Friday, 16 August 2024

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


भारताच्या इतिहासातले , महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे व्यक्तिमत्व अहिल्याबाई होळकर यांचे हे जन्म त्रिशताब्दीवर्ष आहे. या निमित्त या कर्तृत्वशालिनीची ओळख करण्याचा जागर अखिल भारतात मांडला जातोय. नव्हे तो मांडलाच पाहिजे, त्याशिवाय या अठराव्या शतकातील, 28 वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्तीची ओळख कशी होणार? रूढी परांपरांनी जखडलेल्या भारतात सामाजिक सुधारणा करण्याचे प्रयत्न 19 व्या शतकात सुरू झाले होते. पण त्या आधीचा काळ ? स्त्रियांना प्रतिकूलच होता.

अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान. सर्वसामान्य कुटुंबातली अहिल्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामींनी झाल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची जागा सुनेला, अहिल्येला देणारे मल्हारराव होळकर ( इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक ) खरंच ग्रेट च होते. त्यांचे ही कौतुक वाटते. त्यांचा हा पाठिंबा म्हणजे आज स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा असावा हे सांगणारा आहे. घराण्याचा वंशाचा दिवा मुलगाच हे मानण्याच्या काळात एक स्त्री असूनही,आपला पुत्र खंडेराव याचे निधन झाल्यानंतर, विधवा झालेल्या सुनेला त्याच्या जागी राजपदाची सूत्रे बहाल केली. तिचे अंगीभूत गुणवैशिष्ट्य हेरून तिला घडविणारे मल्हारराव म्हणूनच वेगळे आहेत. अशी घडलेली एक स्त्री काय करू शकते ,कसा पराक्रम गाजवू शकते हा इतिहास समजून घ्यायला हवा.


राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता ,आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या.त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच.माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत.तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित , वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले. या अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घटना, त्यांचे कार्य यांचा आढावा घेणारी ही मालिका, त्यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने क्रमश:

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी ही मालिका अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे त्यांच्या महिला विश्व च्या ऑगस्ट च्या अंकात सुरू झाली. ही मालिका ,दर महिन्याला एक अशी वर्षभर प्रसिद्ध होणार आहे.

© --ले. डॉ. नयना कासखेडीकर               

                                                        ---------------------------

Thursday, 15 August 2024

मणिपूर- एक सांस्कृतिक ओळख

 

                                              मणिपूर- एक सांस्कृतिक ओळख

                 
         निसर्ग सौंदर्याने नटलेले, ईशान्येकडचे राज्य मणिपूर रत्नभूमी ( The Land of Jewels )म्हणून ओळखले जाते. भारताच्या पूर्व सीमेवर आजूबाजूच्या नऊ डोंगरांनी वेढलेला मैदानी खोर्‍याचा प्रदेश मणिपूर. या राज्याच्या उत्तरेकडे नागालँड, पूर्व व आग्नेयला ब्रह्मदेश, दक्षिणेला मिझोराम आणि पश्चिमेला आसाम . मणीपुर हा भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय संपन्न असलेला प्रदेश . दुर्गम भाग असल्याने इथे वन्य आणि भटक्या जमाती जास्त आहेत. 33 अनुसूचीत जनजाति आहेत. एमोल, अनल, चिरु, चोथे, गांगटे, इनपुई, हमार, खारम, खोइबू, कोइरांव, कोम, लामकांग, लियांगमाई, माओ, मरम, मरिंग, माटे, मोनसांग, मोयोन, पैते, पौमाई, पुरुम, राल्ते, रोंगमेई, सिम्टे, सुहते, तांगखुल, टाराओ, थाडौ, थंगल, वैफेई, जिमी और जो. तर अनुसूचीत जाती 7 आहेत प्रकारच्या आहेत. इथे अनेक संस्कृतीचा संगम आणि लोकजीवन अनुभवायला मिळते. जवळ जवळ 59 % लोक या खोर्‍यामध्ये राहतात तर 41 % लोक आदिवासी पहाडी दुर्गम भागात राहतात. यांचे मुख्य दोन प्रकार आहेत मैतेयी आणि कुकी. मैतेयी आणि नागा मणीपुरचे मूल निवासी मानले जातात. प्रत्येक जाती आणि जनजाति लोकांची भाषा वेगळी आहे. संस्कृती थोडी वेगळी आहे. पण सर्वांचा मुख्य संवाद मणीपुरी भाषेतच होतो.

