Tuesday, 8 April 2014

"गीत रामायण आणि सुधीर फडके "



"गीत रामायण आणि सुधीर फडके "


     श्री प्रभू रामचंद्रांचे चरित्र म्हणजे हिंदू संस्कृतीचा गौरवशाली इतिहास. सर्वश्रेष्ठ आदिकवी महर्षी वाल्मिकींनी चोवीस हजार श्लोकांचे रामायण लिहिले. भारतीयांच्या मनावर या रामायणाने हजारो वर्षे राज्य केलं आहे. संस्कृत मध्ये ९४ रामायणे आहेत. मराठी, हिंदी, तामिळ, कानडी, तेलुगु, गुजराती, डोगरी, बंगाली, ओडिसी, असामी, फारसी, प्राकृत, अशा प्रादेशिक भाषेतून सुद्धा रामायण सर्व भाषिकांपर्यंत पोहोचले आहे. कवी मोरोपंतानी तर १०८ रामायणे रचली. संत एकनाथ, श्री समर्थरामदास, अशा संत आणि अनेक साहित्यिकांनी रामायणाच्या माध्यमातून जनतेच्या मनाची जडण घडण केली आहे. जगाच्या इतर भाषांत सुद्धा इंग्लिश, जर्मन, इटालियन भाषेत रामायण आहे. इतके सगळे रामायणाचे अवतार. पण, गदिमांची रससिद्ध प्रज्ञा आणि बाबूजींची सांगीतिक प्रतिभा यांचा अजोड अविष्कार म्हणजे 'मराठी गीतरामायण'.
     
     महर्षी वाल्मिकींच्या रामायण या महाकाव्याला सरस्वतीपुत्र ग.दि.माडगुळकर यांनी केवळ छपन्न गीतात समूर्त साकार केलं. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला हा एक मराठी विश्वातला चमत्कारच होता. पिढ्यान पिढ्या स्मरणात राहील अशी कलाकृती म्हणजे हे ' गीत रामायण 'या गीत रामायणाने मराठी ला अजरामर केलंय ,याचा आम्हा मराठीना अभिमान आहे.

    
      या गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लावणार? एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसांनी ओतप्रेत भरलेली, मधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. शिवाय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे ही रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करतात. कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. सिद्धहस्त गदिमांच्या कवितेतील शब्दांचा भाव, कवीची भूमिका अत्यंत तन्मयतेने गाण्यातून सादर केली आहे. तरीही गदिमा आणि बाबूजी दोघेही याचे श्रेय घेत नाहीत.ते श्रद्धेने म्हणतात की,"गीतरामायण आम्ही केलेले नाही ते आमच्या हातून झाले आहे. नाहीतर संगीत क्षेत्रात आज असंख्य मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. पण जोपर्यंत त्याची माध्यमातून प्रसिद्धी होत आहे तोपर्यंतच ते लक्षात राहतात. गीत रामायणाचे हेच वैशिष्ठ आहे, म्हणूनंच ते निर्मिती नंतर ६० वर्षांनी सुद्धा कोटी कोटी लोकांच्या मनात घर करून आहे, गदिमा याबद्दल त्यांच्या कवितेत म्हणतात,

‘अजाणतेपणी केव्हा, माता घाली बाळगुटी,
बीज धर्माच्या द्रुमाचे, कणकण गेले पोटी !
छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली,
कोणा एका भाग्यवेळी, पूजा रामाची मांडिली !  

