‘क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता’ राणी लक्ष्मीबाई
सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥
---
सुभद्रा कुमारी चौहान
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात फक्त वीर
पुरुष सहभागी नव्हते झाले, तर, साहसी विरांगना पण सामील झाल्या होत्या. मंगल
पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूरशाह यांच्या बरोबरच झाशीच्या राणी लक्ष्मी बाई या ही बरोबरीने
लढल्या.
एकोणीसाव्या
शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील एक अग्रणी
सेनानी होत्या राणी लक्ष्मीबाई. त्यांच्या शौर्यामुळे ‘क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता’ म्हणून त्यांचं अढळ स्थान आजही आपल्या मनात कायम आहे. राणी लक्ष्मीबाईंचे
ग्वाल्हेर इथले समाधी स्थळ पाहून, कविवर्य भा.रा.तांबे
म्हणतात,
``रे हिंद बांधवा,
थांब या स्थळी ।
अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली ।।''
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली ।।''
आणि हो खरच, हे समाधी स्थळ बघताना आपण भारावून जातो,
नतमस्तक होतो आणि दोन अश्रु ढाळल्याशिवाय कुठलाच हिंदुस्तानी (आपल्या देशाचा
इतिहास माहिती असलेला) तिथून बाहेर पडत नाही. हा माझाही अनुभव आहे. हे ‘पावन तीर्थ’ म्हणजे, ग्वाल्हेरच्या
जवळ १८ जून १८५८ रोजी, सकाळी सकाळीच ब्रिटिश सैन्याने हल्ला
चढविला आणि राणी लक्ष्मी बाई रणांगणात धाव घेऊन तलवारीचे सपासप वार करत समोर
येणार्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. दोन्हीकडून आलेल्या सैन्यांचा
त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. ही परिस्थिति लक्षात घेऊन राणी आपल्या काही
स्वारांनिशी बाहेर पडल्या आणि जरा पुढे जात नाही तसा ओढा लागला आणि घोडा अडला. नेमका
आता त्यांचा नेहमीचा घोडा नव्हता. हा घोडा, ओढा ओलांडला तयार
नव्हता आणि त्याच वेळी घात झाला. इंग्रजांशी लढतांना रक्तबंबाळ होऊन राणी लक्ष्मी
बाई खाली कोसळल्या. ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला तिथेच या लढवय्या राणी लक्ष्मी
बाईंचे स्मारक आणि समाधी बांधली आहे. तेच हे स्थळ. या क्रांतिकारकांच्या स्फूर्तीदेवतेला
वीरमरण येऊन १८ जून २०२०ला १६३ वर्ष पूर्ण होत आहेत.
१९४७ ला
भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण त्या
आधी १८५७ पासून स्वातंत्र्याचा क्रांतिकारक लढा आपले सेनानी लढत होते. मेरठ च्या
लष्करी छावणीतल्या बंडापासून याला सुरुवात झाली होती. मग हे बंड सर्व भारतात पसरले.
१८५७ चा हा इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला पहिला भारतीय स्वातंत्र्य लढा होता. याला राजकीय,सामाजिक, आर्थिक धार्मिक आणि लष्करी अशी अनेक कारणे होती.
तेंव्हा वर्षभर चाललेल्या युद्धात इंग्रज विजयी झाले पण, यामुळे
का असेना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात तर झाली.
खरे निमित्त झाले होते, ईस्ट इंडिया कंपनीकडून अवलंबलेले साम्राज्यवादी धोरण आणि जनतेवर लादलेले
जुलुमी शासन .या कंपनीने अनेक भारतीय प्रदेश जिंकले. कंपनीच्या सैन्यातील भारतीय
आणि ब्रिटिश सैन्यात, सोयी सुविधा आणि पगारामध्ये भेदभाव
केला जात होता. कंपनी काही नगदी पिकं जबरदस्तीने घ्यायला लावून ती भारतीय
लोकांकडून स्वस्तात विकत घेऊन, चीनला मोठ्या नफ्यात विकत
असे. कामगार आणि शेतकरी यांच्याकडून कर वसूली मोठ्या प्रमाणात केली जात असे. हा सगळा
जाच भारतीयांना असह्य झाला होता. त्यांना सुटका हवी होती त्यामुळे शिपायांनी हे बंड
पुकारलं होतं.
