Saturday 4 July 2020

‘ विचार – पुष्प’ भाग १





स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ---     विचार – पुष्प
   
     भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तीला,योग्य दिशा देणार्‍या व्यक्तीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक ,वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.
   
एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतर्राष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा  गुरू झालेले स्वामी विवेकानंद.
    
आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले. अनुयायी तयार केले. भारतीय संस्कृती बरोबरच इतर धर्म व परंपरा यांचाही जवळून अभ्यास व चिंतन केले. त्यासाठी प्रवास केला. भेटी घेतल्या, ग्रंथ वाचन केले. 
  
या जीवनात स्वामी विवेकानंद अनेक गोष्टींना सामोरे गेले. त्यांनी अनेक अनुभव घेतले. त्यांच्या जीवनात अनेक घटना घडल्या. त्यातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे. यात त्यांच्या बालपणा पासूनचे प्रसंग, कौटुंबिक प्रसंग, त्यांचा भारत प्रवास, त्यांना भेटलेली माणसे, त्यांची धर्म ,विज्ञान ,अध्यात्म याविषयीची मते, वाचकांना कळावीत आणि या व्यक्तिमत्वाचा येणार्‍या पिढीला परिचय व्हावा हाच उद्देश आहे. यासाठी अनेक लेखकांनी लिहीलेल्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा संदर्भ वापरला आहे. लॉक डाऊन काळात ही मालिका लिहिली आणि अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आज ४ जुलै, स्वामी विवेकानंद यांचा स्मृतीदिन. आजपासून रोज एक भाग विचार-विश्व या माझ्या ब्लॉग वर जगभरातल्या वाचकांना वाचायला मिळेल.               

१. ध्येय  
          
       जीवनात, आपली प्रत्येकाचीच काहींना काही ध्येये असतात.म्हणजे स्वप्नच म्हणाना. आपल्याला सन्मान मिळावा, आपल्याला उत्तुंग यश मिळावं. आपला प्रत्येक प्रयत्न यशस्वी व्हावा.आणखी बरच काही. मग त्याप्रमाणे आपण प्रयत्नांची शिकस्त ही करत असतो. कोणाचं मार्गदर्शन घेत असतो. सल्ला घेत असतो. एखादी व्यक्ती पण आपल्याला प्रेरणा देणारी असते.त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते.आणि आपण पुढे जात असतो. आपल्या जीवनात एखादा आदर्श आपल्यासमोर असेल तर आपले ठरवलेले ध्येय  लवकर साध्य करता येते.
       
       स्वामी विवेकानंदांच्या मते, एखाद्याच्या समोर आदर्श असेल तर तो मनुष्य एखादीच चुक करेल, पण जर समोर आदर्शच नसेल तर तो मनुष्य मात्र, अगणित चुका करेल.म्हणून जीवनात एखादा आदर्श असणे महत्वाचे आहे असे विवेकानंदांना वाटते. ते म्हणतात, युवकांनी उदात्त ध्येये ठेवली पाहिजेत, ती साध्य  होईपर्यन्त त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. प्रगतिच्या वाटेवर त्यांचे पाऊल सतत पुढेच पडले पाहिजे.यश प्रयत्नपूर्वक खेचून आणले पाहिजे”. त्यासाठी त्यांच्यात हवी दुर्दम्य इच्छाशक्ती. ती असेल तर तुम्हाला अपेक्षित असलेले यश, मान सन्मान, कीर्ती नक्कीच प्राप्त होईल. अपयशाला सामोरं जाऊन ते यशामध्ये बदलविण्याचे धाडस आपल्यात हवं. मग आपले भाग्य आपल्याच हातात हे अनुभवायचे असेल तर आत्मनिर्भर व्हायला  हवे.   



© डॉ.नयना कासखेडीकर     
ही मालिका ज्यांना ऑडिओ स्वरुपात ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या 

https://youtu.be/ItBZQhUesYI 

या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.सर्व भाग ऐकण्यासाठी खाली लिंक दिली आहे .   

playlist link

https://www.youtube.com/playlist?list=PLEkZc0XQx78jmXuRkOtsWN-D1Z2FBgOGk

3 comments: