उत्तरार्ध
‘स्वामी विवेकानंद’
यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,
प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार – पुष्प ,भाग ६६
याची देही याची डोळा ..
पांबन नंतर ते रामेश्वरला गेले.
स्वामीजी स्वागताला उत्तर देण्यासाठी भाषणकर्ते झाले. त्यांच्या इंग्रजी भाषणाचे
तमिळ भाषेत रूपांतर करून उपस्थितांना सांगण्यात येत होते. सर्वश्रेष्ठ
धर्मपुरुषाचा सन्मान मंदिरातील पुजारी व व्यवस्थापक यांनी केला. सजवलेले ऊंट, हत्ती, घोडे असलेली मिरवणूक काढून रामेश्वर मंदिरापर्यन्त नेण्यात आली. इथल्या
भाषणात त्यांनी सांगितले की, “केवळ मूर्तिपूजा करण्यापेक्षा
दरिद्री माणसाला दोन घास अन्न आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र देणे हाच खरा धर्म आहे”.
रामेश्वर नंतर रामनाद च्या सीमेवर जोरदार स्वागत करण्यात आले.
स्वामीजींच्या आगमनार्थ तोफांची सलामी दिली, भुईनळे आतषबाजी केली, 'हर हर महादेव' च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. रामनाद चे राजे स्वता
स्वामीजींच्या गाडी समोर पायी चालत होते, पुढे पुढे तर
स्वामीजींना घोडागाडीतून ऊतरवून, सजवलेल्या पालखीत बसविण्यात
आले, भाषणे झाली, नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या
करंडकातून स्वामिजींना मानपत्र अर्पण केले गेले. सत्कारादाखल उत्तर देताना
स्वामीजी म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीची रात्र संपत आहे, अत्यंत क्लेशकारक दु:ख मावळू लागले आहे, मृतप्राय
वाटणार्या शरीरात नवी चेतना जागी होत आहे, जाग्या होणार्या
या भारताला आता कोणी रोखू शकणार नाही, तो पुन्हा निद्रित
होणार नाही, बाहेरची कोणतीही शक्ति त्याला मागे खेचू शकणार
नाही. अमर्याद सामर्थ्य असणारी ही भारतभूमी आपल्या पायांवर ताठ उभी राहत आहे”.
केवळ या सुरुवातीच्या स्वागतासाठी उत्साहाने जमलेल्या स्वदेशातील बांधवांकडे बघून
स्वामीजींना एव्हढा विश्वास वाटला होता. आणि आपला देश आता पुढे स्वत:च्या बळावर
ताठपणे उभा राहील अशी खात्री त्यांना वाटली होती. एका निष्कांचन संन्याशाचा
उत्स्फूर्तपणे होणारा गौरव ही स्वामीजींच्या जगातील कामाची पावती होती.
रामनाद सोडल्यानंतर स्वामी विवेकानंद मद्रासच्या दिशेने रवाना झाले.
आतापर्यंत छोट्या छोट्या शहरात व गावातील उत्साह आणि आनंद एव्हढा होता, आता तर
मद्रास सारख्या मोठ्या शहरात मोठ्या लोकवस्तीच्या ठिकाणी भव्य सोहळे होणार होते.
रामनाद, परमपुडी, मानमदुराई,मीनाक्षी मंदिरचे मदुराई, तंजावर असे करत स्वामीजी
कुंभकोणमला आले.कुम्भकोणम नंतरच्या एका रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नव्हती
तिथेही लोक स्वामीजींना बघायला आणि एकदा तरी त्यांचे दर्शन घ्यायला प्रचंड
प्रमाणात जमले होते. गाडी थांबणार नाही असे दिसताचा लोक रेल्वे रुळांवर आडवे झाले
आणि गाडी थांबवावी लागली तेंव्हा स्वामीजी डब्यातून बाहेर येऊन शेकडो लोकांनी केलेले स्वागत स्वीकारले,
छोटेसे भाषण केले. त्यांच्याप्रती आदर दाखवला.
कुंभकोणमहून स्वामीजी मद्रासला आले.
हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामीजींनी अमेरिकेला जावे यासाठी मद्रास
मध्ये खूप प्रयत्न केले गेले होते. त्यामुळे पाश्चात्य देशात उदंड किर्ति मिळवून
वेदांतचा प्रचार करून आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्वागताची तयारी खूप
आधीपासून केली होती, एक स्वागत समिति स्थापन करण्यात आली होती. पद्धतशीरपणे नियोजन केले गेले
होते. वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध केले गेले. स्वामीजींच्या धडक स्वागत
समारंभाची वृत्ते प्रसिद्ध होत होती.
त्यांनी पाश्चात्य देशात केलेल्या कामांवर अग्रलेख लिहिले गेले. विविध शाळा, संस्था, महाविद्यालये बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणे
येथे स्वामीजींना बोलावण्याचा धडाका सुरू होता. मद्रासमध्ये रस्ते, विविध १७ ठिकाणी कमानी, फलक, पताका
यांची सजावट असे उत्सवी वातावरण होते. एगमोर स्थानकावर उतरल्यावर (६ फेब्रुवारी
१८९७) स्वागत समितीने स्वागत केले. घोष
पथकाने स्वागतपर धून वाजविली. मिरवणूक काढण्यात आली. दुतर्फा
लोक जमले होते, मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, प्रौढ, असे सर्व
सामान्य नागरिक ते सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.