मणीपुर ची मूळ भाषा ‘मितई’ किंवा ‘मणीपुरी’ आहे. याची लिपि रोमन आहे. ‘लियांगमेई’ ही आणखी एक बोलली जाणारी भाषा आहे. एव्हढ्या प्रकारच्या लोकांवरून इथली संस्कृती कशी असेल याची कल्पना आपल्याला येते. सर्वांचे रीतिरिवाज, पोशाख, परंपरा वेगवेगळ्या आहेत. सतराव्या शतकापासून चैतन्य वैष्णव संप्रदायाची उपासना पद्धत इथे आहे. ती अजूनही टिकून आहे.

भाषा-
मणीपुर राज्यात बोलली जाणारी मुख्य भाषा मणीपुरी आहे. या भाषेला तीन ते चार शतकांचा इतिहास आहे.तिला मेईथेई म्हणतात. ब्रह्मी आणि तिबेटी भाषेशी साम्य असलेल्या याची लिपि मेईथेई होती, पुढे आठराव्या शतकात बंगाली लिपीचा वापर सुरू झाला. मणीपुर चे प्राचीन साहित्य इन्फाळ च्या बोली भाषेत आढळते. मणीपुर मध्ये 29 प्रकारचे आदिवासी राहतात त्यांची प्रत्येकांची स्वतंत्र भाषा आहे. सर्वांचे रीतिरिवाज, पोशाख, परंपरा वेगवेगळ्या आहेत. वैशिष्ट्य पूर्ण आहेत.

ऐमोल लोक कुकी आहेत. ते असम आणि मणीपुर दोन्ही ठिकाणी आढळतात. त्यांची भाषा ऐमोल. शेती करतात. सर्वात जुनी जनजाति म्हणजे च अनल जाती, तर चिरू लोक मणीपुर आणि असम मध्ये विशेषता आढळतात. ते कुकी, चीन, नागा पैकी चिरु ही त्यांची भाषा आहे. यांचे आचार विचार रीतिरिवाज कुकी सारखे, तर शरीरयष्ठी ,सवयी केशभूषा नागा लोकांसारखी आहे. नागांच्या विविध जमातींच्या भाषा वेगळ्या आहेत. इनपूई ची इनपूई,लियांगमाई ची लियांगमाई,मरम यांची मरम,कूकींमध्ये मते जंजातींची भाषा माटे पाओ,मोनसांग लोकांची मोनसंग ही चीनी तिबेटी भाषा.

साहित्य – मणीपुरी साहित्य प्राचीन काळापासून असल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. जुन्या कोरीव लेखातून एक प्रार्थना इ.वि.सन पूर्व आठव्या शतकात लिहिली आहे. सोळाव्या आणि सतराव्या शतकात मणीपुरी भाषेत लिखित साहित्य रचना चांगली झाली असे म्हणाले जाते. 1890 मध्ये ‘मणिपुरेर इतिहास’ हा प्रकाशित झालेला पहिला ग्रंथ . कवी निलकांत सिंह ,.एन बिरेन, कवी इबोपिशक,कवी राजकुमार मधुवीर,ठा. इबोहल, के.पद्मयकुमार,यांच्या कविता म्हणजे पारंपारिक रचनांबरोबरच सामाजिक चित्रण, सामाजिक परिस्थिति,जाणिवा, जीवनातील पोकळी, मनाची अस्वस्थता, स्वच्छंदपणा, देशभक्ती, वासुदेव व गोपी यांची वर्णने अशा रचना केल्या आहेत.

मणीपुरी भाषेत कवितांशिवाय कथा, कादंबरी, नाटके-(मणीपुर प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारी नाटके ) निबंध, समीक्षा, अनुवाद-(संस्कृतमधील रामायण महाभारत,कालिदास,बाणभट्ट यांच्या रचना, प्रेमचंद, बंकिम चंद्र चटर्जी, टागौर यांचे साहित्य) अशा साहित्य प्रकारांचे लिखाण आहे.

