कार्यक्रमातल्या आणि पंडितजींच्या सहवासातल्या आठवणी सांगताना माऊली टाकळकर म्हणतात, "१९७६' पंडितजींची आणि माझी ओळख झाली. ठाण्याला होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे टाळकरी येणार नव्हते. तेव्हा माझे मित्र विठ्ठल कदमांनी मला विचारले मला एकदम दडपण आले. एवढ्या मोठ्या माणसाला साथ करायची मी भीतीने नाही म्हटले. पण अडचण लक्षात घेऊन शेवटी ‘हो’ म्हटल. यावेळी केलेल्या साथीवर पंडितजी एवढे खुश झाले. त्यांनी सांगितले यांना आपल्या कार्यक्रमात नेहमीसाठी घ्या. तेव्हापासुन आजपर्यंत आमचे सूर जुळलेले राहिले. हे पूर्व जन्मीचे संचीतच होय."
गाण्यातल्या शब्दांचे उच्चार जसेच्या तसे अभंगात यायला हवेत.
याकडे वत्सलाबाईंचाही फार कटाक्ष असायचा. एखादा शब्द
मागेपुढे झाला की त्यांच्या लगेच लक्षात यायचं. गाण्याच्या रेकॉर्डींगला त्या जातीने
हजर असत. खटकलेल्या गोष्टीत रेकॉर्डींग थांबवून त्यावर चर्चा करून लगेच दुरुस्ती करवुन घेत.
पंडितजी बालगंधर्वांना गुरूप्रमाणेच मानत. त्यांच्या संपूर्ण संतवाणीमध्ये बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि सवाई गंधर्व यांचा मिलाफ असे. ‘कान्होबा तुझी घोंगडी... म्हणताना, पंडितजी मा. कृष्णरावच जणू उभे करायचे. तीर्थ विठ्ठल, इंद्रायणी काठी, नामाचा गजर, अणुरणीया थोकडा हे सर्वच अभंग लोकप्रिय. कितीही वेळा ऐकले असले तरी लोक त्यांचीच फर्माईश करायचे. कारण या सगळ्या गाण्यांत पंडितजींनी जीव ओतला. जसं लोकांचं त्यांच्या गाण्यावर प्रेम तसं पंडितजींचं लोकांवर प्रेम. गेल्या सवाई गंधर्व महोत्सवात पंडितजी गायले. ते म्हणाले गेली दोन वर्षे मी गायलो नाही. लोक नाराज होतात. यावेळी मी १५ मिनिटे गाईन आणि दोन वर्षात गाण्याला स्पर्शही नव्हता. आजारी होते. तरीही ठरवून गायले. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अहो परमेश्वरी कृपेशिवाय हे होऊच शकत नाही. त्यांची ७५ वर्षांची सुरांची तपश्चर्या ही काही साधीसुधी नव्हती.
एकदा पैठणला महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला, नाथषष्ठीचा कार्यक्रम होता. संध्याकाळच्या कीर्तनानंतर रात्री १० ला संतवाणीचा कार्यक्रम होता. पैठणला जात असताना वाटेत आमची आणि पंडितजींच्या गाडीची चुकामुक झाली. आंम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही. तिथे जमलेले लोक मात्र आमची वाट पाहून तिथेच झोपी गेले होते. प्रचंड गर्दी. ८० हजारावर लोक होते. आम्ही पोहोचल्यावर, पंडितजी आल्याचे कळताच सर्व रसिक झोपेतून उठून कार्यक्रमाला हजर आणि रात्री २ वाजता कार्यक्रम सुरु झाला.
कन्नडमध्ये त्यांची जवळजवळ १५० भजने आहेत. मराठीत १२५ भजने त्यांनी गायिली आहेत. सगळीच्या सगळी लोकप्रिय झाली. ते कलाकार आम्हा साथीदारांनाही खुश ठेवायचे. मान द्यायचे. आपलेपणाने वागवायचे. दुजाभाव कधीही केला नाही. फारफार मोठ्या मनाचे. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले”.
