Friday, 26 December 2014

माजघरातली सोन्याची खाण


माजघरातली सोन्याची खाण



      मराठी काव्यप्रांतात सामान्य लोकांच्या हृदयाला भिडणारे तत्त्वज्ञान बोलीभाषेत सांगून वेगळा ठसा उमटविणा-या बहिणाबाई नथुजी चौधरी. यांची आठवण होण्याच कारण म्हणजे, तीन डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. जळगाव जिल्ह्यातल्या असोदा गावच्या सधन शेतकरी कुटुंबातल्या बहिणाबाईंना चार बहिणी, तीन भाऊ आणि चुलत-आत्ये भावंडांचे मोठे एकत्र कुटुंब होते. वयाच्या तेराव्या वर्षीच जळगावातील वतनदार असलेल्या चौधरी यांच्या नथूजींबरोबर विवाह होऊन त्या महाजन कुटुंबातून चौधरी कुटुंबात दाखल झाल्या. संसाराचा अर्थही कळण्याचे वय नसलेल्या बहिणाईंचा तेराव्या वर्षी संसारही सुरु झाला.

    लौकीकार्थाने काहीही शिक्षण न घेतलेल्या, अक्षर ओळख नसलेल्या, मौखिक परंपरेने आत्मसात केलेल्या गोष्टी, भोवतालच्या निसर्गाचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि जीवन जगताना प्रत्यक्ष घेतलेले अनुभव यातून त्यांनी आपल्या कवितातून जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं आहे. तेराव्या वर्षी लग्न, तरुणपणीच तिशीच्या आंत आलेलं वैधव्य आणि या अल्पशा जीवनात आलेली नैसर्गिक संकटंही समजून घेत त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले, हे त्यांच्या कवितांवरून लक्षात येतं. शेतकरी असल्याने आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकमेकांच्या सुखदु:खाच्या संवेदना त्या जाणत होत्या. बहिणाबाईंनी कुमारिका ते सौभाग्यवती, सौभाग्यवती ते विधवा, कन्या ते सूनबाई, मुलगी, पत्नी, माता, सासू, आजी अशा विविध भूमिका आनंदानं निभावल्या. आपली स्वता:ची त्या त्या भूमिकेतली काय कर्तव्य आहेत ती जाणून घेतली आणि पारही पाडली.

      बहिणाबाईंची कविता म्हणजे जीवन जगण्याचा प्रत्यक्ष अनुभवच. बहिणाबाई म्हणजे आजच्या कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भान असणा-या होत्याच, पण त्या आजच्या संसार करणा-या लेकी-सूना, सासवांना, देवाची भक्ती करणा-या सर्व भक्तांना, अविवेकाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणा-या शेतक-यांना, वैधव्य आलेल्या सर्व स्त्रियांना आदर्श वस्तुपाठ घालून देणा-या होत्या.

    शेतीकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ओव्या रचून त्या गात. सासर-माहेर, संसार, शेतीची अवजारे, शेतकरी जीवनातील विविध प्रसंग, सण, परिचित व्यक्ती त्यांच्या कवितेत आढळतात.

                          
                                             बहिणाबाईंच्या वहाणा आणि इतर वस्तू

      बहिणाबाई कविता लिहित होत्या त्याच काळात आधुनिक मराठी कविता बहरत होती. केशवसुत, बा.सी.मर्ढेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बालकवी, भा.रा.तांबे, शरद्चंद्र मुक्तिबोध यांच्या नवकवितांनी मराठी कविता समृध्द होत होती. रसिकांना भावत होती. कारण या कवितांमधून नवा विचार पुढे येत होता. एकापेक्षा एक कविता निर्माण होत होत्या. याच काळात बहिणाबाईंची लोकभाषेतील अहिराणी कविताही तयार होत होती. विशेष म्हणजेही कविता तितकीच सरस असूनही साहित्य सृष्टीला त्याचा मागमूसही नव्हता.

     जीवनाचं तत्वज्ञान, तेही स्वताच्या अनुभवाने सिध्द झालेल्या आशयसंपन्न व बोलीभाषेतल्या असल्याने, प्रत्येकाच्या मनाला भिडणा-या अशा या रचना त्यांच्या मरणोत्तर प्रकाशात आल्या आणि प्रकाशितही झाल्या. आचार्य अत्रे यांच्या नजरेने हे हेरले नसते तर, बहिणाबाईंचा या महाराष्ट्राला परिचयही झाला नसता. आचर्य अत्रे यांचे या महाराष्ट्रावर केव्हढे उपकार आहेत?

     बहिणाबाईंचे पुत्र, कवी सोपानदेव हे आचार्य अत्रे यांचे मित्र. त्यांच्या २२ वर्षाच्या मैत्रीत सोपानदेवांच्या घरात दडलेला हा तत्वज्ञानाचा खजिना आपल्याला कसा कळला नाही याची अत्रे यांना खूप खंत वाटली होती. बहिणाबाइंच्या अनेक रचनांपैकी कवी सोपानदेव आणि त्यांच्या आतेभावानं लिहिलेल्यापैकी केवळ ३५ रचनाच हाती लागल्या. आचार्य अत्रे यांनी पुढाकार घेऊन संग्रह रुपात त्या प्रकाशित केल्या. १९५२ ला प्रसिध्द झालेल्या या संग्रहाला अत्रे यांची विस्तृत प्रस्तावनाही आहे. यात ते म्हणतात, "बहिणाइंच्या शब्दा- शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस व सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. मौज ही आहे की,' जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल 'असे त्याचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा हा भाषेचा, विचारांचा व कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे आणि 'मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?' या त्यांनी मानवतेला दिलेल्या अमर संदेशाने तर मराठी वाड:मयात त्यांचे स्थान आढळ केले आहे."

     बहिणाबाई निवर्तल्यावर पुढच्याच वर्षी हा संग्रह प्रसिद्ध झाला. त्या हयात असताना हे झालं असतं तर, अशा या बहिणाबाईना याची देही याची डोळा पाहण्याचं, भेटण्याचं भाग्य रसिकांना लाभलं असतं याची हळहळ रसिकांबरोबर जाणकार साहित्याकारांनाही वाटली असेल.

     कणखर स्वभावाच्या बहिणाबाईं यांनी जळगावच्या मातीकडे सोन्याची खाण म्हणूनच पाहिलं आणि जीवन-मरण, सृष्टी व माणसाचे नाते समर्थपणे जोडले. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदु:खाकडे समभावाने पहू शकणारे शहाणपण, प्रत्यक्ष जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ठ्ये.

    बहिणाबाई खेड्यात वाढल्या. शेतात राबल्या. वतनदारी श्रीमंती पासून दारिद्र्यरेषेपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांना व्यवहारज्ञान शिकवून गेला. खेड्यातल्या जीवनचक्राशी त्या एकरूप झाल्या. आपली पारंपारिक भूमिका नेमाने पर पाडली. नाती सांभाळली. कुटुंब, माणस, निसर्ग, शेत,या बरोबरच शेतातील अवजारे, कोयपं, आऊत, पाभर(तिफण),चाहूर, वखर, नांगर ही सुद्धा त्यांच्या चिंतनातून सुटली नाहीत. म्हणूनच ब्राह्मणी आणि वाणी संस्कृतीत ज्याच्यातून पीठ येतं त्याला जातं म्हणतात, पण बहीणाबाईंना हे मान्य नाही. त्या म्हणतात,
     
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'


अरे घरोटे घरोटे, वाणी-बामनाचं जातं,
कसा घर घर वाजे, त्याले म्हनवा घरोटं.

तर,
अरे जोडता सोडलं, त्याले नाते म्हनू नये,

ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नये.

      त्यांच्या शेतातल्या अनुभवावरून जीवनातील वास्तव आणि निसर्ग, शेती, पाणी, प्राणी, माणूस, देव यांच्यातील ताळमेळ कसा आहे, तो कसा असायला हवा?, याचं गणित त्या मांडतात. सरत्याला परतं करणं, तिफणी नं मातीशी करार करणं, पेरणीचा चौघडा वाजवीत बीज मातीच्या कुशीत टाकणं, पेरलेल्या बी-बियाणांवर मायेची शाल पांघरणं ही शेतातल्या प्रक्रियेची जडण-घडण त्यांच्या कवितेत दिसते.

धरीत्रीच्या कुशीमधी, बी-बियानं नीजली,

वर पसरली माती, जशी शाल पांघरली.

बीय टरारे भूईत, सर्व कोंब आले वर,

गहिवरलं शेत, जसं अंगावरती शहारं.

     बहिणाबाईंनी केलेली ही शेतीची वर्णनं जणू शेती प्रक्रियेची चित्रफितच दाखवताहेत असं वाटतं. पेरणी नंतर आलेला पाऊस शेतक-याला किती आनंद देऊन जातो.हा पाऊस बहिणाबाईना देवाचा प्रसादच वाटतो. त्यानंतर उगवलेलं कोवळं पीक मग बहिणाबाईंची कविता बनतं.