गव्हर्नर जनरल डलहौसीने १८५७ च्या पूर्वीच अनेक लहान मोठे
प्रांत हस्तगत केले होते. अनेक संस्थाने खालसा झाली. आपल्या साम्राज्य विस्तारासाठी
इंग्रजांनी १८३३ पासून १८५७ पर्यन्त अनेक युद्धे केली होती.
इंग्रजांची सत्ता खिळखिळी करण्यासाठी भारतात सगळीकडे
प्रयत्न सुरू झाले. उठाव झाले ते मोडून इंग्रजांनी दिल्ली, लखनौ, माळवा ताब्यात घेतले. झाशीला वेढा
दिला. तिथे राणी लक्ष्मी बाई इंग्रजांशी लढली.
लढणे ही
किमया तर लक्ष्मी बाईंनी म्हणजे मणिकर्णिका ने लहानपणीच साधली होती. चिमाजी
आप्पांचे कारभारी मोरोपंत तांबे आणि
भागीरथी बाई यांची कन्या मणिकर्णिका उर्फ सर्वांची मनू. ती चार वर्षांची असताना
मातृछत्र हरपलं. लहानगी मनू त्यामुळे सतत वडिलांबरोबर राहत असे. मूळचे
खांदेशातल्या जळगाव जिल्ह्यातले पारोळा गावचे मोरोपंत, पेशव्यांच्या आश्रयाला होते त्यामुळे ते ब्रम्हावर्तात
राहायला होते. तिथे मनुच्या बरोबरची दुसर्या बाजीरावांची दत्तक मुले, नानासाहेब पेशवे ,रावसाहेब पेशवे आणि बाजीरावांकडे
दानाध्यक्ष म्हणून काम करणारे पांडुरंग टोपे यांचा मुलगा तात्या टोपे अशा
सर्वजणांचं बालपण एकत्र गेलं. रामायण महाभारताची पारायणे त्यांनी एकत्र केली. मराठ्यांचा
इतिहास एकत्र वाचला. एकत्र शिक्षणा बरोबरच ब्रम्हावर्तातल्या कार्यशाळेत, आख्याड्यात, घोडेस्वारी,
तलवारबाजी, बंदूक चालविणे, पिस्तूल, जांबिया चालविणे, असे सर्वच धडे गिरविले होते. अश्व
परीक्षेचे सर्व मापदंड तिला माहिती होते, युद्धशास्त्रातील प्रत्येक
विद्येत ती पारंगत होती. मल्लखांब मध्ये पण ती तरबेज झाली. युद्धाचे डावपेच पण
शिकली. लिहिणे, वाचणे याबरोबरच मोडी लिपि शिकली.
मूळच्या कुठल्याही राजघराण्यातली नसतानाही
पेशव्यांच्या राजघराण्यात मात्र ती वाढली होती. वडिलांबरोबर दरबारात जात होती.
तिला सर्वजण छबेली म्हणून हाक मारत. राजवाड्यात सर्वांची लाडकी झाली होती छबेली.
लहानपणी नाना घोड्यावर बसले की छबेली पण घोड्यावर बसायची. ते हत्तीवर बसले की ही
पण हत्तीवर बसायचा हट्ट करायची. बाजीरावांनी तिला आपल्या मुलाप्रमाणेच मानलं होतं.
या राजवाड्यात तीन वीर घडत होते जे १८५७ च्या लढ्यात देशासाठी आपल्या जिवाची बाजी
लावून इंग्रजांशी लढणार होते. जेंव्हा श्रीमंत नानासाहेबांनी स्वातंत्र्य रणपटावर
आपला फासा कानपुरला टाकला तेंव्हाच त्यांच्या या बाल मैत्रीण छबेली ने आपला फासा
झाशीवर टाकला होता.
