Friday, 21 June 2024

डॉ हेडगेवार- लेखक - ना.ह. पालकर

 



डॉ हेडगेवार-

लेखक - ना.ह. पालकर

वाचायलाच हवा हा चरित्रग्रंथ


थोर आणि कर्तबगार व्यक्तींची चरित्रे पुढच्या पिढीला नेहमीच प्रेरणा देतात,मार्ग दाखवतात.आतापर्यंतअनेकऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे, संतांची चरित्रे, स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या काळातीलव्यक्तींचीचरित्रेवाचकांना उपलब्ध झाली आहेत. अशी चरित्रे त्यातील संस्मरणीय आणि उद्बोधक घटना मधून वाचकांना प्रेरकठरतात. त्यातील व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजतात. कर्तृत्व कळते, असेच एक उल्लेखनीय चरित्र म्हणजे ना.ह.पालकर यांनी लिहिलेले डॉक्टर हेडगेवार यांचे चरित्र.याला वाङमयीन मूल्य तर आहेच पण ऐतिहासिक मूल्य सुद्धाआहे.

कारण जगातल्या एकमेव मोठ्या हिंदू संघटनेचे संस्थापक असलेल्या डॉक्टर केशवराव हेडगेवार यांचे जीवनविषयी विचार, त्या वेळी असलेली सभोवतालची परिस्थिति, स्थित्यंतरे, त्याचे परिणाम, आचार, विहार, व्यवहार, कौटुंबिक घटना, स्वभाव वैशिष्ठ्ये आणि घडत गेलेले व्यक्तिमत्व आजच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या दिशेने होणार्‍या वाटचालीच्या पार्श्वभूमीवर समजून घेणं महत्वाचं वाटतं.


एखाद्या व्यक्तिच्या जीवनात घडलेल्या सामाजिक घटनांचा त्याच्या व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम समजून घेत घेत चरित्र वाचताना आपल्याला एखादे व्यक्तिमत्व समजत जाते, उलगडत जाते. तसेच, त्या वेळच्या स्थळ, काळ आणि परिस्थितिचे आपल्याला आकलन होत जाते.त्या प्रमाणे डॉक्टरांचा हा चरित्रग्रंथ वाचताना हे सर्व समजतेच पण, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात डॉक्टरांनी क्रांतिकारक म्हणून केलेले काम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आज जगभर बलाढ्य समजल्या जाणार्‍या विशाल संघटनेच्या स्थापनेची गरज का पडली, त्यावेळची सामाजिक व राजकीय परिस्थिति कशी होती आणि या सगळ्यात डॉक्टरांचे योगदान सुरुवातीपासून काय आणि कसे होते हे यातून वाचताना मन आश्चर्याने स्तिमित होते आणि ऊर अभिमानाने भरून येतो. हा ग्रंथ वाचताना एकीकडे राष्ट्राला संघटनेचा मंत्र देणार्‍या आणि त्यासाठी अतोनात कष्ट घेणार्‍या डॉक्टरांचे उत्तुंग व्यक्तिमत्व कसे घडत गेले ते समजते तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळपास शतकभराचा असंख्य खाचखळग्यांनी भरलेला इतिहास म्हणजे एका दीर्घ वाटचालीचा पटच आपल्यासमोर उलगडतो आणि राहून राहून आश्चर्य वाटतं की एका अलौकिक कर्तृत्ववान व्यक्तीने सुरू केलेली एक संघटना तब्बल १०० वर्षभर कार्यरत आहे, नव्हे फोफावलेल्या एका विस्तीर्ण वटवृक्षासारखी भारतातच काय, भारताबाहेरसुद्धा आपली मुळे खोलवर रुजविते ! याचे कारण त्यांनी बालवयापासूनच अनुभवलेला पारतंत्र्यातील भारत. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू करून आपले जीवन आर्थिकदृष्ट्या स्थिर, सुखी व्हावे अशी चारचौघांसारखी रूढ वाट चालावी असे कदापिहि न वाटता, आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची तीव्र उर्मी त्यांच्या मनात होती. परकीय सत्तेखाली भरडून निघत असलेला भारत रोज दिसत होता आणि त्यामुळे इंग्रजांबद्दल मनात कमालीची चीड होती.त्यांच्या जीवनातल्या अनेक घटनां वरून दिसते. एक प्रसंग उल्लेख करण्याजोगा आहे, इंग्लंड ची रानी विक्टोरिया हिच्या राज्यारोहणाला २२ जून १८९७ ला साठ वर्षे पूर्ण झाली म्हणून सगळीकडे समारंभ, भाषणे होऊन, त्यानंतर मुलांना मेवामिठाई वाटण्यात आली. काही अजाण मुलांनी ती आनंदाने उड्या मारत खाल्ली. पण परदास्याची जाणीव असलेला लहानगा केशव, त्याने मिळालेला पुडा घरी आल्यावर कचर्‍याच्या डब्यात फेकून दिला. भावाने विचारलं केशव तू एव्हढा गंभीर का? तुला नाही वाटतं मिठाई मिळाली?केशवने उत्तर दिले मिळाली तर! पण आपल्या भोसल्यांचे राज्य जिंकणार्‍या राजांच्या समारंभाचा आनंद कसला? कारण लहानपणी त्यांच्या मनावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा विलक्षण प्रभाव होता. सीतबर्डीच्या किल्ल्यावर युनियन जॅक फडकताना दिसला की, त्या बाल मनाला वाटे तो काढून टाकून तिथे भगवा झेंडा लावला की किल्ला सर झाला. एव्हढेच काय वर्गात इतिहासाच्या तासाला शिकविले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र केशव अत्यंत तन्मयतेने ऐकत असे. त्यातल्या रोमांचकारी अद्भुत घटना ऐकल्यावर त्याला वाटे आपणही असा पराक्रम करावा. असे अनेक संदर्भ डॉक्टरांच्या देशभक्तीचे दाखले म्हणून या ग्रंथात ठिकठिकाणी आले आहेत.

