पहायचे होते. पम्पकिन भाजीवाल्याकडे न घेता नर्सरीत कशाला घेते ? असा प्रश्न मला पडला होता. एखाद्या मॉल ची एन्ट्री वाटावी असे त्या फॅमिली नर्सरी चे प्रवेश दार होते. आत शिरल्यावर इनडोअर आणि आउटडोअर सजावटीच्या वस्तू, आणि बरेच काही लक्ष वेधून घेत होते. मला आपल्याकडील दिवाळीच्या तयारीची आठवण होत होती.कुंभार वाडा आठवला,विविध आकाराच्या पणत्या,दिवे,मूर्ती ,किल्ल्यावरची मातीची खेळणी, किल्ल्याच्या प्रतिकृती, रांगोळ्या, लक्ष्मी पूजनाची  तयारी यांची एव्हाना सर्व दुकानं थाटली असतील. उत्सवाचे वातावरण,प्रफुल्लीत करणारे! तशीच कुणकुण इथेही लागली .काहीतरी, इथला सण असणार. नर्सरीत पम्पकिन खरेदी करण्याला काहीतरी संदर्भ नक्की असणार.

           

आतमध्ये गेलो, भोपळ्यांचे कितीतरी प्रकार. मला दोन तीनच प्रकार माहिती होते. लहानात लहान आकारापासून ते मोठ्यात मोठ्या आकाराचे असे इथे भोपळ्यांचे पीकच आले होते. नुकतीच कापणी झाल्यासारखे. म्हटलं, असेल ह्यांचा बैसाखी, ओणम सारखा हार्वेस्ट फेस्टिवल. विविध आकाराचे भोपळे,भोपळ्याच्या आकाराचे प्लास्टिक चे कंदील, भयानक मुखवटे, वटवाघळे, काळ्या मांजरी, कोळी, कोळीष्टके, हाडांचे सापळे, भीतीदायक मुखवटे, अॅक्सेसरीज, अशा अनेक वस्तूंनी या नर्सरी बरोबरच इतर दुकाने, ऑफिसेस, फार्मर्स मार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल,रंगीबेरंगी सजली होती.ऑक्टोबर महिन्यात इथे हॅलोवीन साजरा होणार होता.त्याची पूर्वतयारी महिनाभर आधी सुरु झाली होती.हळू हळू आम्हाला हॅलोवीन ची सजावटही पाहायला मिळणार होती.

          

          मधल्या काळात आमचे फिरणे ,स्थलदर्शन चालू होते.जिथे जिथे जात होतो, तिथे तिथे पम्पकिन काही पाठ सोडत नव्हते. सुंदर सजावटी दिसत होत्या. नासा मध्ये सुद्धा होती. न्यूयॉर्क चे The Met  अर्थात, दी मेट्रोपोलीटन म्यूझीयम, मोमा, नायगरा, फिलाडेल्फिया, मॅनहटन, सार्वजनिक ठिकाणे. इथेही हॅलोवीन च्या सांस्कृतिक खुणांचे दर्शन होत होते.
            

जाता- येता, घरा बाहेर, अंगणात अक्राळविक्राळ, मुखवटे, भुते, हाडांचे सांगाडे अशा भीतीदायक सजावटी केल्या होत्या. कुणाच्या अंगणात पम्पकिन च्या सजावटी, लक्ष वेधून घेत होते, पण भीती वाटत होती ते बघताना. काही घराबाहेर तर लाईट इफेक्ट्स, हॉरर संगीत,फ्युम,बापरे !

              

इकडे आमची दिवाळीची तयारी  जोरात सुरु होती. आकाशकंदील. लाईट च्या माळा,पणत्या लावून दिव्यांच्या उत्सवाची तयारी.३१ ला दिवाळी पडावा, आमचा प्रकाशाचा उत्सव आणि ३१ ऑक्टोबर ला यांचा हॅलोवीन . दोन्ही टोकाचे विसंगत वाटत होते.

                     

बालगोपाळांची ‘ट्रिक ऑर ट्रीट’

दिवेलागणीची वेळ झाली ,बाहेर लहान लहान मुले त्यांच्या पालकांसह ,विविध वेशभूषेत घरोघरी जात होती. परीकथेतील राजकुमारी, नायक, ममी, ड्रॅक्युला, चेटकीण, हॅरी पॉटर यांचे वेश घालून, हातात भोपळ्याच्या आकाराच्या बादल्या, बास्केट्स घेऊन जात होती.बाहेर हे काय वातावरण आहे हे पाहायला आम्ही कॉलनीत एक चक्कर मारली.घरात पण मुलांसाठी चॉकलेट ,खाऊ ची तयारी झाली होती.ते पाहून मला संक्रांत आणि दसरा आठवला आणि लहानपण आठवल.तेंव्हा ही मुले घरोघरी जाऊन ‘ट्रिक ऑर ट्रीट’? असे ओरडत, खाऊ देणार कि घाबरवू? आणि खाऊ, भेटवस्तू घेऊन जातात. हॅलोवीन च्या कॉस्च्युम्स ची आणि पार्टीची लहान मोठे आतुरतेने वाट पाहत असतात.हा हॅलोवीन चा एक प्रकार.याशिवाय घोस्ट टुर्स  आयोजित करतात. कॉस्चुम पार्टी, हॉंटेड हाउसला भेट, हॉरर स्टोरी सांगणे, हॉरर फिल्म पहाणे हे उत्सव साजरे करण्याचे प्रकार .

              

हॅलोविन पाककृती

या सणा निमित्त कैंडी अॅपल, पीनट बटर बॉल्स, ओवन कॅरॅमल कॉर्न अणि भोपळ्याचे ब्रेड, स्वीट्स यांचा स्वाद घेतला जातो.

                  

हॅलोविन चे मूळ ब्रिटन अणि आयर्लंड संस्कृतीत सापडतात.त्यांच्याकडे नोहेम्बर महिन्याचा पहिला दिवस हा नविन वर्षाचा दिवस मनला जाई अणि उन्हाळ्याचा शेवटचा दिवस.ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत पशुपालन, शेतीची बरीचशी कामे उरकली जात. थंडी सुरु होणार.खरे तर ऋतू बदलाची जाणीव करून देणारा हा सण.हार्वेस्ट फेस्टिवल, जगात ही कल्पना सगळीकडे सारखीच. नवीन पीक हाती आलं आहे त्यामुळे या समृद्धीने आनंदोत्सव साजरा करतात ही तर परंपराच आहे .

