जीवन त्यांना कळले हो ...
"इच्छित कार्य करण्यासाठी
विचारवंत, कलावंत, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, नोकर, अन्य सर्व समाजाचे
वैचारिक तोंड हे एकाच दिशेला झाले तर आपल्याला अपेक्षित असलेले कार्य पूर्ण
सिद्धीस जाईल आणि यालाच संस्कार म्हणतात." असं मार्गदर्शन करणारे
बापू. चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर. क्षणात
गेल्या पंधरा वर्षातील त्यांच्या स्मृतींची
मनात एकच गर्दी झाली. नट म्हणून जे श्रेष्ठत्त्व त्यांच्याकडे होत तेव्हढच
श्रेष्ठत्व त्यांच्या माणूंसपणात होत, आचारविचारात होतं. कलाक्षेत्रात चेहऱ्याच्या
रंगरंगोटीतही त्यांची साधी रहाणी, उच्च विचार, निर्मळ मन, प्रामाणिकपणा, कलेवरील
निष्ठा, मोकळा आणि सरळ स्वभाव असा त्यांचा चेहरा स्पष्ट उठून दिसे.
त्यांच्या अभिनयाची कारकीर्द
सुरु झाली तीच मुळी एक्स्ट्रा नट म्हणून. एखादा नट गैरहजर असेल तर त्याची भूमिका
यांना अपघातानेच मिळे.१९४४ पासून सुरु झालेल्या कारकिर्दीत भावबंधन, आग्र्याहून
सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, एकच प्याला, गारंबीचा
बापू, अश्रूंची झाली फुले, या नाटकांबरोबरच त्यांनी कुंकवाचा धनी, पेडगावचे शहाणे,
शेवग्याच्या शेंगा, मोहित्यांची मंजुळा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जावई माझा भला,
तू तिथे मी, अशा ऐंशी पेक्षा जास्त चित्रपटात भूमिका केल्या. सगळ्याच भूमिका अतिशय
गाजल्या. आवाज, संवादफेक आणि दमदार अभिनय कौशल्याने त्यांनी नाट्यसृष्टी गाजविली. नट
म्हणून ते कलेला जागले. प्रामाणिकता या मूल्याच्या जोरावर त्यांनी कलेचा 'धंदा'
कधीच होऊ दिला नाही. याचं मूळ होतं ते परंपरेत आणि लहानपणी बालमनावर झालेल्या
संस्कारात. कारण आयुष्याला दिशा देणारे होते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात
असणारे त्यांचे वडिल कै.चिंतामणराव कोल्हटकर आणि सामाजिक समरसता जपणारी त्यांची आई
कै.ताराबाई कोल्हटकर.
एका दैनिकात काम करताना
'माझी आई' या विषयावर स्तंभ लिहित होते. राम गबाले, न.म.जोशी, चंद्रकांत गोखले, मधु
कांबीकर, कादरखान, गजानन वाटवे आणि चित्तरंजन कोल्हटकर या मान्यवरांच्या मुलाखती
घेतल्या होत्या. संस्कार भारतीच्या विविध चिंतन बैठका आणि कार्यक्रम यात बापूंना
पाहात होतोच. पण या निमित्ताने बापूना भेटण्याची ही विशेष संधी होती. मुलाखतीच्या
निमित्ताने त्यांना बालपणीच्या भूतकाळात घेऊन गेले." आईनं उत्तम संस्कार करून
घडवलंय" हे अभिमानानं सांगताना त्यांचा ऊर भरून आला होता. त्यांनी एक प्रसंग
आवर्जून सांगितला, ते म्हणाले, "सांगलीला मी लहान असताना वाड्यातला गोविंद
दाते सायकल कसा सफाईने चालवायचा. हे पाहून मलाही मोह व्हायचा. सायकल भाड्याने
घ्यायला आईला पहिल्यांदा पैसे मागितले. तिने दिलेही. पण मला मोह स्वस्थ बसू देईना.