लोकजीवन व परंपरा - मणीपुर चे सर्वोच्च हिल स्टेशन असलेल्या उखरुल जिल्ह्यात जिथे सर्वात जास्ती तांगखुल नागांची वस्ती आहे ही प्राचीन जमातींपाइकी एक समजली जाते. ही जमात निसर्ग पूजक आहे.तांगखुल या मैतेयी बोलीतील शब्दाचा अर्थ- बडे भाई का गांव असा आहे. या भागातील कांगखुई इथे चुन्याच्यी लेणी आहेत, येथे पाषाणयुगीन मानवी वस्त्यांचे पुरावे सापडले आहेत. म्हणजे प्राचीनतेचा धागा दोरा पाषाण युगीन काळात आपल्याला घेऊन जातो.

भारत- म्यानमार सीमा क्षेत्रात येणार्‍या उखरुल च्या तांगखुल नागांचा धर्म ख्रिश्चन आहे, मणीपुरच्या लोकांचा धर्म बदलण्यास मिशनर्‍यांनी पहिला प्रयत्न तांगखुल येथेच केला.1895 पासून ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे जीवन बदलले. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने निसर्ग चक्राप्रमाणेच त्यांचे सण आणि उत्सव असतात.त्याला धार्मिकतेची जोड असते. पेरणीचा उत्सव लुईरा फणित ,मंगखप फणित आणि युवा उत्सव हे मोठे सण असतात. लुईरा फणित हा वृक्षारोपण हंगामाच्या सुरूवातीला साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव असतो. संगीतप्रेमी असलेले हे लोक लोकगीते आणि लोककथा याद्वारे सादरीकरण करतात. व्हायोलिन, तुरही, ड्रम, माजो(महिलांचे मौखिक संगीत), बासरी, पैरेन (बांबुचा पाईप,) ही त्यांची पारंपरिक वाद्ये आहेत. मौखिक परंपरा, लोकगीते, नृत्य, संवाद ,याद्वारे त्यांनी इतिहास जीवंत ठेवलेला दिसतो.

                             

या जमाती मध्ये वस्त्र प्रवारणे आणि आभूषणे घालण्याचे काही नियम पारंपरिक आहेत, लिंग, वय, सामाजिक स्थिति, वैवाहिक स्थिति याप्रमाणे सूत, रंग, आकार,कपड्याचे प्रकार समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी प्रथेप्रमाणे ठरवून दिलेले असतात.विणकाम हे मणीपुर मधील प्रमुख कला व कापड उद्योग आहे. प्रत्येक घरात हातमाग /लूम आहेत. घराघरातील प्रत्येक स्त्री यात सहभागी असते, हे कौशल्य लहान वयापासूनच मुलगी आत्मसात करते. सामाजिक जाणीवेतून सुरू झालेले हे काम पुढे त्यांचा हातमागाचा उद्योग, अर्थाजनासाठी उपयोगी पडतो. तिथे प्रत्येक घरात मैतेयी, काबूईस, थांगकुल आणि कुकी स्त्रिया विशेषता हे काम करतात. विणकाम कलेमुळे येथील खेडी स्वयंपूर्ण बनली आहेत. आत्मनिर्भर झाली आहेत. भरतकामाचे निरनिराळे प्रकार आहेत. पुरुष जेंव्हा युद्धकाळात बाहेर असत तेंव्हा घरातील स्त्रिया त्यांच्या साठी कपडे /गणवेश पुरवीत, तसेच आपला उदरनिर्वाह चालवीत . तेंव्हापासून योद्ध्यांसाठी व राजा साठी वेगळे भरतकाम असलेले कापड तयार करण्याची प्रथा आहे. त्याला वॉर कापड म्हणजे युद्धासाठी तयार केलेली विशेष शाल -लॅम्फी म्हणतात. राजदरबारातील विश्वासू लोकांसाठी लांब कोट सैजूनबा, योद्ध्यांच्या पगडीवर लावण्यासाठी लहान ध्वज चिन्ह -प्लम फिरनानबा , धोतर- खमेनचटपा, फिरंजी- लाल रंगाचे ब्लंकेट. अशा अनेक डिझाईन्स चे प्रकार पण आहेत. नृत्यासाठी, सण समारंभासाठी, लग्नासाठी, वीरता म्हणून सन्मानासाठी, कपड्यांवर नक्षीकाम वेगवेगळे असते. आदिवासींच्या रचना व नक्षीकाम वेगवेगळ्या असतात. कबुई नागा, हमर्स, कूकी, पेइतीस, थंगथुल नागा या आदिवासींची कपड्यांची वैशिष्ट्य पूर्ण डिझाईन असतात.