         हॅलोविन या शब्दाचा पहिला वापर सोळाव्या शतकात केला गेला, जो स्कॉटीश संस्कृतीची ओळख देतो. केल्ट आय सी मध्ये हा सण म्हणून साजरा करतात.तो नववर्षाभिनंदन म्हणूनच.त्यामुळे नवे वर्ष संतांचा दिवस/संन्यासी दिवस असेल, या दिवशी संत पद मिळालेल्या व न मिळालेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते.त्याला आल हॉलोज डे किंवा होली डे म्हणतात. तर त्याचा आधला दिवस हा, वर्षभरात कुटुंबातले जे कोणी निधन पावले असतील त्यांना शांत करण्याचा दिवस. त्या रात्री मृतात्मे येतात, ते या दिवशी नव्या शरीराच्या शोधात येतात व मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करतात असा समज होता.त्यातले दुष्ट आत्मे आपल्यावर  प्रभावी ठरू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी व आपल्या घरापासून पळवून त्यांना लावण्यासाठी घराबाहेर स्मशानरूपी सजावट करण्याची प्रथा हॅलोवीन सणाला आहे. इथे मला आपली भारतीय संस्कृती आठवली .पितृ पंधरवडा.आपणही पंधरा दिवस आपल्या पितरांच्या आठवणीप्रीत्यर्थ राखून ठेवतो. आवश्यक ते विधी करतो. आपल्या परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हॅलोवीन म्हणजे सर्वपित्री अमावास्याच म्हणावी नाही का?

                     

इसवि सनानंतर पहिल्या शतकात रोमन साम्राज्यात पोमोना या फळझाडाची रोमन देवतेची पूजा करण्यासाठी हा सण साजरा होऊ लागला. अॅपल बॉबिंग हा हॅलोवीन चा खेळ प्रसिध्द आहे.   

             आयर्लंड मधून अमेरिकेत आलेल्या विस्थापितांनी हा सण अमेरिकेत आणला. अमेरिका कॅनडा, पोर्तोरिको, आयर्लंड,ब्रिटन मध्ये हा सण साजरा  केला जातो.

                   

अमेरिकेतले हॅलोवीन चे वैशिष्ट्य म्हणजे jack o Lantern, भोपळ्याचा तयार केलेला भला मोठा कंदील. भोपळ्याला मानवी डोक्याचा आकार देऊन, त्यावर नाक, डोळे, तोंड कोरून, मुखवटा तयार केला जातो. ३१ ऑक्टोबरला रात्री भोपळ्यात मेणबत्ती लावून तो कन्दिलासारखा मुख्य दाराबाहेर ठेवला जातो. जक या अत्यंत हुशार पण आळशी आयरिश माणसाची कथा या ‘jack o Lantern’ शी जोडलेली आहे. दुष्ट प्रवृत्ती /आत्मे भोपळ्यामुळे दूरच राहतात अशी श्रद्धा आहे.

          अशा या हॅलोवीन ची मजा गेल्या वर्षी अमेरिकेत अनुभवली आणि त्या मागचे रहस्य पण उलगडले. आज ३१ ऑक्टोबर म्हणून आठवण आली.

                              
                  
हा सण साजऱ्या करणाऱ्या समस्त बांधवाना Happy Halloween  / शुभेच्छा!       


-- डॉ.नयना कासखेडीकर  

Sunday, 17 September 2017

योजकस्तत्र दुर्लभः।

                                                 
                                                                   पुस्तक परीक्षण



अमंत्रं अक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्।

अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्रदुर्लभः।।



ज्यात मन्त्रशक्ति नाही असे एकहि अक्षर नाही.
ज्याला औषधी गुण नाही असे मूळ नाही.
पूर्णतः निरुपयोगी असा माणूस नाही.
पण या सगळ्यांना कामाला लावणारा म्हणजे योजक- तो दुर्मिळ असतो.

     योजना करणारा योजक दुर्मिळ असतो, पण तो असला की काय बदल घडतात हे सगळी जनता बघतेय. अनुभवते आहे. भारतातल्या परीवर्तनाचा शिलेदार मा पंतप्रधान नरेंद्र मोदी ! त्यांच्याच बद्दल लेखक डॉ.भा.ना.काळे यांनी ‘योजकस्तत्र दुर्लभ:’ हे पुस्तक लिहून त्यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीतले त्यांनी घेतलेले कष्ट, लावलेली शिस्त, घेतलेले निर्णय, परदेशात निर्माण केलेली भारताची एक वेगळीच प्रतिमा या सगळ्या विषयांचा उहापोह केला आहे.

     






या पुस्तकात आठ प्रकारणे आहेत. त्यात लेखकाने, नरेंद्र मोदी लहानपणापासून कसे घडत होते, तेंव्हापासून संघात त्यांच्यावर कोणते संस्कार झाले, त्यांनी संघाशी जोडलेले नाते, इथपासून ते पंतप्रधान झाल्यानंतरची अडीच वर्षे, यात त्या त्या काळातली सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध व भारताला भेडसावणाऱ्या समस्या आणि देशाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न याचा अतिशय मार्मिक शब्दात आढावा घेतला आहे.

     ॐ केशवाय नम: या पहिल्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, त्यापूर्वीचा हिंदुस्थान आणि संघाच्या मुशीतून घडणारा स्वयंसेवक ही माहिती नव्याने संघात येणाऱ्या व संघाबाहेरच्या अज्ञानी लोकांना व टीकाकारांना अत्यंत उपयोगी व मार्गदर्शक वाटते. केवळ ऐकीव आणि द्वेषाने प्रचार केलेल्या गोष्टी किती खोट्या असतात व वास्तव वेगळेच असते हे या प्रकरणातून उमगते. आरोग्यासाठी योगासने, व्यायाम, शुद्ध आचार विचार, मातृभूमीसाठी त्यागवृत्ती, कमालीची समर्पण भावना, हाती घेतलेल्या कार्याप्रती निष्ठा, शिस्त, शाकाहार, ब्रम्हचर्य, निर्व्यसन अश्या कित्येक गुणांचा समुच्चय मोदींच्या व्यक्तीमत्वात झालेला दिसतो.

     दुसऱ्या प्रकरणात १९४७ ला स्वतंत्र झालेल्या भारतात, चीन, पाकिस्तान, ताश्कंद करार यावेळी काय घडलं आणि १९५१-५२ मध्ये झालेली पहिली सार्वत्रिक निवडणूक ते २००९ च्या पंधराव्या सार्वत्रिक निवडणुकीचा धांडोळा लेखकाने घेतला आहे. यापैकी दीर्घकाळ कॉंग्रेस/युपीएची केंद्रात सत्ता होती. या विरोधी सरकारच्या काळातही  नरेंद्र मोदी यांनी तब्बल १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ तयार केले जे इतर राज्यांनाही मार्गदर्शक ठरले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी चौथ्यांदा घवघवीत यश मिळवलं. देशात आणि विदेशातही त्यांना कसे आणि काय काय अडथळे येत होते आणि ते सर्वाना कसे सामोरे गेले याचे यथार्थ वर्णन या प्रकरणात आहे. गुजरातचा विकास काय व कसा केला ? जामनगर मधली निवडणूक, वीज, पाणी, रस्ते या जनतेच्या मुलभूत समस्यांचे निराकरण, दारूबंदी, पर्यटन, व्यापार, अर्थव्यवस्था या माहितीमुळे गुजराथ मॉडेल ठळकपणे समोर येते.

