सुपर गोल्डी चाय !
'चायवाले...चाय
... सुपर गोल्डी चाय' असं शांतपणे ओरडत डब्यातला चहावाला आधी एकदा येवून गेला
होता.पहाटे पाच नंतर गाडी थांबेल तिथे रेल्वे स्टेशन वरील सुमारे १०चहावाले तरी
ओरडत येवून चहाची ऑफर देवून गेले होते.पण रेल्वेचा चहा अजिबात नको म्हणून
दुर्लक्षच केलं होतं.मागच्याच आठवड्यात पुणे- ग्वाल्हेर एक्सप्रेसने बडोद्याला
चालले होते.बडोद्याला गाडी सकाळी १० वाजता पोहोचणार होती.उतरून पुन्हा चहा-पाण्यात
वेळ घालवायचा नव्हता, हा विचार करते तेव्हढ्यात पुन्हा सुपर गोल्डी चाय वाला आला. त्याने
खुणेनेच विचारले,चहा हवा का? मी विचारात पडले. तेव्हढ्यात माझा भाऊ म्हणाला आधी एक
कप घेवून बघूया.तसा चहावाला म्हणाला, 'सुपर गोल्डी है, पीके देखो'. शेवटी घेतला आणि
काय म्हणावं एव्हढा सुंदर चहा घराबाहेर पडल्यावर आजपर्यंत कधीच मिळाला नव्हता
.चहाचा कप हातात घेतल्या बरोबर चहा न पिताच चहाच्या रंगावरून, मी भावाला म्हटलं
चांगला आहे. घे दोन कप आणि... तो चहा पिऊन समाधान झालं. दहा रुपये प्रमाणे दोन
चहाचे वीस रुपये घेऊन तो गेला.
सुपर गोल्डीची
स्वारी पुन्हा १५/२० मिनिटांनी आली. मी आणि भावाने एकमेकांकडे कटाक्ष टाकला. पुन्हा
त्याचा सुंदर चहा घ्यावासा वाटला. दुस-यांदा चहा देताना तो म्हणाला, आज गाडीमे
अच्छां पब्लिक नही है,खराब है.बापरे, हा एकदम गाडीतल्या पब्लिक वरच का घसरला? मी
म्हटलं, क्यूं ? क्या हुआ ? "आज ग्वाल्हेर का पब्लिक नही है.ऐसाही है.नही तो
सैकडो चाय बिक जाती एक घंटेमे.आज कबसे घूम रहा हूं, अभी तक ६/७ चाय ही बिक गयी"
.बिचारा नर्व्हस झाला होता.तो नक्की ग्वाल्हेरचा असावा.म्हणूनच त्याला खानदानी
पब्लिक कसं असत ते माहिती असणार.(चला आम्ही त्याच्याकडून ४ कप चहा घेऊन आमचं ग्वाल्हेरचे नसूनही खानदानी पण सिद्ध केलं होतं
याचा मनात आनंद झाला) कारण ग्वालिअर हे अखिल भारतातले एक खानदानी शहर. मैलोन
मैलांवरचा बकालपणा इथे पोहोचू शकत नाही, शाही संस्थानिकांची शाही संस्कृती
ग्वाल्हेर रेल्वे स्टेशन पासूनच सुरु होते.चहा विक्रेत्यालाही नुसत्या चहा वरून
माणसं ओळखता येतात.यालाच म्हणतात संस्कृती.चहा हे नुसते पेय नाही, चहा ही संस्कृती
आहे तीही जगभरातली .दैनंदिन व्यवहारात आणि लोकांचे आदरतिथ्य करण्यात चहाला
महत्वाचे स्थान आहे. चहा हे भारतीय लोकांना एकत्र आणण्याच पेय आहे.
याच्या उलट
प्रसंग चहावरून संस्कार ओळखण्याचा.एका लग्नात वराकडची मंडळी उशीरा आल्याने,सीमन्त पूजनाआधी
जेवणे उरकवून घेतली आणि सीमन्तपूजन रात्री साडे बाराला संपले .अर्थातच स्वयंपाक
पाणी हा विषय संपला होता.आता वराकडच्या मंडळीनी आत्ता आम्हाला चहा पाहिजे अशी
मागणी केली.रात्री साडेबाराला चहाची सोय होण कुठल्याच अर्थान शक्य नव्हत.वधू पक्ष
अडचणीत आला.सर्व प्रथम दूध कुठे मिळेल? एक जण म्हणाला,अरे रेल्वे स्टेशन वर जावून
५० कप चहा घेऊन या पटकन ,कल्पना चांगलीच होती.चार दिशांना चौघांना पाठविले, दूध
किंवा चहा जे मिळेल ते आणायला .कार्यालापासून रेल्वे स्टेशन, दूध डेअ-या, असे सर्व
शोधून मंडळी रिकाम्या हाताने परतली होती .थोडयाशा वादावादीनंतर , समजूत घालून
चहाचा विषय मिटवला होता. रात्री एक दीडला कसा मिळणार चहा? दुस-यांच्या लग्न
कार्यात मान घेऊन मिरवणा-यांचा एक वर्ग असतो. तो अशा वेळी पुढे असतो.
