ललित कलांची जननी ‘साहित्य’
मनुष्याचे विचार अभिव्यक्त करण्याचे प्रमुख माध्यम 'साहित्य' आहे. समाजाला अर्थपूर्ण दिशा देण्याचे काम साहित्य करते. अखिल भारतीय स्तरावर संस्कार भारतीचे काम, साहित्य आणि चित्र, शिल्प, रंगावली, नाट्य, संगीत, नृत्य आणि लोककला अशा विविध कलांमध्ये सुरू आहे. साहित्य विभागामध्ये विशेषत: लेखन आणि वाचन ही कार्ये येतात. साहित्य विभाग (विधा) ही इतर ललित कला विधांची जननी आहे असे म्हणता येईल. कारण चित्रकला, नृत्यकला, शिल्पकला, रंगावली, नाटक, संगीत आणि लोककला या सर्व ललित कलांची अभिव्यक्तीची एक भाषा आहे आणि भाषेचा आधार शब्द आहे. तो लिखित असतो. या शब्दाला एक अर्थ असतो, एक विचार असतो, विचारधारा असते, संस्कृती असते, त्याचे आदानप्रदान होताना किंवा संवाद साधताना भाषाच आधार असते. या सर्व कलांना आस्वाद्य बनविण्याचे कार्य भाषा करत असते. शिवाय त्याचा आशय सतत ताजा ठेवण्याचं कार्यही भाषा करते.
शब्द आणि अर्थ यांचे एकत्रित अस्तित्व म्हणजे 'साहित्य' असे म्हणतात. इंग्रजी टीकाकार ए.सी. ब्रॅडली यांनी ‘व्हेअर साऊंड अँड मीनिंग आर वन’ अशी साहित्याची व्याख्या केली आहे. शब्द म्हणजे ध्वनी किंवा अक्षरसमूह, त्याचे तयार झालेले वाक्य आणि वाक्य समुहातून तयार होणारा आशय म्हणजेच शब्द असतो. त्यात संवेदना, विचार आणि कल्पना असतात. शब्द आहेत म्हणूनच त्यातून मानवाच्या भावना व्यक्त होतात. शब्दसुमनांची गुंफण करत वाक्यांचे अलंकार निर्माण होतात आणि सर्व शक्तिनिशी ते नाद, गंध आणि रंग उधळीत जातात. त्याच शब्दांच्या कविता होतात, पुढे गीतांच्या रचना होतात आणि लोकप्रिय संगीत कलेतून गाणी निर्माण होतात, जी श्रोत्यांच्या मनावर पिढ्यान पिढ्या राज्य करतात. त्याचप्रमाणे कथा- कादंबर्या होतात, नाटके लिहिली जातात. यात लेखकाची प्रतिभा असते. त्यातून उत्कट भावाविष्कार, अनेक कल्पनाविलास, चिंतन, विचार यांचे दर्शन घडते. साहित्यात मानवी जीवनातले व्यावहारिक चित्रण असते, भाष्य केलेले असते. काल्पनिक, वैचारिक याबरोबरच जीवनाचे वास्तववादी चित्र पण दिसते.
साहित्य म्हणजे नुसते शब्द नाहीत, नुसता लिखित मजकूर नाही, तर आपल्या संस्कृतीचा व्यापक इतिहास आहे. जो विविध कलांमधून व्यक्त होत असतो, तो शब्दांमुळेच टिकून आहे. असे हे ललित साहित्य, कलाविश्वातील मनोरंजना बरोबरच उच्च अभिरुची रुजवत असते.
अगदी आदिम काळात चित्रभाषा होती. गुहा चित्रे, लेण्यातील चित्रे, आदिवासींची चित्रकला(वारली) यातून त्या काळातली संस्कृती व पद्धती समजे. त्या नंतरच्या काळात मौखिक साहित्य परंपरा होती. नंतर ती लिखित स्वरुपात आली. उदा. वेद, धर्मग्रंथ, रामायण महाभारत, पुराणे, शास्त्रे इत्यादि. प्राचीन संस्कृत वाद्मयातिल सर्व ग्रंथ श्लोकबद्ध असत. काव्यात असत. मौखिक असल्याने ते गेय व पाठांतरास सोपे असे. म्हणून ते पठणाद्वारे प्रसारित व्हायचे. हे ज्ञान एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे प्रसारित व्हायचे.