जात्याच चपळ आणि हुशार असलेली मनू लग्नाची दिसू
लागली. मोरोपंत वरसंशोधनास लागले होतेच. इकडे त्याचवेळी झाशी चे संस्थानिक गंगाधरराव
नेवाळकर पत्नी गेल्यामुळे पुनर्विवाहासाठी कुलीन कन्येच्या शोधात होते, कर्तबगार गंगाधर पंतांची रयतेवर चांगली जरब होती. मनूचा विवाह
गंगाधर पंतांशी झाला आणि ती झाशी संस्थांनाची राणी लक्ष्मी झाली. लग्नानंतर
दरबारातल्या कामकाजात राणीने लक्ष घालणे गंगाधरपंताना मान्य नव्हते. स्वतंत्र
वृत्तीत वाढलेली स्वछंदी मनू लग्नानंतर जणू बंधनात राहू लागली. पण म्हणून राणी
लक्ष्मीबाईने गप्प न बसता आपला वेळ व्यायाम, कसरती, घोडेस्वारी, रोज सुरू ठेवत,
बरोबरच्या सर्व सामान्य महिलांनासुद्धा एकत्र करून याचे शिक्षण देऊ लागली. त्यात
त्यांना पारंगत केले. याचा प्रत्यक्ष उपयोग ब्रिटीशांनी हल्ला केला तेंव्हा
घोडदळात झाला. तेंव्हा हे महिलांचे सैन्य कामी आले.
झाशी संस्थानच्या राणीला मुलगा झाला. संपूर्ण
झाशी आनंदित झाली होती. गंगाधरपंत ही आनंदात होते. गादीला वारस मिळाला होता.
आनंदोत्सव साजरा झाला. पण तीन महिन्याचा होऊन त्या मुलाचा मृत्यू झाला. गंगाधरपंत
दु:खी झाले.सगळी झाशी दुखी झाली. हा आघात गंगाधरपंताना सहन झाला नाही.
संस्थांनाच्या वारसा हक्कासाठी दत्तक पुत्र घेण्याचे ठरविले. दत्तक विधान झाले. मुलाचे
नाव दामोदर ठेवले. थोड्याच दिवसात गंगाधरपंत निवर्तले. पण याच वेळी, हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल
डलहौसी ने घेतला होता. झाशी संस्थान पण खालसा करून जाहीरनामा काढण्यात आला. हे
दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकार मध्ये विलीन करण्यात आले. पण
नुसत्या कागदोपत्री हे संस्थान खालसा होणार नव्हते. जिथे नानासाहेबांनी अशा
न्याय व अन्यायाचे उत्तर इंग्रजांना दिलेच
होते. तसेच नानांची ही बहीण छबेली थोडी गप्प बसणार होती?
तिघेही जण एकमेकांच्या संपर्कात होते, एकमेकांना मार्गदर्शन
आणि सहकार्य करत होते. आता झाशी वर इंग्रजांचा अधिकार राहील अशी इंग्रजांची क्रूर
आणि कुटिल नीती कळताच राणी लक्ष्मीबाई अपमान आणि मानभंगामुळे संतापून कडाडली, “मेरी झांसी नाही दूंगी!”