चंद्रकांत कामत १९५६ ते १९६७ पर्यंतचा काळ पंडितजींच्या बरोबर तबल्याची साथ करायला होते. त्यांच्या अनेक गाजलेल्या कार्यक्रमाच्या व प्रवासातल्या आठवणी सांगताना ते म्हणतात "आकाशवाणी पुणे केंद्रावर तबलावादक म्हणून रुजू झालो आणि त्याच सुमारास आकाशवाणीच्या संगीत सभेत भीमसेनजी गाणार होते. त्यावेळी या सभांचे आकाशवाणीवरून थेट प्रसारण होत असे. त्यात थिरकवाँ साहेबांचे तबलावादन सुरुवातीला आणि नंतर पंडितजींचे गाणे. पंडितजींनी मला धीर दिला की तू तुझ्या पद्धतीने वाजव ताण घेऊ नकोस. मी तर नॉर्मलच होतो. भीमसेनजींनी ‘अभोगी’ राग गायला. 'चरण घर आये....' ही झपतालातील बंदीश होती. कार्यक्रमानंतर ते आतमध्ये आले आणि मला मिठीच मारली. म्हणाले, “फारच सुंदर ठेका दिलात. आता तुम्हाला माझ्या बरोबर गाण्याला घेऊन जाणार. मी बोलवीन तेव्हा माझ्या बरोबर यायचं.” आणि लगेच १५ दिवसात फलटणच्या कार्यक्रमाचा निरोप आला. त्यांच्या गाण्याच्या बैठकीचा साचा ठरलेला असायचा. त्यात बदल नाही. पहिला एक राग, नंतर ठुमरी, त्यानंतर इंद्रायणी काठी, मग मध्यंतर! त्यानंतर मालकंस, मग नाट्यसंगीत आणि शेवटी भैरवी. असं पाच ते सहा तास गाणं व्हायचं. ते ही एका दमात. पंडितजी एक राग दोन तास गायचे. ते नावाप्रमाणेच 'भीम' होते.
संतवाणीच्या जन्माची कहाणी सांगताना चंद्रकांत कामत म्हणाले, "बेडेकर गणपतीवाले गोविंद बेडेकर आणि रमेश देशमुख पंडितजींना म्हणाले, की नुसत्या अभंगांचा एक कार्यक्रम करू." त्यानुसार नुकतचं पुणे आकाशवाणी केंद्रावर अणुरणीया, तीर्थ विठ्ठल, अधिक देखणेपण, पंढरीनिवासा, हे अभंग रेकॉर्ड झाले होते. आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम करायचा ठरला. पेपरला जाहिरात दिली. पण कार्यक्रमाची रूपरेषाच ठरली नव्हती. आषाढी एकादशी, वारकरी संप्रदाय या पार्श्वभूमीवर सुरुवात ‘जयजय रामकृष्ण हरी’नेच व्हायला पाहिजेना. शिवाय संतवाणी मध्ये अभंगच हवेत. दुसरी गाणी चालणार नाहीत. मग तशी रचना ठरली. 'रूप पाहता लोचनी' हे सुरु झाल्याशिवाय अभंग सुरूच करत नाही. असा रिवाजच आहे मुळात. पण पंडितजी म्हणाले या पद्धतीने एकदाच गाईन. पुन्हा गाणार नाही. मी म्हटलं, अहो तुम्हाला आवडत नसलं तरी लोकांना तेच आवडतयं. त्यामुळे तुम्हाला तसंच गावं लागेल. त्यांना वाटलं हे आपल्याला नेहेमी जमणार नाही. या कार्यक्रमाची तिकीट विक्री केव्हाच संपली. पहिलाच हाउसफुल्ल कार्यक्रम पुणे विद्यार्थिगृहात झाला. इतकी अलोट गर्दी झाली की पोलीस बंदोबस्त बोलवायला लागला. नंतर लगेच कार्तिकी एकादशीला कार्यक्रम झाला. मग मागणी वाढतच गेली. कुणी संस्थेकरीता, कुणी मदतीकरीता, कुणी एखाद्या निमित्ताने कार्यक्रम ठेवु लागले. प्रत्येक ठिकाणी अलोट गर्दी.
