Tuesday 20 May 2014

महापुरुष - बाळशास्त्री जांभेकर


महापुरुष - बाळशास्त्री जांभेकर    

   
लेखक यशवंत पाध्ये यांनी जांभेकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावरील रेखाचित्र

             कोकणातल्या विजयदुर्ग ते कासार्डे या रस्त्यावर डावीकडे अचानक, 'बाळशास्त्री जांभेकर स्मारक तीन किलोमीटर आंत' , असा बोर्ड पहिला आणि मी चमकून पहिले.वृत्तपत्रांचा अभ्यास करताना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कोकणातले एव्हढे माहिती होते,पण अचानक या ठिकाणाच्या जवळच आपण आहोत, हे कळल्यावर उत्सुकता वाढली. पण घाई असल्याने पुढे गेलो.एक वर्षापूर्वी पाहिलेली ही पाटी मी जाणून बुजून लक्षात ठेवली होती.वर्षभराने कोकणातल्या मुक्कामात असताना या स्मारकाला काहीही करून भेट द्यायचीच असा पण केला.स्मारक आहे लक्षात ठेवलं पण पोंभुर्ले हे नाव काही केल्या आठवेना. दोनचार जणांना विचारून पाहिलं पण त्यानाही माहिती नव्हतं.शेवटी पुस्तकाच्या दुकानात जाऊन जांभेकरांचे चरित्राचे अथवा माहितीचे पुस्तक घेऊ म्हटलं तर तेही मिळालं नाही.आता मी निश्चय केला कि विजयदुर्गच्या मुख्य रस्त्यावर जिथे पाटी होती तिथपर्यंत जायचं, पुढचं पुढे.  
              
             गाडीची व्यवस्था झाली आणि आम्ही स्मारकाला भेट द्यायला पोम्भूर्लेला निघालो. दरम्यान ड्रायव्हरने चौकशी करून पोंभुर्ले वर शिक्कामोर्तब केले होते म्हणाला मला माहिती आहे खारेपाटण कडून जाऊ,जवळचा रस्ता आहे. राजापूरच्या अलीकडे खारेपाटणहून आत वळलो,जेमतेम अर्धा किलोमीटर गेलो आणि सुरु झाला कोकणातल्या दुर्गम (माझ्या दृष्टीने अतिदुर्गमच होता तो.)भागातला प्रवास. चढ-उतार-तीव्र वळण, असा हा एकाला एक जोडलेल्या छोट्या डोंगरांवरचा कच्चा रस्ता,दाट झाडी, देवगडच्या आसपासचा हा भाग असल्याने हापूस आंब्याची झाडे मोहोराने गच्च बहरली होती.आंबेमोहोराचा सुगंध मनाला मोहवीत होता. कोसाकोसावर चारपाच-चारपाच घरं.रस्ता अत्यंत खराब,डांबरीकरणाचा पत्ता नाही.मुली बायका लांबून पाणी वाहून नेत आहेत.२०० वर्षांनंतर आज हे पोम्भूर्ल्याचे चित्र असेल तर बाळशास्त्री यांच्या वास्तव्यातले हे गाव अतिदुर्गमच म्हटले पाहिजे.अशा भागात वयाची बारा वर्ष बालपण गेलेल्या या तरुणाला महाराष्ट्राच्या विकासासाठी, इथल्या लोकांना नव्या ज्ञानाचा, पाश्चात्त्य विद्येचा परिचय व्हावा म्हणून मराठी भाषेत वृत्तपत्र काढण्यची इच्छा व्हावी ? म्हणून दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा श्रीगणेशा करून ते ज्ञान मातृभाषेत लोकांपर्यंत पोहोचवावे, केव्हढा हा विचार होता.आजच्या राज्यकर्त्यांना विकास म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्प स्वल्प आयुष्यात केलेले कार्य पाहावे. आज महाराष्ट्राचा विकास म्हणजे रस्ते, इरिगेशन, वीजप्रकल्प, पर्यटन आणि ब-याच काही कल्याणकारी योजनाचे कोट्यावधी रुपयांच्या घोषणा मंजूर करून घेणे एव्हढेच? कुठे जातात कोट्यावधी रुपये? महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रवास केल्यावर हा प्रश्न पडतो. प्रवास करता करता नकळत तेंव्हाचे खरे समाजसुधारक आणि आताचे बेगडी आणि ढोंगी, स्वार्थी पुढारी नेते यांची आणि आत्ताच्या माध्यमांच्या मालक- संपादकांची मनात तुलना होत होती.      