                                                      
                                                    

‘थांगौ पुओन’ हे पैतें चे कापड, जो पर्यन्त युद्धात शत्रूंना मारत नाहीत तो पर्यन्त हे कापड त्या पैतेइ लोकांना वापरता येत नाही अशीही प्रथा आहे.तसेच गावात जो सर्वात जास्त पीक कापणी करतो त्यालाच हे कापड वापरता येते, ‘पुओन दम’ हे राष्ट्रीय कापड शोकसभा, अधिकृत सभा, राष्ट्रीय दिन या वेळेसच वापरता येते. जौल पुअन कापड नव विवाहितेने सासरी जातांना पतीसाठी भेट म्हणून नेणे अनिवार्य असते.

                                     

मैतेयी हिंदू नववधू पोशाख म्हणजे ‘पोटलोई किंवा पोलोई’ म्हणजे जड कापड आणि बांबूचा दंडगोलाकार सुशोभीत स्कर्ट. हाच रास लीला नृत्याला पण वापरतात. याला पण इतिहास आहे. हे पोटलोई डिझाईन महाराजा भाग्यचंद्र (1749 -1798 ) यांनी रस लीला या नृत्यासाठी पोशाख म्हणून तयार केला होता. त्याच्या सुंदरतेमुळे पुढे तो हिंदू मैतेइ लोक समारंभसाठी वापयाला लागले. मग तोच वधू पोशाख म्हणून प्रसिद्ध झाला.

     हस्तकला - भरतकाम विणकाम आणि हातमाग कापडा बरोबरच हस्तशिल्प आणि हस्तकला यातही मणीपुर प्रसिद्ध आहे. बांबू च्या कलाकुसरीचे सर्वात मोठे उत्पादक म्हणून हे राज्य ओळखले जाते.याला मोठी आंतरर्राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. कुंभारकामाची वेगळीच शैली येथे पहायला मिळते. यात कुंभार कामात चाकाचा उपयोग न करता अन्द्रो,थोंगजाओ आणि नुंगबी या जमाती अशी भांडी हाताने आकार देत तयार करतात. हे त्यांचे पारंपरिक कौशल्य आहे. तर, ऊस आणि बांबू हस्तकला, कौना हस्तकला, मातीची भांडी , कापड विणकाम (हाताने विणलेले आणि भरतकाम केलेले कापड),लाकूडकाम, अशा विविध कलात्मक वस्तु म्हणजेच कापड, खेळणी, सजावटीच्या वस्तु, दगडी आणि लाकूड कोरीव काम, बाहुल्या प्रसिद्ध आहेत.


                           


                               

मणीपुरी नृत्य – हे पारंपरिक शास्त्रीय नृत्य आहे.रास लीला शास्त्रीय शैलीत तर लाई हारोबा लोक शैलीत असते. संकीर्तन चोलम, पुंग चोलम, रास लीला - रास लीला चे वसंत रास, कुंजा रास, महारास, नित्य रास, दीबा रास हे प्रकार आहेत.या शास्त्रीय नृत्य प्रकारात राधा आणि कृष्ण यांचे अलौकिक प्रेम आणि भक्तिचे दर्शन असते. या नृत्य नाटिका प्रकारातून श्रीकृष्णाच्या लीला, वृंदावनच्या गोपिकांबरोबरच्या कहाण्या आणि उदात्त प्रेम दाखवले जाते. वसंत रास होळी पौर्णिमेला तर राखी पौर्णिमेला कुंजा रास सादर करतात. यात विशेषता श्रीकृष्णाच्या प्रेमलिलेवर आधारित गीत गोविंद किंवा पद्म पुराणातील विषय गीत नृत्य आणि अभिनयाने मांडले जातात. हे नृत्य नाट्य मंदिरात केले जाते.