त्यापायी आता मी धीटपणाने चोरून सायकल चालवू लागलो. एक दिवस सायकल वाल्याने पैसे
मागायला सुरुवात केली, आर्थिक परिस्थिती नव्हतीच, हे कळायचं वयही नव्हतं. मग
आईच्या कानापर्यंत ही गोष्ट जायला नको म्हणून, न सांगताच तिच्या वेणीफणीच्या
पेटीतून एक रुपया घेऊन तो सायकलवाल्याला देवून टाकला. दुस-याच दिवशी यात रुपया
नाही हे आईच्या लक्षात आलं. माझ्या सर्व भावंडाना फैलावर घेतलं गेलं ते मी पहात
होतो. सगळे जण नाही म्हणाले. आईला माझा संशय सुद्धा आला नव्हता.तिला माझ्या बद्दल
खात्री होती. या प्रसंगामुळे कोणीही त्या दिवशी जेवलं नाही. आई तर हे कळल्या शिवाय
जेवणारच नव्हती. दुस-या दिवशी शाळेत गेलो. मात्र आपण रुपया घेतला आहे या विचाराने
मी खूप बेचैन होतो. दुपारी शाळेतून घरी आल्यावर पुन्हा एकदा तापलेलं वातावरण, आईचा
त्रागा, हे पाहून न राहवून मी आईला म्हटलं, "मी घेतला तो रुपया" त्या
सरशी आईचा क्रोध अनावर झाला. तिच्या माझ्यावरील विश्वासाला तडा गेला होता. तिने
हातातले उलथने गरम केले आणि तोंडाला चटका दिला. मी कळवळलो, मावशीने मला सोडवले, या
प्रसंगानंतर आयुष्यात कधीही खोटं बोललो नाही. आईला खोटेपणाची भयंकर चीड होती. अशा अनेक
अनुभवांनी मला माणूस बनविलं. माणुसकी शिकविली. आपण प्रामाणिक असलो कि परमेश्वर
कुणाच्या तरी रुपात आपल्या पाठीशी उभा राहतो. असा अनुभव मी आयुष्यभर घेतलाय".
लहान वयातच
कलाक्षेत्रात असलेल्या वडिलांच्या आयुष्यातले अनेक चढ-उतार बापुंनी अनुभवले. झळ
सोसली. नैतिक मूल्यांच्या जोरावरच अनेक संकटांना समर्थपणे तोंड देण्याचं धाडस ते
शिकले. समाजाचं आपण देणं लागतो ही भावना त्यांच्या मनात कायम असे. म्हणूनच कलेच्या
माध्यमातून समाजावर संस्कार ही संस्कारभारतीची संकल्पना त्यांना भावली होती. महाराष्ट्र
शाखेच्या स्थापने पासून त्यांनी तसे काम सुद्धा सुरु केले होते. दिल्ली येथे
संस्कार भारतीचे अधिवेशन होणार होते. शाहीर योगेश यांच्या आग्रहामुळे
महाराष्ट्रातून सादरीकरणासाठी नाटक घेऊन जायचे ठरले, 'आग्र्याहून सुटका'तील प्रवेश
ठरला. तिथे गेल्यावर कार्यकर्ते दर अर्ध्या तासाला, मी आपकी क्या सेवा कर सकता हूं
?अशी विचारपूस करत. कार्यकर्त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे बापू खूप भारावून
गेले. एकूणच तिथे विविध कला क्षेत्रातील निष्णांत लोक एकाच छताखाली निष्ठेने कला
सादर करीत होते. तर प्रेक्षकात बसले होते, थोर त्यागी, विचारवंत अशा व्यक्ती. त्यात
होते, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, विजयाराजे शिंदे, नानाजी देशमुख,
वसंतराव ओक, असा थोर व्यक्तींचा मेळावा ते प्रथमच अनुभवत होते. त्यांना वाटले 'असा
प्रेक्षक' नुसता पाह्यला मिळणे याला अनेक जन्मांची पुण्याई हवी.
या मान्यवर नेत्यांनी
यावेळी देशाबद्दलची जाणीव, कलाकारांचे स्थान, याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले होते.