     प्रचारकार्य हे या पुस्तकातील सर्वात मोठे प्रकरण. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी प्रकाश झोतात आले कसे आणि लोकांच्या गळ्यातले ताईत झाले कसे याचं तंत्र समजून घ्यायचं तर हे प्रकरण इंटरेस्टिंग आहे. २००१ ची निवडणूक, गोधरा, बाबरी मशीद, दंगली, युरोपात येण्याची बंदी असे अनेक प्रसंग, त्याचा प्रचार-अपप्रचार, तर    २०१४ च्या निवडणुकीचे हाताळलेले प्रचारतंत्र, मागील १३ वर्षातील उल्लेखनीय काम, मोदी यांचे झंझावाती प्रचारदौरे, सभा, रॅली, नव्या टेक्नॉलॉजीचा त्यांनी प्रचारासाठी करून घेतलेला समर्पक उपयोग, त्याचा परिणाम, चहावला मुलगा, (चायवाला !) याची विरोधकांनी उडवलेली टर, अगदी त्यांचे वैयक्तिक जीवन सुद्धा टीका करताना सोडले नाही. असे प्रतिमा मलीन करण्याचे उद्योग का व कसे केले याचे लेखकाने यथार्थ वर्णन केले आहे.

     प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत धीराने सामोरा गेलेला अन तावून सुलाखून बाहेर पडलेला माणूस २०१४ मध्ये निवडून दिला तर नक्कीच उत्कृष्ठ प्रशासन अन आर्थिक विकास या उद्दिष्ठांची पूर्ती होणार हे प्रचारकार्यातून  लोकांच्या लक्षात आले. या निमित्ताने नरेंद्र मोदी व्यक्ती म्हणून कसे आहेत हे निवडणुकीच्या काळातील प्रचारात लोकांना समजून सांगाव लागले नाही तर आपोआप त्यांच्या कामाने ओळखता आले. ते सरळमार्गी आहेत, ते दारू पीत नाहीत, कुठलेही व्यसन त्यांना नाही. स्त्री शिक्षणाबद्दल त्यांचे प्रगतीशील विचार आहेत, घोषणा देऊन आकर्षित करणारे ते नाहीत, ठरवलेले काम ते पूर्ण करत्तात, राष्ट्रकार्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करतात. पैशापासून दूर आहेत व भ्रष्टाचार नाही ! माणसं जोडण्याची व ती सांभाळण्याची हातोटी हे लेखकाने उदाहरणासहित स्पष्ट केलय. जे आपल्यालाही अनुभवाने दिसतंय. त्यांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी नव्याने समजल्या. गैरसमज दूर झाले. मला वाटतं या पुस्तकाचा उद्देश तोच आहे.

     लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत नेहमीपेक्षा जास्त मतदान झालं. ६६.४% एव्हढे. जे यापूर्वी झाले नव्हतं. भारतातल्या जनतेला आता घराणे आणि परंपरेने चालणारे राजकारण नको होते. बदल हवा होता तो त्यांनी कौल देऊन करून दाखवला. ते मोदी यांचं व्यक्तिमत्व जवळून समजल्यामुळेच. निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यांची वयोवृद्ध आई मतदान करायला रिक्षातून गेली. अलिशान गाडीतून नाही. संसदेत प्रवेश करताना प्रथम ते पहिल्या पायरीवर डोके ठेऊन नतमस्तक झाले. हा प्रसंग आणि त्यांच्या ठायी दिसणारा संस्कार व मूल्यांबद्दल असणारा आदरभाव याचं दर्शन वेळोवेळी बातम्या व टीव्ही, वर्तमानपत्रे आदि माध्यमातून वेळोवेळी झाले आहे. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर झालेले परिवर्तन लेखकाने यात विषद केले आहे.     

 पिन्डे पिन्डे मतिर्भिन्न: कुंडे कुंडे नवं पया ||
 जातो: जातो: नवाचारा: नवा वाणी मुखे मुखे ||

कोणाकडून काम करून घेता येईल, कसं करून घेता येईल, योग्य कामासाठी योग्य व्यक्ती कोणती- याची चुणूक मंत्रिमंडळ स्थापन करताना दिसली. आपल्या मंत्रिमंडळातील पदे कर्तव्यदक्ष, निष्णात अशा व्यक्तींना त्यांनी  दिली. या व्यक्ती कशा आहेत व त्यांची वैशिष्टे लेखकाने सांगितली आहेत. त्यांचाही परिचय यातून होतो.

     देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, निवडणुकांपूर्वी केलेल्या भाषणात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडण्याची तयारी सुरु झाली. स्वच्छता अभियान, गंगा सफाई, परदेशी संबंधातील सुधारणा, व्यापार-वृद्धी, खेडी व लहान गावांचा विकास, यासाठी नागरिकांचा सहभाग, पोषक वातावरण निर्मिती, त्या बरोबरीने भ्रष्टाचार आणि लपवून ठेवलेला पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी निर्णय, सरकारचा कर चुकवून परदेशी बँकातील गुंतवलेला काळा पैसा उजेडात आणणे, पावसाचे पाणी अडवा पाणी जिरवा, सौर उर्जा, अशा कामांची सुरुवात झाली. बांगला देशाचा घुसखोरी, अतिक्रमण आणि सीमाप्रश्न  पंतप्रधान झाल्यावर त्यांनी दोन वर्षात मार्गी लावले. सीमा ठरवून घेण्यात आल्या,     
     ‘योग’ हे भारताचे वैशिष्ट्य ! याचे विसरत चाललेले महत्व लक्षात घेऊन भारतात पुन्हा प्रसार करता करता, आंतरराष्ट्रीय स्तरावर योग पोहोचविणे त्यांना आवश्यक वाटले आणि २४ सप्टेंबर २०१४ ला राष्ट्रसंघात केलेल्या भाषणात मोदींनी या बद्दल अपेक्षा व्यक्त केली, तर संयुक्त राष्ट्रसंघाने ११ डिसेंबर २०१४ ला त्याला मान्यताही दिली. २१ जूनचा दिवस हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळला जाऊ लागला.