   ऊन वा-याशी खेयता

एका एका कोंबातून

पर्गटले दोन पानं

जसे हात जोडीसन

टाया वाजविती पानं

      बिजांकुरातून उगवलेली कोवळी दोन छोटीशी पान बहिणाबाई ना दोन इवलेसे हात वाटतात.तर वर आल्यानंतर हलणारी पाने जणू, ती टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताहेत. देवाची प्रार्थनाच करताहेत.देवाचं स्मरण करताहेत.अशीच आबादी आबाद होऊदे म्हणून मागणं मागताहेत.या निर्मितीमागच व निसर्ग नियमांचं गूढ त्यांना विचार करायला लावतं. आणि नियंत ,देव कसा अजब गारुडी आहे वाटतं.शेतात बी पेरल्या पासून ते पीक व्यवस्थित हाती येईपर्यंत ,शेतक-याचे कष्ट वाया जायला नकोत अशी काळजी त्यांना वाटते.

                                                          बहिणाबाईंची 'हक्काची' अवजारे

आला आला मार्गेसर ,

आली कापणी कापणी.

आज करे खाले वऱ्हे,

डाव्या डोयाची पापनी.

     आज डावा डोळा लवतोय, काही संकट तर येणार नाही नं? असा संशय येऊन त्या हातातल्या विळ्याशी बोलतात. “आता विळ्या रे बाबा, दाखव तुझी करामत”. अशा प्रकारे त्या अवजारांशी बोलतात, कधी वा-याशी बोलतात. बैलाशी बोलतात. असा सगळ्यांशी संवाद साधून एकेक काम हाता वेगळं करतात. मातीवर बहिणाबाईचं जीवापाड प्रेम आहे. तर धरित्री बद्दल त्यांना अत्यंत आदर. तीच आपली खरी माय आहे. परंपरेने मिळालेलं देणं आहे. असं त्यांना वाटतं.

     सोपानदेव एकदा त्यांना विचारतात, “तू दिवसभर मेहनत करते, थकते, तुझं सगळं लक्ष शेतातल्या जमिनीकडे असतं, तरीही तुला इतक्या सुंदर कविता कशा सुचतात?. त्यावर बहिणाबाई म्हणतात, “ मी धरीत्रीच्या आरशात सरग(स्वर्ग) पाहते रे बाप्पा! केव्हढं त्यांचही मन आरसपानी.

                                                             बहिणाबाईंची वापरातली चूल

      नही दियामधी तेल, चुल्हा पेटता पेटेना, खोकलीमाय या त्यांच्या अत्यंत आशयगर्भी रचना. शेतक-यांना शेतावरून कष्ट करून घरी परतल्यानंतरही अडचणींना तोंड द्यावे लागते.याचे वर्णन तर अप्रतिम, जिवंत आहे. त्यांच्या घरातल्या दिव्याला नेहमी तेलाची कमतरता भासते. एकदाचे तेल मिळाले तर, वात उंदराने पळवलेली असते. चिंधीची नवी वात करून घेतली तर, काडेपेटीच हरवते. काडेपेटी सापडली तर, तिच्यात नवसाने एकच काडी शिल्लक असते. असा तो ‘दिवा’ एका काडीत कौशल्याने उजळे पर्यन्त मनावर केव्हढा ताण येतो. याचाही विचार त्यांच्या संवेदनशील मनाने केला आहे. वस्तुस्थिती आणि वास्तव याचं भान त्यांना आहे. म्हणून संसार कसा आहे? हे अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे.

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके, तवा मियते भाकर
 
ह्या रचनेने तर अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली ही बहिणाबाईंची हृदयस्पर्शी रचना घराघरांत पोहोचली आहे. एव्हढ्या छोट्याशा कवितेतून त्यांनी मानवी जीवनाचं मर्म आणि वर्म सांगितले आहे त्याला तोड नाही.
आधुनिक काव्य, नवकाव्य, कुठलीही शैली किंवा अलंकार याचं कसलंही ज्ञान नसलेल्या त्यांच्या या कविता श्रेष्ठ दर्जाची जानपदं मानली जातात.
बहिणाबाईंच्या नणंदे नं, राजस आत्यांनी एकदा त्यांना विचारलं, “तुला एव्हढे हे शिकवितो कोण?माझ्या सारखीच तू न शिकलेली, ना पढलेली, तुला हि गाणी सुचतात तरी कशी? हि बोली तुला कोण शिकवितो?” त्यावर बहिणाबाई म्हणतात,

“ माझी माय सरोसती, माले शिकविते बोली.

लेक बहिनाच्या मनी, किती गुपितं पेरली.

माझ्या साठी पांडुरंग, तुझं गीता-भागवत ,

पावसांत समावतं, माटीमधी उगवतं.

अरे देवाचं दर्शन, झालं झालं आपसूकच.

हिरीदात सुर्यबापा , दाये अरुपाच रूप.”

बहिणाबाईं च्या रचनांत स्वताच्या वैधव्याचे हृदय भेदक वर्णन वाचायला मिळते. ऐन तारुण्यात सौभाग्य गमावल्यावर त्या लिहितात,

लपे करमाची रेखा, माझ्या कुंकवाच्या खाली.

पुसोनिया गेलं कुंकू, रेखा उघडी पडली.

                                                        बहिणाबाई च्या संसारातील भांडी
 
         मुलं पोरकी झाली. संकट कोसळलं. पण दुख बाजूला सारून, कंबर कसली आणि स्वतालाच धीर दिला. कुंकू पुसलं तरी माहेरचं कपाळावरचं गोंदण कायम आहे. मनगटावरच्या बांगड्या फुटल्या, तरी कर्तृत्व थोडीच फुटणार आहे. मंगळसूत्र तुटलं तर तुटू देत, पतीच्या गळ्याची शपथ हेच मंगळसूत्र. असं म्हणून संसारात सुख कशात आहे ते शोधलं. आपल्या जीवाभावाच्या सखीला, धरित्रीला त्या विचारतात,

सांग सांग धरतीमाता, अशी कशी जादू झाली?

झाड गेलं निघीसन, मागे सावली उरली.

      आईची एक आठवण सोपानदेवांनी सांगितली आहे, “ कर्जबाजारी झाल्याने आईच देवदर्शन कथाकीर्तन बंद होतं. आईची साठी उलटल्यावर, पायदुखीचा त्रास होता. तेंव्हाही ती कथा कीर्तनाला जात नसे. मी विचारलं, “ हल्ली कथा कीर्तनाला जात का नाहीस ?” तेंव्हा बहिणाबाईं चे उत्तर होते, “ अरे ते कथेकरी बोवा, नामा म्हणे, तुका म्हणे, तेच ते सांगतो. आरं पन भल्या मानसा तू काय म्हणे, ते एकदा तरी सांगशीन का नाही? तुले सोताचं आसं सांगण्यासाठी देवानं धाडलं नाही का? याला असं वाटतं, त्याला तसं वाटतं, यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय वाटतं, यातून तुमचं त्या विषयांच ज्ञान दिसतं, चिंतन दिसतं. हे बहिणाबाईंना अभिप्रेत होतं. कथा कीर्तनाने त्यांना बहुश्रुतता लाभली होती. भजन कीर्तन ऐकणे हेच त्यांचे देवदर्शन होते. विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलापेक्षा नामदेवाच्या कीर्तनात नाचणारा, जनाईबरोबर दळणारा, सावताजी बरोबर निंदणारा विठ्ठलच त्यांना आवडे.

     बहिणाबाईंना सर्वात चीड आहे ती माणसाच्या स्वार्थी वृत्तीची. कृतघ्नतेची. त्या संतापून म्हणतात, “माणसा, तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा गोठ्यातल जनावर बरं. गाय-म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. तुझं पोट एकदा भरलं की तू उपकार साफ विसरतोस. कुत्रा त्याचं शेपूट इमानीपणा दाखवण्यासाठी हलवतो. तर, माणसा तू तुझं मतलब साधण्यासाठी मान डोलवतोस. लोभामुळे तू माणूस असूनही काणूस (पशू) झाला आहेस”. हे सांगून, त्या हृदय पिळवटून विचारतात, “ मानसा मानसा कधी व्हशील मानूस?” ही त्यांची आर्तता आजच्या पिढीला समजेल का?

       गाव व्यवस्था, कृषी संस्कृती, बारा बलुतेदार पद्धती, यामुळे त्या काळात समाज व्यवस्थेचा कारभार सुरळीत चालत असे. पण सुधारणा आली आणि ही व्यवस्था कोलमडली. प्रत्येकच त्याच्या त्याच्या क्षेत्रात निष्णात होता. त्यामुळे गाव कसं स्वयंभू होतं. मात्र नवे बदल झालेले बहिणाबाईना रुचले नाहीत. त्याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या ‘अनागोंदी कारभार’ या कवितेत दिसतं. त्या याबद्दल म्हणतात, “ चाले महाराची पोथी, ढोरे बामन ओढतो.”

