Wednesday, 16 August 2023

भारताबाहेर आमची संस्कृती - फिनलंड मधील मराठी माणसं.

 

साहित्य परिमळ या ई पत्रिकेसाठी नवे सदर-

भारताबाहेर आमची संस्कृती

फिनलंड मधील मराठी माणसं.

हेलसिंकी हे फिनलंड मधले सर्वात मोठे शहर आणि देशाची राजधानी. एका सर्वेक्षणात हेलसिंकी शहरातील नागरिक प्रामाणिकपणात प्रथम क्रमांकावर आहेत. युरोपिय संघातला देश. औद्योगिक दृष्टीने प्रगत असलेला हा देश जीवन शैली, अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण या बाबतीतही सर्वोत्तम श्रेणी असलेला आणि सामाजिक व राजकीय स्थैर्य आलेला देश सिद्ध झाला आहे.अशा विविध देशात राहणारे आपले भारतीय लोक संस्कृती कशी जपतात हे जाणून घेण्यासाठीहे सदर चालू केले आहे. आजचे कुटुंब आहे  अमित व राधिका जोशी –फिनलंड    

      फिनलंड येथे गेली सहा सात वर्षे राहत असलेले भारतीय, महाराष्ट्रियन कुटुंब. अमित, राधिका आणि त्यांच्या दोन मुली. इथे असताना आय.टी.त असणारे आणि उच्च शिक्षित असून सुद्धा घरात सर्व सणवार, आपल्या परंपरा नेमाने पाळणारे जोडपे.  अचानक दुसर्‍या देशात जावे लागले तरी त्या वातावरणात आपली संस्कृती पाळण्यासाठी आग्रही असणारी, दोन्ही लहान मुलींचे संगोपन करताना आपल्याच पद्धतींवर ठाम असणारी राधिका आणि अमित यांची भेट झाली आणि उत्सुकतेने अनेक शंका त्यांना विचारल्या. एका मजेशीर प्रसंगाने सुरुवात झाली. अमित सांगत होता, “एका परदेशी कुटुंबाकडे आम्हा सर्वांना आग्रहाने जेवायला बोलावले होते, बराच वेळ झाला तरी कुठलीही स्वयंपाक किंवा जेवणाची तयारी, घाई नाही, लगबग नाही. बराच वेळ गप्पा- टप्पा झाल्या आणि चला जेवू या असे म्हणत त्यांनी आमच्या समोर उकडलेले बटाटे जेवण म्हणून प्लेट मध्ये ठेवले. असे हे अनपेक्षित जेवण म्हणून मान्य कसे करायचे? कुठल्याही पद्धतीने कुठलेही एक्सप्रेशन न देता, आम्ही मुकाट्याने बटाटे जेवलो आणि घरी येऊन वरण भात पोळी भाजी असा स्वयंपाक करून रीतसर जेवणे झाली”. हा प्रसंग त्यांच्या कडून ऐकतांना आपल्या खाद्य संस्काराचे महत्व भारतीय लोकांना जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात गेलं तरी असतच हे ऐकून आनंद झाला.

     आपली संस्कृती म्हणजे त्यात खाद्यसंस्कृती आली, पोशाख, धार्मिक, आध्यात्मिक, आपली भाषा, नाते संबंध, देशाभिमान आणि आपले आचार विचार सुद्धा आलेच. यावर जाणून घेताना साहजिकच तिथल्या संस्कृतीचे पैलू पण कळले.   

    अगदी फिनलंड मध्ये पाय ठेवला पहिल्यांदा तेंव्हा घर आणि काही व्यवस्था दाखवायला ऑफिसच्या एक बाई आल्या, त्यांना आल्या आल्या पाणी दिलंत्यांना हे आदरातिथ्य नवीन होतं. त्या म्हणल्या आम्ही असे कोणाकडे पाणी पित नाही, काही अडचण असेल तर विचारा, लगेच विचारलं, लाइट गेले तर काय व्यवस्था आहे? त्या म्हणल्या इथल्या माझ्या नोकरीच्या २४ वर्षांच्या अनुभवात आज पर्यन्त एकानेही असा प्रश्न विचारला नाही. फिनलंड मध्ये लाइट जातच नाहीत.