स्वामीजींचा मद्रासमध्ये ९ दिवस
मुक्काम होता. अनेक कार्यक्रम झाले. वेगवेगळ्या भाषेतील
२४ मानपत्रे त्यांना देण्यात आली. खेतडीचे राजा अजितसिंग यांनी मुन्शी जगमोहनलाल
यांच्याबरोबर स्वागत पत्र पाठवले होते. कोणी स्वागतपर संस्कृत मध्ये कविता लिहून
सादर केली.
७ फेब्रुवारीला मद्रास मध्ये
विक्टोरिया हॉल मध्ये मद्रास शहराच्या वतीने स्वामीजींचा मोठा सत्कार समारंभ झाला.
जवळ जवळ दहा हजार लोक उपस्थित होते. असे सत्कार स्वामीजींनी याची देही याची डोळा
अनुभवले, लोकांचे
प्रेम आणि असलेला आदर अनुभवला. पण मनात, शिकागो ल
जाण्यापूर्वी आणि शिकागो मध्ये गेल्यावर सुद्धा ब्राम्हो समाज आणि थिओसोफिकल
सोसायटीने जो विरोध केला होता, असत्य प्रचार केला होता, वृत्तपत्रातून लेख, अग्रलेख यातून स्वामीजींची
प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे शल्य होतेच,
त्याचे तरंग आता मनात उमटणे साहजिकच होते. यातील काही अपप्रचाराला उत्तर देण्याची
खर तर संधी आता मिळाली होती आणि ती संधी स्वामीजींनी घेतली सुद्धा. त्यांनी भाषण करताना अनेक खुलासे केले. धर्म नाकारणार्या समाज
सुधारकांचा परखड परामर्श घेतला. भारताचे पुनरुत्थान घडवायचे असेल तर त्याचा मूळ
आधार ‘धर्म’ असायला हवा असे विवेकानंद
यांना वाटत होते. भारतातील सुधारणावाद्यांचा भर सतत धर्मावर आणि भारतीय संस्कृतीवर
केवळ टीका करण्यावर होता ते स्वामीजींना अजिबात मान्य नव्हते. मद्रासला त्यांची या
वेळी चार महत्वपूर्ण प्रकट व्याख्याने
झाली. एका व्याख्यानात त्यांनी म्हटले की, “आम्हाला असा धर्म
हवा आहे की, जो माणूस तयार करील,
आम्हाला असे विचार हवे आहेत की, जो माणूस उभा करतील”.
स्वामीजींचे मद्रासला आल्यावर जसे
जोरदार स्वागत झाले तसे ते नऊ दिवसांनी परत जाताना त्यांचा निरोप समारंभसुद्धा
जोरदार झाला. इथून ते कलकत्त्याला गेले. स्वामीजींचे मन केव्हढे आनंदी झाले असणार
आपल्या जन्मगावी परतताना, याची कल्पना आपण करू शकतो. बंगालचा हा
सुपुत्र त्रिखंडात किर्ति संपादन करून येत होता.
कलकत्त्याला स्वागतासाठी एक समिति नेमली होती, अनेक जण
ही धावपळ करत होते. कलकत्त्यातील सियालदाह रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी वीस हजार
लोक जमा झाले होते. फलाट माणसांनी फुलून गेला होता. त्यांच्या बरोबर काही गुरु
बंधु, संन्यासी, गुडविन, सेव्हियर पती पत्नी, अलासिंगा पेरूमल, नरसिंहाचार्य या सगळ्यांचे स्वागत केले गेले. सनई चौघड्याच्या निनादात
आणि जयजयकारांच्या घोषणेत स्वामीजींचे पुष्प हार घालून स्वागत केले गेले. यावेळी
परदेशातून सुद्धा अनेक मान्यवरांनी गौरवपर पत्रे पाठवली,
त्याचे ही वाचन झाले व सर्वांना ती वाटण्यात आली. केवळ चौतीस वर्षाच्या युवकाने
आपल्या कर्तृत्वाची असामान्य छाप उमटवली होती, त्याने बंगाली
माणसाची मान अभिमानाने उंचावली होती. रिपन महाविद्यालय,
बागबझार,काशीपूरचे उद्यान गृह, आलम
बझार मठ, जिथे गुरूंचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प सारदा
देवींसमोर सहा वर्षापूर्वी नरेंद्रने सोडला होता तिथे पाय ठेवताच आपण दिलेले वचन
पुरे केले याचे समाधान स्वामीजींना वाटले, येथे
रामकृष्णांनंद आणि अखंडांनंद यांनी दाराताच आपल्या नरेन चे स्वागत केले. पुजाघरात
जाऊन श्रीरामकृष्णांना नरेन ने कृतार्थ होऊन अत्यंत नम्रतेने नमस्कार केला. नरेन
ने ठाकूरांना नमस्कार केला तो क्षण गुरुबंधुना पण धन्य करून गेला. आता पुढच्या
कार्याची आखणी व दिशा ठरणार होती. (क्रमश:)
- - डॉ.नयना कासखेडीकर
----------------------------
No comments:
Post a Comment