राणीची
नित्याची दिनचर्या चालू होती. इंग्रजां विरुद्ध लढणारी ही रणलक्ष्मी पती निधनानंतर
श्वेत वस्त्र परिधान केल्यावर शीतल आणि सौम्य
दिसायची. एव्हढच काय या घटनेनंतर त्यांनी नथ वगैरे सारखे सौभाग्य अलंकार
कधीच घातले नाहीत. इंग्रजांनी केशवपनास काशीला जाऊ दिले नाही म्हणून डोक्यावर केश
सांभार तसाच ठेऊन प्रायश्चित्त म्हणून ,रोज अभ्यंग स्नानानंतर त्या अर्घ्य सोडत असत. नंतर तुलसी पुजा आणि
पार्थिवलिंग पुजा. पूजेअर्चे नंतर गायन- वादन, पुराण श्रवण
होत असे. त्यांचे देवदर्शनाला जाणे थाटामाटात असे. कधी मेण्यात, कधी घोड्यावरून जात. त्या प्रमाणे वेष पण परिधान करत असत. मेण्यातल्या
स्वारीपुढे डंका निशाण, हलके वाजणारी रणवाद्य, निशाण्यामागून दोनशे विलायती लोक, मागेपुढे शंभर
स्वार, कारभारी, मुत्सदी, मानकरी, भैय्यासाहेब उपासने,
आश्रित मंडळी आणि शिबंदीचे लोक, इत्यादि असत. शिंगे कर्णे
वाजत. बंदुकीचे शेकडो आवाज निघत, मग बुरुजा वरील चौघडा राणी दर्शनाहून
परत येईपर्यंत वाजत राही. त्यांच्या दरबारात मोठ मोठे शास्त्री, विद्वान, वैदिक पंडित,याज्ञीक, पुराणिक, गवई, सतारवादक
नामांकित कारागीर होते. त्यांची स्वता जातीने लक्ष घालून काळजी घेत. त्यांना
चांगल्या गुणांची कदर होती. शिपायांच्या तब्येतीची आत्मियतेने चौकशी करत. त्यांचा
पराक्रम गौरवीत,
यानंतर राणी
लक्ष्मीबाई किल्ल्यावरून राजवाड्यात राहायला गेल्या. जून १८५७ मध्ये शिपायांचा
पुन्हा उद्रेक झाला तेंव्हा इंग्रज पळून गेले होते आणि पुन्हा राणी किल्ल्यावर
राज्यकर्ती झाली पण परिस्थिति बिकट होती. खजिना रिकामा, मनुष्यबळ नाही, प्रजा भ्यायली होती. पण
ही परिस्थिती लक्ष्मीबाईंनी खूप धीराने आणि खंबीरपणे हाताळली. प्रजेतल्या लोकांचा
विश्वास संपादन केला. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. धोरणीपणाने जुन्या
विश्वासातील लोकांना बोलावून त्यांना महत्वाच्या जबाबदार्या सोपविल्या. कुणाला
सल्लागार मंडळात घेतले. निकामी तोफा पुन्हा सुरू केल्या.
लक्ष्मी बाई
दानशूर आणि श्रद्धाळू होत्या. त्यांनी
रंजले गांजलेले गोरगरीब आणि साधू संन्याशी यांच्यासाठी दानधर्म केला. गोवध बंदी
सुरू केली. काही सण आणि धार्मिक कार्यक्रम सुरू केले. कल्याणकारी कामे मार्गी
लावली. कलेला प्रोत्साहन दिले. त्यांना नाटकांची हौस होती. ग्वाल्हेर मध्ये नाटके
होत, त्या मराठी नाटकांचे प्रयोग त्या झाशी
मध्ये आयोजित करत असत. नाटक कंपनीची तेव्हढे दिवस खाण्या पिण्याची सोय करत. राजा
हरिश्चंद्र, रासक्रीडा, बाणासूरी
आख्यान होई. विशेष म्हणजे नाट्य कलाकारांना दरबारात बोलावून,
नाटकासाठी पात्रांना लागणारी जरीची वस्त्रे, खर्या हिर्याचे
दागिने समोर मांडून त्यातून निवडायला सांगत. त्यांच्या पुढे सारा खजिनाच मोकळा
ठेवत. त्यामुळे नाटकात पात्रे अधिकच खुलून दिसत असत. राणी साहेब ही नाटके तीन तीन
तास बसून बघत असत. दरबारातल्या स्त्रियांसाठी त्या खास प्रयोग ठेवत असत.
