साडी आणि लावण्य
वर्तमानपत्रं उघडलं आणि एक जाहिरात दिसली, ती नेहमी पेक्षा वेगळ्या
कार्यक्रमाची.'साडी, लावण्य आणि संस्कृती ' पुण्यात साड्यांचे एक नवे दालन उघडणार
होते.त्याच्या जाहिराती प्रीत्यर्थ हा साड्या नेसवून दाखविण्याचा म्हणजे साड्यांचे
प्रकार शिकविण्याचा अभिनव कार्यक्रम होता.कार्यक्रम जाहीर होता, विनामूल्य होता.
या वेगळ्या शोला जाण्याचा मोह झाला.चौकशी केली असता कळले, तीन तासांचा हा
कार्यक्रम आहे, वाटलं, कशाला उगीच वेळ घालवायचा ?आपल्याला पाचवार, सहावर, नऊवार,
ओच्याची आणि दुटांगी, गुजराती हे प्रकार नेसता येतात.पण...... मनात उत्सुकता होती.
शेवटी गेले. सभागृहात पाय ठेवला तर काय ? बालगंधर्व रंगमंदिर खचाखच भरलेले होते. लावण्ण्यावर
प्रेम करणा-या, साडीवर प्रेम करणारा तमाम
तरुण आणि जेष्ठ महिला वर्ग हजार होता.
सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली निसर्गाची देणगी आहे. तर सौंदर्य खुलवणं ही कला.
प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतच. (पुरुष सुद्धा सुंदर
दिसण्यासाठी धडपडत असतात.जागरूक असतात.)लक्ष्मीच्या अनेक गुणांचं वर्णन
श्रीसूक्तात केलं आहे.ते असं, ' लक्ष्मी
कशी असावी? तर, हिरण्यवती म्हणजे सुवर्ण अलंकारांनी, उंची वस्त्रांनी नटलेली
असावी. तिची कांती चंद्राप्रमाणे आल्हाददायक असावी. नेत्र तेजस्वी असावेत. देहयष्टी
कांतिमान व भरदार असावी. ती सुस्मिता असावी. तिचे हृदय कोमल भावनांनी भरलेले
असावे.तिच्या भोवतीच्या सुगंधाने तिचे अस्तित्व ओळखू यावे.ती जीवनदात्री असावी.' आजची
एकविसाव्या शतकातली स्त्री नव्या बदलांना सामोरे जात जमेल तसं या श्रीसुक्तातल्या
लक्ष्मी सारखं होण्याचा कौशल्याने प्रयत्न
करते हे या कार्यक्रमाच्या गर्दीवरून वाटलं .
या कार्यक्रमात राजेशाही नऊवारी, दुटांगी व खानदेशी नऊवारी, कोळी, कोकणी, आदिवासी
असे पारंपारिक प्रकार, प्रांतानुसार बंगाली, पारशी, आसामी साडी, त्याशिवाय गांधारी
साडी, शकुन्तला साडी, वैजयंतीमाला साडी, आशा पारेख साडी, ड्रीमगर्ल साडी, जयाप्रदा
साडी असे २६ प्रकार दाखविले गेले. हे झाले साडी नेसण्याचे म्हणजे त्या रचनेचे
प्रकार. पण साड्यांना गावाच्या, राज्यांच्या, साडीच्या काठांच्या किंवा धाग्याच्या
नावावरून ओळखले जाते. उदाहरणार्थ, आसामी, ओरिसी, इंदुरी, कलकत्ता, गढवाल, धारवाडी,
बनारसी, मदुराई, लखनवी, महेश्वरी. तर मुगा सिल्क, बांधणी, तलम, टसर, जॉर्जेट,
इरकल, सॅटीन, वुली, शीफॉन,सुती, रेशमी, गर्भरेशमी इत्यादी. तसं पाहिलं, तर साडी हे
स्त्रियांनी गुंडाळून नेसण्याचे ठराविक लांबी रुंदीचे कापड. व्यापार, फॅशन, स्पर्धा,
उपयुक्तता, सुलभता यामुळे या लांब-रुंद कापडावर संस्कार होत होत अनेक बदल झालेले
दिसतात.वस्त्राच्या विविध पोतानुसार अनेक रंग,रंगछटा, काठपदर विविध आकृतीबंध, नक्षीकाम
करण्याच्या पद्धती व तंत्रे विकसित झालेली पाहायला मिळतात.काठावरून साडीचे प्रकार
म्हणाल तर रुद्र्काठी,नारळीकाठी,असावरीकाठी, गोमिकाठी, करवतकाठी, कोयरीकाठी,नारायण
पेठी(आंध्र प्रदेशातील नारायणपेठ येथे या तलम साड्या प्रसिद्ध आहेत.पुण्यातली
नारायण पेठ नाही.)