म्हणून पुढे हिंदूंचे असे संघटन उभे करून हिंदू राष्ट्र स्वबळाने आणि वैभवाने पुन्हा एकदा जगाच्या अग्रभागी दिसावे अशा उद्देशाने डॉक्टरांनी, अखेरच्या श्वासापर्यंत सर्व शक्तींनीशी प्रयत्न केले. त्यांनी भले संन्याशाची वस्त्रे चढवली नाहीत पण ब्रह्मचारी राहून संन्यस्त जीवन जगले, ते केवळ आणि केवळ राष्ट्रासाठी. आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडेल की काय विचार होता या मागे?

केशवराव कलकत्त्याहून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पदवी घेऊन परतल्यानंतर साहजिकच लग्नासाठी मुलींची स्थळे येऊ लागली. तसे यासाठी प्रयत्न करणार्‍या आपल्या काकांना त्यांनी पत्राने कळविले की, “अविवाहित राहून, जन्मभर राष्ट्रकार्य करण्याचा मी निश्चय केला आहे. देशकार्य करताना केंव्हाही जिवावरचे संकट ओढवू शकेल, हे माहीत असताना उगीच एका मुलीच्या जीवनाचा नाश करण्यात काय अर्थ आहे?” आणि देशकार्यासाठी ब्रह्मचारी राहून आपले ध्येय साधत राहिले. केव्हढे हे समर्पण होते?

हम करे राष्ट्र आराधन,

तन से, मन से, धन से,

तन मन धन जीवन से,

हम करे राष्ट्र आराधन !

