उत्तरार्ध
‘स्वामी विवेकानंद’
यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,
प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार – पुष्प, भाग ६८
स्वामी विवेकानंद,एक महान यात्रिक
रामकृष्ण मिशन चे काम सुरू झाले.
स्वामीजिंचा प्रवास, भेटीगाठी, काम वाढवण्याच्या दृष्टीने सुरूच होता. भारतात
भारतीय शिष्य आणि परदेशी शिष्य काम करत होतेच. पण परदेशातील शिष्य यांच्याशी पण
पत्रव्यवहाराने संपर्क होत होता. सतत मार्गदर्शन चालू होते, काश्मीर, पंजाब,
खेतडी, नैनिताल, कलकत्ता, आल्मोरा, अमरनाथ, मायावती, पूर्व बंगाल असं सगळीकडे
संचार झाला. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा दीड वर्षे ते पाश्चात्य देशांचा प्रवास
करून परतले. बेलूर मठात पोहोचल्यावर मन प्रसन्न झाले. एक दिवस विश्रांती
झाल्यानंतर एकेक वृत्तान्त कळू लागला. आपल्या कार्यासाठी ज्यांनी स्वतच्या देशाचा
त्याग केला आणी आपल्या हिमालयासारख्या दुर्गम भागात राहून मोठ्या कष्टाने अद्वैत
आश्रम उभा केला. आपले एक स्वप्न साकार केले ते सेव्हियर पती पत्नीने. त्यातले स्वत:
सेव्हियर कार्य करता करताच निधन पावले, तर गुडविन आधीच गेले होते. या दोन इंग्रज
शिष्यांनी भारतमातेच्या चरणी आपली जीवनपुष्पे वाहिली, याचे
स्वामीजींना दु:ख झाले. मिसेस सेव्हियर मायावतीला होत्या, त्यांचे ताबडतोब सांत्वन
करायला गेले पहिजे आणि तशी तार त्यांनी मिसेस सेव्हियर यांना केली. प्रकृती ठीक
नसतानाही स्वामीजी प्रतिकूल हवामान व परिस्थितीत ,गैरसोयीचा प्रवास असतानाही ते शिष्यांबरोबर
गेले.
मदतीशिवाय
त्यांना चालणेही कठीण झाले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, त्यावर बरोबर असलेल्या विरजानंदाना ते म्हणाले, “पहा मी किती दुबळा आहे
जणू वृद्ध होऊन गेलो आहे. हे एव्हढेसे चालायचे आहे तेही मला बिकट वाटते आहे,
पूर्वी पर्वत प्रदेशात २५- २५ मैल चालायलाही काही वाटायचे नाही. माझ्या आयुष्याचा
शेवट जवळ येत चालला आहे हेच खरं”. ते ऐकून विरजानंद मनातून हादरून गेले. मिसेस
सेव्हियरना भेटणे आपले कर्तव्य आहे म्हणून हा खडतर प्रवास ते करत होते.मिसेस
सेव्हियर ने आपले दु:ख बाजूला ठेऊन स्वामीजींचे स्वागत केले. पतीच्या निधनाचे दु:ख
मोठे असतानाही आपण घेतलेले व्रत चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले, मायावतीला
स्वामीजी पंधरा दिवस राहिले. सेव्हियर पती पत्नी ने इथे अद्वैत आश्रमाचे काम मार्गी लावले होते. इथल्या
वास्तव्यात अनेकजण स्वामीजींना भेटायला येऊन गेले. मायावती हून स्वामीजी कलकत्त्याला
निघाले, बेलूर मठात आल्यावर आणखी एक धक्कादायक वृत्त समजले ते म्हणजे खेतडीचे राजा
अजित सिंग यांचे अपघाती निधन झाले. या अकस्मात दुर्घटनेमुळे स्वामीजीना मोठा धक्का
बसला. राजा अजित सिंग हा त्यांचा मोठा आधार होता.
बेलूरला आल्यावर मठाच्या व्यवस्थेतील काही
कायदेशीर पूर्तता आणि विश्वस्त मंडळ करून घेतले. ब्रह्मानंद ,शिवानंद, प्रेमानंद,
सारदानंद, अखंडानंद, त्रिगुणातीतानंद, रामकृष्णानंद, अद्वैतानंद, सुबोधानंद,
अभेदानंद, आणि तुरियानंद यांचे विश्वस्त मंडळ करून त्यांच्यावर कारभार सोपवला, यात
त्यांनी एकही पाश्चात्य शिष्य घेतला नाही, ते
दुरदृष्टीने कायदेशीर गुंतागुंत होऊ नये म्हणून. ६ फेब्रुवारीला रीतसर नोंदणी
करण्यात आली. विवेकानंदांनी कोणतेही अधिकार पद स्वीकारले नाही. स्वत:च्या मालकीच्या
जागेत रामकृष्ण संघाचे काम आले. भारताच्या इतिहासात एक नवे पान उघडले गेले होते,
स्वामीजींनि पाहिलेले स्वप्न साकार झाले होते. फेब्रुवारीत रामकृष्ण परमहंस यांचं
जन्मदिन बेलूर मठात साजरा झाला तेंव्हाही स्वामीजीना खूप समाधान वाटले.
