Saturday, 3 May 2014

शब्देविण संवादू...


                                                               'शब्देविण संवादू... '


            व्यंगचित्र म्हणजे चित्रमय विडंबन. पाहता क्षणी हसविणारे आणि मार्मिक भाष्य जाणवून देणारे चित्र.आपल्या सभोवताली विविध प्रसंगात, घडणा-या घटना-घडामोडीत, बोलण्या-वागण्यात, माणसांच्या प्रवृत्तीत अनेक ठिकाणी विसंगती आढळतात. या विसंगतीचं मार्मिक दर्शन व्यंग चित्रातून होतं. त्यात कधी थट्टा मस्करी असते, कधी उपहास असतो, तर कधी प्रबोधन असते. ही चित्रे रसिकांना योग्य अयोग्य काय याचं भान देतात. त्यांच्यातील खिलाडू वृत्ती वाढवितात. संवेदनक्षमता वाढवितात. कधी निर्मळ हास्य निर्माण करतात. यातला आशयच सामान्य वाचकाला भावत असतो, पण तो प्रभावी ठरतो, तो हे दृश्य माध्यम असल्यामुळे. कारण चित्रेही तेव्हढी परिणामकारक हवीत. रेषा, रंगसंगती, आकार, रचना, या बरोबरच चेहरे, हावभाव, पोशाख, शरीरयष्टी यांची निवड अत्यंत कौशल्याने केलेली असते. अशीच वैशिष्ठपूर्ण व्यंगचित्रे (गॅग) म्हणजे हास्यचित्रे यात उल्लेखनीय कार्य असणारे, व्यंगचित्रकार शि.द.फडणीस.अशा हास्य चित्रांनी वाचकांच्या मनात हास्याची कारंजे उमटविणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार, माननीय शि. द. फडणीस शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्त त्यांना दीर्घायु लाभो ही सदिच्छा. 

                                         

शिवराम दत्तात्रय फडणीस यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील भोज इथला. त्यांच मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण कोल्हापूरला झालं. १९४९ मध्ये मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मध्ये पदवी शिक्षण घेत असतानाच व्यंगचित्रांचा छंद जडला. मोहिनी, हंस सारख्या कितीतरी मासिकातून त्यांच्या मुखपृष्ठाद्वारे व आतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रांच्या माध्यमातून ते आपल्याला १९५२ पासून सलग ६२ वर्षे भेटताहेत. 'शब्दविरहीत' चित्र आणि त्यातून निखळ आनंदाची निर्मिती हे त्यांच्या व्यंगचित्रांचे वैशिष्ट्य. अशी अनेक मासिके त्यांच्या हास्यचित्रां मुळेच आपल्या लक्षात कायम राहिली आहेत. ना.सी.फडके, चिं.वि.जोशी, द.मा.मिरासदार, पु.लं.देशपांडे , व. पु.काळे, शकुंतला फडणीस, दिलीप प्रभावळकर, मंगलाताई गोडबोले या लेखकांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठावरही शि.दं.ची चित्रे आपल्याला भेटतात. त्यांनी या बरोबरच गंभीर साहित्यामधील विषय सुद्धा चित्रात हाताळले आहेत. महादेव शास्त्री जोशी, गो.नी.दांडेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर दि.बा.मोकाशी यांच्या साहित्यासाठी पण चित्र काढली आहेत.
नियतकालिके, दिवाळी अंक, पुस्तके, बालसाहित्य, कथाचित्र, नाटक सिनेमाच्या जाहिराती,अशा अरव माध्यमासाठी त्यांनी चित्रे काढली .
       
                                                      

    कोणताही मनुष्य परिपूर्ण कधीच नसतो. त्याच्या वागण्या-बोलण्यात, जीवनात, स्वभावात कुठेतरी विसंगती आढळत असते. काही त्रुटी असतात आणि 'जे न देखे रवी ते देखे कवी ' या उक्ती नुसार हे व्यंग्य कलाकाराला नेमके दिसते आणि त्याची व्यंगचित्रे होतात. अशी ही चित्रे वा फोटो वाचकांना १००० शब्द सांगून जातात. शि.द.फडणीस यांची व्यंगचित्रेही अशीच साधी, सोपी, सरळ. उच्च अभिरुची आणि सभ्य विनोद हे त्याचे वैशिष्ट्य. सामान्य लोकांच्या मनातल्या सहज सुलभ भावना, विचार, प्रश्न सरांच्या चित्रात विनोदाच्या रुपात आपल्यासमोर येतात.त्यांच्या व्यंगचित्रात माणसांप्रमाणेच प्राणी सुद्धा असतात. म्हणूनच ती लहान थोर सगळ्यांनाच कळतात. वाचता येतात. यात आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्यही असतं. त्यांची ही चित्रे जीवनातल वास्तव सांगणारी पण तरीही सुखद आणि आनंददायी असतात. त्यांच्या चित्राद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधली जाते असे वाटते. कारण ही चित्रे भाषांची सीमा पार करतात.