      बहिणाबाईंच्या स्त्रीसुलभ जाणीवाही किती प्रगल्भ होत्या, हे त्यांच्या कवितेतून जाणवतं. ‘माहेर’, ‘माहेरची वाट’, ‘सासुरवाशीन’ या कवितेतून माहेरचा अभिमान, सासरच्या लोकांविषयी च्या भावना, नाती, व्यावहारिकता, कर्तव्य याची ओळख होते.बहिणाबाई त्यांच्या स्त्री संबंधी कविता, ओव्या, व्यक्तिचित्रे यातून स्त्रीधर्म नीती उलगडून दाखवतात.सासू या नात्याकडे सहानुभावाने सह्संवेदनेने, पहा म्हणजे तिच्याशीही सुनेचे नाते जवळीकतेचे, जिव्हाळ्याचे होईल असा सल्ला त्या देतात. त्या काळातला हा सल्ला आजच्या सुनांनाही लागू आहे. परस्पर संवादाचं महत्व त्यांनीही जाणलं होतं.

     भारतीय समाजरचनेतल्या प्रत्येक सांस्कृतिक नात्याच्या मूळापर्यंत त्या पोहोचल्या होत्या. मानवी मन हा त्यांच्या चिंतनाचा आवडता विषय. मन वढाय-वढाय, मोकाट-मोकाट, लहरी-लहरी अशा प्रतिमांनी त्यांनी घडवलेलं मनाचं दर्शन चिरकाल टिकणारं आहे. ‘विषारी मन’ हे साप-विंचूच्या विषापेक्षाही वाईट आहे. हे सत्य त्यांनी सांगितले आहे.

     बहिणाबाईंचे काव्य तुंम्हा आंम्हा सर्वांचे काव्य आहे. त्यातला भाव, प्रवाहीपणा तत्वचिंतन ,बोधकता यामुळे हे काव्य उच्च दर्जाचे ठरले आहे. त्यात कारुण्य आहे. पती भक्ती आहे. निसर्गाच्या लीला आहेत. माया, कौतुक, असे अनेक रस आहेत. या कविता आशय संपन्न आहेत. त्यात नाद आहे. लय आहे. मधुरता आहे. हाती लागलेल्या एव्हढ्याशा कवितात जीवनाचे सारे सार सामावले आहे. असं हे आचार्य अत्रे यांना सोपानदेव चौधरी यांच्याकडे सापडलेलं बावनकशी सोनं.

                           बहिणाबाईंच्या कुटुंबीयांसमवेत बहिणाबाईंच्याच घरात -चौधरी वाडा, जळगाव 


( टीप :- या लेखातील सर्व फोटो मी बहिणाबाई चौधरी यांच्या जळगाव येथील 'चौधरी' वाड्यास भेट देऊन प्रत्यक्ष काढले आहेत. )


-डॉ.नयना कासखेडीकर
                                          -------------------------------------------------

Friday, 28 November 2014

कुंचला ते राजकारण




कुंचला ते राजकारण




     १७ नोहेंबर हा स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. जरा दोन वर्षे मागे जावून पाहिलं कि आठवतो, तो त्यांना अखेरचा निरोप देणारा प्रचंड जनसागर. एव्हढी लोकप्रियता का मिळाली होती त्यांना? याची अनेक उत्तरे आहेत. कारणे आहेत. त्यांचा स्वभाव, नेतृत्त्व, निर्भयता, कणखरपणा, तीव्र सामाजिक जाणीव, संवेदनशील मन आणि त्यांच्यातील व्यंगचित्रकार, अर्थात कला. बाळासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय, “आमच्या हाती कुंचला नसता तर आज राजकारणात व समाजात आम्ही ज्या शिखरावर जावून पोहोचलो आहोत ते शिखर आम्हाला कधीच गाठता आले नसते”.
     

   लोकशाहीतले राज्यकर्तेच काय, हुकुमशहा सुद्धा व्यंगचित्रकारांना व त्यांच्या फटका-यांना घाबरतात आणि एखाद्या देशात किती स्वातंत्र्य आहे हे, त्या देशातील व्यंगचित्रकाराला किती स्वातंत्र्य आहे यावरून ठरवता येते. कलाकाराला आपली राजकीय मते आणि सामाजिक दृष्टीकोन व्यक्त करण्याचे व्यंगचित्र हे एक माध्यम असते. राजकीय व्यंगचित्रे म्हणजे खरं तर चित्ररूप संपादकीयच असते. राजकीय व्यंगचित्रात चित्रकाराने राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक भाष्य केलेले असते.ज्याला अग्रलेखाची भाषा समजत नाही त्याला ती व्यंगचित्रातून समजते. अशी चित्रे सामान्य लोकांशी सहज व सुरेल संवाद साधतात. राजकीय व्यंगचित्रांच्या प्रभावामुळे लोकमत तयार होत असते.

व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांच्या राजकीय व्यंगचित्रातून अनेक राजकारण्यांना थरथर कापायला लावले. मराठी माणसाच्या हितासाठी व हिंदुत्वाच्या प्रसारासाठी जवळ जवळ पाच दशके कर्तृत्वाची व वक्तृत्वाची तळपती तलवार हातात घेवून त्यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना व नसतानाही राज्याच्या राजकारणावर सतत अंकुश ठेवला. सत्ताधा-यांच्या कृतीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून भंबेरी उडविण्याची शक्ती त्यांच्या कुंचल्यात होती.
     

           संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमा प्रश्न, गोवा मुक्तीसंग्राम, केंद्रातले राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण, भारताचे परराष्ट्र धोरण, तर दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गिरणी कामगारांचे प्रश्न, भारत पाकिस्तान, काश्मीर प्रश्न, आसाममधील घुसखोरी, अशा विषयावरची व्यंगचित्रांची भाषा सर्व सामान्य लोकांना भावात होती. राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा या विषयावरील व्यंगचित्रातून त्यांचे फटका-यांचे आसूड रोज उमटत होते. त्यांच्या व्यंगचित्रात संपूर्ण घटना, घडलेले प्रसंग आणि अपेक्षित काय याचा लेखाजोखाच मांडलेला असे. सामान्यांच्या मनातले रोखठोक व सडेतोडपणे मत मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सामान्य जनतेची नाडी त्यांना गवसली होती. कारण त्यांचे संवेदनशील मन, घटनांचे बारकाईने निरीक्षण, जिज्ञासा, कलेचा ध्यास आणि रियाज.

बाळासाहेबांनी म्हटलंय, ‘राजकीय व्यंगचित्र काढायला पॉलीटिकल डेप्थ लागतेच. पण ड्राफ्ट्समनशीप, कल्पना व रेषा यांचे मिश्रण जेंव्हा होते, तेंव्हाच ते परिणामकारक व्यंगचित्र होते’.त्यांना खंत होती की, आजच्या राजकीय व्यंगचित्रकाराकडे राजकारण्यांच्या विचाराची खोलीच नाही. व्यंगचित्रातून आता प्रहारही होत नाहीत. कॅरीकेचरसंबंधी त्यांची अलीकडची अडचण अशी होती, की त्यासाठी लायक असा एकही चेहरा त्यांना योग्य वाटत नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांना अर्कचित्रासाठी असंख्य चेहरे सापडायचे, त्यांच्या मते, चांगला चेहरा कोणता, तर जो व्यंगचित्रकाराला स्फूर्ती देतो तो. वृत्तपत्र सृष्टीतला मार्मिकचा कालखंड हा व्यंगचित्रांचा काळ होता. आपण व्यंगचित्रकार झाल्याचे सारे श्रेय बाळासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरे आणि बाबूराव पेंटर यांना दिले आहे.


    बाळासाहेब व्यंगचित्रांकडे सर्वप्रथम आकर्षित झाले ते, दुस-या महायुद्धाच्या काळात टाईम्स ऑफ इंडियातील बॅनबेरीच्या व्यंगचित्रांमुळे. त्या काळात वर्तमानपत्रात येणारे व्यंगचित्र ते रोज न्याहाळायचे. वडिलांनी ते पाहून एक दिवस विचारले, “ काय पाहतोस रे?चित्र? आवडली का?” बाळासाहेब म्हणाले, “हो”. वडिल म्हणाले,“ मग आजपासून पेन्सिलने काढायला लाग. मी संध्याकाळी आल्यावर पाहीन.” प्रबोधनकार स्वत: चित्रकार होते. त्यांच्या प्रोत्साहनाने व्यंगचित्र काढणे सुरु झाले. या क्षेत्रातले पहिले गुरु त्यांचे वडीलच होते. त्यानंतर दिनानाथ दलाल व डेव्हिड लो यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. दलालंचे फटकारे डेव्हिड लोंच्या स्टाईलने असायचे. लो यांच्या व्यंगचित्रांची ताकद एव्हढी होती कि, लो यांच्या व्यंगचित्रांमुळे हुकुमशहा हिटलर सुद्धा हैराण झाला होता. लो यांना जिंदा या मुर्दा हजर करण्याचं फर्मान त्यानं काढलं होतं.