वस्त्र किंवा साडी वापरण्याची प्रथा
भारतात प्राचीन काळापासून चालत आली आहे.संस्कृतीचा विकास होऊ लागला तसतशी सौंदर्य
दृष्टी वाढत गेली आणि वेगवेगळ्या शैली निर्माण होत गेल्या.अनेक प्राचीन लेण्यांमध्ये
,गुहांमध्ये,मंदिरे किंवा वास्तू रचनेत असलेल्या विविध प्राचीन शिल्पांमध्ये
त्याकाळच्या स्त्रिया कशी वस्त्रे वापरत होत्या हे समजते.इ.स.पूर्व ६४२ ते १९ व्या
शतकापर्यंत साडीचे उल्लेख इतिहासात आढळतात. इ.स. तिस-या ते पाचव्या शतकात ऋतू
मानानुसार वस्त्रे घालण्याची पद्धत होती. साड्यांवर फुले आणि चिमण्यांचे भरतकाम
केलेले असायाचे. विसाव्या शतका पर्यंत डिझाईन मध्ये प्रचंड बदल झाला.
साडी हा भारतीय स्त्रियांचा पारंपारिक ,वैशिष्ठपूर्ण वस्त्रप्रकार. वेशभूषा
म्हणजे लोकजीवन, संस्कृती आणि इतिहासाचा आरसा असतो.वेशभूषेवरून त्या त्या
प्रदेशाची सामाजिक आणि भौगोलिक स्थिती लक्षात येते.पोशाखा मुळे प्रत्येकाचे
व्यक्तिमत्त्व उठून दिसते. सौंदर्य उठून दिसते.तर त्या पेहरावावरून त्या व्यक्तीची
आवड-निवड, त्याची मन:स्थिती, त्याची कलादृष्टी याची ओळख होते. भारतात तर विविधतेत
एकता सर्वदूर पहायला मिळते. साडीच्या प्रकार वरून अनेक प्रांत, त्यांची संस्कृती, कलाकुसर
,ऋतुमान, सांस्कृतिक वातावरण, याची ओळख होते.
महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये पाचवार व सहावर साडी वापरतात, आंध्र प्रदेशात
आठवारी लुगडे २ ते ३ प्रकारात नेसतात. तामिळनाडू मध्ये लुगडे सात ते दहावार असते.
आपल्याकडे नऊवार असते. ढोबळ मानाने स्त्रियांच्या मतानुसार साड्यांचे मुख्यत: दोन
प्रकार पडतात.१ )घरात नेसाव्याच्या साध्या साड्या आणि २) बाहेर म्हणजे लग्न समारंभ
,कार्यक्रमाला जाताना नेसावयाच्या साड्या .(आज भारतीय टीव्ही वर घरातल्या घरात
भरजरी वस्त्र, दागदागिने घालण्याची अत्यंत चुकीची नवी परंपरा सुरु झाली आहे.) लग्न
समारंभ म्हटलं की आधी आठवतात त्या वधूच्या साड्या. प्रांतानुसार वधूचा पोशाखही
बदलतो. वधूसाठी च्या साड्या भरजरी, भपकेबाज, आकर्षक असतात. ह्या साडीला महावस्त्र
म्हणतात. नववधुचे महावस्त्र म्हणजे बहुतेक बनारसी शालू किंवा भरजरी पैठणी असते. हे
ऐश्वर्याचे, वैभवाचे प्रतिक मानले जाते.पैठणीत इरकल पैठणी,शाही पैठणी, पारंपारिक
पैठणी, असे अनेक प्रकार आणि हवी ती रेंज .
