भुलाबाई-भोंडला – लोकपरंपरा
भाद्रपदात गौरी गणपती झाले की मुलींना वेध
लागतात ते भुलाबाई किंवा भोंडल्याचे .त्या अगदी वाटच बघत असतात. लहानपणी भातुकली
खेळायचा जसा तिचा हक्क च असतो, तसाच हा भोंडला किंवा हादगा आणि भुलाबाई उत्सव तिचा हक्काचा असतो. मनोरंजना
बरोबरच त्यातून तिला शिक्षण पण मिळत असतं. असे शिक्षण देण्याची सुरुवातीला आपली
मौखिक परंपरा होती. जात्यावरच्या ओव्या, दळणकांडण करताना
म्हणायची गाणी. लग्न कार्यातली किंवा शुभ प्रसंगी म्हणायची मंगलगाणी, शेतातली कामे उरकताना म्हणायची गाणी, डोहाळजेवण,
बारसे, पाळणा, विहीण
म्हणणे असे अनेक प्रसंग गीतातून वर्णन करून साजरे केले जायचे. पणजी, आजी यांच्याकडून नातीपर्यंत सर्वजण ही मौखिक परंपरा सांभाळायच्या. यातून
मंगलमय वातावरण तयार व्हायचे, उत्साह वाढायचा. तर जीवन
जगण्याची ओढ निर्माण व्हायची. कारण जगण्यात आनंद असला तर जीवन सुसह्य होत जाते.
म्हणूनच उत्सवप्रियता आपल्या सर्वांना जास्त प्रिय होती आणि आहे. साने गुरुजींनी
म्हणूनच म्हटलं आहे की, “ नित्य क्रमाचे जेंव्हा उत्सव
होतात तेंव्हा आयुष्य ही एक आनंदयात्रा होते”.
भारतीय लोकसाहित्यात अशा लोकगीतांची परंपरा
समृद्ध आहे . प्राचीन वैदिक वाड:मयात त्याची मुळे आढळतात. अगदी जन्मापासून
अंत्यविधी पर्यन्त जे धार्मिक विधी असतात त्याची त्या त्या प्रसंगाची गीते
प्रत्येक भाषेत दिसतात. मग त्या त्या प्रांतातल्या ज्या परंपरा आहेत, व्रतवैकल्ये आहेत,
चालीरीती आहेत, त्याचे वर्णन अशा लोकगीतातून आपल्याला घडत
असते.
अशा साहित्यात
मुख्यत: शिव-पार्वती, राधा-कृष्ण आणि राम-सीता हा विषय समान धागा म्हणून सर्व प्रांतात दिसतो.
यात प्रेम भावना, आदर्श नाते संबंध,
निष्कलंक चारित्र्य, आदर्श पती किंवा कुटुंब प्रमुख, विवाहसंस्था, प्रतिष्ठा असे अनेक विषय यातून प्रसृत
होत असतात. लोकसाहित्यातील अनेक प्रकारात उदा. लोककथा, बोधकथा, भारुड, ओव्या, स्त्री गीते, उखाणे म्हणी, कूट प्रश्न,
सवाल जबाब, लोकनाट्य यातून आपल्या जीवनातील वेगवेगळ्या
टप्प्यांवर जे जे प्रसंग,विधी,संस्कार
होत असतात त्या त्या वेळचे वर्णन या गीतातून येते. आपल्या सण उत्सवांशी निगडीत
किंवा ऋतु बदलांप्रमाणे ही लोकगीते असतात. मनोरंजन, कल्पकता, चातुर्य, शहाणपण यातून सांगीतलेले असत. ही गीते वेगवेगळ्या
भाषेत जरी असली तरी त्यांचा आविष्कार आणि समान दुवा ही संस्कृती च असते.
आसामी भाषेतली बिहू गीते, बंगाली भाषेतली तुसू गीते, पंजाबी मधली तिजा गीते, तमिळ भाषेतली तिरूविळपात्तु
अशी ही वेगवेगळी सण आणि उत्सव गीते आहेत. रोगनिर्मूलनासाठी धार्मिक विधी गीते
असतात. ऋतु गीते, होळी गीते, कृषिगीते, वर्षागीते, नौका गीते,
कोळीगीते तर, काश्मिरी, तेलुगू, मल्याळम, उर्दू, आसामी यात
लग्न गीते असतात त्याला वेगवेगळी नावे आहेत.