यानंतरच्या काळात वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षीच कालाक्षेत्रातून निवृत्त होऊन
समाजासाठी चांगले काम करावे या विचारात ते होते. या संबंधी प्रचारक होण्याची इच्छा
प.पू.गोळवलकर गुरुजींकडे बोलून दाखवताच त्यांना दोन ते तीन वर्षांनी उत्तर मिळाले,
"थांबा, कलेच्या प्रांतात आपल्याला काम सुरु करायचे आहे. त्यात पाऊल
ठेवण्यापूर्वी त्या प्रांतातील दोन मजबूत दगड मी निवडले आहेत. एक म्हणजे तू आणि
दुसरा सुधीर फडके. तुम्हाला तुमच्या कला क्षेत्रातून निवृत्ती नाही" आणि इथेच
त्यांना दूरदर्शीपणा म्हणजे काय याची अनुभूती मिळाली. तिथून पुढे ते संस्कार
भारतीच्या कामात मनापासून दाखल झाले. या कामाची वैचारिक भूमिका त्यांच्या मनात
स्पष्ट होती. महाराष्ट्र प्रांताच्या स्थापनेपासून पुढे सलग सोळा-सतरा वर्षे
त्यांनी संस्कार भारतीच्या कामात लक्ष घातलं .पहिल्याच कार्यकारिणीत त्यांच्या
बरोबर अध्यक्ष पंडित.जितेंद्र अभिषेकी, सरोजिनी बाबर, रा.शं.वाळिंबे, बाबासाहेब
पुरंदरे, राम कदम, द.मा.मिरासदार, शाहीर योगेश ही मान्यवर मंडळी होती.
नानाजी देशमुखांच्या सांगण्यावरून बापुंनी प्रथम
नागपूरला बालनाट्य शिबीर घेतले. ३०० च्या संख्येने प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढे
महाराष्ट्र प्रांताचे ते उपाध्यक्ष झाले. नंतर पुणे महानगरचे अध्यक्ष,पश्चिम
महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष,अशा जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. या कामासाठी त्यांनी
१० ते १२ वर्ष प्रवास सुद्धा केला. महाराष्ट्रांबरोबरच गुजराथ, आंध्रप्रदेश,
मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इथेही गेले. विविध बैठका, अधिवेशने, कार्यशाळा, राष्ट्रीय
कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले. आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा संघटनेच्या
कार्यकर्त्यांना व कलाकारांना करून दिला. महाराष्ट्रात त्यांचा विविध
समित्यांमध्ये प्रवास होत असे. त्यांची तिथे उपस्थिती, त्यांचा सहवास, त्यांचे
वर्तन, त्यांची भाषणे, बोलणे, याचा प्रभाव कार्यकर्त्यांवर पडत असे. कलाकार
कार्यकर्त्याला ते आदर्श ठरत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात संस्मरणीय
ठरलेल्या '१८९७ एक चैतन्य स्मरण' या रँडच्या वधाचे नाट्य रुपांतर हजारो लोकानी
गौरविले.
एकदा अखिल भारतीय बैठकी
साठी बापू जळगाव इथे आले होते. उतरायची व्यवस्था अर्थातच कार्यकर्त्यांच्या घरी
होती. बैठकीच्या दुस-याच दिवशी त्यांचा 'एकच प्याला' चा प्रयोग होता. रात्री
प्रयोग असल्याने दुपारी थोडा वेळ होता, आई बाबांची बैठकीची धावपळ बघून आमच्या
दोन्ही मुलांना कोणीतरी महत्वाची व्यक्ती आली आहे हे कळलं होतं. "एक खूप
मोट्ठे कलाकार आले आहेत" असे सांगितल्यावर आई, आम्हाला त्यांना पहाता येईल? मुलांचा
प्रश्न होता. अशी व्यक्तिमत्व लहानपणी मुलांना संधी मिळेल तेंव्हा दाखवायला हवीत
असे वाटायचे आणि मुलांना आम्ही त्यांच्या भेटीला घेऊन गेलो. बापूंना म्हटलं, तुम्हाला
यांना पाह्यचं आहे. त्यावर ते थोडासा अभिनय करत म्हणाले, "या पहा, कसा दिसतो
मी? मला शेपूट शिंगे वगैरे नाहीत हं? तुमच्या सारखाच दिसतोय न? त्यांचा साधा वेष
पाहून मुलांच्या कल्पनेला तडा गेला. एव्हढा मोठा नट सांगितलं आणि हे इतके साधे?