प्राचीन काळात काव्य हाच वाड्मय प्रकार प्रामुख्याने होता. त्यात गद्य, पद्य, नाटक हे प्रकार असत. संस्कृत वाद्मयात याची उदाहरणे सापडतात. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना अशी व्याख्या डॉ मध्यावरव पटवर्धन यांनी मांडली आहे. तत्वज्ञान, नीती, व्याकरण असे शास्त्रीय ग्रंथसुद्धा पद्य प्रकारात असत. ते मौखिक मार्गाने टिकवून ठेवण्याची पद्धत सगळीकडे होती. मुद्रणकलेचा शोध गटेनबर्गने लावला आणि कागदावर अक्षरे उमटू लागली तसे जगभरात गद्य साहित्य तयार होऊ लागले. रोजनिशी, स्मरणिका, चरित्र, आत्मवृत्त, कादंबरी लेखन प्रकार भरभराटीस लागले. दीर्घ लांबीचे साहित्य तयार होऊ लागले. पुढे ललित आणि ललितेतर वाद्मयीन साहित्य प्रकार असे वर्गीकरण झाले. आज आपण ज्या साहित्यातून विविध सौंदर्याच्या पातळीवर आस्वाद घेत असतो, असे ललित प्रकार म्हणजे, काव्य, कथा, कादंबरी, नाटके, एकांकिका, नाट्यछटा, प्रहसने, महानाटये, अतिनाट्य, नाट्यगीत, कथाकाव्य, महाकाव्य, खंडकाव्य, नृत्यनाट्य, भावगीत, बॅलड, मुक्तछंद, वात्रटिका, लोककथा, लोकगीते, गोंधळ, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडे, लावणी, आरत्या इत्यादि आहेत. असे ललित साहित्य प्रकार चार घटका मनोरंजन, विरंगुळा आणि जीवनातील ताणतणाव यापासून सुटका याबरोबरच सामाजिक सुधारणा, रूढी-परंपराबद्दल मार्गदर्शन, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, मानवी मूल्ये, प्रबोधन, जिज्ञासातृप्ति आणि अलौकिक आनंद देतात. त्यातून काही गोष्टींचा नवा अर्थ समजतो. सांस्कृतिक मूल्यांची जाणीव होते, जीवनातल्या समस्यांवर प्रकाश टाकला जातो. मानवी जीवन व तत्वज्ञान याचीही माहिती मिळते. मग एखादी कथा चित्रपट किंवा नाटकाचा आत्मा असते. तर एखादी काव्यरचना घेऊन गायकांच्या स्वरात एखादा संगीतकार वेगळा आकार देतो आणि त्या रचना, गाण्याची महफिल, विविध कार्यक्रम यातून नाट्यगीते, भावगीते, चित्रगीते, भक्तिगीते, बालगीते, लोकगीते, स्फूर्तीगीते या माध्यमातून सादर केल्या जातात.
या साहित्याच्या आधारेच बहुतेक सर्व ललित कलांचे सादरीकरण होत असते.मनुष्याला विचार करण्याची क्षमता ईश्वराने बहाल केली आहे. त्याद्वारे या शब्द शक्तीचा वापर तो अभिव्यक्त होण्यासाठी करत असतो. या शब्दाबरोबर नाद लय, ताल, गंध आणि रंग येतात तेंव्हा नवीन निर्मिती होते. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।।
शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।।
तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा करू।।’ आपले विचार प्रथम साहित्यातून आणि नंतर इतर कलांतून प्रकट होतात.
शब्दशक्तीचे एक सुंदर उदाहरण म्हणजे संतांच्या अभंग रचना. निर्गुण निराकार शक्तीचे सगुण रूप भक्तांच्या मनात तंतोतंत उभे करणारे हे शब्द. अशा अनेक भक्तिरचना शतकानुशतके आपल्या मनावर राज्य करत आहेत. ‘मोगरा फुलला..’, ‘ओम नमो जी आद्या’, ‘घणू वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा’..., अशा अनेक संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या रचना स्व.लता मंगेशकर यांच्या आवाजात अजरामर झाल्या आहेत. वेगवेगळ्या गायकांनी संतांच्या रचना मधून लोकांच्या मनात भक्तीभाव निर्माण केला आहे.
बुगडी माझी सांडली गं.. ही आशाताई भोसले यांच्या आवाजातली लावणी असो किंवा ‘पदरावरती जरतारीचा, मोर नाचरा हवा,
आई मला नेसव शालू नवा’..
गदिमांची ही लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात अजरामर होते. जगदीश खेबुडकरांच्या 'आज प्रीतीला पंख हे लाभले रे' .. अशी गीते जीवनाचे स्वप्न रंगवायला शिकवतात. 'अरे संसार संसार' या गीतातून कवयित्री बहिणाबाई चौधरी, संसार कसा असतो याची कल्पना देतात.
चित्रपट आणि नाटके या माध्यमातून संदेश दिला जातो. समाज प्रबोधन, इतिहास, देशभक्ती आणि जगात वागावे कसे याचेही मार्गदर्शन नाटके व चित्रपटातून होत असते. 'संगीत शारदा', 'एकच प्याला', 'नटसम्राट', 'सन्यस्त खड्ग', 'जग काय म्हणेल'? तो मी नव्हेच, अशा नाटकांनी समाजाला संदेश दिला. साधी माणसं, शामची आई, वहिनीच्या बांगड्या, वंदे मातरम, या चित्रपटांनीही इतिहास घडविला.
नृत्य नाट्यातूनही कथा रंगविल्या जातात. चित्रकला, रंगावली, शिल्पकला या कला माध्यमातून अनेक विषय मांडले जातात. चरित्र, व्यक्तिचित्र असे विषय सुद्धा यातून मांडता येतात. कै. बाबासाहेब पुरंदरे यांचं महानाट्य 'जाणता राजा' हे छत्रपती शिवरायांचे चरित्रच आहे. हाच इतिहास चित्रकलेतून,शिल्प कलेतून,रंगावलीतून,सादर करता येतो. सर्व ललित कलांचा आधार म्हणजे साहित्य आहे, नव्हे ती जननीच आहे .
(हा लेख संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड च्या साहित्यवैभव या पहिल्या अंकासाठी लिहिला होता. या अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका व कन्नड मराठी अनुवादिका डॉक्टर उमा ताई कुलकर्णी यांच्या हस्ते मराठी भाषा दिना निमित्त १७ फेब्रुवारी २३ला प्रसिद्ध झाला. )
© लेखन- डॉ. नयना कासखेडीकर.
---------------------
(हा लेख संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड च्या साहित्यवैभव या पहिल्या अंकासाठी लिहिला होता. या अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका व कन्नड मराठी अनुवादिका डॉक्टर उमा ताई कुलकर्णी यांच्या हस्ते मराठी भाषा दिना निमित्त १७ फेब्रुवारी २३ला प्रसिद्ध झाला. )
© लेखन- डॉ. नयना कासखेडीकर.
---------------------