भारतात विवाहप्रसंगी म्हणायची लोकगीत सगळीकडे
दिसतात. मुलीला सासरी पाठवताना म्हणायची वियोगाची गाणी,भोजपुरी मध्ये आहेत. कश्मीर मध्ये विवाहगीते
समुहाने म्हणायची आहेत. पंजाब मध्ये तर विधीनप्रमाणे गीते आहेत. वधूकडची आणि वराकडची गीते वेगवेगळी असतात. गुजराती लग्न
गीतात वधूवरांना राम-सिता किंवा कृष्ण- रुक्मिणी समजून गीते म्हणतात. यात विरह
भावाला महत्व दिलेले असते. ओरिसा मध्ये तर वधूने स्वत:च गीते म्हणण्याची प्रथा आहे
आणि यात नवरी मुलगी आपल्या माहेरच्या नात्यांची ताटातुट होताना जो वियोग होतो, त्यातील आई वडील, भाऊ बहिणी यांच्या नात्यातील
भावना यांचं वर्णन करत असते.
स्त्री
गीते – भारतातली लोकशाही ,लोक संस्कृती आणि कृषि संस्कृती या सर्वांमध्ये स्त्री ही नेहमी मध्यवर्ती
भूमिकेतच राहिली आहे. लोकसंसख्येच्या पन्नास टक्के स्थान असलेली स्त्री .खर तर
तीचं सगळीकडे अस्तित्व अगदी महत्वाच असतं. कर्तृत्व असतं.अनुभव पण असतो. काली माता, दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी, गौरी या रूपात ती लोकदेवता- स्त्री देवता असते . तीचं माहात्म्य सांगणारी
गीतं गायली जातात. शेतीसंबंधी कृषि गीते ,सण उत्सवासंबंधी
गीते, धार्मिक गीते गायली जातात. पण.... पण, मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपित पण असतं, तर कुठला आनंद आणि कुठल तरी दु:ख, कोणाला तरी
सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण यासाठी भेटायला
हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.
पुर्वी मुली लहान वयातच लग्न होऊन सासरी जायच्या, नंतरच्या टप्प्यात तिचं लग्नाचं वय जरी वाढलं तरी ती एक मुलगी, आणि १६,१८ फार फार तर २१,२२ अस वय असायचं. मोठी झाली तरी घरातली लग्नाची मुलगी ही जबाबदारीच ओझं असायची. कारण ज्या ज्या काळात तिच्या बाबतीत वाईट अनुभव येत गेले तिथे तिथे मग तिला बंधने घातली जाऊ लागली यात तिची काळजी हाच भाग असायचा, कारणाशिवाय कुठे जायचं नाही, उशिरा पर्यन्त बाहेर थांबायचे नाही.मग पुढे पुढे या रूढीच होऊन गेलेल्या दिसतात. सासरच्या लोकांबद्दल तक्रार करायची नाही. घरात बोलाची सोय नाही मग कोणापाशी बोलणार? जिवाभावाच्या मैत्रिणीच. दुसरं कोण? त्या एक तर समदु:खी असतात. आपल्याच सारख्या आनंद आणि दु:खाच्या अनुभावातून ती ही गेलेली असते. त्यामुळे तिला माझे मन जास्त च कळेल या भावनेतून ही अशी गीते लिहिली गेली असणार. यासाठीच भेटण्यासाठी, एकत्र येण्यासाठी निमित्त असायची ती श्रावणात मंगळागौर जागविणे, भाद्रपदात हरितालिका जागविणे, भोंडला किंवा हादगा किंवा भुलाबाईची पुजा करणे. वटसावित्री, नागपंचमी, संक्रांत, चैत्र गौर हे सुद्धा अशा निमित्त केलेले हळदी कुंकू समारंभ. पण विशेषत: लहान मुलींना एकत्र आणणे, त्यांना निसर्ग शिक्षण देणे, वनस्पतींची ओळख करून देणे, कुटुंब संस्थेतल्या नात्यांची ओळख पक्की करून देणे, पाककृती किंवा पदार्थ ओळखणे, सजावट, मांडणी स्वच्छता यातलं कला कौशल्य दाखविणे, संस्कार करणं अशा अर्थाने त्यांना शिक्षण द्यायचे ते त्यांना साजेशा अशा खेळातून, गाण्यातून. कारण हे सर्व त्या मुलीला तिच्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार असतं. हा असतो भोंडला .