बाळासाहेब संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात फ्रीप्रेस नवशक्तीत ‘मावळा’ या नावाने सहा ते सात साप्ताहिकांसाठी व्यंगचित्रे काढीत. इथेच त्यांची चित्रकला बहरली. पुढे व्यवस्थापन बदलले व व्यंगचित्रकारांवर सेन्सॉरशिप लागल्याने, त्यांना हि नोकरी सोडावी लागली आणि इथेच वृत्तपत्रसृष्टीत मार्मिकची एन्ट्री झाली. दिल्लीतल्या शंकर्स विकली सारखे राजकीय व्यंगचित्र साप्ताहिक, मराठीत काढण्याचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला होता. मार्मिकचा जन्म झाला. १३ ऑगस्ट १९६० ला मार्मिक हे मराठी व्यंगचित्र साप्ताहिक वाचकांच्या सेवेत रुजू झालं. निराधार मराठी मनांना एक भक्कम आधार मिळाला. व्यंगचित्रांची लयलूट आणि विचारांचे सोने उधळणा-या मार्मिकने अल्पावधीतच लोकप्रियता गाठली. बाळ ठाकरे, द.पा.खांबेटे व श्रीकांत ठाकरे या त्रयींनी मराठी मनावर भुरळ घातली.

     बाळासाहेबांचं राजकीय भाष्य करणारं मुखपृष्ठावरील व्यंगचित्र ,रविवारची जत्रा, श्रीकांत ठाकरे यांची दोन व्यंगचित्रे, काही सदरे व खांबेटे यांचे विनोदी लेख याला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. मार्मिक हातात घेतल्यावर वाचक प्रथम बाळासाहेबांनी काढलेले मुखपृष्ठावरचे व्यंगचित्र न्याहाळीत, मगच मधली पाने पहात. चित्रातून केलेले भाष्य वाचून वाचकांची करमणूक व्हायची. पण रविवारची जत्रा मराठी वाचकांची प्रेरणा व्हायची. लढायचं बळ देणारी शक्ती व्हायची. मार्मिकमधले ज्वलंत विचार व मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी निर्भीडपणे केलेले लिखाण वाचून अस्वस्थ मराठी माणूस मार्मिकचे ऑफिस किंवा बाळासाहेबांचे घर गाठायचा. असे पुढे पुढे माणसांचे लोंढेच्या लोंढे धडकायचे. या गर्दीलाच एका क्षणाला १९ जून १९६६ या दिवशी आकार मिळाला आणि शिवसेना ही ओळख सुद्धा. असे हे मराठी माणसाची शक्ती दाखवणारे एक मोठे संघटन तयार झाले. त्याचा प्रवास कलेपासून सुरु होऊन राजकीय पक्षापर्यंत पोहोचला.


     मार्मिक लोकांचे मुखपत्र झाले. त्याने व्यंगचित्रांच्या विश्वात इतिहास घडविला. बाळासाहेबांच्या राजकीय कॅरीकेचर्सने धम्माल उडवली. बाळासाहेबांची संघटनेवर हुकुमत होती. राजकारणातही ते हुकुमत गाजवीत. पण, मार्मिकमध्ये व्यंगचित्रे काढणा-या चित्रकाराचे स्वातंत्र्य त्यांनी कधीही हिरावून घेतले नाही. ते जातिवंत कलासाधक होते. कलाकाराचे स्वातंत्र्य ते जाणून होते.


व्यंगचित्रकलेत त्यांचा आवडता विषय ‘कॅरीकेचर’. त्यांचे अनेक कॅरीकेचर मास्टरपीस ठरले आहेत. बाळासाहेबांची व्यंगचित्रे ‘न्यूयॉर्क टाईम्स’ व ‘असाही शिम्बून’ या जपानी दैनिकात प्रसिध्द झाली होती. इंग्लंडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या व्यंगचित्रात्मक चरित्रात सुद्धा बाळासाहेबांची व्यंगचित्रे छापली होती. निवडक व्यंगचित्रकारांच्या पुस्तकात एकमेव भारतीय व्यंगचित्रकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. व्यंगचित्रं हि लोकशाहीची अहिंसक भाषा, मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांनी महाराष्ट्राला शिकविली.


    आपल्या लोकांना आपलं राजकारण व आपले प्रश्न समजावून सांगितले पाहिजेत असे त्यांना वाटत होते. त्यामुळे व्यंगचित्रे केवळ वाचकाला समजून चालणार नाहीत, ते ज्यांच्यासाठी काढलंय त्यानाही समजले पाहिजे, असाही त्यांचा आग्रह असे. तसेच वाकड्या तिकड्या रेघा म्हणजे व्यंगचित्रे नव्हेत. व्यंगचित्रकाराला, ‘अॅनाटॉमी’ म्हणजे शरीररचनेचे भान असायला हवे. तो अभ्यास नसेल तर उत्तम व्यंगचित्रकार होऊ शकत नाही. या त्यांच्याच म्हणण्याचा अनुभव आपल्याला त्यांच्या फटका-यातून साकारलेल्या व्यंगचित्रातून येतो. एक कलाकार त्याच्या कुंचल्याच्या जोरावर एव्हढे मोठे सशक्त संघटन उभे करू शकतो, ही कला प्रांतातील कलाकाराला प्रेरणा देणारी एकमेवाद्वितीय घटना आहे.
                                                    (सर्व चित्रे 'फटकारे' या पुस्तकातून )

- डॉ.नयना कासखेडीकर.

                                                                                                           


Monday, 11 August 2014

गुरुशिष्य परंपरा

                                              गुरुशिष्य परंपरा
 
    
         नव्या पिढीकडे अध्यात्मिक ज्ञान पोहोचविण्याचा मार्ग म्हणजे गुरुशिष्य परंपरा. प्रथम गुरुकडून शिष्य शिक्षण घेतो आणि हाच शिष्य पुन्हा गुरूच्या रुपात दुस-यांना शिक्षण देतो. हा क्रम एका पिढीकडून दुस-या पिढीकडे चालू असतो यालाच परंपरा म्हणतात. ही परंपरा कोणत्याही क्षेत्रात असू शकते. उदा. संगीत, अध्यात्म, कला, वेद इ. आज प्रामुख्याने कला क्षेत्रात संगीत आणि नृत्य यामध्ये ही परंपरा दिसते.
    
                                              


         गुरुकुल शिक्षण पद्धती हे हिंदू धर्माचं विशेष लक्षण मानलं जात असे. प्राचीन भारतात ही व्यापक संकल्पना होती. संस्कार व विद्याग्रहणासाठी शिष्य गुरुगृही राहत असे. वयाच्या पंधरा/सोळा वर्षापर्यंत बाल्यावस्था ते पौगंडावस्थेतील काळ हा संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडण्याचा काळ. या काळातील विकासात गुरूंचा महत्वाचा वाटा असे. आपल्याला राम-वशिष्ठ, कृष्ण-संदिपनी, चंद्रगुप्त मौर्य-चाणक्य, द्रोणाचार्य-अर्जुन, परशुराम-कर्ण, विवेकानंद-परमहंस यांची आदर्श गुरु-शिष्य परंपरा माहिती आहे. महर्षी व्यास तर ज्यांनी महाभारत, पुराणं लिहिली, त्यांना तर भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जाते. आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी आणि थोर व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या जीवनात गुरुंना उच्च स्थान दिलं आहे. म्हणून 'व्यासपोर्णिमा' हीच गुरुपोर्णिमा मानतात.


                             

         गुरु आपल्या शिष्याच्या मानसिक, शारीरिक तसेच अध्यात्मिक विकासाचा भार उचलत. एका अर्थाने वडील हे जैविक पिता तर गुरु हे त्या विद्यार्थाचे अध्यात्मिक पिता असत. यात गुरु शिष्याचं नातं निर्व्याज प्रेमाचं असायचं. मानवी जीवनात अनेक प्रकारचे नाते-संबंध पाहायला मिळतात. पण गुरु-शिष्य संबंध हा एका उच्च पातळीवरचा अद्वितीय संबंध असतो. इतर संबंधांच्या तुलनेत तो पूजनीय असतो. 'चांगला गुरु मिळाल्यामुळे शिष्य' तर, 'चांगला शिष्य मिळाल्यामुळे गुरु', असे दोघेही स्वताला कृतार्थ समजत. शिकत असतो शिष्य, पण परीक्षा मात्र गुरूची होत असते. शिष्याकडून हरणे म्हणजे गुरूंना जिंकण्यासारखेच असते. जेंव्हा असे होते तेव्हा गुरूंची मान अभिमानाने ताठ होते, तर त्याउलट शिष्याची काही चूक झालीच तर, तो आपलाच कमीपणा आहे असे गुरूंना वाटते.