      पुस्तकातल्या, केल्याने देशाटन या प्रकरणात देशात आर्थिक विकास व्हायला हवा असेल तर परदेशी गुंतवणूक  वाढली पाहिजे आणि आपली  निर्यातही वाढली पाहिजे, त्यासाठी मेक इन इंडिया अशी घोषणा देऊन नुसते न थांबता व्यापारवृद्धी साठी प्रयत्न केले. त्यासाठी परदेशी दौरे केले. २०१४ मध्ये ३४ देशांना भेटी दिल्या,२०१५ मध्ये सहा देशांना, तर २०१६ मध्ये अमेरिकेत दौरा केला हे सांगितले आहे. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, पाकिस्तान, हे दौरे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यास कारणी लागले असे म्हणता येईल. याबरोबरच लष्करात, वन रँक वन पेन्शन, जन धन योजना, भारतातील सर्व राज्यात एकच समान कर जी.एस.टी सेवा कर याची योजना, नद्याजोड प्रकल्प, पर्यटन विकास, आरक्षण, बेटी बचाव बेटी पढाव, मेक इन इंडिया आदि महात्वाकांशी उपक्रमांबरोबरच सबका साथ सबका विकास ही मोदींची घोषणा, अशा सगळ्या विषयांची थोडक्यात सामान्य माणसाला समजेल अशी माहिती डॉ.भा.ना.काळे यांनी या पुस्तकात दिली आहे. आपले पंतप्रधान कसे आहेत हे देशातल्या प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे.

     योजकस्तत्र दुर्लभ: हे पुस्तक नागपूरच्या ज्ञानेश प्रकाशनने प्रकाशित केले आहे. पुस्तकाचा विषयच महत्वाचा असल्याने पुस्तकाबद्दल लिहायचे तर पंतप्रधान मोदींबद्दल व त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल लिहायलाच हवे. देशाभिमानाचा विचार करता आमच्या पंतप्रधानांचा आम्हाला परिचय असायलाच हवा.
 ----------------------------------------------------------------------------------                                                                                                                         

 --- डॉ. नयना कासखेडीकर

Tuesday, 11 April 2017

जालियनवाला बाग


घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जायचे तेंव्हा किमान अमृतसरला तरी भेट द्यायची असे ठरवले होतेच. तिथल्या इतिहासाच्या पाऊलखुणा बघायच्या. लहानपणी शालेय पाठ्यपुस्तकात इतिहासात जालियानवाला हत्याकांड यांवर धडा होता. त्या धड्यातला एक प्रसंग मनावर कोरला गेला होता तो म्हणजे, ब्रिटिशानी अंदाधुंद चालवलेल्या गोळीबारात अमृतसर मध्ये लोकांनी जीवाच्या भीतीने विहिरीत उड्या टाकल्या. बापरे ! या विषयाचं गांभीर्य त्या लहान वयात काही फारस नव्हतं. मात्र आज त्या विहिरीसमोर आम्ही उभे होतो अत्यंत गंभीरपणे. वरवर बघता ही जालियानवाला बाग छान, सुंदर निगराणीत ठेवलेली बाग. पण आत जाताच या काळ्या इतिहासाच्या खुणानी भरलेली, दु:खाने भारलेली, विश्वातल्या सर्वात मोठ्या नरसंहाराची वेदना सोसलेली ही जागा.




१०,११,१२ एप्रिल १९१९ पंजाब धुमसत होताच. लोकप्रिय नेते डॉ.सत्यपाल आणि सैफ़ुद्दिन किचलू आणि महात्मा गांधी यांना पंजाब मध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती. जाळपोळ सुरु होती. कर्फ्यू लावला गेला होता. संतप्त झालेल्या लोकांनी मोर्चा काढला, त्यावर सैनिकांनी गोळीबार केला, परिस्थिती आणखीनच चिघळली. लोकांना न्याय हवा होता.  



१३ एप्रिल १९१९ चा रविवार, बैसाखी चा सण. त्यामुळे अमृतसरच्या आजूबाजूच्या गावातील अनेक शेतकरी व इतर लोक बैसाखी साजरा करायला अमृतसरला आले होते. दुपारी साडेचारची वेळ: जालियानवाला बाग-ब्रिटीश सरकारने केलेल्या रौलेक्ट कायद्या विरोधात शांततापूर्ण निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. यासाठी २०,००० लोक एकत्र आले होते. सैनिकांनी बागेला संपूर्ण वेढा दिला होता. आत जाण्यासाठी एकच अरुंद रस्ता होता. तिथपासून चारी बाजूला सैनिकांचा वेढा. जनरल डायर १५० सैनिकांबरोबर बागेत पोहोचला. मुख्य प्रवेश दारावर एका उंच ठिकाणी त्याने स्वत:ची जागा निश्चित केली. सूर्यास्ताला सहा मिनिटे बाकी असताना त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता सैनिकांना जमलेल्या लोकांवर बंदूक चालवण्याचे आदेश दिले. जमलेल्या लोकांमध्ये स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे सुद्धा होती. १० ते १५ मिनिटांत एक हजार सहाशे पन्नास गोळ्या चालल्या. गोळ्या संपेपर्यंत सैनिकांच्या बंदुका चालूच  होत्या. जीव वाचविण्यासाठी सगळे जण बाहेरचा रस्ता शोधत, दिसेल तिकडे पळत होते. जीवाच्या आकांताने जखमी लोक सैरावैरा पळत होते. काही चेंगराचेंगरीत गेले. शेकडो लोकांनी विहिरीत उड्या घेतल्या. मृतांचे आणि जखमींचे ढीग पडले होते. बैसाखी सणाच्या दिवशीचे हे हत्याकांड.




या हत्याकांडात हजारो निरपराध लोक मारले गेले. दोन हजारावर जखमी झाले. या हत्याकांडानंतर इंग्रजांनी मार्शल लॉं लागू केला. अनेकांची धरपकड केली, भारतीय सदस्य शंकर नायर यांनी या हत्याकांड विरोधात व्हाइसरॉय च्या कार्यकारिणी समितीचा राजीनामा दिला. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली ‘सर’ ही उपाधी परत केली. जालियानवाला बाग या ठिकाणी होणाऱ्या जनसभेत भाग घ्यायला महात्मा गांधी सुद्धा निघाले होते, परंतु त्याआधीच त्यांना पलवल रेल्वे स्टेशनवर १० एप्रिलला अटक करण्यात आली. ब्रिटीश सरकारच्या या क्रूर आणि निर्दयी  अत्याचाराची ही करणी नुसते पंजाबच नाही तर संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा वन्ही चेतवण्यास कारणीभूत ठरली. असे हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचे एक महत्वाचे प्रतिक म्हणजे जालियानवाला बाग !




हे ठिकाण अमृतसर शहराच्या मध्यभागी असून कुठूनही येथे पोहोचण्यासाठी सायकल रिक्षा, रिक्षा उपलब्ध आहेत. अशा या बागेत मुख्य प्रवेशदारातून एकदा आत गेलं कि डोक्यात फक्त विचार असतो तो इथे असे काय घडले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा. इथे दिसतात, घडलेल्या हत्याकांडांचे दुख:द आठवण करून देणाऱ्या खुणा, घडलेल्या घटनेच्या साक्षीदार असलेल्या प्रतिमा. डावीकडे शहीदी चित्र कलादालन आहे ज्यात या घटनेच्या इतिहासाची ओळख होते. पुढे गेल्यावर अंदाधुंद गोळीबार होत असताना उड्या घेतल्या ती विहीर आहे. जी आज स्मारक म्हणून उभी आहे. त्याच्या शेजारीच पुढे लागून असलेल्या घरांच्या भिंतीवर अजूनही बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा तशाच असलेल्या भिंती. बुलेट मार्क असलेल्या एका भिंतीवर तर गोळ्यांच्या २८ खुणा स्पष्ट दिसतात. एक हजार सहाशे पन्नास राउंड फायर केले गेले होते. समोर शहिदांचे स्मारक आणि ‘अमर ज्योती’ -निरपराध लोकांच्या हत्येची सतत आठवण करून देणारी धगधगती ज्योती ! सारंच कसं अंगावर शहारे आणणारे !