   भारतीय म्हणून इथे खूप चांगला अनुभव आहे. आपल्याला चांगली ट्रीटमेंट देतात. मी ऑफिसला जाताना सुद्धा आपलाच पोशाख, कपाळाला टिकली, गळ्यात मंगळसुत्र घालते. फक्त त्याच प्रदर्शन होणार नाही याची काळजी घेते. असही इथे आठ महीने थंडी असल्याने पूर्ण कपडे असतात त्यात तुम्ही घातलेले बांगड्या, गळ्यातले हे दिसत नसतेच.

 


             मात्र एकदा रांगोळीच्या बाबतीत अनुभव आला. एकदा दिवाळीत स्वस्तिक चिन्हांची रांगोळी दारात काढली होती, दुसर्‍या दिवशी सकाळी पाहिलं तर पुसलेली दिसली. मला वाटलं स्वच्छता कामगार येतात ते स्वच्छता करून गेले असावेत.पण परत दिवाळी म्हणून रोज पाच दिवस मी रांगोळी काढतेच. दुसर्‍या दिवशी पुन्हा छोटीशी स्वस्तिक असलेली रांगोळी काढली. पुन्हा दुसर्‍या दिवशी पुसलेली दिसली मग छडा लावला .रोज स्वच्छता कामगार येत नाहीत मग कशी पुसली गेली? म्हणून लक्ष ठेवून होते, तेवढ्यात शेजारच्या बाईंनी बेल वाजवली. त्यांनी आमच्याकडे काळजीने विचारपूस केली की तुम्हाला इथे कुणी त्रास देतय का? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का कुणाकडून? आम्हाला काही कळेनासे झाले. मी म्हटलं, "नाहीं , असं काहीच नाही पण तुम्ही असं का विचारता ? ". तेव्हा त्यांनी सांगितले की कधीतरी काही बदमाश लोकं विद्वेषाच्या भावनेतून त्रास देण्याच्या उद्देशाने लोकांच्या घराबाहेर असं नाझी लोकांचं चिन्ह काढतात. गेले २ दिवस तुमच्या घरासमोर असंच काहीसं  चिन्ह मला दिसलं. तुम्हाला त्रास नको म्हणून मीच ते मिटवून टाकलं .  तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांचा काय गैरसमज झालाय ते. या अशा किस्स्यांबद्दल आम्ही ऐकून होतो, पण आम्हालाच असा काही अनुभव येईल असं कधी वाटलं नाही. पण परदेशात सुद्धा तुमची काळजी करणारे शेजारी लाभणं म्हणजे नशीबच. फिनिश लोक स्वभावाने खूप चांगले असतात याचा आलेला हा अजून एक अनुभव.

रांगोळी बरोबर उत्सुकता होती देवपूजा ? रोज होते ? राधिका म्हणाली हो रोज देवाची पूजा करतो. पण आरतीच्या वेळी घंटा हळू वाजवतो कारण इथे आवाज चालत नाही. रात्री दहा ते सकाळी सात हे सायलेंट अवर असतात. बाहेर कुठलाही आवाज जायला नको..मिक्सर, मशीन असे आवाजाचे यंत्रेही लावत नाहीत.  एवढंच काय कुठेही ओपन फ्लेमची सुद्धा परवानगी नाही, आग लागू शकते म्हणून,म्हणून इथे गॅस नाहीत इंडक्शन आहेत, घराबाहेर फ्लेम चालते गार्डन मध्ये वगैरे करू शकता . पण देवाजवळ दिवा तर लावायलाच हवा . मी अगदी छोटासाच लावते, उदबत्ती धूर चालत नाही, सेंसर आहेत सगळीकडे ,ते वाजले की दंड भरावाच लागतो. तुळशीला पण दिवा लावते .