पैठणच्या कार्यक्रमात तर एवढी प्रचंड गर्दी. आमचा कार्यक्रम सुरु झाला. पंडितजींनी ख्याल सुरु केला. प्रेक्षकात समोरच प्रचंड कोलाहल सुरु होता. एक आवर्तन होत नाही तोवर लोक उठून जाऊ लागले. पंडितजी मला म्हणाले अरे काय करायचं. तू काय वाजवतोस हे मला काहीही ऐकायला येत नाही. मी म्हटलं तुम्ही काय गाताय हे मलाही ऐकू येत नाही. इतका कोलाहल होता. त्यांनी द्रुत चीज सुरु केली आणि समोरच्या महिला एकदम उठल्या त्यांना वाटलं गाणं संपलं. त्यांनी ऐकलेलंच नव्हतं कधी. ते पाहून पंडितजींनी एवढा मोठा षड्ज लावला आणि ‘अवघाची संसार’ अभंग सुरु केला. क्षणातच सर्व लोक खाली बसले. शांतता पसरली. सहा अभंग, मध्यंतर, नंतर सात अभंग असा संतवाणीचा कार्यक्रम झाला.
कर्नाटकातल्या कोप्पळ गावाला कार्यक्रम ठरला होता. गाव यायच्या दहा मैल अलीकडेच एका जंगलात गाडी नादुरुस्त झाली. काय बिघडलय ते समजेना. पंडितजी स्वतःच चालवित होते. शेवटी कोप्पळला वाट पहात असतील म्हणून निरोप देण्यासाठी माधव गुडेला चालत जायला सांगितले. रात्रभर आम्ही विश्रांती घेतली. सकाळी उठून पंडितजींनी पुन्हा प्रयत्न केला. तर गाडी सुरु झाली. आंम्ही तासाभरात साडेसातला कोप्पळला पोहोचलो. समोरचं दृश्य पाहून लोकांच्या प्रेमाची कल्पना आली. गाणं ऐकायला पंचक्रोशीतली पाच ते सहा हजारावर माणसे रात्रीपासून वाट पहात थांबली होती. पंडितजींनी लोकांची माफी मागितली आणि संतवाणीचा कार्यक्रम झाला. इतकी कर्नाटकात सुद्धा त्यांची लोकप्रियता होती. भारतरत्न पुरस्काराचा जेवढा आनंद आपल्याला झाला तेवढाच आनंद पंडितजींच गाणं ऐकताना कर्नाटकातल्या लोकांच्या चेहऱ्यावर मी पाहिला आहे. प्रेमापोटी हे लोक एक काय दोन-दोन दिवस वाट पहात थांबले आहे.
भीमसेनजींच्या दातृत्वाची एक आठवण सांगताना म्हणाले, केवढं दिलदार व्यक्तिमत्व आहे. १९७३-७४ ची गोष्ट आहे. नागपूरला साईबाबांचे मंदीर बांधण्यासाठी निधी संकलन म्हणून संतवाणीचा कार्यक्रम होणार होता. त्याला अभिनेते दिलीप कुमार हजर होते. तेव्हा दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. पहिल्या रांगेतल्या लोकांनी १० हजार रुपये दिले होते. राखीव खुर्चीचा दर जाहीर करण्याची पद्धत तेव्हा नव्हती. त्याचप्रमाणे दिलीप कुमार यांची सही असलेल्या फोटोचा लिलाव केला जात होता. हे सर्व संस्थेच्या मदतीसाठीच होते. शेवटची फोटोची बोली ५०० रु. झाली. त्यापुढे किंमत जातच नव्हती. शेवटी भीमसेनजींनी तो फोटो ६०६ रुपयांना विकत घेतला. हा फोटो आजही त्यांच्या घरात लावला आहे.