                                       

       सरांना भेटायला गेले .घरातच असलेला चित्रकाराचा स्टुडिओ बघितला. त्यांचे सुरू असलेले काम बघता बघता ज्या गप्पा सुरू झाल्या त्यात दोन ,तीन तास कसे निघून गेले ते कळले देखील नाही. एव्हढं मोठं व्यक्तिमत्व पण किती साधं !
त्यांच्या या आत्तापर्यंतच्या सर्व प्रवासाबद्दल ते सांगत होते, म्हणाले, "व्यंगचित्रातून निखळ मनोरंजन होतेच पण या दृश्य कलेची चित्रभाषा हा एक गुण आहे. तो तुम्ही किती आत्मसात करता त्यावर कौशल्य अवलंबून आहे. मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. जे. जे. त अॅडमिशन घेतल्यापासून माझ्या करियरची घरात सर्वांना काळजी वाटत होती. कारण व्यंगचित्र म्हणा चित्रकला म्हणा याला तसं फारसं महत्व नव्हत. दैनिकात, मासिकात तर फार तुरळक व्यंगचित्र असायची. मी सहज हौस म्हणून किर्लोस्कर, स्त्री यासारख्या मासिकांना व्यंगचित्र काढून पाठवायचो जेव्हा 'हंस' मासिकातर्फे मला पहिलं बक्षीस मिळाल तेव्हा जाणवले आपल्यात काहीतरी कौशल्य निश्चित आहे. वाचकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. तसतसे चित्र काढण्याचं प्रमाण वाढलं. १९५२ साली 'मोहिनी' दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर पहिलं चित्र छापलं गेलं. त्या संपादकांनी सांगितल, तुमच्यातलं हे वैशिष्ट्य आहे हेच करियर करा".विशेष म्हणजे १९५२ सालापासून आजतागायत सर मोहिनी दिवाळी अंकासाठी चित्र काढत आहेत. २०२१ मध्ये त्यांनी काढलेले नवे चित्र हे ७० वे मुखपृष्ठ चित्र होते.

                                        

       "व्यंगचित्र या माध्यमाची गुणवत्ता कौशल्यावर अवलंबून असते आणि ते माझ्याकडे होतं. आपण शब्दाशिवाय चित्राने बोलू शकतो हे माझ्या चित्राचं वैशिष्ट्य इतरांनीच माझ्या लक्षात आणून दिलं. त्यामुळे फायदा असा झाला मी भाषेच्या, राज्यांच्या, देशांच्या सीमा ओलांडू शकलो. मला काय म्हणायचयं हे शब्दविरहीत चित्रांतून मराठी, कन्नड, तेलगु, गुजराथी, तामिळी एवढचं काय इंग्रजी भाषेच्या परदेशी माणसांनाही कळत. पाठ्यपुस्तक मंडळामुळे व्यंगचित्राचा 'बोधचित्र' हा एक गुण मला समजला". महाराष्ट्र राज्य शालेय पाठ्य पुस्तक मंडळाने गणिताच्या पाठ्यपुस्तकात सरांच्या चित्रांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत गणिता बद्दल खूप भीती असते. पण ही भीती पुस्तकातील सरांच्या चित्रांमुळे कमी झाली. गणितातल्या अमूर्त संकल्पना सरांनी अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून चित्रातून सुलभ करून दिल्या.म्हणूनच वाचू न शकणार्‍या मुलांना चित्रांच्या भाषेतून गणित समजत होतं.


      बँकिंग, आरोग्य, गणित, शास्त्र, कायदा, तत्वज्ञान या विषयाची पुस्तके त्यांनी सचित्र केली. चित्रांमुळे या विषयांचं वातावरण सुखद बनतं. विषयाची क्लिष्टता कमी होते. जिथे शब्द पोहचत नाहित तेथे चित्र काम करते. निरक्षरांना हे चित्र माध्यम फार महत्वाचे आहे. कॉम्प्युटर बद्दल त्यांना वाटते, आजच्या कॉम्प्युटर युगात कॉम्प्युटर हा सगळ्या सीमा ओलांडून काम करू शकतो. त्यामुळे सर्वांना वाटतं हे सहज शक्य झालंय. पण तसं नाही, चित्रकला किंवा चित्रकार म्हणून करियर करण्यासाठी मनुष्यामधल्या सृजनशक्तीला आव्हान असतं. हे आव्हान कॉम्प्युटर स्वीकारू शकत नाही. त्याला माणूसच हवा. कॉम्प्युटर फक्त आपले कष्ट व वेळ वाचवते कॉम्प्युटरचं एनिमेशन, चित्रकला, ग्राफिक्स या क्षेत्रात सर्वांसाठी स्वागतच करतो मी पण या सगळ्यांचा मुळ पाया चित्रकलाच आहे तो मजबूत हवा.