त्यानानंतर त्यांनी पूर्व बंगालचा प्रवास आखला
आणि आई भुवनेश्वरी देविंची इच्छा पण पूर्ण करावी असे मनात होते. बंगालच्या या
सुपुत्राने एकदा तरी आपल्या गावात यावे अशी तिथल्या लोकांची इच्छा होती. चंद्रनाथ
आणि कामाख्यादेवी ही तीर्थ क्षेत्रे
भुवनेश्वरी देविंच्यासह स्वामिजिनी केली आणि आईसाठी काही केल्याचे समाधान त्यांना
होते. या यात्रेत तिथल्या भेटी, स्वागत, आपल्या मुलाबद्दल लोकांचे प्रेम आणि आदर
पाहून भुवनेश्वरी देविंना मनोमन समाधान वाटले. हाच तो आपला लहान बिले ना ? असे
नक्की वाटले असेल.
पूर्व बंगाल
आणि आसामचा हा प्रवास दोन महिन्यांचा झाला आणि स्वामीजींची प्रकृती आणखीनच ढासळली
,विश्रांती नाही, सतत कामाचा ताण यामुळे दम्याचा त्रास आणखीन बळावला .आपलं अखेरचा
क्षण जवळ आला की के अशी शंका स्वामीजींच्या मनात डोकावली. प्रवासात ते अनेकांना
पत्र लिहीत असत. अधून मधून जरा बारे वाटले की लगेच उत्साहाने पुढचे नियोजन करीत.
एकदा त्यांचे शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती भेटले तेंव्हा त्यांनी सहज प्रकृती बद्दल
विचारले, तर स्वामीजी म्हणाले, “ अरे बाबा आता प्रकृतीची चौकशी कशाला करायची? प्रत्येक
दिवशी शरीराचा व्यापार बिघडत चालला आहे. जे काही आयुष्याचे थोडे दिवस आता राहिले
आहेत ते मी तुम्हा सर्वांसाठी काहीना काही करण्यात घालवेन आणि असा कार्यमग्न
असतानाच एके दिवशी या जगाचा निरोप घेईन”.
'दुर्गापूजा उत्सव' बंगाल मधला महत्वाचा उत्सव, आता स्थिरावलेल्या बेलूर मठात दुर्गा पूजा व्हावी असे
सगळ्यांच्याच मनात आले. स्वामीजींच्या अंगात बराच ताप होता. श्री दुर्गा
प्रतिष्ठापना झाली होती. अष्टमीला मुख्य पूजेला स्वामीजी कसेबसे आले. नवमीला थोडे
बरे वाटले तेंव्हा देवीसमोर त्यांनी काही भजने म्हटली. श्रीरामकृष्ण यांची आवडती
भजने त्यांनी गायली. हे पाहून भुवनेश्वरी देवींना बरे वाटले. बरोबर केलेल्या तीर्थयात्रेपासूनच त्यांना माहिती होते की
आपल्या मुलाची प्रकृती अलीकडे ठीक नसते. त्याला भेटायला त्या मधून मधून मठात येत
असत. आल्यावर बाहेरूनच ‘बिले..’ अशी हाक मारत आणि विश्वविख्यात बिले,
संन्यासीपुत्र नरेन आईची हाक आल्यावर भरभर खाली येइ. दोघांच्या गप्पा होत. मग त्या
परत जात.
एकदा नरेंद्र
लहान असताना आजारी पडला, तेंव्हा तो बरा व्हावा म्हणून बोललेला देवीचा नवस
आपल्याकडून पूर्ण करायचा राहिला हे अनेक वर्षानी लक्षात आले. तेंव्हा आता
कालीमातेला जाऊन, विशेष पूजा करून मुलाला तुझ्यासमोर लोळण घ्यायला सांगेन असा तो,
आता पूर्ण करायला हवा. आईची इच्छा पूर्ण करायची म्हणून विवेकानंद बरे नसतानाही
गंगेत स्नान करून कालिघाटावर ओल्या वस्त्रानिशी मंदिरात गेले. पूजा केली, तीन
वेळा लोळण घेतली, गाभाऱ्याला सात
प्रदक्षिणा घातल्या. विधिपूर्वक होम हवन केले. आईला खूप समाधान झाले आणि इतक्या
वर्षानी नवस पूर्ण झाल्याचा आनंद पण.
साधारण २८ जून
चा दिवस, शुद्धानंदाना विवेकानंद यांनी पंचांग घेऊन बोलावले आणि ते चाळून, तिथी
पाहून ठेऊन घेतले. नंतर ची ४,५, दिवस रोज ते पंचांग चाळायचे आणि स्वत:शीच काही
विचार करायचे ,बाकी सर्व रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते. १ जुलैला
विवेकानंद, मठाच्या बाहेर हिरवळीवर फेऱ्या मारत होते. त्यावेळी प्रेमानंदाना
एका जागेकडे बोट दाखवून म्हणाले, “माझ्या
मृत्यूनंतर या ठिकाणी माझे दहन करा”. अंत्यसंस्काराचा एव्हढा स्पष्ट उल्लेख केलेला
कोणाच्याच लक्षात आला नाही.