आपले लोकजीवन आणि कृषीप्रधान संस्कृती, भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक प्रांतात जरा
वेगवेगळी आहे. त्यावर आधारित काही सण ऋतुंप्रमाणे साजरे केले जातात. कोकण, खान्देश, विदर्भ, पश्चिम
महाराष्ट्र , मराठवाडा अशा ठिकाणी नवीन आलेल्या पिकांचे, धान्याचे स्वागत करण्याचा उत्सव केला जातो. त्यातच या लहान मुली
भुलाबाईचा उत्सव साजरा करतात. भुलाबाई आणि भुलोजी ची म्हणजे शंकर पार्वती ची
स्थापना करतात. नव्या पिकांचं, कृषि लक्ष्मीचं स्वागत
करण्याचा हा उत्सव विदर्भात मानला जातो. निसर्गा बरोबरच तिच्या स्त्री सुलभ भावना त्यात
गाण्यातून व्यक्त होत असतात. विदर्भातला भुलाबाई उत्सव ३१ दिवसांचा तर पश्चिम
महाराष्ट्रातला भोंडला घटस्थापनेपासून कोजागिरीपर्यंत साधारण सोळा दिवस चालणारा.
भुलाबाई उत्सवात शंकर, पार्वती आणि त्यांचं बाळ यांची आरास
मांडून पुजा करतात. पार्वती महिनाभरसाठी माहेरी आलेली असते. म्हणून आपली मुलगी
समजून तीचं माहेरपण खूप उत्साहात साजरं करतात. माहेर ! मग तिचे आनंदाचे दिवस ! अशी
कल्पना करून त्याचे नियोजन होते. तर भोंडला म्हणजे हस्त नक्षत्रातला .
वेदकालीन ऋषिजनांनी सूर्य चंद्र आदींची प्रार्थना करून त्यांच्या प्रीत्यर्थ यज्ञ याग असे काही करत असताना मास, ऋतु, नक्षत्र या संबंधित काही सिद्धांत अनुभवाच्या आधारावर ठरवले. त्यावरूनच आपली कालगणना ,पंचांग याचे नियोजन केले गेले आहे. पण अशी माहिती, हिंदू सणांचा इतिहास आपल्या मुला मुलींना माहिती नसतात. त्यातून स्त्रियांना व मुलींना नसायच्याच. आताही तशीच परिस्थिति आहे. कारण वेगळे आहे एव्हढेच. गुढीपाडवा, अक्षयतृतीया,चातुर्मास, नारळी पौर्णिमा, संक्रांत, होळी असे ऋतूवरून निश्चित केलेले सण आहेत. तर काही कौटुंबिक आहेत उदा. वटसावित्री, मंगलागौरी, पिठोरी अमावास्या, हरितालिका, ऋषिपंचमी ही कुटुंबासाठी ठरवलेली व्रते आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता दाखविण्याची संधी म्हणजे पूजा अर्चना वगैरे करत असत.
शेतीप्रधान भारतात तर उगवलेल्या पिकांमुळे
झालेला आनंद हा उत्सव म्हणून च साजरा होत आला आहे. रब्बी हंगामातली पिके मोठी होत
असताना, ती टिकावित आणि आणखी चांगली तरारून वर
यावीत म्हणून हस्त नक्षत्राची पूजा बांधली जाते,
पावसाळ्यातल्या या चार महिन्यात हस्त नक्षत्राला मानांचं स्थान असत. हस्त
नक्षत्रात मुसळधार पाऊस असतो. त्यामुळे यावेळी हत्तीला प्राधान्य दिलेले असते. त्याची
प्रतिमा पाटावर काढून किंवा रांगोळीतून काढून समृद्धीच्या या प्रतिकाची पुजा करून
त्या भोवती फेर धरून गाणी म्हणायची पद्धत आहे. भोंडल्याची सुरुवात याच अर्थपूर्ण
गाण्याने करतात .
ऐलमा
पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे,
करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय
पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या
भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे बा माळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या
लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा
वर्षे
हस्त नक्षत्रावर सर्वांचीच भिस्त . हस्तात होणारा पाऊस हा हत्ती पाण्यात बुडेल एव्हढा असायला हवा अशी अपेक्षा असते. म्हणून आनंदी आनंद असतो. त्याचे महत्व सांगण्यासाठी
हस्त
हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।
दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।
एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं
नक्षत्राच्या
माहिती बरोबर वारांचे महत्व सांगणारे गीत म्हणजे
आज
कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।यातून आध्यात्मिक गोडी लावण्याचे काम साधले जाते.