झाशीतल्या
स्त्रियांसाठी राणीने किल्ल्यावर हळदी कुंकवासारखे कार्यक्रम आयोजित केले. त्यांच्या
दरबारी असलेल्या विष्णुशास्त्री भट यांनी या हळदीकुंकू कार्यक्रमाचे वर्णन त्यांच्या
पुस्तकात करून ठेवले आहे. ते वाचून एखादा राजा किंवा राणी म्हणजे राज्यकर्ता आपल्या
प्रजेवर किती प्रेम करतो हे लक्षात येते. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात किती
सवाष्णींच्या बांगड्या फुटणार माहिती नाही म्हणून आणि लढाई सुरू व्हायच्या आधी योद्धे
आपल्या बायकांना माहेरी वा सुरक्षित स्थळी पाठवणार, मग परत भेट होईल की नाही अशा अवस्थेत राणीने हा एकत्रीकरणाचा कार्यक्रम
योजला होता,
१८५७ चा चैत्र
महिना होता. राणीने झाशीतल्या आणि आसपासच्या एकूण एक स्त्रियांना आपल्याकडील
हळदीकुंकू समारंभास आदराने निमंत्रित केलं होतं. भव्य महालात चैत्र गौरीची
प्रतिष्ठापना केली होती. त्याची गौरीची सजावट, मांडणी आणि सुशोभन दोन मजली इतके उंच होते. मागच्या दारातील मोठ मोठ्या
टाक्यांमधून मणांनी हरभरे भिजत घातले होते. शंभर ते दीडशे जणी फक्त हळदी कुंकू
लावायला उभ्या होत्या. तेव्हढ्याच जणी अत्तर, गुलाबपणी, खिरापत द्यायला आणि स्वत: राणी जातीनं गुलाब पुष्प देऊन सर्व महिलांचं
स्वागत करायला उभी होती. या हळदीकुंकू समारंभास एक लाख सुवासिनींनी हजेरी लावली
होती. एका स्त्रीने दुसर्या स्त्रीचं जाणलेलं मन हे राणीच्या संवेदनशील मनाची
साक्ष देतं. स्त्री असल्यामुळेच तिनं उद्या भविष्यात या झाशीच्या महिलांवर काय प्रसंग
येऊ शकतो याचा विचार केला होता. ती एक खंबीर योद्धा असली तरीही ती एक स्त्री होती.
राणी आणि झाशीतली प्रजा यांच्यात चांगले नाते निर्माण झाले होते.
सर्व
संस्थानात इंग्रजांविरुद्ध लढ्याची तयारी जोरात चालू होती. मेरठ झाले, कानपुर झाले. आता झाशी. झाशी १८५७ च्या संग्रामाचं एक प्रमुख केंद्र
बनलं. इंग्रजांनी झाशीवर आक्रमण केले. राणीने किल्ल्याची तटबंदी सर्व बाजूने मजबूत
केली. ते पाहून इंग्रज सेनापती हयू रोज पण आश्चर्य चकित झाला होता.राणीने फौजांना
धीर दिला. रणांगणावर तुम्हाला मरण आले तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची सर्व
व्यवस्था मी करेन. असे आश्वासन पण दिले,
४ एप्रिल १८५७
ची रात्र. नऊ दिवस नऊ रात्र अखंड शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा इंग्रजांनी झाशीचा
पाडाव केलाच. दुर्दैवाने झाशीच्या बाबतीत राणी अपयशी ठरली. राणीने किल्ल्यावरून
झाशीचे हृदय द्रावक दृश्य पाहिले. शांत आणि
सुंदर झाशी शहराची वाताहत झाली होती. ती बघून तिचे मन दुखी कष्टी झाले. मुख्य
दरवाजाचे रक्षण करणारेच शूर गोलंदाज खुदाबक्ष आणि गुलाम घोष खान इंग्रजांच्या
गोळ्यांना बळी पडल्याचे कळताच, राणीवर आणखी एक आघात झाला. तिच्या
मनात आले शेवटी इंग्रजांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातच दारूगोळा पेटवून
चितेवर स्वर व्हावे, पण एका अनुभवी वृद्ध सरदाराने राणीसाहेबांना
धीर दिला. आत्मघात हे पाप आहे असे सांगीतले आणि आजच्या रात्री इंग्रजांची फळी तोडून, पेशव्यास जाऊन मिळावे असा सल्लाही दिला. हा विचार राणीसाहेबांना पटला.