                       

                       

                        

 आश्विन पौर्णिमेला साजर्‍या होणारी कुंजा रास गोविंद लीलामृत वर आधारित असते. यात पूजा, भक्ति, प्रार्थना, पुष्पांजलि, आरती सादर होते. भागवत पुराणावर आधारित ,कार्तिक पौर्णिमेला ही रास होते. यात श्रीकृष्णाची निष्काम भक्ति आणि शुद्ध प्रेम यावर, श्लोक आणि गीतांच्या माध्यमातून कथा सादर केली जाते.
थांगटा नृत्य- मार्शल आर्ट्स आणि तलवारी व भाला यांचा कौशल्यपूर्ण वापरकरून नृत्य सादर होते.
पुंग चोलम- हे नृत्य पुरुष सादर करतात. याला मृदंग कीर्तन म्हणतात.

                          
सण उत्सव - मणीपुर मध्ये आनंद व उल्हास देणारे उत्सव वर्षभर सुरु असतात. यात लाई हारोबा, याओशांग (होली), रास लीला, चैराओबा, निंगोल चकौबा, रथयात्रा, दुर्गा पुजा, दिवाळी, ख्रिसमस, मेरा हौचौगंबा, असे विविध महत्व पूर्ण सण साजरे केले जातात.
  
                              
   लाई हारोबा – हा नृत्य नाट्य महोत्सव असतो. . सृष्टीची उत्पत्ती करणार्‍या देवतेचा हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पारंपरिक देवता आणि पूर्वजांचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करणे हा उद्देश असतो. सनामाही, पखंगबा, नोंगपोक निमगथो, लेईमरेल,उमंग लाई या जंगलातील देवी देवतांची पण पुजा करतात. निसर्ग, प्राणी आणि मनुष्य यांच्या जीवनासाठी देवाची प्रार्थना असते. पुजा, पौराणिक कथांवर आधारित पारंपरिक गीते व लोकनृत्य, नाटक लोककथा यातून विषयाची मांडणी होते.


                                
निंगोल चकौबा हा सण म्हणजे मैतेयी /वैष्णव लोकांचा प्रमुख सण आहे. ‘निंगोल म्हणजे महिला’ आणि ‘चकौबा म्हणजे भोजनाचे आमंत्रण’. याची परंपरा म्हणजे आपल्या विवाहित मुलीं व बहिणींना माहेरी भोजनासाठी बोलावून आदरातिथ्य करायचे. ऑक्टोबर- नोहेम्बर मध्ये येणारा हा सण श्रीमंत गरीब अशा सर्वांच्या घरी साजरा केला जातो. आपल्या आई वडिलांच्या, भावाच्या घरी,अर्थात माहेरी, बहिणी व मुली मुलाबाळांसह आवर्जून येतात, सर्व जण तिचा आनंदाने सत्कार व स्वागत करून एक कौटुंबिक पुनर्मिलन करून ही नाती अधिक दृढ करतात. मणीपुर मध्ये या सणाला सार्वजनिक सुट्टी असते.


                              
याओशांग उत्सव म्हणजे होळी- हा मणीपुरचा सर्वात महत्वाचा उत्सव फाल्गुन मध्ये पाच दिवस चालू असतो. याचे मुख्य आकर्षण असते लोकगीतांवर आधारित थबल चोंगबा पारंपरिक नृत्य. नृत्य हे ईश्वर उपासनेचे च एक रूप मानले जाते. मैतेयी लोकांच्या या सणाला तीनशे वर्षांची परंपरा आहे. हा आदिवासींचा एक कृषि उत्सव होता.आपल्याकडील गणेशोत्सवा सारखेच लोकांकडून देणग्या गोळा करून सण साजरा करतात. या दिवशी कुस्ती, घोडेस्वारी असे खेळही आयोजित केले जातात.

                              
काबुई नागां चा गंग-न्गाई आणि लुई-न्गाई-नी- हे सण नागा जन जातीचे प्रमुख सण आहेत, वसंत ऋतुत बीज पेरणी करून शेतीचे काम उत्साहात सुरू करताना एकत्र येऊन गीत, नृत्य, भोजन यांचा आस्वाद घेऊन ,बियाणे पेरणीचा हंगाम नागा लोक पाच दिवस साजरा करतात.

                             
कुट महोत्सव – ज्याप्रमाणे बीज पेरणी उत्सव हा कृषीवर आधारित साजरा करतात, त्या प्रमाणेच वर्षभर कठीण परिश्रम करून घेतलेले पीक , शरद ऋतुत कापणी करून हातात भरपूर पीक आलेले असते, त्याचा आनंदोत्सव व देवाचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा करतात, कुट म्हणजे कापणी .हा कुकी-चीन-मिजो आदिवासी शेतकर्‍यांचा उत्सव असतो.