 

मी आश्चर्याने विचारलं, तुळस आहे तुझ्याकडे? हो, तुळस आहे ,मैत्रिणीकडून तुळशीच बी आणून माती विकत आणून कुंडीत लावली. मात्र खूप काळजी घ्यावी लागते इथे थंडीमुळे.  त्या रोपाला थंडी पासून संरक्षण मिळावं म्हणून उष्णतेसाठी एक बल्ब लावला आहे. जो सूर्यासाखं काम करतो. त्या उष्णते प्रमाणे तुळस वाढते. आता तुळस छान वाढली आहे.    

बापरे आपले खाद्य पदार्थ आणि दिवा बत्ती, तळण, धूर काहीच चालणार नाही .अगदी भाजलेल्या वांग्याचे भरीत, बटाटेवडा, भजी, दिवाळीचा फराळ, धूप दीप कसं काय जमणार? कितीतरी वेळा सेन्सर वाजतील? तर राधिकाने दिवाळीची गमतीशीर आठवण सांगितलीच, “दिवाळीत मी भजी, पापड ,कुर्डया एका पाठोपाठ तळले, सगळ्याचा धूर झाला आणि सायरन वाजायला लागला. माझी धावाधाव झाली. सायरन बंद करण्याची धडपड केली, बंद होईना, ऊशा वगैरे घेऊन त्या स्पीकर वर टेबलवर चढून दाबून धरल्या की आवाज बाहेर जाणार नाही. तरी नाही. खूप कर्कश आवाज आणि बाहेर गेला तर? शेवटी अमितला फोन करून सांगितलं, तासभराने त्याने येऊन सर्व वायर्स काढून नीट केला तेंव्हा आवाज थांबला”.

     आम्ही इथे सुद्धा आजकाल सणवार पाळायला उत्सुक नसतो. त्याची अनेक कारणे आहेत. पण देशाबाहेर गेलात की ही संस्कृतीच आपला आधार पण असते . राधिका  दिवाळी, गुढीपाडवा आणि येणारे सर्व उत्सव करते, मुलींना आपली खाद्य संस्कृती समजावी म्हणून, कटाची आमटी, नारळी भात, पुरणपोळया असा नेहमीचा साग्रसंगीत स्वयंपाक करते. तेंव्हा घरात सणाचे वातावरण निर्माण होते. मुलींनाही परिचय होतो”.  

एकत्रित सण साजरे होतात महाराष्ट्र मंडळात, पण सर्वात जास्त गौरी गणपतीच्या आनंदाला मुकतो. पाडव्याला गुढी उभी करतो, पंचांग वाचतो, फक्त कडुनिंबाची पाने मिळत नाहीत. हे सर्व आम्हाला सकाळी ८ च्या आत नेहमी उरकावे लागतात, सुटीच्या दिवशी आले तर चांगले. अमित दत्तजयंती चे पारायण पण करतो, उद्यापन करतो. संक्रांतीचे हळदीकुंकू करतो मग जरा हायफाय वस्तु लुटतो. इथे जे मिळते ते.  मुलींच्या वाढदिवसाला सकाळी औक्षण, घरी जेवायला गोडधोड आणि संध्याकाळी देव दर्शन असा वाढदिवस साजरा करतो. इस्कोन मंदिर आहे. साई मंदिर आहे. इथे भजन, कीर्तन महाप्रसाद असतो.   

    आदर ही आपल्या संस्कृतीतली मोठी महत्वाची गोष्ट आहे. शिक्षक, गुरु किंवा मोठी वडीलधारी माणसे यांना आपण आदराने हाका मारतो, अरे तुरे करत नाहीत, ते इथे राधिकाला खटकते, इथल्या संस्कृतीत लहान मुले सुद्धा सहजपणे मोठ्या माणसांना नावानेच संबोधून बोलतात.

मुलींना अथर्वशीर्ष, रामरक्षा, पसायदान, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र पाठ आहे .रोज म्हणतात. बाराखडी उजळणी रोज घेतो, परदेशात राहून आपली भाषा टिकवणे हा एक महत्वाची जबाबदारीच असते, त्या बद्दल  अमितने या खूप सकारात्मक बाजू सांगितली की,  “इथल्या शिक्षणात मातृभाषेला महत्वाचं स्थान आहे. सर्व शिक्षण मातृभाषेतच म्हणजे फिनिश भाषेतच असतं. ते अनिवार्य आहे. त्यामुळे तिथली भाषा तुम्हाला यायलाच पाहिजे. पुस्तके, शिकविणे हे सर्व फिनिश भाषेतच असते”.