जाण्यापूर्वी सर्वांचा निरोप घ्यायला राणीसाहेब
बाहेर आल्या आणि म्हणल्या, “मी तुमचा सर्वांचा आणि माझ्या या प्रिय
झाशीचाही आता निरोप घेते आहे, महालक्ष्मीची मर्जी असेल तर, पुन्हा आपल्या भेटी होतीलही . खुल्क खुदा का, मुल्क
बादशहा का, अंमल राणी लक्ष्मीका. राणी लक्ष्मी तर निघून
चालली आहे. पण माझ्या या प्रिय भारतात परमेश्वरचा मात्र कधीही पराभव होणार नाही.
माझी श्रद्धा आहे ही. त्याचा ध्वज उभा ठेवण्यासाठीच हा संग्राम आहे”.असे म्हणून
सर्वांना नमस्कार करून संगितले की, ज्यांना इंग्रजांना शरण
जायचं आहे त्यांनी शरण जा, ज्यांना माझ्याबरोबर यायचं आहे
त्यांनी या, ज्यांना इथेच थांबायचे आहे त्यांनी इथेच थांबा, माझी सर्व कोठारं खुली आहेत काय हवं ते घ्या. स्वताचं रक्षण करा. काल्पी
वर लावलेला स्वराज्याचा जरीपटका त्यांना खुणावत होता. म्हणून त्या काल्पीला गेल्या.
इंग्रजांच्या
तावडीतून सुटून दामोदरला घेऊन राणी काल्पिला तात्या टोपे यांना जाऊन भेटली. दोघे
मिळून त्यांच्या सैन्यांसह ग्वाल्हेरच्या मदतीला धावले. सैन्याची नियमित कवायत
सुरू ठेवली. तिच्या बरोबर मंदर आणि काशी ह्या जिवलग दासीही होत्या. आणि मोर्चे बांधणीचा
विचार सुरू असतानाच, १८ जूनला ब्रिटिश अधिकारी स्मिथ आपल्या
सैन्यासाह ग्वाल्हेरला येऊन धडकला होता.
मर्दानी
पोशाख चढवलेली राणी लक्ष्मी तिच्या दासीसह आपल्या तंबूत सरबत पित होती, सावध होतीच. त्या वेळीच, ग्वाल्हेर
ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळ्या दिशांनी चढाई केल्याचं कळलं आणि त्याला
तोंड द्यायला राणी लक्ष्मीबाई तंबूतून सपकन बाहेर आली,
घोड्यावर स्वार झाली, तळपत्या समशेरीसह रणांगणात उतरली. शूर राणी
लक्ष्मीबाई, समोर येणार्या प्रत्येक ब्रिटिश सैन्याला सपासप
तलवारीने कापत होती. आपले सैन्य धारातीर्थी पडून कमी होत होते तरी भंगलेल्या
सैन्याला गोळा करत राणी सर्वांच्या पुढे शौर्याने झुंजत होती.
इंग्रजी
योद्ध्यांना त्यांनी बेजार केले. तळपणार्या या विजेचा अवतार पाहून ब्रिटिश
सैन्यही आवेशाने लढत होते. आधल्या दिवशी परतवून लावलेला स्मिथ, आपल्या नव्या सैन्याला घेऊन हट्टाला पेटून लढत होता. तेव्हाढ्यात, “बाई साहेब, मेले, मेले” असा
आवाज कानी आला. त्यांची दासी धारातीर्थी कोसळली होती. मारणार्या फिरंग्याच्या
अंगावर राणी धावून गेली आणि आपल्या दासीला मारणार्याचा सुड घेतला. अचानक दोन्ही
कडून फौजा आल्या हे ओळखून राणी लक्ष्मी बाई त्यातून बाहेर पडली आणि घोड्याला टाच
देऊन शत्रूच्या टप्प्यातून राणी निसटली पण, थोडं पुढे जाताच
घोडा अडला. कारण समोर ओढा होता. तो ओलांडायला घोडा तयार होईना. यावेळी नेमका
राणीचा राजरत्न हा नेहमीचा घोडा नव्हता. तेव्हढ्यात इंग्रजी घोडेस्वार राणीच्या
अंगावर कोसळले, पण काहीही झालं तरी शरण जाणं नाही. मरेपर्यंत
लढायच हाच निश्चय होता. अनेक तलवारींशी एकटीची तलवार भिडत होती. आघातावर आघात होत
होते. एकाने मागून राणीच्या मस्तकावर वार केला. छातीवर दूसरा वार झाला. राणी लढता लढता
कोसळली. आज ती शौर्यस्फूर्तीच्या शिखरावर विराजमान
झाली होती. या शेवटच्या क्षणी पण, तिने आपल्यावर वार करणार्या
गोर्या सार्जंटचा चुराडा केला. मानिनी होती ती. युद्ध करून रणांगणावर मरण येणे
केंव्हाही चांगले असेच राणीला वाटत होते. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू
नये व विटंबना होऊ नये असे आधीच सहकार्यांना सांगून ठेवले होते. शत्रूची नजर
चुकवून सहकार्यांनी राणीला जवळच्याच गंगागीर बुवा यांच्या पर्णकुटीत नेले.
