Monday, 31 March 2014

आपली कालगणना


आपली कालगणना
                
                   आपल्या हिंदू संस्कृतीत काळ हा अनाद्यनंत मानलं गेला आहे. या कालाचे मोजमाप करणे अशक्य आहे. इतक्या प्राचीन काळापासून हे जग अस्तित्वात आहे.वेदकाली ऋषीजनांनी सूर्य चंद्रादिकांची प्रार्थना करून त्यांच्या प्रीत्यर्थ जे यज्ञयाग होत असत, त्याच्या अनुभवाने मास, ऋतू, नक्षत्र,या संबंधी त्यांनी काही सिद्धांत मांडले.वेदकाली ज्योतिष शास्त्रज्ञांनी कालमापनाचे माप ठरवून वर्ष, ऋतू, मास, वार असे भाग पडले.
                  
                   सौर वर्ष, चांद्र वर्ष यांचे दिवस नक्की करण्यात आले.पृथ्वीच्या भोवती चंद्राच्या १२ प्रदक्षिणा संपल्या कि एक वर्ष पूर्ण होते.ते ३५४ दिवस, ८ तास,४८ मिनिटे, ३३.५५ सेकंद इतक्या वेळेचे असते.यावरून पुढे प्रत्येक दोन महिन्याचा एक ऋतू याप्रमाणे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू आपण मानतो.त्याच प्रमाणे चंद्राच्या मार्गातील २७ नक्षत्रांना वेगवेगळी नावे देण्यात आली.नक्षत्राच्या मार्गक्रमणा नुसार चंद्राची गती ठरविली जाते.हे ठरवण्याआधी बारा महिन्यांची नावे याप्रमाणे होती.मधु, माधव, शुक्र, शुची, नभस, नभस्य, इष,ऊर्ज, सहस ,सहस्य, तपस,तपस्य. आता मराठी महिन्यांची नांवे ,चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण,भाद्रपद,अश्विन, कार्तिक,मार्गशीर्ष,पौष,माघ,फाल्गुन अशी आहेत.
                     
                  प्रतिपदेपासून पौर्णिमे पर्यंतचा दोन आठवड्यांचा काळ म्हणजे शुक्ल पक्ष .तर त्यानंतर प्रतिपदेपासून अमावास्ये पर्यंतचा दोन आठवड्यांचा काळ म्हणजे कृष्ण पक्ष होय.सुर्योदया पासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयाचा काल म्हणजे वार होय.
                       
                     प्राचीन काळी वेधशाळा होत्या. जयपूर, मथुरा, काशी, उज्जैन, तक्षशीला या ठिकाणी आर्यज्योतिषी खगोल शास्त्राचा अभ्यास करीत. पुढील काळात विविध धर्माच्या प्रवर्तकावरून चिली, पारशी, ख्रिस्ती यांनी आपापले कालमापन ठरविले. त्यानंतर परकीय स्वा-यांविरुध्द जिंकणा-या कर्तापुरुष असल्यावरून काल मोजण्याचा प्रघात पडला, असे इतिहासावरून दिसते. यात वेगवेगळे शक मानण्याची पद्धत रूढ झालेली दिसते. उदा.कलियुगकाल, सप्तर्षिकाल, विक्रम संवत, शालिवाहन शक , शिवराज्याभिषेक शक किंवा शिवशक, बंगाली सन अमली सन, फसली सन, सुरसन, मगीसन,कोल्लम,(परशुराम शक) राजशक, विलायतीसन,ख्रिस्तीसन, इ. यापैकी रूढ असलेले शक असे ,

विक्रम काल : उत्तर हिंदुस्थानात विक्रम संवत पाळतात.उज्जैन राजा विक्रमादित्याने परकीय स्वारी पर्ताव्ल्याने त्यांच्या नावाने हा काळ गणला जावू लागला.
शालिवाहन शक: हे शक दक्षिण हिंन्दुस्थानात मानले जाते.शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या पुत्राने सैन्याच्या मदतीने शत्रूचा पराभव केला. या विजया मुळे शालिवाहन शक सुरु झाले असे मानतात.   
  हिजरी सन: हा अरब प्रांतातील शक ओळखला जातो.महंमद पैगंबर यांना धर्म सुधारणा कायद्यात मक्केहून मदिना येथे काही कारणास्तव जावे लागले तो काळ हिजरी सन म्हणून पाळला जावू लागला.बारा चांद्रमास म्हणून हिजरी वर्ष होते.बाराचा  आरंभ सूर्यास्तापासून होतो.

 ख्रिस्तीसन :  इंग्रजी राजसत्तेच्या काळात हे सन सुरु झाले.येशू ख्रिस्त यांच्या जन्म काळाचा हा सन मानला जातो. हे सन सौरवर्षा प्रमाणे आहे. याशिवाय गुप्त, हर्ष, वल्लभ, चेदी, चालुक्य यांचे शक ही होवून गेले.ते आता प्रचारात नाहीत.आपल्या संस्कृतीततले सर्व सण नक्षत्र,मास, ऋतू या नैसर्गिक घटनांवरच अवलंबून आहेत.

आज नव्या वर्षाचा पहिला दिवस,सर्व वाचकांना आणि सुहृद यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!                   
डॉ.नयना कासखेडीकर

2 comments:

  1. ह्या सर्व कालगणनेतला सर्वात अर्वाचीन , म्हणजे शिवराज्याभिषेक शक ! तो विसरून कसा चालेल ?

    ReplyDelete
    Replies
    1. मौल्यवान सूचना.धन्यवाद .बदल केला.

      Delete