Tuesday, 1 April 2014

एप्रिल फूल- मूर्खांचा दिवस



 मूर्खांचा दिवस
               
     सावधान ,आज एक एप्रिल.आज तुम्हाला कोणीही मूर्ख बनवू शकतं कारण, आज मूर्खांचा दिवस आहे. हा दिवस जगभरात अनेक शतकांपासून मुर्खांचा दिवस म्हणून साजरा केला जातो.जयंती,पुण्यतिथी किंवा कुठलाही विशेष दिन साजरा करणे म्हणजे गतकाळातील आठवणीना उजाळा देणे आणि परंपरा टिकविणे होय. असे दिवस पाळण्यासाठी विषय महत्वाचा हवा. ८ मार्च जागतिक महिला दिन. १४ नोहेंबर बालदिन, रंगभूमी दिन, ग्राहक दिन, अपंग दिन, आरोग्य दिन आणि आताचा व्हेलेंटाइन दिन, असे अनेक विशेष दिन. एकूणच काय कुठलाही दिन साजरा करण्यामागे काहीतरी कारण असतेच, कधी गंभीर, कधी आनंदी .पण ह्या दिवशी काहीजण मात्र स्वत:मूर्ख बनून किंवा दुस-याला मूर्ख बनवून सुख आणि आनंद मिळवतात आणि दिवस मजेत घालवतात .

एक एप्रिल हा मूर्खांचा दिवस साजरा करण्यामागे मजेशीर इतिहास आहे. हा दिवस पाळण्याची परंपरा १५६४ पासून फ्रान्स मध्ये सुरु झाली. म्हणजे १५६४ च्या पूर्वी संपूर्ण युरोपात एकच दिनदर्शिका वापरात होती.त्यात प्रत्येक नवीन वर्षाचा प्रारंभ एक एप्रिल पासूनच होत होता, म्हणून साहजिकच एक एप्रिल हा नववर्ष दिन म्हणून पाळला जाई. या दिवशी आपल्या मित्र मैत्रीणीना, आप्तेष्टांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन,भेटवस्तू देऊन लोक आनंद व्यक्त करीत असत.वर्षानुवर्षे हे चालू होते, अचानक फ्रान्सचा राजा, दहावा चार्ल्स याने १५६४ मध्ये आज्ञा केली कि लोकांनी नव्या दिनदर्शिके प्रमाणे एक जानेवारी हा वर्षारंभ मानवा. सर्वांनी त्याप्रमाणे सूचनेचे पालन केले.पण काही लोकांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही अथवा दुर्लक्ष केले आणि आपल्याच नादात असणा-या या लोकांनी एक एप्रिल हाच दिवस नववर्ष दिन म्हणून पाळणे चालू ठेवले. त्यांच्या अशा वागण्यामुळे हे लोक त्यांच्या मित्र परिवारात आणि समाजात चेष्टेचा विषय ठरले. मग काय जानेवारी हा नववर्ष दिन पाळणा-या लोकांनी एप्रिल वर्षारंभ मानणा-या लोकांना मूर्ख ठरवून एक एप्रिलला चेष्टा करण्यासाठी गमतीशीर भेटवस्तू देण सुरु केलं. ही घटना लोक विसरले परंतु मुर्खांचा दिवस साजरा करण्याची प्रथा अजूनही चालू आहे.विशेष म्हणजे ही परंपरा आज सर्व जगभर पाळतात, अगदी अनिवार्य असल्यासारखी.

अजून एक कथा प्रचलित आहे. ती अशी,बनारसला एकदा हास्य प्रेमी भारतेंदु हरिश्चंद्र यांनी दवंडी पिटवली कि, अमुक वैज्ञानिक अमुक वाजता चंद्र आणि सूर्य धरतीवर आणून दाखवणार आहेत.दवंडी नुसार हा चमत्कार पाहायला लोकांनी एकच गर्दी केली. लोक तासन तास वाट पाहत बसले, पण कोणी वैज्ञानिक तिथे आला नाही. मूर्ख ठरलेले लोक घरी परत आले तो एक एप्रीलचा दिवस होता.

एप्रिल फूल रोममध्ये ७ दिवस साजरा करतात.चीन मध्ये खोट्या भेटवस्तू पाठवल्या जातात. जपान मध्ये पतंगावर बक्षिसाची घोषणा लिहून मुले पतंग उडवतात.पतंग पकडून बक्षीस मागणा-याला एप्रिल फूल बनविले जाते.इंग्लंड मध्ये तर या वर मूर्खांच्या गाण्याचा विशेष कार्यक्रमच असतो. स्कॉटलंड मधला मूर्खांचा दिवस 'हंटिंग द कूल' म्हणून प्रसिध्द आहे. कोंबडा चोरणे इथली परंपरा आहे.कोंबड्याच्या मालकाला याचा राग येत नाही कारण त्यामगे मजा हाच उद्देश असतो.

समाजाच्या विरुद्ध प्रवाहात वागणारे लोक मूर्ख ठरविले जातात.अशा काही घटनां पासून मूर्ख दिवस पाळणे सुरु झाले.बनावट मेजवानीचे आमंत्रण आणि गमती जमती घडवून आणण असा प्रकार आजही सुरु आहे. या दिवशी हास्य विनोदाचे काही नियम नसतात.कायदा नसतो.
ब्रिटन ,ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिके मध्ये एप्रिल फूल ची मजा दुपारपर्यंत चालते.तर फ्रान्स,आयर्लंड,इटली,दक्षिण कोरिया,जपान,रुस,नेदरलँड,जर्मनी,ब्राझील,कँनडा व अमेरिका इथे दिवसभर जोक्स आणि मजेचा सिलसिला चालू असतो.