हा चरित्र ग्रंथ वाचताना या गीताची प्रचिती आपल्याला पदोपदी येते आणि मन आदराने भरून येते.
त्यांच्या अशा निर्णयामुळे, त्यागी आणि सच्छील देशभक्त तरुण म्हणून त्यांच्याकडे सगळे पाहात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देश कार्यासाठी पुढे येत. या वयातला हा त्यांचा निर्णय होईपर्यंतच्या काळात त्यांचे लहानपणापासूनचे आयुष्य कसे होते, त्यांना देशासाठी, राष्ट्रासाठी अवघ आयुष्य समर्पित करावं अशी प्रेरणा देणार्‍या कुठल्या घटना होत्या, हे सगळं या चरित्र ग्रंथातून समजतं.डॉक्टरांनी म्हटले होते,

सामर्थ्य आहे हिंदुत्वाचे |

प्रत्येक हिंदु राष्ट्रियाचे |

परंतु तेथे संघटनेचे |

अधिष्ठान पाहिजे ||

त्याप्रमाणे, संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करणे हाच त्यांचा उद्देश होता. त्यांनी हे संघटन बांधताना एका कार्यपद्धतीने त्याला आकार दिला. एक शिस्त लावली, दृष्टी दिली, संघटन कौशल्य शिकविले. वेगवेगळ्या प्रसंगातून व घटनातून आणि व्यवहारातून बरोबरच्या कार्यकर्त्यांवर संस्कार केले. त्यामुळेच त्यांनी १९२५ च्या विजयादशमीला सुरू केलेले हे कार्य, आज काळ बदलला तरी त्या नंतरची सतत ९८ वर्षे वाढतच आहे. संघ स्थापन करून राष्ट्रासाठी हिमालयाएवढे काम करणारे डॉक्टर हेडगेवार म्हणजेच संघ आणि संघ म्हणजेच डॉक्टर हेडगेवार.

पूजनीय डॉक्टरांचे हे चरित्र, भारतीय विचार साधनाने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ स्वयंसेवक (दिवंगत) ना.ह. उपाख्य नाना पालकर यांनी हे लिहिले आहे. या ग्रंथाला प.पू. श्रीगुरुजींची सविस्तर अशी प्रस्तावना आहे. ग्रंथाची ही प्रस्तावना वाचल्यास हे चरित्र लिहिण्यातल्या अडचणी किती होत्या आणि तरीही ते लिहिणे आपल्यासाठी किती महत्वाचे होते हे आज कळते. अन्यथा हा इतिहास आपल्या हाती लागलाच नसता आणि याचे दस्तैवजीकरण ही झाले नसते. डॉक्टरांच्या निधनानंतर २० वर्षांचा काळ लोटल्यावर हे चरित्र लिहिले गेले, हे काम अर्थातच सोपे नाही. शिवाय पूर्वायुष्यात डॉक्टर क्रांतिकारक म्हणून काम करताना इंग्रज शासनाच्या हाती काही लागू नये ही काळजी घेत असल्याने अनेक संदर्भ प्रसिद्ध झाले नाहीत, जपून ठेवले गेले नाहीत. इंग्रज सरकारचेही डॉक्टरांवर बारीक लक्ष असे. लेखक कै.नाना पालकरांनी मनोगतात आणखी एक खंत व्यक्त केली आहे की, गांधी हत्येनंतर १९४८ मध्ये झालेल्या जाळपोळीत डॉक्टरांच्या संबोधनांची प्रतिवृत्ते व पत्रे यात नष्ट झाली. जे कागदपत्र चरित्र लिहिण्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. ते हाती आले असते तर, डॉक्टरांचे संघटक म्हणून व्यक्त झालेले वेळोवेळचे विचार व चिंतन आपल्यापर्यन्त पोहोचले असते. शिवाय कित्येक कागदपत्रे सरकारकडून जप्त झाली, काही वाळवी लागून हातची गेली. डॉक्टरांना पाहिलेल्या वा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती हयात नसल्यामुळे ज्यांच्याकडून प्रत्यक्ष माहिती उपलब्ध झाली असती, ते ही शक्य झाले नाही. म्हणूनच हे ग्रंथ लेखन परिश्रमाचे व कौशल्याचे काम होते. यात ‘महाराष्ट्र’सारख्या जुन्या वृत्तपत्रातील माहिती, संबंधित व्यक्ती व कार्यकर्त्यांशी बोलून, जुनी कागदपत्रे, संदर्भ, काही भाषणे, पत्रव्यवहार ,लोकांनी सांगितलेल्या आठवणी आणि संदर्भ घेत लिहिलेल्या या चरित्रामुळे डॉक्टरांचे अगदी बालपण, शालेय जीवन, युवावस्था, वैद्यकीय शिक्षण ते संघस्थापने पर्यन्त घडलेले त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना, घडामोडी आणि त्यानंतरच्या काळात केलेले काम, कॉंग्रेस पक्षातील दायित्व, क्रांतिकारक हालचाली, भोगलेला तुरुंगवास, गांधीजींच्या दांडी सत्याग्रहातला वैयक्तिक सहभाग व त्यामुळे घडलेला नऊ महीने तुरुंगवास, जंगल सत्याग्रह, असहकार आंदोलन, होमरूल चळवळीत दिलेली भाषणे अशा अनेक गोष्टींपासून ते थेट संघाचा कार्यविस्तार इथपर्यंतचा डॉक्टरांचा जीवन प्रवास या चरित्रग्रंथात वाचायला मिळतो.