शहीदि चित्रशाला मध्ये मोठ्ठं पेंटिंग लावलंय, मन घट्ट करून ते पाहावं लागतं. हत्याकांडा वेळी काय दृश्य होतं ते बघून मन थरकापतं. पेंटिंग बारकाईने बघितले तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या त्या क्षणाच्या भावना, भीती, हे  चित्रकाराने हुबेहूब रंगवलंय. या प्रसंगाची भयानक वास्तवता हे पेंटिंग दाखवतं.

अमृतसर हे अखंड भारतातलं पंजाब प्रांतातील एक मुख्य शहर. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर सहभाग असलेले. पंजाब आणि लाहोर च्या फाळणीची झळ सोसलेले.





संत नामदेवांची कर्मभूमी घुमानला गेल्यावर, आमच्या संतांचे दुसऱ्या प्रांतात केलेले अतुलनीय काम बघून मन जेव्हढे अभिमानाने भरून आले, तेव्हढेच जालियानवाला बाग बघून स्वातंत्र्य योद्ध्यांपुढे मन अभिमानाने  नतमस्तक ही झाले. देशासाठी जीव गमवाव्या लागलेल्या या निरपराध लोकांना शतश: प्रणाम!
                                                     _________________
   

-  डॉ. नयना कासखेडीकर.

       

Wednesday, 25 January 2017

भारतरत्न-पंडित भीमसेन जोशी

                  

               भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
                    
   

   संगीताचा ध्या त्यासाठी केलेले अविरत कष्ट, अखंड परिश्रम, एकनिष्ठ गुरुसेवापंच्याहत्तर वर्ष गुरूंची स्वरसाधना केलेले अद्वितीय कलासाधक अर्थात पंडित भीमसेन जोशी.किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक. त्यांची ख्याल शैली आणि भजन गायन यासाठी ते प्रसिद्ध होते. शुद्ध कल्याण, मिया की तोडी, पुरीया  धनश्री, मुलतानी, भीमपलास, दरबारी, रामकली हे राग म्हणजे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. त्यांनी आपल्या तेजस्वी दमदार आणि आक्रमक सुरांनी कोटीकोटी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे त्यांच्या संगीत साधनेला केलेला मानाचा मुजराच. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि इतर अनेक पुरस्कारा नंतर आता भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वजण मनातून आनंदले होते.  जो तो आपल्या परीने आनंद व्यक्त करत होता. धन्यता अनुभवत होता. पंडितजींचे भक्त आणि संगीताचे अभ्यासक पंडित विजय कोपरकर, तसेच पंडितजींच्या सहवासातले त्यांचे साथीदार, टाळ वादक माऊली टाकळकर, तबला वादक चंद्रकांत कामत यांनी अनुभवलेले क्षण, प्रसंग, किस्से पंडितजींचा भूतकाळ उलगडून दाखवतात.   

     कार्यक्रमातल्या आणि पंडितजींच्या सहवासातल्या आठवणी सांगताना माऊली टाकळकर म्हणतात, "१९७६' पंडितजींची आणि माझी ओळख झाली. ठाण्याला होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे टाळकरी येणार नव्हते. तेव्हा माझे मित्र विठ्ठल कदमांनी मला विचारले मला एकदम दडपण आले. एवढ्या मोठ्या माणसाला साथ करायची मी भीतीने नाही म्हटले. पण अडचण लक्षात घेऊन शेवटी होम्हटल. यावेळी केलेल्या साथीवर पंडितजी एवढे खुश झाले. त्यांनी सांगितले यांना आपल्या कार्यक्रमात नेहमीसाठी घ्या. तेव्हापासुन आजपर्यंत आमचे सूर जुळलेले राहिले. हे पूर्व जन्मीचे संचीतच होय."  

     पंडितजी एकदा का कार्यक्रमात गायला बसले की त्यांचा पहिला सा लागताना उपस्थित श्रोत्यांची खात्रीच पटायची की आजचा कार्यक्रम एकदम जमून जाणार. मी ३३ वर्षे त्यांच्याबरोबर साथ केली आहे. ३००० संतवाणीचे कार्यक्रम केले आहेत. १९९० जेव्हा संतवाणी बंद केला तेव्हा मी काळजीने त्यांना विचारलं, "आता माझे पुढे काय?" ते म्हणाले, "माझ काय म्हणजे तू आता माझ्या बरोबर कायमच राहणार. मी क्लासिकलमधे प्रत्येकवेळी एक अभंग म्हणणारच. तेव्हा तुला एका अभंगासाठी का होईना घेऊन जाणार. मी त्यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र एवढंच काय भारतभर तसच अमेरिका, इंडोनेशिया, जकार्ता, सिंगापूर, दुबई, अबुधाबी, मस्कत, बहारीन, शारजा इथेही गेलो. भारताबाहेर पंडितजींबद्दल फार आदर आहे. संतवाणीची अफाट लोकप्रियता हे त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे. तेवढी त्या गाण्याची तपश्चर्या आहे. तीर्थ विठ्ठल... हा अभंग गाताना ते जेव्हा विठ्ठल विठ्ठल...... ठ्ठ्लss.... ठ्ठ्ल.....s.....s म्हणायचे तेव्हा आमच्या अंगावरचे केस ताठ उभे रहायचे. एवढी त्यांच्या गाण्याशी एकरूपता होती. शब्दोच्चार व त्याच्याशी एकरूप होण्याची सवय, त्यातल्या भावाचे सादरीकरण म्हणजे स्वर ब्रम्हानंदीच लागायचा. त्यामुळे आम्ही सुद्धा तल्लीन व्हायचो. 

       गाण्यातल्या शब्दांचे उच्चार जसेच्या तसे अभंगात यायला हवेत. याकडे वत्सलाबाईंचाही फार कटाक्ष असायचा. एखादा शब्द मागेपुढे झाला की त्यांच्या लगेच लक्षात यायचं. गाण्याच्या रेकॉर्डींगला त्या जातीने हजर असत. खटलेल्या गोष्टीत रेकॉर्डींग थांबवन त्यावर चर्चा करून लगेच दुरुस्ती करवुन घेत.            

