Monday, 31 March 2014

प्रास्ताविक



प्रास्ताविक

          
             आज चैत्र शुद्ध प्रतिपदा ,शके १९३६, सोमवार, ३१ मार्च २०१४.
आज तुमच्या समोर या व्यासपीठावर येताना आनंद झालाय पण, मनात धाकधूक आहे, ताण आहे कारण या माध्यमात मी प्रथमच पाऊल ठेवतेय. इंटरनेट समजायला लागलं ते १९९९ ते २००० या काळात जेंव्हा मोबाईलची ओळखही झाली नव्हती .तेंव्हा होत पेजर .पण संगणकाची ओळख मात्र झाली होती. गेल्या १४ वर्षात काळ झपाट्याने बदलला.मी आकाशवाणीसाठी १९८५ ते २००५ काम केलं.प्रेससाठी विविध ठिकाणी १९९९ ते २०१० काम केलं. तंत्रज्ञानामुळे ही माध्यमं आज मितीस प्रचंड बदलली आहेत. रोज नवे बदल होत आहेत. ते अटळ आहेत आणि या प्रवाहात टिकायचे तर आपणही बदलले पाहिजे, ती आजची  गरज आहे.
            सांस्कृतिक ,सामाजिक,शैक्षणिक,व संशोधक म्हणून  विविध संस्थांचे काम करताना आणि पीएच.डी च्या शोध प्रबंधासाठी व विविध सर्वेक्षणासाठी काम करताना अनेक अनुभव आले.अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली.अभ्यासात आणि सामाजिक कामात हजारो महिलांशी  प्रत्यक्ष संवाद साधला.वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांना जवळून अभ्यासायला मिळाले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर वेळोवेळी फिरताना काही वेगळ्या गोष्टी दृष्टीस पडल्या .
          यातून एक लक्षात आलं कि बहुसंख्य  स्त्रिया स्वताच्या अधिकार, हक्क , सामान्यज्ञान, आरोग्य, कायदा या बाबतीत अनभिज्ञ आहेत.त्यांना जीवन विषयक दृष्टी नाही, विचार नाही. त्या व्यवहार कळण्यासाठी उत्सुक नाहीत.महाराष्ट्रात जवळ जवळ १००% महिला रोज वृत्तपत्र, मासिकं वाचतात ,पण काय वाचतात तर भविष्य,पाककृती,आरोग्य विषयक माहिती.चांगले विषय,चांगल्या चर्चा ,जीवनाबद्दल दृष्टिकोन देणारे विषय त्यांना हवे आहेत पण दुर्दैवाने कुठल्याच माध्यमात त्यांना ते मिळत नाहीत. त्यांच्या राहणीमानात बदल झालाय. आज किमती मोबाईल प्रत्येकीच्या हातात आहे ,जाहिरात आणि सिरीयल्सची त्यांना चांगली ओळख आहे .पण, विषयाची जाण नाही. जीवनातील घडामोडी संबंधी माहिती, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक प्रश्न, राजकारण यापासून त्या दूर आहेत. हे फक्त स्त्रियांच्या बाबतीत नाही तर काही  पुरुषांच्या, विशेष म्हणजे ज्यांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आहे त्या युवा पिढीलाही अनेक विषयांची माहिती नसते.
         हे आणि असे विविध विषय ' विचार विश्व ' मध्ये असणार आहेत. मला जे जे विषय भावतात, कळतात व येतात ते ते  विषय मी हाताळणार आहे. कलाक्षेत्र,सामाजिक, वैचारिक, प्रासंगिक, कौटुंबिक, माहितीपर आणि संशोधनपर लेखन विषय यात असतील. मी साहित्यिक नाही, कुणी फार मोठी लेखिका नाही. माझ्याकडचं शब्द भांडार कदाचित कमी असेल. शब्दांचा फुलोरा मला जमत नाही .पण जे असेल ते सरळ साधं आणि समजेल असं असेल.
          विचार विश्व सर्वांसाठी आहे.फक्त महिलांसाठी नाही. विचार विश्व मधून सर्वांच्या जाणीवा  प्रगल्भ करण्याच काम करायचं आहे. यासाठी माझ्यातकाच तुमचाही सहभाग आवश्यक आहे. तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. ही एक सामाजिक जबाबदारी समजून तुमच्या मदतीने पार पडण्याचा मी प्रयत्न करणार आहे  मनमोकळेपणाने, खुल्या दिलाने यात सहभागी व्हावे. ब्लॉग ची सुरुवात नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर   आपल्या कालगणनेच्या माहितीने करीत आहे.

3 comments:

  1. सुंदर.. blog सूरू केल्याबद्दल अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. तुम्ही ब्लॉग विश्वात ’विचार’ घेऊन आला आहात, ज्याची खरोखरीच निकड होतीच. इथे आपले स्वागतच होईल. नवनवे विचार वाचायला मिळतीलच हे वेगळे सांगायला नकोच, तेव्हा त्यासाठी वाट पहाणे आलेच!

    ReplyDelete