     गदिमांनी एका शुभ क्षणी रामाची पूजा मांडली आणि प्रासादिक रचना असलेल्या गीत रामायणाचा जन्म झाला. पण रामकथेचे बीज त्यांच्या मनावर लहानपणीच रुजले होते. तर बाबूजी थोर गायक व संगीतकार याबरोबरच कट्टर हिंदुत्ववादी आणि निष्ठावान देशभक्त होते. निश्चयी स्वभावचे, कडक शिस्तीचे, कष्टाळू, कलेची गुणग्राहकता असलेले, व्यावसाईक निष्ठा असणारे आणि स्वताच्या व्यक्तिमत्वात राम असलेले होते. गीत रामायण म्हटले की गदिमा आणि बाबूजी दोघेही आलेच. गदिमाबद्दल लिहायचे तर बाबूजी अनिवार्य आणि बाबुजीबद्दल लिहायचे तर गदिमा अनिवार्य आहेत. इतके ते कवी, संगीतकार आणि गायक म्हणून एकरूप झालेले.

     बाबूजींचा कोल्हापूरमधील बालमित्र माधव पातकर यांनी एच.म.व्ही. कंपनीसाठी गीते लिहिणाऱ्या ग.दि.माडगुळकर यांची साधारण १९३८|३९ च्या सुमारास कोल्हापूरला,’ हा माझा मित्र राम फडके, गातो आणि गाण्यांना चाली लावतो’ अशी बाबुजीशी ओळख करून दिली ती मैत्री शेवटपर्यंत होती. गदिमांच्या ‘दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरीभिरी’ या गीताला बाबुजींनी चाल लाऊन दिली, सर्वाना ती खूप आवडली. या गाण्याचे रेकॉर्डिंग व्हायच्या आधी कोल्हापूरला साहित्य संमेलन भरले होते, अध्यक्ष होते प्र.के.अत्रे. संमेलनातल्या कार्यक्रमात हे गाणं बाबुजींनी म्हणावं असा सगळ्यांनी आग्रह केला आणि काय आश्चर्य, 'वन्स मोअर' मिळाला. रसिकांनी प्रचंड दाद दिली होती. तेव्हा पासून गदिमा आणि सुधीर फडके ही दोन नावं कवी आणि गायक, संगीतकार म्हणून सा-या कोल्हापूरला माहिती झाली, पण लोकांच्या मनात आणि घराच्या देव्हा-यात जाऊन बसली ते गीत रामायणामुळे .                                         

          १९५४ साली गदिमांनी गीतरामायण लिहीले ते पुणे आकाशवाणी केंद्रासाठी. गीतरामायण प्रकल्पाचे प्रमुख होते सीताकांत लाड. सीताकांत लाड गदिमा आणि बाबूजींचे जिवलग मित्र. गदिमा पुण्यात तर बाबुजी मुंबईत. एव्हाना दोघेही त्यांच्या चित्रपट व संगीत क्षेत्रात अत्यंत व्यस्त होते, तरीही हे काम त्यांनी अत्यंत श्रद्धेने, आनंदाने आणि श्रीरामाच्या प्रेमापोटी भारावून जाऊन केले. अडचणी तर सुरुवातीपासून होत्याच.

     गीत रामायणातल्या पहिल्याच गीताचा प्रसंग, ललिताताई फडके आणि आनंद माडगुळकर यांनी त्यांच्या आठवणीत सांगितला आहे. गदिमांनी रामायणाचे पाहिलेच गीत लिहिले आणि ते त्यांचे मित्र नेमीनाथ यांच्या बरोबर बाबुजींकडे पाठवून दिले. आकाशवाणीत ऐन ध्वनिमुद्रणाच्या वेळी बाबूजींना ते मिळेना, धावपळ आणि शोधाशोध झाली, इकडे गदिमा गीत पाठवून दिल्यावर आपले काम झाले म्हणून निवांत झोपले होते. सीताकांत लाड यांनी गदिमांना निरोप पाठून बोलावून घेतले. ते आल्यानंतर गीत हरवल्याचे कळताच भडकले. वातावरण निवल्यानंतर सिताकांतानी गदिमांना सांगितले उद्या प्रसारण आहे, तेव्हा गीत तर तुम्हाला लिहावेच लागेल आणि त्यांनी गदिमांना गीत लिहिण्यासाठी एका खोलीत बसवून बाहेरून कडी घातली. तर १० ते १५ मिनिटातच गदिमांनी दार वाजविले. पहातात तर काय, नवं गीत लिहून सिताकांतांच्या हातात ठेवलं.हे नवं गीत पहिल्या हरवलेल्या गीतासारखच होतं. फक्त ‘ज्योतीने तेजाची आरती !’ या शब्दांची भर त्यात पडली होती. हे होतं गीतरामायणातलं पहिलं गीत                                            ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती’ !