अत्यंत साध्या वेशातील नटश्रेष्ठ बापूंना पाहून त्यांचा वैचारिक गोंधळ उडाला होता.
नट फक्त रंभूमीवरच. एकदा
नटाचे कपडे उतरविले कि ते चित्तरंजन कोल्हटकर असत. सामान्य आयुष्यातील सामान्य
माणूस असत. त्याच दिवशी रात्री 'एकच प्याला' चा प्रयोग होता, काही झालं तरी तो
बघायचाच अस वाटल होतं, पण बापूंना जेवायला घरी या म्हटल्यावर त्यांनी सांगितलं,
त्या पेक्षा रात्री प्रयोगानंतर भाकरी आणि दूध शक्य असेल तर थिएटरवर आणा. मग काय
ही सेवा आम्हाला करता येणार होती, त्यामुळे प्रयोग बघण्याचा विचार मनातून केंव्हाच
गळून पडला होता. ज्वारी दुकानातून आणून ती दळून आणण्यापासून तयारी होती. पण खूप
आनंद वाटत होता. रात्री दीड वाजता त्यांना गरम ज्वारीची भाकरी आणि गाईचं दूध नेऊन
दिलं. प्रयोग संपता संपता प्रेक्षागृहातील प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा
मुलगा आनंद यांच्या हातात डबा दिला आणि बापुना न भेटताच निघून गेलो. त्यांच्या
जगण्यातल्या साधेपणाचा हा एक अनुभव होता. इतक्या साधेपणान ते कार्यकर्त्यानाही
उपलब्ध होत. मार्गदर्शन करत. प्रवासातही कधी त्यांनी कलावंताची मिजास दाखविली
नाही. कधी राहण्यासाठी हॉटेल ची व्यवस्था मागितली नाही. बापू म्हणजे समाजासमोर
कलाक्षेत्रातला मूर्तीमंत आदर्शच होता.
त्यांच्या
कलाक्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचालीत ती.काकूंचा (श्रीमती विदुला
कोल्हटकर )मोठा वाटा आहे. काकूंनी सह्धर्मचारिणीची भूमिका इतकी सार्थपणे निभावली
कि, मेकअप उतरवल्यावर नटवर्य बापुना दुस-या क्षणी घरची ओढ लागत असे. भूमिका व
वास्तव जीवन यांचे महत्त्व त्यांना होते. बापूंचे घर म्हणजे कलावंताचे आदर्श घर. त्यांचा
८१ वा वाढदिवस त्यांच्या घरी जाऊन आम्ही कार्यकर्त्यांनी साजरा केला. ८१ दिव्यांनी
त्यांचे औक्षण केले. त्यांचे आशीर्वाद घेतले. या दिव्यांची जबाबदारी माझ्याकडे
होती .बँकेतून एक रुपयाची ८१ नवी नाणी आणून, चांगल्या तुपात ८१ वाती भिजवून, औक्षणाचे
ताट तयार करून घेऊन गेले होते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ही आणखी एक संधी
आयुष्यात मला मिळाली होती. एव्हढे मोठे व्यक्तिमत्व, अभिनय समर्थ, अनेक पुरस्कार
प्राप्त, जवळ जवळ सहा दशकं चित्रपट आणि रंगभूमी गाजवलेला सम्राट. एक देशप्रेमी,
आपल्या संघटन कौशल्याने कलाक्षेत्रात काम करता करता, नकळत संस्कारही करत होता. असे
आदरणीय व्यक्तिमत्व मला जवळून अनुभवायला मिळाले होते. अहो भाग्यम !
- डॉ. नयना कासखेडीकर
No comments:
Post a Comment