पंडित विजय कोपरकर आठवण सांगताना म्हणतात, “ पंडितजींचे कार्यक्रमातील गायलेले तास मोजले तर त्यांच्या इतक रेकॉर्ड कुणी केले असेल असं मला वाटत नाही. अगदी दुर्गम भागापासून लांब लांबवर प्रवासाला जाऊन ५-५/६-६ तासांच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम १९५६ ला झाला, असे म्हणतात. तेव्हापासुन ५२ वर्षे ते संगीताची दीर्घ साधना केली. कुठेही गेले तरी त्यांच गाणं तितकच लोकप्रिय होत. हे त्यांचं वैशिष्ट्य.
किराणा घराण्याचे संस्कार व ते गाणं त्यांच्यामध्ये आहेच. पण ते नेहेमी सांगायचे की, मी अमीरखाँ साहेब, केसरबाई केरकर, अंजनीबाई यांच्या गाण्याचा अभ्यास खूप बारकाईने केला आहे. अमीरखाँ आणि बालगंधर्वांच्या गाण्यांचे ते निःस्सीम चाहते आहेत. त्यांनी केलेल्या 'नाट्यरंग' या कार्यक्रमातून ते प्रेम दिसतंच, त्यांच्या गायकीत घराण्यांचा, संस्काराबरोबरच जो वेगवेगळ्या गोष्टींचा अविष्कार दिसतो तो त्यांच्या प्रतिभेचा भाग आहे. दुसरे म्हणजे किराणा घराण्याची सूरप्रधान व संथगायकी ही त्यांच्यात होतीच. पण त्याचबरोबर ग्वाल्हेर घराण्याची लयकारी ज्याला सुप्त लयकारी म्हणतात तीही होतीच.
त्यामुळे भीमसेनजींच्या गाण्याला लोक खिळून जायचे. कारण त्यांचे कुठलेही शब्द म्हणा, बोल त्या लयीच्या आवर्तनाशी अतिशय बांधून यायचे. त्यांची तपश्चर्या म्हणजे, त्यांनी सात-सात, आठ-आठ तास रियाज केला आहे. गुरु सवाई गंधर्वांच्या घरी कष्ट केले आहे, त्यांची सेवा केली आहे. तेव्हा हे संगीताचं वैभव त्यांना मिळालं आहे. ही कष्टसाध्य विद्या त्यांनी मिळविली, पुढेही रियाज करून, साधना करून जी सिद्धी त्यांना मिळाली म्हणूनच त्यांचं गाणं सामान्य माणसालाही भावलं. जसे 'पिया मिलन की आंस.....', ही ठुमरी असेल 'जो भजे हरी को सदा.....', हे भजन किंवा कोमल रिषभ आसावरीमधली 'मै तो तुमरो दास.....' ही बंदीश. असं कुठलही गाणं भावपूर्णच आहे. मग ते क्लासिकलमध्ये असो, वा ठुमरीमध्ये. ते रसप्रधानच आहे. आणि हा त्यांचा स्वतःचा विचार आहे. या भावपूर्ण गायकीमध्ये त्यांच्या 'संतवाणी' चाही मोठा वाटा आहे.
भीमसेनजींनी आपली किराणा घराण्याची गायकी सुयोग्य वैशिष्ट्यांनी अलंकृत करून मांडल्याने व रागदारीवर आधारलेली अभंगवाणी लोकप्रिय केल्याने जनमानसांत आवडत्या गायकाचे खास स्थान निर्माण केले आहे. संतवाणीमुळे त्यांचं गाणं अगदी सामान्य गावातल्या लोकांपर्यंत, वारकरी संप्रदायापर्यंत आणि संत परंपरेपर्यंत ते लोकप्रिय झालं. 'संतवाणी' म्हणजे काय होतं ? उदा. "जय जय राम कृष्ण हरी..." हे काय त्यांच्या दृष्टीने यमनच होता. 'केतकी गुलाब...', 'धन्य ही स्वर्गाहून लंका...' ही सिनेमातली गाणी ऐकताना सुरांचा बाज आणि भारदस्तपणा आपल्याला जाणवतो ".