        पंडितजी बालगंधर्वांना गुरूप्रमाणेच मानत. त्यांच्या संपूर्ण संतवाणीमध्ये बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि सवाई गंधर्व यांचा मिलाफ असे. कान्होबा तुझी घोंगडी... म्हणताना, पंडितजी मा. कृष्णरावच जणू उभे करायचे. तीर्थ विठ्ठल, इंद्रायणी काठी, नामाचा गजर, अणुरणीया थोकडा हे सर्वच अभंग लोकप्रिय. कितीही वेळा ऐकले असले तरी लोक त्यांचीच फर्माईश करायचे. कारण या सगळ्या गाण्यात पंडितजींनी जीव ओतला. जस लोकांच त्यांच्या गाण्यावर प्रेम तस पंडितजींच लोकांवर प्रेम. गेल्या सवाई गंधर्व महोत्सवात पंडितजी गायले. ते म्हणाले गेली दोन वर्षे मी गायलो नाही. लोक नाराज होतात. यावेळी मी १५ मिनिटे गाईन आणि दोन वर्षात गाण्याला स्पर्शही नव्हता. आजारी होते. तरीही ठरवन गायले. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अहो परमेश्वरी कृपेशिवाय हे होऊच शकत नाही. त्यांची ७५ वर्षांची सुरांची तपश्चर्या ही काही साधीसुधी नव्हती.  

      एकदा पैठणला महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला, नाथषष्ठीचा कार्यक्रम होता. संध्याकाळच्या कीर्तनानंतर रात्री १० ला संतवाणीचा कार्यक्रम होता. पैठणला जात असताना वाटेत आमची आणि पंडितजींच्या गाडीची चुकामुक झाली. आम्ही वेळेत पोहोच शकलो नाही. तिथे जमलेले लोक मात्र आमची वाट पाहून तिथेच झोपी गेले होते. प्रचंड गर्दी. ८० हजारावर लोक होते. आम्ही पोहोचल्यावरपंडितजी आल्याचे कळताच सर्व रसिक झोपेतून उठून कार्यक्रमाला हजर आणि रात्री २ वाजता कार्यक्रम सुरु झाला.

     कन्नडमध्ये त्यांची जवळजवळ १५० भजने आहेत. मराठीत १२५ भजने त्यांनी गायिली आहेत. सगळीच्या सगळी लोकप्रिय झाली. ते कलाकार आम्हा साथीदारांनाही खुश ठेवायचे. मान द्यायचे. आपलेपणाने वागवायचे. दुजाभाव कधीही केला नाही. फारफार मोठ्या मनाचे. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले.

      चंद्रकांत कामत १९५६ ते १९६७ पर्यंतचा काळ पंडितजींच्या बरोबर तबल्याची साथ करायला होते. त्यांच्या अनेक गाजलेल्या कार्यक्रमाच्या व प्रवासातल्या आठवणी सांगताना ते म्हणतात "आकाशवाणी पुणे केंद्रावर तबलावादक म्हणून रुजू झालो आणि त्याच सुमारास आकाशवाणीच्या संगीत सभेत भीमसेनजी गाणार होते. त्यावेळी या सभांचे आकाशवाणीवरून थेट प्रसारण होत असे. त्यात थिरकवा साहेबांचे तबलावादन सुरुवातीला आणि नंतर पंडितजींचे गाणे. पंडितजींनी मला धीर दिला की तू तुझ्या पद्धतीने वाजव ताण घेऊ नकोस. मी तर नॉर्मलच होतो. भीमसेनजींनी अभोगीराग गायला. 'चरण घर आये....'  ही झपतालातील बंदीश होती. कार्यक्रमानंतर ते आतमध्ये आले आणि मला मिठीच मारली. म्हणाले, फारच सुंदर ठेका दिलात. आता तुम्हाला माझ्या बरोबर गाण्याला घेऊन जाणार. मी बोलवीन तेव्हा माझ्या बरोबर यायचं.” आणि लगेच १५ दिवसात फलटणच्या कार्यक्रमाचा निरोप आला. त्यांच्या गाण्याच्या बैठकीचा साचा ठरलेला असायचा. त्यात बदल नाही. पहिला एक राग, नंतर ठुमरीत्यानंतर इंद्रायणी काठी, मग मध्यंतर! त्यानंतर मालकंस, मग नाट्यसंगीत आणि शेवटी भैरवी. असं पाच ते सहा तास गाणं व्हायचं. ते ही एका दमात. पंडितजी एक राग दोन तास गायचे. ते नावाप्रमाणेच 'भीम' होते.

                           

       संतवाणीच्या जन्माची कहाणी सांगताना चंद्रकांत कामत म्हणाले, "बेडेकर गणपतीवाले गोविंद बेडेकर आणि रमेश देशमुख पंडितजींना म्हणाले, की नुसत्या अभंगांचा एक कार्यक्रम करू." त्यानुसार नुकतचं पुणे आकाशवाणी केंद्रावर अणुरणीया, तीर्थ विठ्ठल, अधिक देखणेपण, पंढरीनिवासा, हे अभंग रेकॉर्ड झाले होते. आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम करायचा ठरला. पेपरला जाहिरात दिली. पण कार्यक्रमाची रूपरेषाच ठरली नव्हती. आषाढी एकादशी, वारकरी संप्रदाय या पार्श्वभूमीवर सुरुवात जयजय रामकृष्ण हरीनेच व्हायला पाहिजेना. शिवाय संतवाणी मध्ये अभंगच हवेत. दुसरी गाणी चालणार नाहीत. मग तशी रचना ठरली. 'रूप पाहता लोचनीहे सुरु झाल्याशिवाय अभंग सुरूच करत नाही. असा रिवाजच आहे मुळात. पण पंडितजी म्हणाले या पद्धतीने एकदाच गाईन. पुन्हा गाणार नाही. मी म्हटलं, अहो तुम्हाला आवडत नसलं तरी लोकांना तेच आवडतयं. त्यामुळे तुम्हाला तसच गावं लागेल. त्यांना वाटलं हे आपल्याला नेहेमी जमणार नाही. या कार्यक्रमाची तिकीट विक्री केव्हाच संपली. पहिलाच हाउसफुल्ल कार्यक्रम पुणे विद्यार्थिगृहात झाला. इतकी अलोट गर्दी झाली की पोलीस बंदोबस्त बोलवायला लागला. नंतर लगेच कार्तिकी एकादशीला कार्यक्रम झाला. मग मागणी वाढतच गेली. कुणी संस्थेकरता, कुणी मदतीकरता, कुणी एखाद्या निमित्ताने कार्यक्रम ठेवु लागले. प्रत्येक ठिकाणी अलोट गर्दी.