                                         

      एकदा प्रसिध्द सतारवादक उस्ताद उस्मान खां यांना विचारलं, "हुबेहूब आपल्या सारखंच कोणी वाजवावं असं वाटत का? तेंव्हा ते म्हणाले, "माझ्या सारखं माझ्या शिष्याने वाजवावं अस मला कधीच वाटत नाही. छापाचे गणपती तयार करण्यात मला अजिबात रस नाही. माझ्याकडे शिकून एखादा प्रतिभावान शिष्य जर माझ्यापेक्षा वेगळ वाजवत असेल आणि कलेच्या आकाशात माझ्यापेक्षा उंच झेप घेत असेल तर, त्याने तसे का करू नये? " असा हा गुरुसंस्कार.

      गुरु शिष्य परंपरेची चर्चा करताना एका जेष्ठ कलावंताने सांगितलेली आठवण, "एकदा अभिषेकी बुवांची(पंडित जितेंद्र अभिषेकी) मैफिलीची तयारी सुरु होती. बुवा तानपुरा लावण्यात मग्न होते. मनासारखा स्वर लागल्यावर आता सुरुवात होणार असे वाटत असतानाच त्यांनी सहज श्रोतृवर्गाकडे पहिले, तो बुवांच्या लक्षात आले की, समोर गानकोकिळा हिराबाई बडोदेकर सुद्धा उपस्थित आहेत. बुवा उठले आणि व्यासपीठावरून उतरून जाऊन हिराबाईना खाली वाकून नमस्कार केला आणि मग रंगमंचावर येऊन गायला सुरुवात केली. गुरुप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा व नम्रतेचा हा एक मोठा संस्कार.

     प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात असलेल्या सुप्त शक्तींचा विकास केवळ गुरूंच्या कृपेमुळेच होत असतो. विशुध्द चारित्र्य, नीतिमत्तेचा आदर्श, एकात्मज्ञान, तसेच अध्यात्म प्रवणता यांच्या सामर्थ्यावर गुरु आपल्या शिष्याला सन्मार्गाला नेऊ शकतो.


                                         

          रामकृष्ण परमहंसांमुळेच स्वामी विवेकानंदांना आत्मसाक्षात्कार झाला होता. त्यांच्या स्पर्शानेच दिव्यदर्शनही झाले होते. त्यामुळेच गुरूंची आवश्यकता सांगताना ते म्हणतात, "सर्वात श्रेष्ठ विद्या व सर्वोच्च ज्ञान असा जो धर्म, ही पैशांच्या मोबदल्यात मिळण्यासारखी जिन्नस नाहीत. ती ग्रंथालायातूनही लाभण शक्य नाही. सा-या दुनियेचे काने-कोपरे धुंडाळा, हिमालय, आल्प्स शोधून काढा, अथांग सागराचे तळ हुडका, सारा तिबेट पायदळी तुडवा, वाळवंटात हिंडा, पण जोपर्यंत तुमचे स्वता:चे हृदय, धर्म ग्रहणास पात्र झालेले नाही आणि जोवर तुम्हाला गुरु लाभलेला नाही, तोवर काय हवे ते केलेत तरी धर्म तुम्हाला कुठेही गवसायचा नाही, म्हणून विधात्यानेच नेमून दिलेल्या तुमच्या गुरुदेवांशी तुमची गाठ पडताच निष्पाप, निष्कपट, बालकाच्या विश्वासाने व सरलतेने त्यांची सेवा करा".

                                "तीर्णा: स्वयं भीमभवार्णवं जनानहेतूनान्यानपि तारयंत:"|

   जो स्वत: दुस्तर असा भवसागर तरुन गेलेला असतो व स्वतः कोणत्याच लाभाची अपेक्षा न ठेवता दुस-यांना तरून जाण्यास सहाय्य करतो त्यालाच गुरु म्हणतात. अन्य कोणीही गुरु होऊ शकत नाही, अशा गुरूंच्या परीसस्पर्शाने पावन झालेल्या अनेक शिष्यांच्या आठवणी आहेत. आचार्य चाणक्य यांनी आदर्श शिष्याचे गुण सांगितले आहेत. ते म्हणतात,


'' काकचेष्टा बकुल ध्यानं श्वानं निद्रा तथेव च

अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थीनाम पंचलक्षणं ''

गुरुशिष्यांमध्ये केवळ शाब्दिक ज्ञानाचे आदान प्रदान होत नसे, तर गुरु आपल्या शिष्याचा सर्वांगीण विकास पाहात असे, तर शिष्याचा आपल्या गुरूंवर श्रद्धा, विश्वास आणि समर्पण भाव असे, कारण त्याला खात्री असायची कि गुरु आपलं नेहमीच हित पाहतील.

गुरुशिष्य परंपरेत, आपले सर्वांचे लाडके, भारतरत्न पंडित.भीमसेन जोशी, उस्ताद.झाकीर हुसेन, पंडित.गोपीकृष्ण, लयभास्कर खाप्रुमाम पर्वतकर, पंडित.रामकृष्णबुवा वझे अशी संगीत क्षेत्रातील कितीतरी नावे आहेत.


                            

     आपण जे शिकत आहोत ते योग्य आहे का, शास्त्रशुद्ध आहे का हे कळण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते. 'गुरु बिन कोन बतावे बांट' असे म्हणूनच म्हटले आहे. चांगला समाज घडण्यासाठी गुरु-शिष्य परंपरा महत्वाची होती, आजही आहे. या पुढच्या काळात तर ती आणखीनच महत्वाची ठरणार आहे. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा हे जागतिक परिमाण ठरू शकेल. ही गरज आणि सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील बदल, नवे पायंडे, दिशाहीनता लक्षात घेऊन आपली मूल्ये रुजवली पाहिजेत, टिकविली पाहिजेत. आई वडिल, घरातील व बाहेरील वडीलधारी मंडळी, शिक्षक, यांचा आदर करायला, कृतज्ञता व्यक्त करायला, त्यांच्याशी नम्रपणे बोलायला लहान मुलांना आणि युवकांना घरातून सांगितलं गेलं पाहिजे. शाळेत शिकविलं गेलं पाहिजे. हे सर्व आधी स्वत:च्या घरापासून सुरु व्हायला हवे. आता पूर्वीसारखे आश्रम नाहीत. तेंव्हा जबाबदारी आपली आहे, ती आपण स्वीकारुया.
(सर्व फोटो इंटरनेट वरून साभार परत.)


- डॉ.नयना कासखेडीकर
----------------------------

Tuesday, 29 July 2014

'वालचंदनगर'......एक आठवण.


                        'वालचंदनगर'......एक आठवण.  

    वालचंदनगर पुण्यापासून अवघ्या १३५ किलोमीटर अंतरावर वसलेलं ५८० एकराचं मॉडर्ण टाऊनशिप, महाराष्ट्र राज्यातील इंदापूर तालुक्यात,नीरा नदीकाठी वसलेली इंडस्ट्रीज लिमिटेडची एक आदर्श अशी उद्योग नगरी. जिथे रोड, पाणी, वीज, शिक्षण, औषध, ड्रेनेज या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होत्या. खरं तर कळंब या खेड्याच्या परिसरातील ही मुरबाड जमीन शेठ वालचंद हिराचंद यांनी साखर कारखान्यासाठी निवडली होती. इंग्लंडमधील मार्सलंड प्राईस कंपनीच्या सहकार्याने साखर कारखाना आणि त्याच्याशी संबंधित जोडधंदे त्यांनी १९३३ मध्ये सुरु केले होते. पर्यायाने या कारखान्यात काम करणा-या कर्मचा-यांसाठी टुमदार वसाहत तयार केली. तिला सुरुवातीला कळंब वसाहत म्हणूनच ओळखत. सुरुवातीला हे शास्त्रीय व अद्ययावत पद्धतीने उसाची शेती आणि साखर निर्मिती केंद्र होते पुढे १९५५ मध्ये औद्योगिक यंत्रसामग्री बनण्यावर लक्ष केंद्रित केले. पुढे सिमेंट, क्षेपणास्त्रांचे सुटे भाग, उपग्रहक्षेपण साधने, बाष्प जनित्रे. अणुभट्टी साधने, युध्द नौकांसाठी गियरबॉक्स यांचे उत्पादन येथे होत होते.