   
                                     

       चित्रांच्या शैलीबद्दल सांगताना ते म्हणाले, "चित्रांची शैली म्हणजे एखाद्याच्या चित्रकलेचा चेहरा म्हणजेच त्याची ओळख असते. जी आपण स्वतः विकसित केलेली असते. तीच तुमची खरी शैली उद्देशपूर्ण व जाणीवपूर्वक चित्र ट्वीस्ट करता आली पाहिजेत. तुमची चित्रशैली अनुकरण मुक्त हवी". सरांची चित्रे डेकोरेटिव्ह व गोंडस असतात. कारण ते ही व्यंगचित्र केवळ ड्राईंग म्हणूनच एन्जॉय करतात. इंटरनेटमुळे जग जवळ आल्याचा अनुभव सरांनीही घेतलाय. 'फेस्टिव्हल ऑफ लाईटस चे अंतरराष्ट्रीय स्वरूप' या विषयावर कैलिफोर्नियातील कूपर्टिनो इथे विषय समजल्यापासून केवळ ३६ तासात व्यंगचित्र पाठविली. अर्थातच ई-मेल ने. तसेच दिवाळी अंकात 'सावली' या अमेरिकेतील मराठी मासिकात सरांनी मुखपृष्ठ व आतील व्यंगचित्र काढली आहेत.


      अमेरिकेतील व्यंगचित्रकार नॉर्मल रॉकवेल यांची चित्रे त्यांना आवडतात. तर महाराष्ट्रातल्या चारुहास पंडितांचा चिंटू त्यांना खूप आवडतो. एनिमेशन क्षेत्रातला किंग वौल्टर डिस्ने त्यांचा अत्यंत आवडता. कॉपीराईट्स चा कायदेशीर अधिकार चित्रकारांना पण असतो याची त्यांनी सर्वांना जाणीव करून दिली. त्यामुळे आता सर्वच चित्रकारांना याचा फायदा होतो.
      
      शि. द. फडणीस यांची हसरी गॅलरी, मिस्कील गॅलरी, चिमुकली गॅलरी, छोट्यांसाठी चित्रकला, भाग १ व भाग २ (इंग्रजी व मराठी) तसेच १९७२ पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची गणिताची सचित्र पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे आत्मवृत्त 'रेषाटन' प्रसिद्ध आहे. त्यांचं 'हसरी गॅलरी' हे चित्रांच पहिलं प्रदर्शन १९६५ मध्ये मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलं. ही प्रदर्शने व स्लाईड शो भारतभर व इंग्लंड, अमेरिका, जर्मनी व इतर देशात सुद्धा झाले आहेत. सरांच्या चित्रप्रदर्शनांना उदंड प्रतिसाद मिळतो. नाशिकच्या प्रदर्शनात एक रसिक, पेशंट असूनही चक्क स्ट्रेचरवरूनच झोपल्या झोपल्या प्रदर्शन पाहून गेला. अशी ही व्यंगचित्रे सर्वाना आनंद देतात.

                                        

      शि. द. ना त्यांच्या कारकिर्दीत, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, मार्मिकचा जीवनगौरव पुरस्कार, गुणीजन कला पुरस्कार आणि बंगळूरच्या जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
शि.द.फडणीस यांनी रेखाटलेली शब्दविरहित चित्र मिश्किल, खट्याळ, खुमासदार, व्यवहारिक व सदोदित तजेलदार अशी आहेत. ती पुन्हा पुन्हा बघाविशी व वाचाविशी वाटतात. आपल्याला अंतर्मुख करतात. नवा दृष्टीकोन देतात.त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा !


- डॉ. नयना कासखेडीकर.
                                          -------------------------------------------------- 

7 comments:

  1. उत्तम लेख.

    ReplyDelete
  2. व्यंग्यचित्र विषय पर सार्थक आलेख। पहला व्यंग्यचित्र संगीत मासिक पत्रिका के पुराने अंक में देख चुका हूँ।

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर झाला आहे लेख नयनाताई!पुन:प्रत्ययाचा आनंद दिलात धन्यवाद!

    ReplyDelete
  4. खूप छान लेख नयना ताई..

    ReplyDelete
  5. सुंदर रोचक भाषेत शि. द.यांचा व्यक्तिगत परिचय व व्यंगचित्र कलेबाबत त्यांचे विचार पोचवले आहेत नयनाताई

    ReplyDelete