     अशा प्रकारे गीतरामायणाचे दर आठवड्याला एक अशी ५६ गाणी पुणे आकाशवाणी केंद्रावरून वर्षभर प्रसारित झाली. अगदी ताजी ताजी ! रेकोर्डिंग रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत चालायचे. बाबूजी त्यासाठी दर आठवड्याला पुण्याला येत. गम्मत म्हणजे मुंबईच्या लोकांना गीतरामायण काय प्रकार आहे याची जराही कल्पना नव्हती. कारण पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम मुंबईला ऐकू येत नसत.त्याची क्षमता कमी होती. ट्रांझिस्टर तर नव्हताच, रेडीओ ठराविक लोकांकडेच. त्यामुळे एकत्र रस्त्यावर जमून गीत रामायण ऐकले जायचे. ते सुरु होण्यापूर्वी लोक रेडिओला हार घालायचे, उदबत्ती ओवाळायचे, नमस्कार करायचे आणि भक्ती भावाने गीत रामायण ऐकायचे. ते संपल्यावर प्रसादही वाटायचे.इतकी प्रभू रामचंद्रांवर श्रद्धा. त्यानंतर मुंबई, नागपूर, इंदोर, भोपाळ, हैद्राबाद, दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून अनेक वेळा गीतरामायणाचं प्रसारण झालं. अजूनही होतंय. चैत्रात गुढीपाडवा ते रामनवमी या काळात तर गीतरामायण हमखास लागलेच पाहिजे. एव्हढंच काय गीतरामायणाच्या सर्व प्रथम प्रकाशित झालेल्या कॅसेट्स विकत घेवून घराघरातून त्याचा आस्वाद घेतला जाई.आज रामनवमी ,सकाळपासूनच ही गीते रेडीओ, दूरदर्शनच्या विविध चॅनेल वरून प्रक्षेपित होतील.

     सुधीर फडके यांच्या सुस्वर कंठातून बाहेर पडलेले रामायण संपूर्ण महाराष्ट्राने सर्वेन्द्रियांचे कान करून ऐकले, अजूनही ऐकताहेत. यातील गीतांचे करूण रस, रौद्र रस, वीर रस, भयानक, अद्भुत अशा सगळ्या भावनांचे झपाटल्यासारखे सादरीकरण होत असे. आजही ही गाणी ऐकताना श्रोतागणही झपाटून जातो. बाबूजी या गीतातून आपल्यासमोर शोकविव्हल दशरथ, शंकाकुल सीता, चिडलेला लक्ष्मण, संतापी भरत ,प्रत्यक्ष उभे करतात.या गीत रामायणाचे बाबुजींनी १८०० प्रयोग केले.याची आठ भारतीय भाषेत भाषांतर झाली. पण विशेष म्हणजे हे भाषांतर जसेच्या तसे झाले आहे आणि ही गीतं बाबूजींच्या मूळ चालीवरच गायली जातात.