    अशा या छोट्या वसाहतीत सहकारी तत्त्वावर चालणारं पुरवठा भांडार, सहकारी बँक, पोस्टऑफिस, जलशुद्धीकरण प्रकल्प, सुंदर सार्वजनिक बगीचा, क्रीडांगण, चित्रपट गृह या सर्व सोयी होत्या. इथलं टाईम टेबल म्हणजे कारखान्याच्या ड्युटी बदलणा-या भोंग्यावर चालत असे. वेगळीच संस्कृती होती इथे. इथली एक पद्धत मला फार आवडली होती. ती म्हणजे दस-याच्या दिवशी हे कारखाने सर्वाना बघण्यासाठी दिवसभर खुले असत. आम्ही ते बघायला आवर्जून जात असू. आजही ही प्रथा चालू आहे.                   
    वालचंदनगरच्या आठवणी मनात आहेतच. पण, फेसबुकच्या पेजवर टाकलेल्या फोटो मुळे त्या सतत टवटवीत राहतात. आम्ही पोस्ट कॉलनी आणि मॉडीफायडी मेन कॉलनीत, दोन्हीकडे राहिलो. वालचंदनगरच्या एका सुंदर टाउनशिपमध्ये घालवलेल्या बालपणात आईवडिलांचे संस्कार तर होतेच. पण वालचंदनगरनेही आम्हाला शेजारधर्म शिकविला, अठरापगड जातीच्या लोकातही आम्ही इथेच मेरा भारत महान अनुभवला. शेजारच्या घरातलं दु;ख आमचही दु;ख असे तर त्याचं सुख सुद्धा आमचं  सुख असे.                                 
    सी टाईप मध्ये तर आम्ही गल्लीतली सर्व मुले जणू एकत्रच वाढत होतो. पिसाळ, चौरे, चव्हाण, मिंड, कुलकर्णी, कोकणे, सांगळे, गुरखा, खैरनार, गोडसे, देवळे यांची घरे म्हणजे आमचीच घरे. झोपण्या शिवाय घरात थांबतंय कोण? रात्रीचं जेवण तर रोजच अंगणातली अंगत पंगत. काहींचा घरात, तर काहींचा बाहेर चुलीवरच संध्याकाळचा स्वयंपाक होई. भाकरी भाजल्याचा खमंग वास गल्लीभर पसरे.

    एकमेकांची प्रेमाने विचारपूस करणे, प्रत्येक अडचणीच्या वेळी मदतीला जाणे, हक्काने शेजारी जाऊन जेवणे किंवा एखादी गोष्ट मागणे, शेजारच्यांनीही, चुकले तर हक्काने व तितक्याच अधिकाराने रागावणे. हे सगळ चालत होतं. कोणालाही राग नाही, हसत-खेळत व्हायचं सगळ. नोकरी करणा-या आई वडिलांना घरी एकट्या असणा-या आपल्या मुलांची अजिबात काळजी करण्याची गरज नसे. वातावरणच तसे होते. शेजा-यांवर विश्वास होता. वागण्यात चांगुलपणा होता. आपलेपणा होता. आज किती बदलंलय सगळ? आज घरातलेच सख्खे भाऊभाऊ, भाऊबहिण यांच्यात तो अधिकारही राहिला नाही. हक्कही नाही. शेजारी तर फार लांब. काही ग्रामीण भागात अजून असे वातावरण दिसते.    
    सर्व मित्र एका वयाचे नसतानाही एकमेकांना सांभाळून घेणारे. आमची आई नोकरी करणारी म्हणून या सगळ्यांनी आम्हा तीन भावंडांना नेहमीच सांभाळून घेतलं. कुणाच्या घरातलं बाळ रडत असेल तर,ए जरा बघ ह्याच्याकडे, मी जरा धुणं धुवून येते, असं विश्वासाने सांगितलं जायचं. शाळेतून घरी आल्यावर बालसुलभ नियमाप्रमाणे दफ्तर घरात टाकून लगेच खेळायला बाहेर. मग तहान लागली कि पटकन कोणाच्याही घरात जावून पाणी प्यायचे. खैरनार काकुंचे आमच्याकडे सतत लक्ष असे.
     इथले सणावाराचे दिवस आठवणीचा ठेवा आहेत, मग तो दसरा, नागपंचमी गणेश उत्सव, कोणताही असो. नागपंचमी सण विशेष लक्षात राहिला. अशा सणांची गोडी आणि महत्व मुलीच्या जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. नागपंचमीला मेंदीचा पाला आणून, वाटून ती लाऊन, नव्या बांगड्या भरून, नवे कपडे घालून, पूजेच साहित्य घेऊन पोस्ट कॉलनीतून एस.टी.स्टँडकडे जाणा-या रस्त्यावर रेल्वे रुळाच्या बाजूलाच असलेल्या वारुळाला पुजायला जाणे, झाडावर बांधलेल्या झोक्यावर मनसोक्त खेळणे, पंचमीचा फेर धरून, जागरण करणे. परिट मावशींच्या आवाजातलं ` धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा `आणि फेराची इतर गाणी म्हणायची. या सगळ्या लोकगीतातून आणि बायकांच्या चर्चांमधून अनेक मूल्यांची ओळख व्हायची. गल्लीच्या कोप-यावर रात्री जागून खेळलेल्या सुरपाट्या, लगो-या, उन्हाळ्याच्या सुटीत मोठ्ठ वऱ्हाड घेऊन बागेतल्या वेलींच्या मांडवाखाली बाहुला-बाहुलीच लावलेलं लग्न, कधीच नाही विसरणार. उसाचे लोड आले कि अरे," लोड आला लोड आला " असे ओरडत जीवाच्या आकांताने धावत जाऊन, पळत पळत जाऊन, चालत्या रेल्वेतून ऊस काढणे आणि जिंकून आल्याच्या अविर्भावात ते ऊस घरी घेऊन येणे, बुचाच्या झाडाखाली बुचाची फुले गोळा करणे, अशी अनेक प्रकारची मज्जा आम्ही अनुभवली.
    गणेश उत्सवात तर खूप मज्जा येई. दहा दिवस भरगच्च कार्यक्रम. कधी सिनेमा, कधी गाण्याचा कार्यक्रम, कधी कोप-यावर स्टेज बांधून सार्वजनिक मनोरंजनाचा कार्यक्रम असे. याच स्टेजवर आम्ही इतर गाणी व लावण्यावरती नाचण्याची हौस भागवून घेतली आणि शिकण्याचीही. क्लबच्या मैदानावर तर दहा दिवस उत्तमोत्तम कार्यक्रम रंगत असत. 'ही श्रींची इच्छा' नाटक, पंडित भीमसेन जोशींची महफिल, व्वा आनंद सोहळाच होता तो. अशा दर्जेदार कार्यक्रमांची ओळख इथेच झाली आम्हाला. तीही लहान वयात झाली हे महत्त्वाचं. बालमनावरचे संस्कार फार महत्त्वाचे ठरतात. या वयात जे जे चांगले-वाईट समोर घडत असते, दिसत असते, ते ते आणि आई वडिल एकमेकांशी आणि नातेवाईकांशी कसे वागत असतात ते मनावर बिंबत असते. ज्याचा त्या मुलांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम होत असतो. 

    १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे शाळेतील खूप उत्साहाचे दिवस. आमचा हा दिवस तर पहाटे तीनलाच सुरु होई. कारण आमची आजी जेंव्हा आमच्याकडे असायची तेंव्हा ती पहाटे काकड आरतीसाठी तीनलाच उठे आणि आम्हालाही उठवे. अंघोळ करून शाळेचा युनिफॉर्म घालून, आधी दारातल्या वेलीवरची आणि झाडांची फुले तोडून आजीला आणून द्यायची, नुकत्याच उमललेल्या फुलांचा सुगंधी दरवळ आसमंतात पसरलेला असे. या टाउनशिप मध्ये विशेषतः पोस्ट कॉलनी परिसरात प्रत्येकाच्या अंगणात (इथे प्रत्येक सिंगल रूमला सुद्धा घरासमोर आंगण आणि गेट होतं, आज बिल्डिंगला आंगण नाहीच, पार्किंग असतं.) जाई-जुई, चमेली, कुंद, मोगरा, बटमोगरा, शेवंती फुललेल्या असत. हा दरवळ अजूनही जसाच्या तसा मनात साठवून आहे. या सुगंधामुळे दिवसाची पहाट आणि सकाळ अत्यंत प्रसन्न वाटायची.
    आजीला भजनाला घेऊन जाणं,  तिला हात धरून देवळात नेणं, त्यांच्या बरोबर त्यांच्या भजनी मंडळात सामील झालं की, जरा कृष्णाचं गाणं चालीत म्हणून दाखव गं, नाहीतर राधा-कृष्णावरच्या भजनावर नृत्य करून दाखव, पुस्तकातली कहाणी वाचून दाखव अशी छोटी छोटी पण क्रियेटीव्ह कामे आम्ही करत असू. मोठ्या माणसांबद्दल आदर ठेवायला घरात-बाहेर दोन्हीकडे शिकविले जायचे. आज अनेक घरात आजी आजोबा नकोच असतात.  आज नेचरच बदललंय. हा एक तरुण पिढीच्या चिंतनाचा विषय आहे. असो पण कळत्या वयात आलेले अनुभव आणि मिळवलेला आनंद कायम लक्षात राहतो हे खरं.