     पैठणच्या कार्यक्रमात तर एवढी प्रचंड गर्दी. आमचा कार्यक्रम सुरु झाला. पंडितजींनी ख्याल सुरु केला. प्रेक्षकात समोरच प्रचंड कोलाहल सुरु होता. एक आवर्तन होत नाही तोवर लोक उठून जाऊ लागले. पंडितजी मला म्हणाले अरे काय करायचं. तू काय वाजवतोस हे मला काहीही ऐकायला येत नाही. मी म्हटलं तुम्ही काय गाताय हे मलाही ऐकू येत नाही. इतका कोलाहल होता. त्यांनी द्रुत चीज सुरु केली आणि समोरच्या महिला एकदम उठल्या त्यांना वाटलं गाण संपल. त्यांनी ऐकलेलच नव्हत कधी. ते पाहून पंडितजींनी एवढा मोठा षड्ज लावला आणि अवघाची संसार अभंग सुरु केला. क्षणातच सर्व लोक खाली बसले. शांतता पसरली. सहा अभंग, मध्यंतर, नंतर सात अभंग असा संतवाणीचा कार्यक्रम झाला.          

    कर्नाटकातल्या कोप्पळ गावाला कार्यक्रम ठरला होता. गाव यायच्या दहा मैल अलीकडेच एका जंगलात गाडी नादुरुस्त झाली. काय बिघडलय ते समजेना. पंडितजी स्वतःच चालवित होते. शेवटी कोप्पळला वाट पहात असतील म्हणून निरोप देण्यासाठी माधव गुडेला चालत जायला सांगितले. रात्रभर आम्ही विश्रांती घेतली. सकाळी उठून पंडितजींनी पुन्हा प्रयत्न केला. तर गाडी सुरु झाली. आम्ही तासाभरात साडेसातला कोप्पळला पोहोचलो. समोरच दृश्य पाहून लोकांच्या प्रेमाची कल्पना आली. गाणं ऐकायला पंचक्रोशीतली पाच ते सहा हजारावर माणसे रात्रीपासन वाट पहात थांबली होती. पंडितजींनी लोकांची माफी मागितली आणि संतवाणीचा कार्यक्रम झाला. इतकी कर्नाटकात सुद्धा त्यांची लोकप्रियता होती. भारतरत्न पुरस्काराचा जेवढा आनंद आपल्याला झाला तेवढाच आनंद पंडितजींच गाणं ऐकताना कर्नाटकातल्या लोकांच्या चेहऱ्यावर मी पाहिल आहे. प्रेमापोटी हे लोक एक काय दोन-दोन दिवस वाट पहात थांबले आहे.  

    भीमसेनजींच्या दातृत्वाची एक आठवण सांगताना म्हणाले, केवढं दिलदार व्यक्तिमत्व आहे. १९७३-७४ ची गोष्ट आहे. नागपूरला साईबाबांचे मंदीर बांधण्यासाठी निधी संकलन म्हणून संतवाणीचा कार्यक्रम होणार होता. त्याला अभिनेते दिलीप कुमार हजर होते. तेव्हा दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. पहिल्या रांगेतल्या लोकांनी १० हजार रुपये दिले होते. राखीव खुर्चीचा दर जाहीर करण्याची पद्धत तेव्हा नव्हती. त्याचप्रमाणे दिलीप कुमार यांची सही असलेल्या फोटोचा लिलाव केला जात होता. हे सर्व संस्थेच्या मदतीसाठीच होते. शेवटची फोटोची बोली ५०० रु. झाली. त्यापुढे किंमत जातच नव्हती. शेवटी भीमसेनजींनी तो फोटो ६०६ रुपयांना विकत घेतला. हा फोटो आजही त्यांच्या घरात लावला आहे.      

    पंडित विजय कोपरकर आठवण सांगताना म्हणतात, पंडितजींचे कार्यक्रमातील गायलेले तास मोजले तर त्यांच्या इतक रेकॉर्ड कुणी केले असेल असं मला वाटत नाही. अगदी दुर्गम भागापासन लांब लांबवर प्रवासाला जाऊन ५-५/६-६ तासांच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम १९५६ ला झाला, असे म्हणतात. तेव्हापासुन ५२ वर्षे ते संगीताची दीर्घ साधना केली. कुठेही गेले तरी त्यांच गाणं तितकच लोकप्रिय होत. हे त्यांचं वैशिष्ट्य.

     किराणा घराण्याचे संस्कार व ते गाणं त्यांच्यामध्ये आहेच. पण ते नेहेमी सांगायचे की, मी अमीरखाँ साहेब, केसरबाई केरकर, अंजनीबाई यांच्या गाण्याचा अभ्यास खूप बारकाईने केला आहे. अमीरखाँ आणि बालगंधर्वांच्या गाण्यांचे ते निःस्सीम चाहते आहेत. त्यांनी केलेल्या 'नाट्यरंग' या कार्यक्रमातून ते प्रेम दिसतंच, त्यांच्या गायकीत घराण्यांचा, संस्काराबरोबरच जो वेगवेगळ्या गोष्टींचा अविष्कार दिसतो तो त्यांच्या प्रतिभेचा भाग आहे. दुसरे म्हणजे किराणा घराण्याची सूरप्रधान व संथगायकी ही त्यांच्यात होतीच. पण त्याचबरोबर ग्वाल्हेर घराण्याची लयकारी ज्याला सुप्त लयकारी म्हणतात तीही होतीच.      

     त्यामुळे भीमसेनजींच्या गाण्याला लोक खिळून जायचे. कारण त्यांचे कुठलेही शब्द म्हणा, बोल त्या लयीच्या आवर्तनाशी अतिशय बांधन यायचे. त्यांची तपश्चर्या म्हणजे, त्यांनी सात-सात,  आठ-आठ  तास रियाज केला आहे. गुरु सवाई गंधर्वाच्या घरी कष्ट केले आहे, त्यांची सेवा केली आहे. तेव्हा हे संगीताचं वैभव त्यांना मिळालं आहे. ही कष्टसाध्य विद्या त्यांनी मिळविली, पुढेही रियाज करून, साधना करून जी सिद्धी त्यांना मिळाली म्हणूनच त्यांच गाणं सामान्य माणसालाही भावल. जसे 'पिया मिलन की आंस.....', ही ठुमरी असेल 'जो भजे हरी को सदा.....', हे भजन किंवा कोमल रिषभ आसावरीमधली  'मै तो तुमरो दास.....'  ही बंदीश. असं कुठलही गाणं भावपूर्णच आहे. मग ते क्लासिकलमध्ये असो, वा ठुमरीमध्ये. ते रसप्रधानच आहे. आणि हा त्यांचा स्वतःचा विचार आहे. या भावपूर्ण गायकीमध्ये त्यांच्या 'संतवाणी' चाही मोठा वाटा आहे.

    भीमसेनजींनी आपली किराणा घराण्याची गायकी सुयोग्य वैशिष्ट्यांनी अलंकृत करून मांडल्याने व रागदारीवर आधारलेली अभंगवाणी लोकप्रिय केल्याने जनमानसात आवडत्या गायकाचे खास स्थान निर्माण केले आहे. संतवाणीमुळे त्यांचं गाणं अगदी सामान्य गावातल्या लोकांपर्यंत, वारकरी संप्रदायापर्यंत आणि संत परंपरेपर्यंत ते लोकप्रिय झाल. 'संतवाणी' म्हणजे काय होतं ?  उदा.  "जय जय राम कृष्ण हरी..."  हे काय त्यांच्या दृष्टीने यमनच होता. 'केतकी गुलाब...',  'धन्य ही स्वर्गाहून लंका...'  ही सिनेमातली गाणी ऐकताना सुरांचा बाज आणि भारदस्तपणा आपल्याला जाणवतो ".           