२ जुलै बुधवार
– एकादशी, विवेकानंदांनी शास्त्रोक्त पद्धतीने उपवास केला होता. त्या दिवशी भगिनी
निवेदिता बेलूर मठात स्वामीजींना भेटण्यास आल्या होत्या. त्यांच्यासाठी काही
पदार्थ विवेकानंदांनी मागवले, हात धुण्यासाठी निवेदिता उठल्या तेंव्हा स्वामीजींनी
त्यांच्या हातावर स्वत पाणी घातले, एक पंचा घेऊन हात पुसले. हे पाहून निवेदिता
खजील झाल्या. त्या म्हणाल्या, "स्वामीजी हे मी तुमच्यासाठी करायचे तर तुम्हीच..?" स्वामीजी म्हणाले, का? जिझसने तर आपल्या
शिष्यांच्या पायांवर पाणी घातले होते ना? . पण ती त्यांची अखेरची वेळ होती असे
निवेदिता म्हणणार पण आवंढा गिळला. कदाचित ही शेवटची वेळ..?ही खरचच दोघांची अखेरची
भेट ठरली .
४ जुलैचा दिवस
उजाडला. शुक्रवार, नेहमीपेक्षा स्वामीजी लवकर उठले. ध्यानसाठी देवघरात गेले. दारे
खिडक्या बंद केल्या. तीन तास एकटे खोलीत होते. त्यानंतर दार उघडून बाहेर येताना
कालिमातेचे गीत गुणगुणत बाहेर आले.श्री रामकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर बसून इतका
वेळ ध्यान मग्न झालेले विवेकानंद स्वतच्याच नादात मुग्ध असे बाहेर येऊन फेऱ्या
मारू लागले ,इतरत्र कुठेही लक्ष नव्हते. सकाळी पण अतिशय प्रसन्नपणे हसत खेळत
सर्वांच्या बरोबर अल्पोपहार घेतला होता . आणि आज आपल्याला उत्साह वाटतोय असेही
म्हणाले होते. दुपारच्या जेवणानंतर तीन तास संस्कृत व्याकरणाचा वर्ग त्यांनी
घेतला. दुपारनंतर प्रेमानंदांच्या बरोबर बेलूर मध्ये तीन किलोमीटर लांब पर्यन्त
फेरफटका मारून आले.आल्यावर संन्यासांशी गप्पा झाल्या.
आल्यावर खोलीत
जाऊन आपली जपमाळ मागवून घेतली, तासभर जप झाला. मग अंथरुणावर आडवे झाले उकडते आहे
म्हणून थोडा वारा घालण्यास शिष्याला सांगितले.थोडे तळपाय चोळले तर बरे वाटेल म्हणून
तेही शिष्याने चोळले. डाव्या कुशीवर वळलेले, हातात जपमाळ तशीच, पाठोपाठ दोन वेळ
दीर्घ श्वास घेतला. नंतर काही हालचाल नाही. नऊ वाजले होते, जेवणाची घंटा वाजली. जवळचा शिष्य घाबरत घाबरत खाली आला. प्रेमानंद आणि निश्चयानंद वर धावत आले.
रामकृष्ण यांचे नाव घेतले तर ही दीर्घ समाधी उतरेल स्वामीजींची, असे वाटले, पण नाही,
डॉक्टर महेंद्रनाथ मजुमदार यांना बोलावले गेले. मध्यरात्री पर्यन्त बरेच प्रयत्न
केले. प्राणज्योत मालवली आहे हे डॉक्टरांचे शब्द ऐकून सारा बेलूर मठच दु:खाच्या
छायेत गेला.
स्वामीजींचे
वय यावेळी ३९ वर्ष, ५ महीने, आणि २४ दिवस इतके होते. सगळीकडे वाऱ्या सारखी बातमी
गेली. भारतात, परदेशात तारा गेल्या. बेलूर
मठाकडे चारी दिशांनी दर्शनासाठी लोंढे येऊ लागले. भुवनेश्वरी देवी पण आल्या. त्यांचा
अवखळ बिले अवखळपणेच साऱ्या जगात फिरून येऊन आता शांतपणे पहुडला होता. भले जगासाठी
तो कीर्तीवंत असला, तरी या जन्मदात्रीचा तो पुत्र होता. पुत्रवियोगाने तिच्या
हृदयाला किती घरे पडले असतील? शब्दच नाहीत.
बिल्व
वृक्षाची जागा प्रेमानंदाना विवेकानंद यांनी ४,५ दिवसांपूर्वीच दाखवली होती. तिथेच
अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या या महान, असामान्य, अलौकिक सुपुत्राची ही
जीवनयात्रा. (मालिका समाप्त)
- © डॉ. नयना कासखेडीकर
-------------------------------------