       “इथे आणखी एक कौतुकाची गोष्ट जाणवली की इथल्या शाळेतील शिक्षक किंवा पाळणाघरातील केअर टेकर सुद्धा पालकांना सांगतात की तुम्ही मुलांशी घरी तुमच्या मातृभाषेतच बोला. मुलांना मातृभाषेत जे ज्ञान मिळतं ते दुसर्‍या भाषेतून मिळू शकत नाही यावर त्यांचा भर आहे. ते म्हणतात तुम्ही घरी कुठलीही भाषा शिकवू नका मुलांना, जी भाषा शिकवायची ती आम्ही शिकवू, पण जे ज्ञान त्यांना मिळणार आहे ते तुमच्या मातृभाषेतुनच मिळेल. आपल्याकडे मात्र उलटे चित्र दिसते ते हे की, आपण मातृभाषे ऐवजी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच टाकतो कारण, असे शिक्षण हा सामाजिक प्रतिष्ठेचा आणि सामाजिक दडपणाचा विषय असतो. अपराधीपणाची भावना असते”. घरात मराठीच बोलतो. इथे महाराष्ट्र मंडळ आहे. मराठी कुटुंबे आहेत आणि इथे भारतीय लोक भेटले की राष्ट्रभाषा हिंदीतच शक्यतो बोलतो सगळे” .

   “आता महाराष्ट्र मंडळात मराठी भाषा शिकवण्याचा काही उपक्रम घेण्याचा प्रयत्न आहे . आपली मराठी इथेही टिकवावी हा आमचा पहिला प्रयत्न आहे. विशेष सांगायचे म्हणजे भारत सरकार इथल्या भारतीय दूतावासच्या माध्यमातून अशा बाहेर राहणार्‍या सर्व भारतीय भाषिकांना त्यांची भाषा टिकविण्यासाठी प्रोत्साहन देते आणि निधी पण पुरवते”.

  “शाळेत सुद्धा रिलीजन हा एक विषय आहे. पण त्यात पर्याय आहेत तुम्हाला जो समजून घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. ख्रिश्चनिटी, इस्लाम, एथीक्स, हिंदू नाही पण इस्कॉन चे  कृष्ण, हे चार पर्याय आहेत. सुदैवाने आम्हाला चांगला पर्याय मिळाला. मुलीने कृष्ण विषय घेतला आहे . इथे इस्कॉन मुव्हमेंट आहे. तिला भागवत शिकवतात, कथा शिकवतात, जन्म, मृत्यू, देव – दानव, पाप -पुण्य या गोष्टी यातून कळतात. हा इंग्लिश मध्ये शिकवतात आणि कृष्ण विषय फिनिश भाषेत पण शिकवतात, भगवतगीता फिनिश भाषेत सुद्धा आहे. इस्कॉनचे प्रभूजी हे स्वत: फिनिश आहेत. त्यांची कृष्णावर भक्ति आहे. अभ्यास आहे. म्हणून ते कृष्णाचा तिथे प्रसार करतात. ही गोष्ट मला अभिमानाची वाटली”.