             कसेबसे तासाभराच्या प्रवासानंतर कोर्ले नावाची पाटी दिसली.आता मात्र साशंक झालो. कोर्ले कि पोंभुर्ले? रस्त्यावरच्या जाणा-या मुलाला विचारून पाहा,जांभेकरांचे स्मारक कुठे आहे? तो म्हणाला, 'ग्रामपंचायतीच्या पुढे डावीकडे वळा '. मनात आलं पत्रकारितेतल्या क्षेत्रातल्या अनेकांना तरी हे नाव माहिती असेल का? आणि किती व्यावसायिक पत्रकारांनी, संपादकांनी या ठिकाणी भेट दिली असेल? पण त्या १०/१२ वर्षाच्या मुलाला जांभेकरांचे स्मारक माहिती होते. हे पाहून सुखद धक्का बसला.      
            

               पोम्भूर्ल्यात एका वाडीजवळ आमची गाडी थांबली. तिथे रस्ता संपत होता. स्मारक शोधण्याची धडपड चालली होती. ते काही दिसत नव्हतं. समोरच्या घराचा रस्ता आडवे बांबू लावून बंद केला होता. मनात कल्पना होती स्मारक म्हणजे मोठा मेन्टेन केलेला बगीचा, माहिती असलेले म्युझियम, पुतळा, फोटो, चित्र, बाळशास्त्रींनी काढलेले दर्पण दैनिकांचे व दिग्दर्शनचे अंक, त्यांची काही ग्रंथसंपदा.पण छें .तसे काहीच नव्हते.कराडला यशवंतराव चव्हाणांचे नदीकाठी असलेले सुंदर स्मारक पाहिले होते.किती मोठ्या जागेवर ते उभे केले आहे.अशी कितीतरी स्मारके शासनातर्फे उभारली जातात.भारतात स्वताचेच पुतळे, स्वताच्या नावाचे चौक यांचे स्वताच्याच हाताने उदघाटन करणारे महान नेते,पुढारी दिसतात. केवळ तेहेतीस वर्षाच्या आयुष्यात मराठी पत्रकारिता, मासिक, गद्य निबंध, शिक्षणक्षेत्र, अध्यापक शास्त्र, इतिहास संशोधन, ग्रंथ लेखन, समाज सुधारणा, चळवळी, स्वदेश, स्वभाषा, लोकशिक्षण या त्यांनी केलेल्या कामामुळे अजरामर झालेल्या बाळशास्त्री जांभेकर या नावाचे कुणालाच काही सोयरंसुतक नसाव?
                

               बाळशास्त्री जांभेकरांचे हे स्मारक म्हणजे त्यांच्या राहत्या घराशेजारी, जाम्भेकरांच्याच जागेवर जिथे आजही त्यांची पुढची पिढी राहते आहे. तिथे लोकवर्गणी आणि शासनाच्या अर्थ सहाय्यातून एक सभागृह बांधून, त्यात फक्त बाळशास्त्री जाम्भेकरांची माहिती लिहिलेले मोठे फलक व एक पुतळा एव्हढेच आहे. त्यांची जयंती आणि पुण्यतिथी हे दोन कार्यक्रम साजरे होतात.              
      
              २९ जानेवारी २०१४ मधला हा दिवस मला माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा वाटत होता.त्यांच्या स्मारकाला भेट म्हणजे जणू काही या महाराष्ट्राला जागे करणा-या पहिल्या मान्यवर संपादकांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद होता माझ्यासाठी.खूप प्रसन्न वाटत होतं. अभिमान वाटत होता.बाळशास्त्री जांभेकरांचे चुलत पणतू सुधाकर जांभेकरांनी आमचे स्वागत केले.सुधाकर त्यांच्या पत्नीबरोबर इथे राहतात.एल अँड टी ची मुंबईतली मोठी नोकरी सोडून जांभेकर कुळाचे मूळ घर जतन करण्यासाठी ते राहतात.आज जांभेकर कुटुंबात चुलतभाऊ मिळून ३५० ते ४०० जण आहेत.सगळे कामानिमित्त बाहेर असतात.बाळशास्त्रींचा जन्म याच घरात झाला.या वास्तुत आजही त्यांचे ५०० वर्षापूर्वीचे देवघर आहे.त्याची रोज पूजा-अर्चा होते.ही जबाबदारी सुधाकर यांनी घेतली आहे.बाळशास्त्री यांनी केलेलं काम पाहिलं कि त्यांच्या महान व्यक्तिमत्वाची कल्पना येते.  

               मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर पत्रकारितेतला दीपस्तंभ.जांभेकर कुळातला बालबृहस्पती आणि आद्याचार्य म्हणून त्यांना संबोधले जाते.गणेश गंगाधर जांभेकर यांनी १९४७ ला शतसांवत्सरिक पुण्यस्मरणार्थ लिहिलेल्या द्वादशश्लोकीत, बाळशास्त्रींना आधुनिक महाराष्ट्राचा आद्य राष्ट्रगुरु आणि पितामह म्हटले आहे.प्राचीन लिपीलेख लावणारा,नाना राष्ट्रेतिहास जाणणारा,आद्य भारतीय पुराणेतिहास संशोधक,अतुल गणिती व निष्णात ज्योतिषी असे त्यांचे वर्णन केले आहे.

        बाळशास्त्रींचा जन्म फेब्रुवारी १८१२,महाराष्ट्रातल्या देवगड तालुक्यातल्या पोंभुर्ले इथला.वडिल गंगाधर शास्त्री आणि आई सगुणाबाई. पोम्भूर्ल्यात मराठी शाळा नसल्याने त्यांचे शिक्षण घरगुती पद्धतीने वडिलांच्या सान्निध्यात झाले.त्यामुळे,बाळबोध,मोडी वाचन व लेखन,व्यावहारिक अंकगणित,तोंडी हिशोब, समर्थ रामदास,संत तुकाराम,कवी मोरोपंत यांच्या कविता,रामायण-महाभारत कथा,मराठ्यांच्या उपलब्ध ऐतिहासिक बखरी,हे सर्व वयाच्या आठव्या वर्षा पर्यंत त्यांनी पारंगत केले.उपनयन झाल्यावर वेदपठण,संस्कृत स्तोत्र,गीतापाठ,आणि अमरकोश,लघुकौमुदी,पंच महाकाव्य,हे बाराव्या वर्षी मुखोद्गत होते.हा काळ १८१८ चा, पेशवाईची अस्त आणि पहिल्या ब्रिटीश गव्हर्नर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या ताब्यात गेलेली मुंबई इलाख्याची सर्व प्रशासकीय सूत्रे असा होता. याच वेळी पाश्चात्य विद्येचा अभ्यास करण्याची संधी बाळशास्त्रींना मिळाली. गव्हर्नर चे धोरण अर्थातच ब्रिटीश राज्य वाढवावे हा होता. तरुणांना आकर्षित करण्यासाठी गव्हर्नरने मुंबईत, दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, इंजिनिअर्स  इंस्टीट्युशन स्थापत्य शाळा सुरु केली. शिळा छापखाना सुरु केला. या सगळ्या ठिकाणी इंग्रजी लोक शिकवायला होते. नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून सदाशिव काशिनाथ छत्रे (बापू छत्रे)यांची नेमणूक झाली होती. या सुमारास पुण्याहून अनेक विद्वान मंडळी मुंबईत आली. त्यातलेच एक बाळशास्त्री होते. बापूसाहेब छत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळशास्त्री यांचे नवे आयुष्य सुरु झाले. इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला आणि शिक्षण घेता घेता विद्यार्थी दशेतच त्यांना असामान्य बुद्धिमत्तेमुळे शिकवण्याचीही संधी मिळाली. मराठी, संस्कृत, कानडी, इंग्रजी, गुजराथी, बंगाली, फारसी, अरबी, लॅटिन, ग्रीक, फ्रेंच,भाषा व अंकगणित, बीजगणित, भूमिती, मूल्यमापन, लॉगेरिथम या विषयात त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी प्राविण्य मिळविले.बीजगणित तर मुखोद्गत होते त्यांचे. जांभेकर यांनी लिहिलेल्या क्रमिक पुस्तकांपैकी लहान मुलांचे मानसशास्त्र हा विषय प्रथमच लोकांना कळत होता .
          