त्यांच्या अशा अनेक आठवणी संगीत क्षेत्रात बर्याच जणांकडे आहेत, त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा अनेक प्रसंग दिले आहेत, ज्यामुळे एका संगीताचार्याचे आयुष्य कसे होते, कलेकडे बघण्याचा दृष्टीकोण, गुरूंकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा होता, कष्ट करण्याची तयारी, घराण्याची शिस्त या सर्व गोष्टींचे आकलन आपल्याला होते. स्वत:
सोळा सोळा तास रियाज केलेल्या पंडितजींनी एकदा संस्कार भारतीने आयोजित केलेल्या, संगीत मार्गदर्शन
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना, 'रियाज कसा करावा' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी रियाजाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘ रियाज आणि महफिल यात असा फरक आहे की, ‘जे आपल्याला येतं ते गाणं, म्हणजेच ती महफिल असते आणि जे आपल्याला येत नाही ते करणं म्हणजे रियाज असतो ’.
तसच, राजकारणात जावसं वाटलं नाही का?
या पुढच्या प्रश्नावर ते मार्मिकपणे म्हणाले, "आमचं वरून सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनीच आम्हाला निवडून खाली पाठविले आहे."
पंडितजिंची लोकप्रियता इतकी वाढली होती की, ते संगीत मैफिलींसाठी वारंवार विमान प्रवास करत असत. कधी कधी
तर एका दिवशी दोन वेगळ्या शहरात मैफिली असत, तेंव्हा विमानाने जाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे पु.ल. देशपांडे यांनी गमतीने
त्यांना ‘हवाईगंधर्व’ ही पदवी
दिली होती.
राजकारणी पुढाऱ्यांमध्येही पंडितजींचे असंख्य चाहते आहेत. अफाट लोकप्रियता असतानाही त्यांनी त्याचा कधीच गैरफायदा घेतला नाही. पंतप्रधान झाल्यावर "मी गाडीत आपल्याच कैसेट एकतो" असे राजीव गांधींनी सांगितले. त्यांनी राज्यसभेचे मानद सभासद होण्याचे निमंत्रण दिले. पण पंडितजींनी स्पष्ट नकार दिला. ही पदं मिळविण्यासाठी काही जण रितसर धडपड करीत असतात. पण पंडितजींनी ते नम्रपणे नाकारले. याबाबत राजीव गांधींनी स्वतः फोन करून विचारले असता पंडितजींकडून त्यांना शांतपणे उत्तर मिळाले की, "मेरे दो तानपुरे ही मेरे लिये राज्यसभा और लोकसभा है" असे इतके नम्र आणि समाधानी .
साथीदारांनाही ते खुप प्रोत्साहन देत. त्यांच्या कुठल्याही अटी नसायच्या. त्यांना ते खुप संधी देत. कधीही त्यांनी साथीदारांचा अपमान केला नाही. अपशब्द नाहीत. रागावणं नाही. दूरदर्शनने १९८५ मध्ये तयार केलेले देस रागातील 'मिले सूर मेरा तुम्हारा' या अभिनव प्रयोगानंतर भीमसेनजी घराघरात पोहचले. या क्षेत्रातले ते आयडॉल झाले. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ त्यांनी पुण्यात सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव दरवर्षीच त्यांचे स्मरण करून देणारा असेल. हा महोत्सव म्हणजे पुण्याची शान आहे. आज ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांना पाहिलेले क्षण, त्यांच्या ऐकलेल्या महफिली अशा त्यांच्या आठवणी आणि त्यांचा आवाज कायम आपल्यासोबत असणार आहे. अजूनही गेली कित्येक दशके आमची सकाळ पंडितजींच्या अभंगाने सुरू होते आणि दिवस रात्रीच्या दुर्गा, मालकंस, दरबारी अशा रागातल्या शास्त्रीय गायनाने संपतो. संगीताच्या इतिहासात त्यांचे स्थान अजरामर राहील. त्यांचे एक गीत ऐकून निरोप घेऊया !
हे पंडितजींचं गाणं तुमच्यासाठी --- भाग्यदा लक्ष्मी ...खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा .
https://www.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g
© डॉ.नयना कासखेडीकर.
---------------------------------------
(हा लेख पंडितजींना भारतरत्न मिळाले तेंव्हा लिहिला होता .)
No comments:
Post a Comment