 “आम्ही महाराष्ट्र मंडळात प्रामुख्याने गुढीपाडवा, गणेश उत्सव आणि दिवाळी  मोठ्या प्रमाणावर साजरे करतोच, यावर्षी पासून संक्रांत सण, हळदीकुंकू आणि १ मे हा महाराष्ट्र दिन साजरा करायला सुरुवात केली. मुलांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र दिन म्हणजे काय ? या वर्षी आम्ही मुलांची वत्क्तृत्व स्पर्धा घेतली. वेगवेगळे विषय देऊन मुलांना भित्तिपत्रक बनवायला सांगितले होते. भाषणे दिली मुलांनी, आपल्या संस्कृतीतले खेळ समजण्यासाठी, चमचा लिंबू, संगीत खुर्ची, रस्सीखेच हे खेळ आयोजित केले होते. त्यामुळं त्या देशात जन्मलेली मराठी मुले यांना माहिती होईल. शारदीय नवरात्र ,भोंडला यावर्षी करणार आहोत. आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी खाद्य पदार्थ हे नव्या पिढीला माहिती होतील याचा प्रयत्न असतो. या शिवाय महाराष्ट्राची संत परंपरा, इथली उद्योग क्षेत्रातील घराणी उदा किर्लोस्कर, गरवारे, चितळे इ, या संबधित माहिती देणे, चर्चा घडवून आणणे किंवा वत्कृत्व स्पर्धा घेणे असेही उपक्रम करतो. या निमित्ताने पालक आणि मुले दोघांचेही वाचन होते. अनेक गोष्टी आपल्या संस्कृती संदर्भात त्यांना कळतात”.

हे सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न होता तुम्ही स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताकदिना बद्दल मुलांना सांगता का काही? तर, अमित म्हणाला, “हे दोन्ही दिवस फिनलंड च्या भारतीय दूतावासा तर्फे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुलांना घरच्या घरी तिरंगा बनवायला शिकवतो. २६ जानेवारीची दिल्लीची परेड असते ती आम्ही आवर्जून टीव्हीवर दाखवतोच, जर शाळा असेल तर, ही परेड, चित्ररथ, सैन्य दले हे  यू ट्यूब वर मुलांना विडिओ द्वारे दाखवतो आणि ओळख करून देतो”. 

“पण एक जाणवतं की १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या आपल्या राष्ट्रीय दिवसांच महत्व व अटॅचमेंट जेव्हढी आम्हाला होती तेव्हढी या मुलांना नाही.कारण हे आम्ही स्वता भाग घेत अनुभवले आहे पण या मुलांना हे राष्ट्रीय दिवस म्हणजे इतर डे सारखेच साजरे करायचे डे असतात. तेव्हढच महत्व.म्हणून कमुनिटीत साजरे करतो. पण भारत आपला देश म्हणून त्यांना खूप आत्मीयता आहेच, त्यांना आपल्या घर नातेवाईक यांची आठवण येते. आपल्याला पुन्हा भारतात जायचे आहे, भारतच बेस्ट आहे हे त्यांच्या डोक्यात फिट्ट आहे”.

      मागची अनेक वर्षे वाचतो की जगात फिनलंडचा हॅप्पीनेस इंडेक्स सर्वात जास्त आहे. त्याचे कारण आर्थिक ताण कमी आहे. सरकारची मदत हा मोठा आधार असतो. इथे लक्षात घेतलं पाहिजे की आपण टॅक्स भरायचा असतो. तेंव्हा या सुविधा आहेत. मुलांच्या संगोपनाचा आर्थिक भार आईवडिलांवर नाही आणि वृद्धापकाळात आईवडिलांना सांभाळायचा आर्थिक भार मुलांवर नाही म्हणून दोघेही आनंदी च असणार.जॉब सिक्युरिटी किंवा सार्वजनिक जीवनात सिक्युरिटी सरकार देते त्यामुळे ही जबाबदारी कमी आहे त्यांना. जॉब गेला तर त्यामुळे काळजी करत नाहीत. जास्त पगार मिळतो म्हणून नोकरी बदलायची मानसिकता इथे नाही. आहे त्यात ते समाधान मानतात. तिथल्या संकल्पना वेगळ्या आहेत जीवनाच्या. पण फिनलंड मध्ये लोकांची स्वभाव वैशिष्ठ्ये म्हणजे, प्रामाणिकपणा, विश्वास ,संयम ,वक्तशीरपणा अशा अनेक गोष्टी आणि असे अनेक पैलू अमित आणि राधिका कडून आज कळले. धन्यवाद राधिका आणि अमित !

मुलाखत- डॉ. नयना कासखेडीकर

------------------------------     

No comments:

Post a Comment