          गुरु बापूसाहेब छत्रे यांनी सचिव पदाचा राजीनामा देवून त्याजागी बाळशास्त्री यांची नेमणूक करण्याची शिफारस केली.ताबडतोब अर्जाचा विचार झाला कारण त्यांची विद्वत्ता आणि योग्यता. सचिव म्हणून काम करताना ते अनुभवसंपन्न झाले.लेख आणि पुस्तकांचे मराठीत भाषांतर,नीतिकथा,सारसंग्रह,गोल्ड स्मिथच्या इंग्रजी बखरीचा इंग्लंड देशाची बखर भाग १ व २अशी मराठी पुस्तके लिहिली.प्राचीन शिलालेखांवर संशोधनात्मक लेख लिहिले.रॉयल एशियाटिक संस्थेच्या नियतकालिकात भारतीय शिलालेख,ताम्रपट या विषयांवर शोधनिबंध लिहिले.  हे करीत असताना अनेक परकीय भाषा शिकले.त्यांचे अनेक भाषांवरील प्रभुत्त्व बघून त्यांना अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणा-या रॉयल एशियाटिक संस्थेच्या मुंबई शाखेच्या सचिव पदाचीही जबाबदारी देण्यात आली.
            
            इंग्रजांनी सुरु केलेले,  शाळा, त्यासाठी विविध पुस्तके, कोष, वाड:मय, भाषांतरित पुस्तके, क्रमिक पुस्तके, त्याद्वारे ज्ञान आणि नोकरी मिळते, यामुळे मुंबईतले वातावरण बदलले. आपल्या लोकांतील वाढलेली गुलामगिरीची प्रवृत्ती आणि  हे ज्ञान अत्यंत जुजबी आहे हे कळल्यावर बाळशास्त्री यांनी सामान्य लोकामध्ये स्वातंत्र्या विषयी जागृती आणि ज्ञान प्रसार करण्याचे ठरविले. या सुमारास इंग्रजी, बंगाली आणि काही गुजराथी वर्तमानपत्रे निघत होती.१८३२ चा काळ म्हणजे इंग्लंड मध्ये पार्लमेंट मध्ये सुधारणा होऊनप्रागतिक राजकारणाचा उदय होण्याचा काळ होता. यावेळी बंगालचे पुढारी राजा राम मोहन रॉय इंग्लंड मध्ये गेले होते.त्यांनी आणि धर्म सुधारकांनी बंगाल मध्ये फार कमी वेळात लोकजागृती केली होती,बंगालची ही सुधारलेली स्थिती पाहून बाळशास्त्रींनाआपल्या राज्यातल्या सुधारणेची स्वप्ने पडू लागली.इथला अज्ञानांधकार आपण प्रयत्न केले तर लवकरच दूर होईल आणि आपण बंगाल सारखी प्रगती करू शकू असा विश्वास वाटू लागला.बंगाल प्रांतातील लोक पाश्चात्य विद्येच्या प्रसारामुळे पुढे गेले आहेत ही जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्यासाठी एकाच मार्ग त्यांना दिसत होतं तो म्हणजे वृत्तपत्र आणि दर्पण हे पहिलं मराठी-इंग्रजी साप्ताहिक ६ जानेवारी १८३२ ला सुरु केलं.दर्पण हे पहिले मराठी नियतकालिक होते तसेच ते भारतीयांनी सुरु केलेले सर्वात पहिले इंग्रजी नियतकालिकही ठरलं. दर्पण चालवण्यामागे त्यांची एक निश्चित विचारधारा होती.

                समाज सुधारण्यासाठी आत्ता कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची गरज आहे हे त्यांना माहित होते.इथल्या सामाजिक रूढी,व्यापार उद्योग,औद्योगिक चळवळी, राजकीय स्थिती,स्य्रीयांचे शिक्षण,विधवा पुनर्विवाह, धर्माच्या नावावर स्त्रियांचा मानसिक आणि शारीरिक छळ, धार्मिक सुधारणा आणि इतर विषयावर त्यांचे क्रांतिकारक लेखन असे.इंग्रंजांची विद्या आणि संस्कृती प्रगत का आहे ,आपण कुठे मागे आहोत याविषयी चे शास्त्रीय ज्ञान दर्पण मधून लोकांना देत असत.तेंव्हाही त्यांचे लेखांचे विषय पाहता उदाहरणार्थ, स्त्रियांचा विद्याभ्यास, मुंज मुलींची का नाही? स्त्री-पुरुषांना समान हक्क? स्त्री शिक्षणाची दिशा, रुक्मिणी व स्त्री-शिक्षण, दुराग्रही चालींवर झोड, १६५ वर्षापूर्वी त्यांचा स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व  धार्मिक व सामाजिक सुधारणांची दूरदृष्टी लक्षात येते.