अलाहाबाद रेल्वे स्टेशनवरील चहा विक्रेता |
चहामुळे
व्याह्यांचेच नाही तर अंतरराष्ट्रीय संबंध कसे बिघडतात याचा आणखी एक किस्सा , अमेरिकेत
वसाहत केलेल्या लोकांवर इंग्लंडने इतर वस्तुंबरोबर चहावरही कर लावला. त्यामुळे लोक
चिडले.याचा निषेध करण्यासाठी बॉस्टन मधील लोकांनी चहाच्या पेट्या तिथल्या समुद्रात
फेकून दिल्या. ही घटना 'बोस्टन टी पार्टी' नावाने प्रसिध्द आहे. अमेरिकेतील
क्रांती नंतर इंग्लंडची सत्ता संपली आणि अमेरिकेतील लोकांनी चहावर बहिष्कार घातला
आणि कॉफीचा वापर जास्त प्रमाणात सुरु झाला.
असो, पण चहा
हे माणस ओळखण्याचं. नाती जोडण्याचं फक्कड माध्यम नाही का? असा हा चहा जगात प्रसिध्द आहे. असं हे चहा पिणं
एक निमित्त असतं आणि त्यातून आपला स्वार्थ साधायचा असतो. सार्वजनिक ठिकाणी म्हणाल
तर, कुठे मिटिंग पॉईंट वर, कधी ऑफिस मध्ये टी टाईमला, कधीकार्यशाळांमध्ये, लग्न
समारंभात, नाटक सिनेमाच्या मध्यंतरात, हे सर्व चहा असतात संवाद साधण्यासाठीचे. तेव्हढ्या
वेळात ताज्या घडामोडींवर भाष्य करण्याचे. मत व्यक्त करण्यासाठीचे. तर वैयक्तिक
चहाच निमित्त असतं ,डोके दुखी,सर्दी,चहाची लहर आली म्हणून, पावसाळ्यात खूप पाऊस
पडतोय वातावरण आल्हाददायक आहे म्हणून, खूप थंडीत थंडी वाजते म्हणून आणि बरीच काही
कारणे.
काळा चहा
(ब्ल्याक टी ), हिरवा चहा (ग्रीन टी), उलोंग टी (हा फक्त तैवान मध्ये होतो) ब्रिक
टी, लेप्पेट टी (हा फक्त लोणच्यासाठी किंवा भाज्यांसाठी वापरतात),झटपट चहा (इंस्टट
चहा ), सुवासिक चहा. चहाचे एव्हढे प्रकार आणि चहा तयार करण्याच्या पद्धतीही अनेक. जपान आणि चीन मध्ये दूध न वापरता किंवा कमी
दुधाचा चहा पितात.रशियात दुधाऐवजी लिंबाचा रस वापरतात. तिबेट मध्ये चहात लोणी
घालायची पद्धत आहे. अमेरिकेत कोल्ड टी घेण्याची पद्धत आहे.पण.. आपला चहाच सर्वांचा
जास्त आवडता .भारतीय चहा परदेशात सुद्धा एका कंटाळवाण्या क्षणी उत्साह आणू शकतो. इतकी
इंडिअन टी ची क्रेझ आहे.
इंग्लंड मधील पूर्व आणि पश्चिम ससेक्स यांना
जोडणा-या हेरीटेज मार्गावरची ब्ल्यू बेल रेल्वे. हा मार्ग १७.७ किलो मीटर लांबीचा
आहे.या रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला संपूर्ण पारंपारिक दुपारचा चहा मिळतो.यात
प्रामुख्याने असतो,भारतीय चहा,त्या बरोबर सँडविचेस,केक्स,फ्रुट ब्रेड,शॉर्ट केक.ही
लाउंज कार ठराविक दिवशी धावते.म्हणजे स्पेशल valentines,mothers आणि Christmas यावेळी.तुम्ही
हे बुकिंग गिफ्ट करू शकता. ते वर्षभर valid असते.आणि हो आगाऊ बुकिंग २ महिने आधी
कराव लागत.बघितलंत customer service कशी आहे ते?
कार्डिफ ही
युकेमधल्या वेल्स देशाची राजधानी. इथे आहे पहिलं आगळ वेगळ ऑथेंटिक चाय हाउस 'चायहोलीक्स'
.आपल्या देशातल्या मोठ्या शहरातल्या दिल्ली,मुंबई ,अलाहाबाद इथल्या
बाजारातील,रेल्वे स्टेशनवरील, टी स्टोल वर दिसणा-या चायवाल्याचे परदेशात भारी आकर्षण.त्यांची चहा
विकण्याची शैली ,भाषा,हालचाली ,चपळता हे अगदी संस्कार केल्यासारखे आणि असाच
पारंपारिक दृष्टिकोन ठेवून या चायहोलीक्सनं नव्या रुपात नवी टेक्नोलॉजी वापरून हे रेस्टॉरंट
चालू केलंय.इथे तुम्हाला मिळेल लोकल आणि रिजनल कुठलाही चहा.नव्या कल्पना.उत्तम
दर्जा ,उत्तम सेवा यासहीत.