     इयत्ता आठवीनंतर शाळा सोडल्यानंतर ३५ वर्षांनी वालचंदनगरला जाण्याचा योग आला तो महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शालेय नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून आणि तेही माझ्याच वर्धमान विद्यालय या शाळेत. स्पर्धा संपेपर्यंत ५ दिवस मुक्काम होता. खूप आनंद झाला होता.सगळ्या जुन्या आठवणी ,वातावरण याची आठवण येत होती. आणखी योगायोग म्हणजे शेवटच्या दिवशी अवधानी सर अचानक भेटले. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सरांचा मोठा सहभाग असे. त्यांनी ३५ वर्षानंतर मला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. मीच त्यांना ओळखल होतं. मी हिम्मत करून विचारलंच सर तुम्ही अवधानी सर न? ते शाळेत युवा दिनासाठी आले होते. स्वामी विवेकानंद जयंतीला, युवा दिन म्हणून या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी ते दर वर्षी बोलवतात. कार्यक्रम प्रीप्लान होता. तरीही त्यांनी मला माजी विद्यार्थी म्हणून शाळेत नेले आणि मला विद्यार्थांना संबोधित करण्याची संधी लाभली.

वालचंदनगरचे विद्यार्थी सातासमुद्रापार गेले आहेत. साहजिकच ते आपल्या या गावाच्या बातमीवर लक्ष ठेऊन असतात. वर्तमान पत्रात बातमी आली कि आम्ही अभिमानाने वाचतो. अशा खूप गोष्टी आहेत. विशेष म्हणजे आशिया खंडातली सर्वात मोठी दुर्बीण या वालचंदनगर इंडस्ट्रीज ने बनविली आहे. तसेच अलिकडे २०१३ मध्ये भारताने मंगळ मोहिमेसाठी पाठवलेल्या पहिल्या 'मंगल याना'च्या प्रक्षेपकासाठी रॉकेट मोटार केसिंग, नोझल्स तयार केल्या होत्या. ज्याचा उपयोग या यानाच्या अवकाशभ्रमणा दरम्यान पृथ्वीच्या कक्षेतून जाताना प्रचंड फोर्स मधून हे रॉकेट वर नेण्यासाठीच्या प्रक्षेपकाच्या यंत्रणेत झाला होता. या इंडस्ट्रीजने 'वालचंद हार्वेस्टर' हे किफायतशीर ऊस तोडणी यंत्र विकसित केले आहे.     
असं हे वालचंदनगर जगाच्या नकाशावर तर पोहोचलं आहेच पण माझ्या मनाच्या नकाशावर सुद्धा कोरलं गेलंय. (सर्व फोटो इंटरनेट वरून साभार परत.)   

- डॉ.नयना कासखेडीकर.

      

Saturday, 28 June 2014

जीवन त्यांना कळले हो ...

जीवन त्यांना कळले हो ...
       
   
  
      "इच्छित कार्य करण्यासाठी विचारवंत, कलावंत, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, नोकर, अन्य सर्व समाजाचे वैचारिक तोंड हे एकाच दिशेला झाले तर आपल्याला अपेक्षित असलेले कार्य पूर्ण सिद्धीस जाईल आणि यालाच संस्कार म्हणतात." असं मार्गदर्शन करणारे बापू.  चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर. क्षणात गेल्या पंधरा वर्षातील त्यांच्या स्मृतींची  मनात एकच गर्दी झाली. नट म्हणून जे श्रेष्ठत्त्व त्यांच्याकडे होत तेव्हढच श्रेष्ठत्व त्यांच्या माणूंसपणात होत, आचारविचारात होतं. कलाक्षेत्रात चेहऱ्याच्या रंगरंगोटीतही त्यांची साधी रहाणी, उच्च विचार, निर्मळ मन, प्रामाणिकपणा, कलेवरील निष्ठा, मोकळा आणि सरळ स्वभाव असा त्यांचा चेहरा स्पष्ट उठून दिसे.
         
    त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरु झाली तीच मुळी एक्स्ट्रा नट म्हणून. एखादा नट गैरहजर असेल तर त्याची भूमिका यांना अपघातानेच मिळे.१९४४ पासून सुरु झालेल्या कारकिर्दीत भावबंधन, आग्र्याहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, एकच प्याला, गारंबीचा बापू, अश्रूंची झाली फुले, या नाटकांबरोबरच त्यांनी कुंकवाचा धनी, पेडगावचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्यांची मंजुळा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जावई माझा भला, तू तिथे मी, अशा ऐंशी पेक्षा जास्त चित्रपटात भूमिका केल्या. सगळ्याच भूमिका अतिशय गाजल्या. आवाज, संवादफेक आणि दमदार अभिनय कौशल्याने त्यांनी नाट्यसृष्टी गाजविली. नट म्हणून ते कलेला जागले. प्रामाणिकता या मूल्याच्या जोरावर त्यांनी कलेचा 'धंदा' कधीच होऊ दिला नाही. याचं मूळ होतं ते परंपरेत आणि लहानपणी बालमनावर झालेल्या संस्कारात. कारण आयुष्याला दिशा देणारे होते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात असणारे त्यांचे वडिल कै.चिंतामणराव कोल्हटकर आणि सामाजिक समरसता जपणारी त्यांची आई कै.ताराबाई कोल्हटकर.
      
     एका दैनिकात काम करताना 'माझी आई' या विषयावर स्तंभ लिहित होते. राम गबाले, न.म.जोशी, चंद्रकांत गोखले, मधु कांबीकर, कादरखान, गजानन वाटवे आणि चित्तरंजन कोल्हटकर या मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या होत्या. संस्कार भारतीच्या विविध चिंतन बैठका आणि कार्यक्रम यात बापूंना पाहात होतोच. पण या निमित्ताने बापूना भेटण्याची ही विशेष संधी होती. मुलाखतीच्या निमित्ताने त्यांना बालपणीच्या भूतकाळात घेऊन गेले." आईनं उत्तम संस्कार करून घडवलंय" हे अभिमानानं सांगताना त्यांचा ऊर भरून आला होता. त्यांनी एक प्रसंग आवर्जून सांगितला, ते म्हणाले, "सांगलीला मी लहान असताना वाड्यातला गोविंद दाते सायकल कसा सफाईने चालवायचा. हे पाहून मलाही मोह व्हायचा. सायकल भाड्याने घ्यायला आईला पहिल्यांदा पैसे मागितले. तिने दिलेही. पण मला मोह स्वस्थ बसू देईना. त्यापायी आता मी धीटपणाने चोरून सायकल चालवू लागलो. एक दिवस सायकल वाल्याने पैसे मागायला सुरुवात केली, आर्थिक परिस्थिती नव्हतीच, हे कळायचं वयही नव्हतं. मग आईच्या कानापर्यंत ही गोष्ट जायला नको म्हणून, न सांगताच तिच्या वेणीफणीच्या पेटीतून एक रुपया घेऊन तो सायकलवाल्याला देवून टाकला. दुस-याच दिवशी यात रुपया नाही हे आईच्या लक्षात आलं. माझ्या सर्व भावंडाना फैलावर घेतलं गेलं ते मी पहात होतो. सगळे जण नाही म्हणाले. आईला माझा संशय सुद्धा आला नव्हता.तिला माझ्या बद्दल खात्री होती. या प्रसंगामुळे कोणीही त्या दिवशी जेवलं नाही. आई तर हे कळल्या शिवाय जेवणारच नव्हती. दुस-या दिवशी शाळेत गेलो. मात्र आपण रुपया घेतला आहे या विचाराने मी खूप बेचैन होतो. दुपारी शाळेतून घरी आल्यावर पुन्हा एकदा तापलेलं वातावरण, आईचा त्रागा, हे पाहून न राहवून मी आईला म्हटलं, "मी घेतला तो रुपया" त्या सरशी आईचा क्रोध अनावर झाला. तिच्या माझ्यावरील विश्वासाला तडा गेला होता. तिने हातातले उलथने गरम केले आणि तोंडाला चटका दिला. मी कळवळलो, मावशीने मला सोडवले, या प्रसंगानंतर आयुष्यात कधीही खोटं बोललो नाही. आईला खोटेपणाची भयंकर चीड होती. अशा अनेक अनुभवांनी मला माणूस बनविलं. माणुसकी शिकविली. आपण प्रामाणिक असलो कि परमेश्वर कुणाच्या तरी रुपात आपल्या पाठीशी उभा राहतो. असा अनुभव मी आयुष्यभर घेतलाय".