इंग्रजांच्या हातात पडण्याआधीच सेवक रामचंद्र याने राणीला स्वातंत्र्य समराच्या
चितेवर ठेऊन अग्नी दिला.
ब्रिटीशांनी
राणी लक्ष्मीबाईंना ‘हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क’ म्हटले आहे. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राणीच्या पराक्रमाची जाणीव
ठेऊन आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला राणी झाशी रेजिमेंट असे नाव दिले. स्वामी
विवेकानंदांना पण राणीबद्दल तिच्या शौर्याबद्दल अभिमान वाटत होता. स्वातंत्र्यवीर
सावरकरांना तर या रण लक्ष्मी बद्दल खूप गर्व आहे. ते म्हणतात, “लक्ष्मी राणी आमची आहे हे म्हणण्याच्या मान आपल्याला आहे. तो
इंग्लंडच्या इतिहासाला अजून मिळालेला नाही. इटलीत एव्हढी मोठी राज्यक्रांती झाली
पण, राणी लक्ष्मी सारखी कुणी झाली नाही. हा गर्व करण्याचं
भाग्य हे भारत भू तुलाच आहे .” खरंच, आपण सर्व भारतवासी भाग्यवान
आहोत.
मी एकदा ग्वाल्हेरला गेले असताना, हातात असलेल्या वेळात प्रसिद्ध संगीत सम्राट तानसेन यांची समाधी, सूर्यमंदिर हे बघून, या समाधी स्थळाला भेट देता देता
रात्रीचे साडेसात- आठ वाजले, रिक्षावाला म्हणाला बंद होईल आता.
पण जाऊन बघू, नशिबात असेल तर उघडे असेल. असे म्हणून आम्हीही आग्रह
केला आणि त्या रस्त्याने रिक्शा घ्यायला लावली. शेवटच्या दहा पंधरा मिनिटात आत धावत
जाऊन का असेना, दर्शन घ्यायचे होते. आणि इच्छा पूर्ण झाली. आधीची
मनस्थिती म्हणजे हे ठिकाण बघायचे एव्हढीच होती. पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आत गेल्यावर
वेगळीच अनुभूति घेतली. झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष लढाई लढली त्या
जागेवर आपण उभे आहोत हा विचारच स्फूर्ति देणारा होता. अभिमान वाटत होता. तिथून पाय
निघेना. मन इतिहासातल्या घटना शोधू लागलं. अंगावर रोमांच उभे राहिले. अंत:करण भरून
आलं.
ग्वाल्हेर च्या कोटा की सराय मधल्या रण राणी च्या या समाधीस्थळाला
साश्रूपूर्ण वंदन करून, जड पावलाने तिथून निघालो.
© डॉ. नयना कासखेडीकर
------------------------------------------------------------------
अतिउत्तम नाहीतीपूर्ण अप्रतिम लेख!
ReplyDeletedhanyvad suhas ji
ReplyDelete