    संतवाणी आणि अभंगवाणी हे अल्बम राम फाटक आणि श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केले होते. ते तर मैलाचा दगड ठरले. त्यांनी चित्रपटांसाठीही गायन केले. तानसेन’, ‘सुरसंगम’, ‘बसंत बहार’(१९५५गीत- केतकी गुलाब जुही... शंकर जयकिशन यांच्या आग्रहस्तव मन्नाडे यांच्या बरोबर जुगलबंदी ), ‘अनकहीया चित्रपटासाठी ते गायले आहेत. अनकही(१९८४) या अमोल पालेकर दिग्दर्शित चित्रपटात पंडितजींनी दोन भजनं गायली आहेत. अमोल पालेकर यांनी, ‘ही भजने आपण गावीतअशी विनंती पंडितजींना केली.त्यांनी चित्रपटाची कथा ऐकली, व्यक्तिरेखा समजून घेतली आणि विचारलं, संगीत कोण देतय? ‘जयदेव. हे  ऐकताच, कानाला हात लावत, “फार मोठा संगीतकार ,मी जरूर गाईन, फक्त एक अट आहे, जयदेवजींनी मला गाणं नीट शिकवायला हवं,माझी नीट तालिम त्यांनी करून घ्यायला हवी”. असे ठरल्यावर प्रत्यक्ष भेटीत, जयदेवना त्यांनी सांगितलं, मी तुमचं नवखा शिष्य आहे असं समजून मला शिकवा. गाण्यातली प्रत्येक जागा नं जागा मला समजावून सांगा. असं निक्षून सांगितलं.मोठ्या भारावलेल्या वातावरणात रघुवर तुमको मेरी लाज आणि ठुमक ठुमक पग ही भजनं रेकॉर्ड झाली. याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.       

त्यांच्या अशा अनेक आठवणी संगीत क्षेत्रात बर्‍याच जणांकडे आहेत, त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा अनेक प्रसंग दिले आहेत, ज्यामुळे एका संगीताचार्याचे आयुष्य कसे होते, कलेकडे बघण्याचा दृष्टीकोण, गुरूंकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा होता, कष्ट करण्याची तयारी, घराण्याची शिस्त या सर्व गोष्टींचे आकलन आपल्याला होते. स्वत: सोळा सोळा तास रियाज केलेल्या पंडितजींनी एकदा संस्कार भारतीने आयोजित केलेल्या, संगीत मार्गदर्शन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना, 'रियाज कसा करावा' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी रियाजाबद्दल बोलताना ते म्हणाले, रियाज  आणि  महफिल  यात  असा  फरक  आहे  की, जे  आपल्याला  येतं ते  गाणं,  म्हणजेच  ती  महफिल  असते  आणि  जे आपल्याला  येत  नाही  ते  करणं  म्हणजे  रियाज  असतो  .      

                               
    दूरदर्शनवरच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात त्यांना सुहासिनी मुळगावकरांनी प्रश्न विचारला की, प मोठमोठे कलाकार परदेशात जाऊन येतात तुम्हीही जाऊन आलात, तुम्हाला काय वाटतं? त्यावर पंडितजी म्हणाले, कावळे आणि पक्षीही परदेशात जातात. त्यात काय विशेष आहे.

     तसच, राजकारणात जावसं वाटलं नाही का?  या पुढच्या प्रश्नावर ते मार्मिकपणे म्हणाले, "आमचं वरून सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनीच आम्हाला निवडून खाली पाठविले आहे."

      पंडितजिंची लोकप्रियता इतकी वाढली होती की, ते संगीत मैफिलींसाठी वारंवार विमान प्रवास करत असत. कधी कधी तर एका दिवशी दोन वेगळ्या शहरात मैफिली असत, तेंव्हा विमानाने जाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे पु.ल. देशपांडे यांनी गमतीने त्यांना हवाईगंधर्वही पदवी दिली होती.

     राजकारणी पुढाऱ्यांमध्येही पंडितजींचे असंख्य चाहते आहेत. अफाट लोकप्रियता असतानाही त्यांनी त्याचा कधीच गैरफायदा घेतला नाही. पंतप्रधान झाल्यावर "मी गाडीत आपल्याच कैसेट एकतो" असे राजीव गांधींनी सांगितले. त्यांनी राज्यसभेचे मानद सभासद होण्याचे निमंत्रण दिले. पण पंडितजींनी स्पष्ट नकार दिला. ही पदं मिळविण्यासाठी काही जण रितसर धडपड करीत असतात. पण पंडितजींनी ते नम्रपणे नाकारले. याबाबत राजीव गांधींनी स्वतः फोन करून विचारले असता पंडितजींकडून त्यांना शांतपणे उत्तर मिळाले की, "मेरे दो तानपुरे ही मेरे लिये राज्यसभा और लोकसभा है" असे इतके नम्र आणि समाधानी .

    साथीदारांनाही ते खुप प्रोत्साहन देत. त्यांच्या कुठल्याही अटी नसायच्या. त्यांना ते खुप संधी देत. कधीही त्यांनी साथीदारांचा अपमान केला नाही. अपशब्द नाहीत. रागावणं नाही. दूरदर्शनने १९८५ मध्ये तयार केलेले देस रागातील 'मिले सूर मेरा तुम्हारा' या अभिनव प्रयोगानंतर भीमसेनजी घराघरात पोहचले. या क्षेत्रातले ते आयडॉल झाले. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ त्यांनी पुण्यात सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव दरवर्षीच त्यांचे स्मरण करून देणारा असेल. हा महोत्सव म्हणजे पुण्याची शान आहे. आज ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांना पाहिलेले क्षण, त्यांच्या ऐकलेल्या महफिली अशा त्यांच्या आठवणी आणि त्यांचा आवाज कायम आपल्यासोबत असणार आहे. अजूनही गेली कित्येक दशके आमची सकाळ पंडितजींच्या अभंगाने सुरू होते आणि दिवस रात्रीच्या दुर्गा, मालकंस, दरबारी अशा रागातल्या शास्त्रीय गायनाने संपतो. संगीताच्या इतिहासात त्यांचे स्थान अजरामर राहील. त्यांचे एक गीत ऐकून निरोप घेऊया ! 

हे पंडितजींचं गाणं तुमच्यासाठी --- भाग्यदा लक्ष्मी ...खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा . 

https://www.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g      

© डॉ.नयना कासखेडीकर.

---------------------------------------

 (हा लेख पंडितजींना भारतरत्न मिळाले तेंव्हा लिहिला होता .)