Friday, 16 August 2024

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


भारताच्या इतिहासातले , महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे व्यक्तिमत्व अहिल्याबाई होळकर यांचे हे जन्म त्रिशताब्दीवर्ष आहे. या निमित्त या कर्तृत्वशालिनीची ओळख करण्याचा जागर अखिल भारतात मांडला जातोय. नव्हे तो मांडलाच पाहिजे, त्याशिवाय या अठराव्या शतकातील, 28 वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्तीची ओळख कशी होणार? रूढी परांपरांनी जखडलेल्या भारतात सामाजिक सुधारणा करण्याचे प्रयत्न 19 व्या शतकात सुरू झाले होते. पण त्या आधीचा काळ ? स्त्रियांना प्रतिकूलच होता.

अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान. सर्वसामान्य कुटुंबातली अहिल्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामींनी झाल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची जागा सुनेला, अहिल्येला देणारे मल्हारराव होळकर ( इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक ) खरंच ग्रेट च होते. त्यांचे ही कौतुक वाटते. त्यांचा हा पाठिंबा म्हणजे आज स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा असावा हे सांगणारा आहे. घराण्याचा वंशाचा दिवा मुलगाच हे मानण्याच्या काळात एक स्त्री असूनही,आपला पुत्र खंडेराव याचे निधन झाल्यानंतर, विधवा झालेल्या सुनेला त्याच्या जागी राजपदाची सूत्रे बहाल केली. तिचे अंगीभूत गुणवैशिष्ट्य हेरून तिला घडविणारे मल्हारराव म्हणूनच वेगळे आहेत. अशी घडलेली एक स्त्री काय करू शकते ,कसा पराक्रम गाजवू शकते हा इतिहास समजून घ्यायला हवा.


राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता ,आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या.त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच.माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत.तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित , वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले. या अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घटना, त्यांचे कार्य यांचा आढावा घेणारी ही मालिका, त्यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने क्रमश:

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी ही मालिका अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे त्यांच्या महिला विश्व च्या ऑगस्ट च्या अंकात सुरू झाली. ही मालिका ,दर महिन्याला एक अशी वर्षभर प्रसिद्ध होणार आहे.

© --ले. डॉ. नयना कासखेडीकर               

                                                        ---------------------------

No comments:

Post a Comment