Saturday 5 April 2014

"करूया जागर गीत रामायणाचा..."




"करूया जागर गीत रामायणाचा..." 


         महाकवी गदिमा आणि स्वरतीर्थ बाबूजी यांनी अजरामर केलेल्या गीतरामायणाला पन्नास वर्षे पूर्ण झाली, तेंव्हा पुण्यामध्ये सगळं राममय वातावरण होतं, भारलेलं. संगीत, नृत्य, नाट्य ,रामायणातील प्रसंग असे भरगच्च कार्यक्रम शहरात चालू होते. त्यानिमित्ताने मी, गदिमापुत्र श्री.आनंद माडगुळकर यांना भेटले होते, गीत रामायणाच्या लोकप्रियते बद्दल त्यांच्या चेह-यावर समाधान दिसत होते. ते म्हणाले, 'आकाशवाणी पुणे केंद्रावरून चांगला लोकप्रिय होईल असा कार्यक्रम द्यावा' अशी सरळ साधी इच्छा सीताकांत लाड यांनी गदिमांना बोलून दाखविली होती.गदिमांनी ती उचलून धरली. त्यांनी गीतरामायण लिहायचं आणि सुधीर फडके यांच्या आवाजात ते रेकॉर्ड करायचं असं ठरलं.५२ आठवडे चाललेल्या या गीत रामायणाने आकाशवाणीचे श्रोतेच काय  अवघा महाराष्ट्र भारला गेला होता आणि आताही तेव्हढाच भारलेला आहे. तेव्हाच्या लोकप्रियतेचा अर्थ आजही टिकून आहे.



        गदिमांच्या प्रतिभेतून आणि अन्त:प्रज्ञेतून उतरेलेलं हे गीतरामायण ,  त्यातील श्री प्रभू रामचंद्रांचं वर्णन, घटना, विविध प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. यामागे त्यांचा बारीक अभ्यास आहे, स्वाध्याय आहे. हे सांगताना आनंदजींनी एक जुनी आठवण सांगितली. "एकदा ग.दि. माडगुळकर त्यांच्या वडिलांच्या श्राध्दानिमित्त गावी गेले होते. नवीन मळा नुकताच घेतला होता. तोही बघायचा होता. हा मळा बघायला गदिमा गेले असताना न्याहारी करून ते विश्रांतीसाठी म्हणून झोपले होते, त्यावेळी त्यांना भारलेल्या वातावरणात एक तेजस्वी दिवा दिसला. त्याची सहत्रावधी प्रकाशमान किरणे त्यांच्या दिशेने येत होती. हा परिणाम काही सेकंद टिकला. गदिमा म्हणाले, या अनुभूतीनं तेव्हाच मला वाटलं कि आपल्या हातून चांगलं काहीतरी लिखाण होणार असल्याचा हा संकेत आहे. असे अजून काही अनुभव त्यांना आले होते.महांकालेश्वराच्या दर्शनाला गेले होते तिथेही त्यांनी कौल मिळाल्याचे सांगितले. औंध संस्थानात शिक्षण घेण्यासाठी ते रहात असताना तिथल्या वास्तव्यात, पंतप्रतिनिधींनी लावलेली रामावरची चित्रे, त्यातले बारकावे,प्रसंग त्यांनी अधिक बारकाईने पाहिली होती, अभ्यासली होती. एव्हढंच काय त्यांच्या संग्रहातील पुस्तके पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाला देताना वीस प्रकारची रामायणावरील पुस्तके मी पाहिली होती.त्यांच्याजवळ २० प्रकारची रामायणावरची  पुस्तके होती ती त्यांनी अभ्यासली असणारच.
                 
    मोरोपंतांचे रामायण, तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण, यांच्या अभ्यासामुळे या विषयाची पार्श्वभूमी गदिमांच्या मनात तयार होतीच. गदिमांचे मामाही रामदासी होते. ते जेंव्हा पूजा करत तेंव्हा गदिमा तासनतास ही पूजा तल्लीन होऊन बघत, अनुभवत.
                 
      गीतरामायणाचा जन्म झाला तेव्हा आनंद सहा वर्षाचे होते.यातील गाण्यांचा बाबुजींचा  सात्विक पवित्र सूर एव्हढ्या लहान वयातही त्यांना जाणवत होता. गदिमा चित्रपट क्षेत्रात तर लोकप्रिय होतेच. पण ते जास्त लोकप्रिय झाले आणि लोकांचे श्रद्धास्थान बनले ते गीतरामायाणामुळेच. १९७७ ला गदिमा गेले.१९७८ ला गदिमा प्रतिष्ठानची स्थापना झाली.या प्रतिष्ठान तर्फे गदिमांचा पहिला स्मृती सप्ताह साजरा केला गेला. यावेळची बाबूजींची (सुधीर फडके ) आठवण त्यांनी सांगितली.'या स्मृती समारंभात गीत रामायणाचा कार्यक्रम करायचे ठरले.बाबुजींनाही बोलावले होते.पण त्यांना बरे नव्हते.अंगात ताप होता.येण्यासारखी परिस्थिती नव्हती.परंतु तशाही परिस्थितीत या कार्यक्रमासाठी ते विमानाने आले. खर्चाचा एकही पैसा घ्यायचा त्यांनी नाकारले".
                   
      "गायक म्हणून बाबुजींनी परकाया प्रवेशाची किमया साधली होती. गीतरामायणातल्या प्रत्येक गाण्यातील 'व्यक्तिरेखा' स्वताला समजून ते गाणं सादर करायचे.ते गाणं गायला, राम म्हणून बसायचे. सीता म्हणून बसायचे, हे त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून कळायचे. सीतेच्या डोहाळ्याचे गाणे बाबूजी ज्या त-हेने पेश करायचे तसे अजून पर्यंत एकाही स्त्री गायिकेला जमलेलं नाही.इतकी ताकद बाबुजींमध्ये होती. गीतातल्या भावनांचा, शब्दांचा बाबूजींचा विलक्षण अभ्यास असायचा. या ताकदीमुळेच रामायणातली गीते मनावर कोरली गेली आहेत. पाच हजार वर्षापूर्वीची रामायण कथा इतकी प्रभावी आहे. त्याचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही, पुढेही होणार नाही याची खात्री आहे".
                    
       नव्या पिढीच्या तरुणांनीही हा गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा कार्यक्रम अनुभवला. त्यांचीही पावती मिळाली. गीतरामायण टिकून राहण्यासाठी सतत जागरण करत रहाणं आवश्यक आहे असं आनंद माडगुळकर म्हणतात. खरंच गदिमा आणि सुधीर फडके यांनी जीव ओतून निर्माण केलेलं हे गीत रामायण अजरामर झालं आहेच. पण इथून पुढच्या पिढीला हा सुरेल इतिहास संक्रमित करण्याची जबाबदारी सर्व रसिकांची, कलाकारांची, विविध माध्यमांची आणि कलाक्षेत्रातील संस्थांची देखील आहे. हा जागर तुम्ही आम्ही केला पाहिजे.

ले. डॉ. नयना कासखेडीकर .       
                                                  ---------------------------- 

No comments:

Post a Comment