     बालगंधर्व आणि हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे गायनातले आदर्श होते. त्यांनी भावगीतं, भक्तीगीतं, लोकगीतं, लावणी, भारुड, चित्रपटसंगीत असे विविध प्रकार हाताळले. त्यांनी हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, पं.भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा, मोहम्मद रफी, मन्ना डे  अशा दिग्गज गायकांच्या स्वरांना साज चढविला आहे. हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट, प्रपंच, जगाच्या पाठीवर, मुंबईचा जावई, चंद्र होता साक्षीला, झाला महार पंढरीनाथ, वंदे मातरम असे मिळून ११० चित्रपटाना त्यांनी संगीत दिलंय. त्याला लोकांनी प्रचंड दाद दिली आहे.’ज्योती कलश छलके’ आणि ‘खुश है जमाना आज पहली तारीख है’, या संगीत दिलेल्या आणि’ दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे’ अशी अनेक भावगीतं बाबूजींच्या सुमधुर आवाजा मुळे अजरामर झाली आहेत. पण एकूण त्यांच्या कारकीर्दीचा मुकुटमणी म्हणजे आनंद सोहळा असलेले गीतरामायणच.

     पुण्याच्या नगर वाचन मंदिरात एकदा मृत्युंजयदिना निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हृद्य सत्कार समारंभात बाबुजींनी ‘सागरा प्राण तळमळला ‘हे गीत म्हटलं. कार्यक्रमानंतर सावरकर बाबूजींना म्हणाले, तू माझं हे गाणं दोन वेळा म्हटलंस, पण मला तुझं गीत रामायण ऐकायचं. मग लगेच रात्रीच्या सत्कार कार्यक्रमात बाबूजी गायले. ‘दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा , पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’ हे बाबुजींच्या आवाजातलं यमन कल्याण रागातलं गीत ऐकून सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर ते गहिवरून बाबूजींना म्हणाले, "कुणाचं अधिक कौतुक करू? तुझं कि माडगूळकराचं"?  

     वैयक्तिक आयुष्यात बाबूजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची मूल्ये जपली. स्वातंत्र्यवीर 
सावरकर बाबूजींचे प्रेरणास्थान होते. वीर सावरकर हा सावरकरांच्या जीवनावरील चित्रपट बाबुजींनी अत्यंत निष्ठेने आणि कष्टाने बनवला. या चित्रपटाचा प्रवासही अत्यंत खडतर होता. सोपी गोष्ट नव्हती .पण बाबुजींनी 'हा चित्रपट पूर्ण करेन मगच मरेन', ही त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करून दाखवली. कलेबरोबरच त्यांच्यातील देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांवरून दिसते. ते गोवा मुक्ती आंदोलनातले सशस्त्र क्रांतिकारक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. अमेरिकेत 'इंडिया हेरीटेज फौंडेशन' स्थापन झाले ते बाबूजींच्या प्रेरणेमुळेच.

     संगीत क्षेत्रात कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांची झालेली मानहानी, सोसलेले अपार कष्ट, हाल, वाईट अनुभव घेवून सुद्धा नंतरच्या काळात मिळालेली अफाट लोकप्रियता, श्रोत्यांच्या हृदयात मिळवलेलं अढळ स्थान यामुळे त्यांचं जीवन कृतार्थ झालं असं वाटतं.असा हा जगाच्या पाठीवरचा रामभक्त .


ले. डॉ. नयना कासखेडीकर
                                                      ------------------------------------

3 comments:

  1. Apratim......Geet Ramayanatil Anek barik ani padadyamagil goshi lokanparyanta ya lekhamarfat chan pohochlya ahet.. khup sundar

    ReplyDelete
  2. Wow, फारच सुरेख लिहिलं आहेस. अभिनंदन.
    पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. मला आठवतंय, मी त्या वेळेस ५ वी किंवा ६ वीत असेल, वडिलांनी रेकॉर्ड प्लेयर घेतला आणि सगळ्यात पहिले गीत रामायणाच्या LP (Long Playing रेकॉर्ड्स) आणल्या होत्या. ११ LP होत्या एकूण. आम्ही रोज ऐकायचो.
    असो, असंच लिहित रहा, शुभेच्छा आहेतच.

    ReplyDelete
  3. Excellent
    जोवरी जग हे जोवरी भाषण
    तोवरी नूतन नीत रामायण

    ReplyDelete