     लहान वयातच कलाक्षेत्रात असलेल्या वडिलांच्या आयुष्यातले अनेक चढ-उतार बापुंनी अनुभवले. झळ सोसली. नैतिक मूल्यांच्या जोरावरच अनेक संकटांना समर्थपणे तोंड देण्याचं धाडस ते शिकले. समाजाचं आपण देणं लागतो ही भावना त्यांच्या मनात कायम असे. म्हणूनच कलेच्या माध्यमातून समाजावर संस्कार ही संस्कारभारतीची संकल्पना त्यांना भावली होती. महाराष्ट्र शाखेच्या स्थापने पासून त्यांनी तसे काम सुद्धा सुरु केले होते. दिल्ली येथे संस्कार भारतीचे अधिवेशन होणार होते. शाहीर योगेश यांच्या आग्रहामुळे महाराष्ट्रातून सादरीकरणासाठी नाटक घेऊन जायचे ठरले, 'आग्र्याहून सुटका'तील प्रवेश ठरला. तिथे गेल्यावर कार्यकर्ते दर अर्ध्या तासाला, मी आपकी क्या सेवा कर सकता हूं ?अशी विचारपूस करत. कार्यकर्त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे बापू खूप भारावून गेले. एकूणच तिथे विविध कला क्षेत्रातील निष्णांत लोक एकाच छताखाली निष्ठेने कला सादर करीत होते. तर प्रेक्षकात बसले होते, थोर त्यागी, विचारवंत अशा व्यक्ती. त्यात होते, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, विजयाराजे शिंदे, नानाजी देशमुख, वसंतराव ओक, असा थोर व्यक्तींचा मेळावा ते प्रथमच अनुभवत होते. त्यांना वाटले 'असा प्रेक्षक' नुसता पाह्यला मिळणे याला अनेक जन्मांची पुण्याई हवी.
     
    या मान्यवर नेत्यांनी यावेळी देशाबद्दलची जाणीव, कलाकारांचे स्थान, याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले होते. यानंतरच्या काळात वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षीच कालाक्षेत्रातून निवृत्त होऊन समाजासाठी चांगले काम करावे या विचारात ते होते. या संबंधी प्रचारक होण्याची इच्छा प.पू.गोळवलकर गुरुजींकडे बोलून दाखवताच त्यांना दोन ते तीन वर्षांनी उत्तर मिळाले, "थांबा, कलेच्या प्रांतात आपल्याला काम सुरु करायचे आहे. त्यात पाऊल ठेवण्यापूर्वी त्या प्रांतातील दोन मजबूत दगड मी निवडले आहेत. एक म्हणजे तू आणि दुसरा सुधीर फडके. तुम्हाला तुमच्या कला क्षेत्रातून निवृत्ती नाही" आणि इथेच त्यांना दूरदर्शीपणा म्हणजे काय याची अनुभूती मिळाली. तिथून पुढे ते संस्कार भारतीच्या कामात मनापासून दाखल झाले. या कामाची वैचारिक भूमिका त्यांच्या मनात स्पष्ट होती. महाराष्ट्र प्रांताच्या स्थापनेपासून पुढे सलग सोळा-सतरा वर्षे त्यांनी संस्कार भारतीच्या कामात लक्ष घातलं .पहिल्याच कार्यकारिणीत त्यांच्या बरोबर अध्यक्ष पंडित.जितेंद्र अभिषेकी, सरोजिनी बाबर, रा.शं.वाळिंबे, बाबासाहेब पुरंदरे, राम कदम, द.मा.मिरासदार, शाहीर योगेश ही मान्यवर  मंडळी होती.

    नानाजी देशमुखांच्या सांगण्यावरून बापुंनी प्रथम नागपूरला बालनाट्य शिबीर घेतले. ३०० च्या संख्येने प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढे महाराष्ट्र प्रांताचे ते उपाध्यक्ष झाले. नंतर पुणे महानगरचे अध्यक्ष,पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष,अशा जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. या कामासाठी त्यांनी १० ते १२ वर्ष प्रवास सुद्धा केला. महाराष्ट्रांबरोबरच गुजराथ, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इथेही गेले. विविध बैठका, अधिवेशने, कार्यशाळा, राष्ट्रीय कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले. आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा संघटनेच्या कार्यकर्त्यांना व कलाकारांना करून दिला. महाराष्ट्रात त्यांचा विविध समित्यांमध्ये प्रवास होत असे. त्यांची तिथे उपस्थिती, त्यांचा सहवास, त्यांचे वर्तन, त्यांची भाषणे, बोलणे, याचा प्रभाव कार्यकर्त्यांवर पडत असे. कलाकार कार्यकर्त्याला ते आदर्श ठरत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात संस्मरणीय ठरलेल्या '१८९७ एक चैतन्य स्मरण' या रँडच्या वधाचे नाट्य रुपांतर हजारो लोकानी गौरविले.

     एकदा अखिल भारतीय बैठकी साठी बापू जळगाव इथे आले होते. उतरायची व्यवस्था अर्थातच कार्यकर्त्यांच्या घरी होती. बैठकीच्या दुस-याच दिवशी त्यांचा 'एकच प्याला' चा प्रयोग होता. रात्री प्रयोग असल्याने दुपारी थोडा वेळ होता, आई बाबांची बैठकीची धावपळ बघून आमच्या दोन्ही मुलांना कोणीतरी महत्वाची व्यक्ती आली आहे हे कळलं होतं. "एक खूप मोट्ठे कलाकार आले आहेत" असे सांगितल्यावर आई, आम्हाला त्यांना पहाता येईल? मुलांचा प्रश्न होता. अशी व्यक्तिमत्व लहानपणी मुलांना संधी मिळेल तेंव्हा दाखवायला हवीत असे वाटायचे आणि मुलांना आम्ही त्यांच्या भेटीला घेऊन गेलो. बापूंना म्हटलं, तुम्हाला यांना पाह्यचं आहे. त्यावर ते थोडासा अभिनय करत म्हणाले, "या पहा, कसा दिसतो मी? मला शेपूट शिंगे वगैरे नाहीत हं? तुमच्या सारखाच दिसतोय न? त्यांचा साधा वेष पाहून मुलांच्या कल्पनेला तडा गेला. एव्हढा मोठा नट सांगितलं आणि हे इतके साधे? अत्यंत साध्या वेशातील नटश्रेष्ठ बापूंना पाहून त्यांचा वैचारिक गोंधळ उडाला होता.

    नट फक्त रंभूमीवरच. एकदा नटाचे कपडे उतरविले कि ते चित्तरंजन कोल्हटकर असत. सामान्य आयुष्यातील सामान्य माणूस असत. त्याच दिवशी रात्री 'एकच प्याला' चा प्रयोग होता, काही झालं तरी तो बघायचाच अस वाटल होतं, पण बापूंना जेवायला घरी या म्हटल्यावर त्यांनी सांगितलं, त्या पेक्षा रात्री प्रयोगानंतर भाकरी आणि दूध शक्य असेल तर थिएटरवर आणा. मग काय ही सेवा आम्हाला करता येणार होती, त्यामुळे प्रयोग बघण्याचा विचार मनातून केंव्हाच गळून पडला होता. ज्वारी दुकानातून आणून ती दळून आणण्यापासून तयारी होती. पण खूप आनंद वाटत होता. रात्री दीड वाजता त्यांना गरम ज्वारीची भाकरी आणि गाईचं दूध नेऊन दिलं. प्रयोग संपता संपता प्रेक्षागृहातील प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा मुलगा आनंद यांच्या हातात डबा दिला आणि बापुना न भेटताच निघून गेलो. त्यांच्या जगण्यातल्या साधेपणाचा हा एक अनुभव होता. इतक्या साधेपणान ते कार्यकर्त्यानाही उपलब्ध होत. मार्गदर्शन करत. प्रवासातही कधी त्यांनी कलावंताची मिजास दाखविली नाही. कधी राहण्यासाठी हॉटेल ची व्यवस्था मागितली नाही. बापू म्हणजे समाजासमोर कलाक्षेत्रातला मूर्तीमंत आदर्शच होता.

     त्यांच्या कलाक्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचालीत ती.काकूंचा (श्रीमती विदुला कोल्हटकर )मोठा वाटा आहे. काकूंनी सह्धर्मचारिणीची भूमिका इतकी सार्थपणे निभावली कि, मेकअप उतरवल्यावर नटवर्य बापुना दुस-या क्षणी घरची ओढ लागत असे. भूमिका व वास्तव जीवन यांचे महत्त्व त्यांना होते. बापूंचे घर म्हणजे कलावंताचे आदर्श घर. त्यांचा ८१ वा वाढदिवस त्यांच्या घरी जाऊन आम्ही कार्यकर्त्यांनी साजरा केला. ८१ दिव्यांनी त्यांचे औक्षण केले. त्यांचे आशीर्वाद घेतले. या दिव्यांची जबाबदारी माझ्याकडे होती .बँकेतून एक रुपयाची ८१ नवी नाणी आणून, चांगल्या तुपात ८१ वाती भिजवून, औक्षणाचे ताट तयार करून घेऊन गेले होते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ही आणखी एक संधी आयुष्यात मला मिळाली होती. एव्हढे मोठे व्यक्तिमत्व, अभिनय समर्थ, अनेक पुरस्कार प्राप्त, जवळ जवळ सहा दशकं चित्रपट आणि रंगभूमी गाजवलेला सम्राट. एक देशप्रेमी, आपल्या संघटन कौशल्याने कलाक्षेत्रात काम करता करता, नकळत संस्कारही करत होता. असे आदरणीय व्यक्तिमत्व मला जवळून अनुभवायला मिळाले होते. अहो भाग्यम !     

- डॉ. नयना कासखेडीकर