भारतात प्रत्येक राज्यात या अशा
साड्या त्यांची परंपरा टिकवून आहेत.बिहारची सुंगडी,वाराणसीची किनखाब,बंगालची
बालुचारी, उत्तर प्रदेशातली जामदानी,ओरिसाची इक्कत,दक्षिणेकडची कलमकारी व कोरनाद,
लखनवी चिकन,राजस्थानची बांधणी,सौराष्ट्राची घरचोला, मध्य प्रदेशातली चुनरी तर
महाराष्ट्राची पैठणी, चंद्रकळा,पेशवाई नऊवारी .परंतु या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण
आणि रुबाबदार दिसते ती महाराष्ट्राची पारंपारिक नऊवारी साडी.हालचालीस
सोपी,सुटसुटीत,व योग्य .शिवाय सर्वांग झाकले जाऊन शालीनता जपणारी ही नऊवारी आता
सहावारी पैठणी अत्यंत शोभून दिसते.बालगंधर्वांच्या नाट्य प्रयोगात अशा एकापेक्षा एक
साड्या वापरल्या आहेत.या साड्या तेव्हा अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या,रसिकांनी ते
बालगंधर्वांचं युग अनुभवलं.अशा या जरतारी नऊवारीत स्त्री भूमिका साकारणारे पुरुष
कलावंत एखाद्या खानदानी घराण्यातल्या स्त्री प्रमाणे उठून दिसत. आता मुली जरीचे ड्रेस
शिवतात.पैठणीचाही ड्रेस,कुडते मिळतात.जमाना बदलतो पण तरीही जुनं ते सोनं टिकतं
,अगदी शंभर टक्के.साडीची सर कशालाही येत नाही हेच खरं. कार्यक्रम,लग्न ,सण ,समारंभ
यासाठी साडीच शोभते.त्याला पर्याय नाही.
-डॉ. नयना कासखेडीकर
उत्तम लेख! राजा रविवर्माला देखील मराठी नऊवारीसाडी आवडत असे .राजा रविवर्माची स्त्री देवतांची सर्व चित्रे नऊवारी सदिच आहेत . सरस्वती, लक्ष्मी ई . महाराष्ट्राची पारंपारिक नऊवारी साडीला बाल गंधर्व आणि राजा रविवर्मा यांनी अज्र्मार केले आहे. .
ReplyDeleteसुहासजी ,तुम्ही आवर्जून ब्लॉग वरील लेख वाचता आणि प्रतिक्रिया देता ,खरच धन्यवाद.प्रसिध्द चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेली नऊवारीतली स्त्रियांची एकापेक्षा एक सुंदर पेंटिंग्ज आहेत.शिवाय आपल्या सगळ्या स्त्री देवतांची विलोभनीय चित्रे नऊवारीतलीच.कोल्हापूरची अंबाबाई,तुळजापूरची भवानी आई,सरस्वती ई .हे आपलं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं म्हणून या प्रतिमा आपल्या पोशाखाप्रमाणेच आपल्याला छान वाटतात .तर इतर राज्यातल्या लोकांना त्यांच्या रिती प्रमाणे पोशाख छान वाटेल.पण काही असो आपली महाराष्ट्रीयन पैठणी आणि नऊवारी साडी प्रकार जगभरात सर्वाना आवडतो.पुण्यातल्या गणेश उत्सवात परदेशी स्त्रिया आवर्जून सहभागी होतात.तेही आपल्या पारंपारिक पोशाखात.
DeletePraice
ReplyDelete