कृष्णा
घालितो लोळण, आली यशोदा धावून ||
धृ ||
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा
धावून...||1||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून |
या गाण्यातून
कशाबद्दल काय काय कल्पना केल्या जातात, कोणत्या उपमा दिल्या जातात आणि कृष्ण कसा हट्ट करतो हे दाखवले
आहे.
काही गीतातून
कौटुंबिक चित्र उभं राहतं. नाती कशी असतात. त्याची बंधने कशी असतात.नात्यातला आदर
कसा असतो? कसा असायला हवा? याचही
चित्रण दिसतं.
नणंद भावजयींचे
नाते एक वेगळेच नाते असते. नणंद बाईंना जरा आपल्या भावाच्या बायकोपेक्षा जास्त च
मान पान हवा असतो.
सासूबाई तर
काय त्यांच्याच तोर्यात. जरा सुनेने माहेरी जायचं म्हटलं तर नाराजीचा सूर. मग ही
कामाची यादीच सुनेपुढे मांडतात. माहेरी जायच्या आधी सून बाईंनी दळण कांडण करून
ठेवायचं, तिखटमिठाचं पाळं भरून ठेवायचं,गिरणीतून पीठ आणून ठेवायचं,भाजी बिजी आणून ठेवायची, कपडे धुवून ठेवायचे अशी सगळी कामे झाल्याशिवाय तिची इच्छा पूर्ण नाही
व्हायची. हे तर अलीकडच्या काळात ही घडत
होतं. म्हणून ते तेंव्हाच्याही काळातल गाणं --
कारल्याचा
वेल लाव गं सुने...
कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥
म्हणजे
कारल्याचा वेल लाव, तो वाढू दे, त्याला फूल येऊदे ,फळ लागू दे, आता त्याची भाजी कर, ती तू पण खा, मागचं उष्ठ खरकटं आवर आणि आता जा
माहेरा, असा तिच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जायचा. भावनांची
कोंडी व्हायची . मग कसं प्रेम वाटणार? आणि तुलनेने माहेर, आजोळ चांगलच वाटणार.
म्हणून अक्कण
माती चिक्कण माती या गाण्यात
अस्सं
माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं
अशी आपली सून माहेरला गेली आहे तिला घ्यायला सासरची मंडळी
जातात वयाने लहान असल्याने तिला काहीतरी आमिष दाखवलं की ती लगेच येईल असे वाटून
आमिष दाखवले जाते .
अरडी ग बाई परडी
परडी एव्हढं काय गं? हे गीत. किंवा
माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासरा पाहुणा आला गं बाई
सासऱ्याने काय काय आणले गं बाई
सासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं
कुत्रं सोडा गं बाई....
अशा प्रकारे एक प्रकारचं लोकजीवनच अशा खेळातून,उत्सवातून आपल्याला पहायला मिळतं. असे सामाजिक शिक्षण देणारे
उत्सव, व्रते आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत. तो टिकवला
पाहिजे. काळा नुसार त्यात बदल होत राहणार. पण मुख्य उद्देश विसरता कामा नये.
म्हणून भलतंच रूप त्याला देऊ नये. अशीच पुढच्या पिढीकडून अपेक्षा आहे. भोंडला, भुलाबाई किंवा हादगा अशा लोक परंपरा सामाजिक मूल्यांचे धडे देणार्या आहेत.
लहान मुलींचे/स्त्रीयांचे व्यक्तिमत्व विकसित करणारे आहे. नैतिकता शिकवणार्या आहे.
नातेसंबंध टिकविणार्या आहेत, हे त्या मुलीच्या पालकांनी सतत
लक्षात ठेवलं पाहिजे. तिच्या भविष्याचा विचार अशा छोट्या छोट्या परंपरेतून या निमित्ताने
तिच्यात रुजवला पाहिजे. आपल्या पूर्वजांकडून चांगले संस्कार करण्यासाठीच असे उत्सव
निर्माण केले गेले आहेत.कालच गणपती विसर्जन झालं. आज मुलींनी भुलाबाई भुलोजीला आमंत्रण दिलं असेल,आता हा महिना त्यांचा आनंदाचा असेल.सर्वांना शुभेच्छा !
© डॉ. नयना कासखेडीकर
----------------------