असाच उत्सव तांगखुल नागा लोक चुम्फा उत्सव म्हणून साजरा करतात.सात दिवस चालणार्‍या या उत्सवात विशेष गोष्टींना स्थान आहे. मुख्याता पेय जल शुद्धता आणि स्वच्छता यासाठी सणाच्या आधल्या दिवशी गावातील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत साफ करतात. या दिवशी नव्या सुनेला सासूकडून घराचा सर्व व्यवहार सांभाळायला दिला जातो. साहजिकच घराची मालकीण होण्याचा मान याच दिवशी नव्या सुनेला मिळतो.

याच प्रमाणे अंग्गी फेव उत्सव - नागा लोक भविष्यातील सर्वांच्या समृद्धीसाठी देवाकडे मागणे मागतात.यावेळी कुदळ ,फावडे, कुर्‍हाड अशी शेतीची अवजारे स्वच्छ करतात. तसेच थंगल लोक लिन्हू उत्सव साजरा करतात, हा उत्सव झाल्याशिवाय बी पेरणी केली जात नाही , गावचा मुखीया तीन दिवस उपवास करून देवाची पुजा करतो व देवाकडे चांगले पीक येऊ दे अशी इच्छा व्यक्त करतो. हा उत्सव होईपर्यंत गावातील कोणीही गावाबाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचे कोणीही गावात येऊ शकत नाहीत.अशी प्रथा आहे.
चेइराओबा – मणीपुरी नव वर्षाभिनंदन –मैतेयी हिंदू सण.हा सण त्यांच्या चंद्र कॅलेंडर शाजिबू नुसार वर्षाचा पहिला दिवस असतो. चेई म्हणजे वर्ष आणि राओबा म्हणजे सांगणे- ‘नव्या वर्षाची घोषणा’. त्यांच्या मतनुयार पहिल्या दिवशी जे बरोबर असतं किंवा जे घडते ते वर्षभर बरोबर असते त्यामुळे सर्व चांगल्या उद्देशाने , महत्व देऊन वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे असे बघतात, म्हणून कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांनी आनंदाने एकत्र येतात, हिंदूंची कुलदेवता ‘सनामाही’ देवतेला स्मरून, पूजून, आशीर्वाद घेतात. समता आणि बंधुत्व वाढवणे व टिकविणे याचा प्रयत्न करतात.यापूर्वी ते आधी घराची साफसफाई, घर व आसापाचा परिसर यांची स्वच्छता ,घराची रंगरंगोटी, घरे व देवलयांची सजावट करतात. सर्वांना एकत्र बोलावून भोजन समारंभ होतात. नवी खरेदी होते, नवीन वर्ष सुरुवातीपासूनच वर्षभर चांगले जावे अशी मनोकामना करतात. गोडधोडचे जेवण करतात. या दिवसा पासून नवीन कृषि चक्र पण सुरू होणार असते.

                                      

कांग चिंगबा- रथयात्रा – पुरी येथील जगन्नाथचा रथ असतो तसेच मणीपुर मध्ये जुलै मध्ये भगवान जगन्नाथची रथयात्रा हा उत्सव असतो. कांग या रथगाडीतून, मंदिरातून जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती नेल्या जातात, हा रथ भक्त ओढतात, ही मोठी शोभायात्रा असते. याची सुरुवात प्रथम 1832 मध्ये राजा गंभीर सिंह याने केली. मैतेयी लोकांचा हा मोठा उत्सव असतो.

                              
खरं तर, अशा सांस्कृतिक वेगळेपणामुळे समाजात एकोपा, समता आणि बंधुत्व टिकून राहायला मदत होते. मणीपुरच्या सौंदर्य आणि निसर्गसंपत्ति बरोबरच ही संस्कृती टिकून राहावी, अबाधित राहावी अशी प्रार्थना !

(सर्व फोटो गुगल वरून साभार . हा लेख एकता या मासिकाच्या ऑगस्ट च्या विशेष मणीपुर अंकात प्रसिद्ध झाला. ,आज 15 ऑगस्ट 24  रोजी अंकाचे प्रकाशन झाले.  ) 

 
© ले. डॉ. नयना कासखेडीकर, पुणे . .
-------------------------------------