मेन्युत काय
आहे माहित आहे? हाताने बनवलेल्या भारतातील विविध प्रदेशातल्या विविध प्रकारच्या मसाला चहाचे कप .म्हणजे मुंबई
बझार चाय, ट्रक स्टॉप चाय, इंडिअन रेल्वे चाय, क्लासिक मसाला चाय, अरोमॅटिक कार्डमम
चाय,एनार्जीसिंग जिंजर चाय, रीफ्रेशिंग लेमन ग्रास चाय.शिवाय भारतातल्या प्रसिध्द
चहाच्या मळ्यातला एकदम ताजा आणि शुद्ध .नैसर्गिक चहा अर्थात,दार्जीलिंग टी ,निलगिरी
टी ,अप्पर आसाम टी, हिमालयन सिक्कीम टी .चहा एकच पद्धती अनेक .आपलाच चहा वेगळ्या
संस्कृतीत वेगळ्या पद्धतीत सादर केला जातो ,आधुनिक ,आकर्षक, स्वच्छ असा.
चहा हे उत्साह
वर्धक पेय आहे. जगातील जवळ जवळ निम्मे लोक चहा पितात. सुखवस्तू तिबेटी लोक दिवसाला
तीस ते सत्तर कप चहा पितात असे सांगितले जाते . भारतात खाजगी उद्योगात चहा
उद्योगाला प्रथम पसंती आहे तर रेल्वेच्या खालोखाल चहा उद्योगातील कामगारांची
संख्या आहे आणि तागा नंतर सर्वात अधिक परदेशी चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे.
आता मला सुपर
गोल्डी चाय वाल्याचं म्हणणं पटल कि चहा हे संस्कृती दर्शक पेय आहे.कारण , चहा विकणा-याची
संस्कृती वेगळी,चहा पिणा-याची वेगळी.राज्या राज्यांची वेगळी आणि राष्ट्रां
राष्ट्रांची वेगळी .म्हणूनच चहा हे राष्ट्रीय पेय आहे ज्याने भारतीय संस्कृती जगभर
नेली.
- डॉ. नयना कासखेडीकर
Apratim,,, eka chahavalyavarun chahachi sampurna dinya firun alyasarkha watala... khup chan... ani mandani changali ahe.......
ReplyDeleteहो चिन्मय,नुसता रेल्वेतला चहा म्हणून शोधायला गेले तर इतके संदर्भ मिळाले कि ते सर्व वाचकांना माहिती व्हावेत असे वाटले आणि मी आधी ही चहाच्या दुनियेची सफर करून आले.कितीतरी माहिती अजून दिली नाही.थोडक्यातच दिली.याचे वाचक जगभर आहेत.त्यामुळे त्यानाही योग्य माहिती मिळाली पाहिजे हे पाहायला पाहिजे.
ReplyDeleteक्या बात है । खूपच अप्रतिम लेखन ! कधी दुनियेची सफर झाली समजलेच नाही ! अभिनंदन !!
ReplyDeleteलेख वाचताना फर्मास चहाचा सुगंध दरवळतोय असं वाटतंय.
ReplyDeleteमस्त ...
ReplyDelete(गरम चहाचा cold tea देणारा माझा थर्मास आठवला).
(हा हा हा),पुढल्या वेळी नवा थर्मास .
ReplyDeleteधन्यवाद !
ReplyDeleteआतल्या चहा प्यावासा वाटतोय पण आयता!
ReplyDeleteचहाची चव प्रत्येक एरीयानुसार बदलते.कारण पाणी आणि दुध . तरीपण प्रत्येकाच्या हाती एक वैशिष्ट्य असणारी कलाच त्याचा स्वाद ठरवत असते.
ReplyDeleteहो ना ,साधं हवामान बदललं तरी चहा वेगळा लागतो. केरळ मधला KDHP चा तिथे प्यायलेला चहा आणून इथे पुण्यात प्यायला तर अजिबात चांगला नाही लागला.अमेरिकेत नायगरा ला बडिशोप घातलेला चहा प्यायलो ,त्या वातावरणात तो छानच लागला पण इथे नाही .
Deleteचाय की न्यारी दुनिया.
ReplyDeleteहोय
DeleteMast chaha. Sandhyatai, chan lihilay.
ReplyDeleteमी आणि योगेश गेलो बडोद्याला, तेंव्हाचा अनुभव ट्रेन मधला
Deleteतरतरीत आणि फक्कड चहालेख.☕..खूप छान लिहिलं नयनाताई👍
ReplyDeletethanks विशाखा
Deleteचहा पुराण मस्तच... छान माहिती पण मिळाली..
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअबाबा...
ReplyDeleteचहावर PHD करणे मनात आहे की काय?
चहाची इतकी भावंडे माहीत नव्हती.खूप छान !
हा हा हा ,करता येईल ,धन्यवाद !
Delete