 
              बाळशास्त्री यांचे नियतकालिक निघण्यापूर्वी कोणत्याही मराठी गद्याची परंपरा नव्हती.पारतंत्र्य काळात, कुठलाही राजकीय आश्रय,कुठलीही आर्थिक मदत नसताना प्रतिकूल परिस्थितीत वृत्तपत्र काढणं निश्चितच सोपं नव्हतं . बाळशास्त्री साप्ताहिक दर्पण आणि मासिक दिग्दर्शन या नियतकालिकांचे संस्थापक ,आधुनिक मराठी गद्याचे प्रणेते,पहिले निबंधकार, मराठीतले आद्य पत्रकार,आद्य प्राध्यापक आहेत.तसेच शालेय क्रमिक पुस्तकांचे व बालवाड:मयाचे जनक पण आहेत. त्यांनी  ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे मराठीत सर्वप्रथम शिळाप्रेसवर प्रकाशन केले.१८४५ मध्ये त्यांनी लोकांना वाचनाची आवड लागावी म्हणून भारतीयांचे पहिले सार्वजनिक वाचनालय बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी स्थापन केली.मुंबईतल्या पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक,पहिल्या अध्यापक वर्गाचे संचालक, कुलाबा वेधशाळेचे संचालक आणि नेटिव्ह इंप्रूव्हमेंट सोसायटी या मुंबईतल्या लोक सुधारणा व्यासपीठाचे संस्थापक होते.सार्वजनिक हिताच्या गोष्टीवर चर्चा होऊन त्यावर निर्भीड पणे मते मांडण्याकरता हे व्यासपीठ निर्माण केले होते.इंग्रजांनी १८४० मध्ये बाळशास्त्री यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा अतिशय महत्त्वाचा बहुमान दिला होता.

      प्रचंड विद्याव्यासंग, अलौकिक कर्तुत्व यामुळे ते विद्यार्थ्यामध्येही ते लोकप्रिय होते. भारतीय पुराणेतिहास संशोधक डॉ.भाऊ दाजी लाड,राजकीय पितामह डॉ.दादाभाई नौरोजी,विख्यात गणिती व ज्योतिषी प्रो.केरो लक्ष्मण छत्रे,मुंबई व इंदूर संस्थांचे न्यायाधीश रा.ब.नाना मोरोजी त्रिलोकेकर, योराबजी शापूरजी बंगाली, के.शी भवाळकर, शंकरशास्त्री जोशी, डॉ.अनंत चंद्रोबा,ही सर्व यशस्वी व सुप्रसिध्द व्यक्तिमत्त्वे बाळशास्त्री जांभेकरांचे विद्यार्थी होत.भारतीयांची प्रगती घडवून आणायची तर शिक्षणासारखे प्रभावी साधन नाही .सर्व शिक्षकांना ते उपदेश देतात कि, 'गुरु दसपट ज्ञानी असेल तर तो शिष्यास एकपट ज्ञान देऊ शकेल.'

        १७ मे २०१४ ही त्यांची १६८ वी पुण्याथिती. अशी व्यक्तिमत्वे दखल न घेतल्यास इतिहासातून बाहेर टाकले जातील हे लक्षातही येणार नाही.तेव्हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर संशोधन करून,संकलन करून ,त्यांची ग्रंथसंपदा,या त्यांच्या स्मारकात लोकांसाठी व माध्यमातल्या लोकांसाठी पाहण्यास व अभ्यासण्यास खुली करावी असे वाटते.
 
       अशी ही स्मारकाची भेट विचारमंथन करणारी ठरली.सुधाकर जांभेकर आणि त्यांच्या पत्नीने आमचे स्वागत केले.घर दाखविले.चहापान झाले आणि संक्रांतीचा काळ असल्याने वहिनींनी माझी हळदी कुंकू देवून, ओटी भरून आम्हाला निरोप दिला.  

- डॉ. नयना कासखेडीकर                                                                              

3 comments:

  1. बाळशास्त्री जांभेकर हे नाव ऐकून होतो पण त्यांचे कार्य व थोरवी एवढी.मोठी आहे हे मात्र आपला लेख वाचल्यानंतर लक्षात येते. खूप छान लेख

    ReplyDelete