१९२५ साली विजयादशमीला सुरू झालेल्या एका शाखेपासून प्रारंभ झालेलं संघाचं काम डॉक्टरांच्या दूरदृष्टीमुळे आणि कामाच्या विस्मयकारक झपाट्यामुळे त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यन्त म्हणजे १९४० पर्यन्त ७०० शाखा आणि ८० हजार सदस्य, इतके वाढले होते. आज तर देशभरात हजारो शाखा आणि लाखो स्वयंसेवक कार्यरत आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखादे संघटन किंवा राष्ट्रासाठीचे काम उभे करून ते वाढवायचे असेल तर काय काय गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात? काय व कसे निर्णय घ्यायला हवेत? कसे आचरण असायला हवे? कार्यकर्ता कसा घडवायचा? वैयक्तिक भेटीचे महत्व, सहकार्य, विश्वास आणि प्रेम, लोकसंग्रह, डॉक्टर मुंजे, लोकमान्य टिळक, क्रांतिकारक सावरकर तिन्ही बंधु, सुभाषचन्द्र बोस, शामा प्रसाद मुखर्जी, लोकनायक अणे, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू यांच्याशी संपर्क आणि अशा अनेक बारीक सारिक गोष्टी, डॉक्टरांची स्वभाव वैशिष्ठ्ये या चरित्रातून आपल्याला समजतात. प्रभावी संस्कार केल्यावचून देशभक्ती चे टिकाऊ स्वरूप निर्माण होणे अशक्य आहे असे त्यांना निरीक्षणातून पटले होते. त्यासाठी विशेषत: आजच्या तरुणांनी हा चरित्र ग्रंथ आवर्जून वाचलाच पाहिजे असा आहे. त्याशिवाय ज्यांना आतापर्यंत संघ समजला नाही त्यांनी जरूर वाचला पाहिजे. झालेले गैरसमज क्षणात गळून पडतील.म्हणून म्हणावेसे वाटते हिंदुनो हा चरित्र ग्रंथ वाचाल तरच वाचाल !

- लेखन – डॉ. नयना कासखेडीकर,पुणे.

(हा लेख साप्ताहिक विवेक हिंदुस्तान प्रकाशन यांनी संघ शताब्दी वर्षा निमित्त प्रकाशित केला त्यात समाविष्ट आहे. ६७४ पानी असलेला हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे व वाचनीय आहे. त्याचा एक छोटासा भाग आपण आहोत याचा अभिमानच आहे.) 

                                                                    ---------------------- 

No comments:

Post a Comment