युरोप मध्ये अनेक वेळा ही मूर्ख दिवस पाळण्याची परंपरा थांबण्याचा खूप प्रयत्न केला गेला,पण तरीही लोकांनी दाद दिली नाही उलट काहींच्या मते तर मूर्खता हा मनुष्याचा जन्मजात स्वभाव आहे.वर्षातून एकदा स्वच्छंद होऊन,हास्य विनोद करून एक दिवस घालवला तर पुन्हा नव्या मूड मध्ये, नव्या उर्जेने कामाला लागता येते.कुठलेही दुख कमी करण्यसाठी हसणे हा त्यावर अक्सीर इलाज आहे,


आपल्याकडे महाराष्ट्रात होळी निमित्त काही ठिकाणी 'महामूर्ख हास्य कवी संमेलन' आयोजित करायची पद्धत आहे. उद्देश केवळ मजा हाच असतो. हल्लीच्या ताणतणाव युक्त जीवनात मनामध्ये हास्याचे कारंजे फुलावे आणि थोडा वेळ का होईना मन आनंदी व्हावे .१९६४ मध्ये सुबोध मुखर्जी लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित भारतीय रोमॅन्टीक कॉमेडी 'एप्रिल फूल' निघाला होता.अशा कल्पना कथा कादंबर्‍या बरोबरच चित्रपट, मालिकांमध्ये सुद्धा दिसतात.

असही आज आपण रोजचा दिवस चिंतेत किंवा तणावाखाली घालवतो अथवा जातो तेव्हा वर्षातला एक दिवस खरच हसून आणि हसवून एक आठवणीतला उत्तम दिवस म्हणून घालवायला काय हरकत आहे? नाहीतरी आपला हा वर्षारंभ नाहीच .त्यामुळे आज हसा आणि हसवा ,पण जरा जपून,कोणी दुखावणार नाही याची काळजी घेवून. विनोद करताना आरोग्य ,करियर,चालणे- बोलणे किंवा व्यक्तिमत्त्व ,अश्लीलता आणि धर्म, संप्रदाय व जातीवरून कुठलाही विनोद करू नका.
आणि हे पण लक्षात घ्या काही महत्वाच्या ठळक गोष्टी १ एप्रिलला सुरू झाल्या आहेत. १ एप्रिल हा दिवस आपल्या ओरिसा राज्यात उत्कल दिवस म्हणून पाळला जातो.कारण १९३६ मध्ये ओरिसाला स्वतंत्र राज्याची ओळख याच दिवशी मिळाली.त्यामुळे हा दिवस ओरिसा चे लोक आपल्या गुढीपाडव्यासारखा आनंदाने साजरा करतात.

आणखी भारतीय रिजर्व बँकेची स्थापना,आपल्या पुण्याचे सिमला ऑफिस म्हणजेच पुणे वेधशाळेची स्थापना पण याच दिवशी १९२८ ला सुरू झाली. भारताचे पहिले अणूउर्जा केंद्र तारापूर येथे याच दिवशी १९६९ मध्ये सुरू झाले.

आणि तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे गीतरामायणाचे पहिले गीत पुणे आकाशवाणी केंद्रावरून याच दिवशी (रामनवमीला)१९५५ ला प्रसारित झाले.

एकविसाव्या शतकात २००४ मध्ये - गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.ज्या जीमेल चा वापर आपण प्रत्येक वेळी करत असतो.

हे गीत तुमच्यासाठी

            https://www.youtube.com/watch?v=ud7Sk3YwyyQ  




ले- डॉ. नयना कासखेडीकर
------------------------------

16 comments:

  1. सुंदर, १ एप्रिलचा इतिहास कळला ……

    ReplyDelete
  2. masta lihilaes kaku! ani april fool sathi vaparlela colourful caricature best ahe! :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद,दर आठवड्याला एक लेख असेल.स्नेहाला सांग.

      Delete
  3. खूपच छान. धन्यवाद !

    ReplyDelete
  4. अप्रतिम लिहिलं आहेस.
    ही प्रथा इतकी जुनी आहे हे या लेखामुळे कळालं.
    एक गोष्ट आणखी -अशा दिवशी सुध्दा, कुणाच्या व्यंगावरही विनोद करू नये.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !आता तर हे तारतम्य नसतेच, मुळात एखाद्या व्यक्तीचे शारीरिक किंवा मानसिक व्यंग ही आधीच सल असते त्या व्यक्तीच्या मनात त्यात आणखी अशी व्यंगात्मक भाषा आणि टिंगल केल्याने ती व्यक्ति कायमचीच दुखाची शिकार होऊ शकते याचा विचार ही त्यांच्या मनाला शिवत नाही.

      Delete
  5. चांगला, माहितीपूर्ण लेख

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती. Enjoy but dont hurt anyone
    This msg is Important. Happiness may be
    PURE....! व.पु. काळे म्हणतात, ज्याला कशाचेच
    वेड नसते, तो शहाणा नव्हेच...तर एक English Poet लिहिचात,
    As a rule, man is fool
    When it is hot,he wants cool
    When it is cool, he wants hot
    Always desires, What he has not.

    ReplyDelete
  7. एप्रिलफूलच्या मागचा इतिहास कळला। खूप छान माहिती

    ReplyDelete
  8. खूप छान! 1 एप्रिल चा ईतिहास कळला.

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती

    ReplyDelete