‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील
घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार – पुष्प,भाग -२३.
परिव्राजक –१. केल्याने
देशाटण ..
तीर्थंभ्रमणाला
निघायच्या आधी पण नरेंद्रनाथ आंटपूर, वैद्यनाथ, शिमूलतला इथे कित्येकदा आले होते. उजाडल्यानंतर सूर्य किरणे सर्व दिशांना
पसरतात हे सांगायची गरज नसते. तसे स्वामीजी जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रभाव पाडत
असत. असाच अनुभव ते फिरलेल्या प्रत्येक प्रांतात दिसतो. बिहार प्रांत फिरत फिरत ते
हिंदू भारतभूमीचं हृदय समजल्या जाणार्या काशीला आले. इथे ते संस्कृत
भाषेचे पंडित आणि साहित्य व वेदांत पारंगत असलेले सद्गृहस्थ श्री प्रमदादास मित्र
यांच्याकडे राहिले. स्वामीजींना त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदरभाव वाटू लागला. पुढे
पुढे तर ते वैदिक धर्म आणि तत्वज्ञान याबद्दल काही शंका असली की ते प्रमदादास
यांना पत्र लिहून विचारात असत. आपले आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेतल्यावर काशीत
आले होते. श्रीरामकृष्ण पण इथे येऊन गेले होते. तिथे मद्रासी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, मराठी हिंदुस्तानी अशी प्रभृती सर्वजण, आचारांची
भिन्नता असूनही एकाच उद्देशाने विश्वेश्वराच्या मंदिरात एकत्र येत असत. यात
नरेंद्रनाथांना या विविध लोकांमधला ऐक्याचा विशेष गुण भावला. म्हणूनच त्यांना
सगळीकडे फिरून भारत जाणून घ्यावसा वाटला होता.
काशी |
शिवाय
इंग्रजांची सत्ता, गुलामी असताना वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक
कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून
माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी ते इथून निघून कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत अवलोकन करता करता भ्रमण
करत होते.
उत्तरेत
फिरून झाल्यावर ते शरयू तीरावरच्या अयोध्येला येऊन पोहोचले. काशी आणि
अयोध्या ही धर्मक्षेत्र,त्यामुळे स्वामीजींचे आध्यात्मिक मन तिथे रमले. ‘अयोध्या’ जिच्या मातीशी सूर्यवंशी राजांच्या गौरवाची स्मृती जोडलेली आहे. शरयू
नदीच्या तीरावरून आणि घाटावरील विविध मंदिरातून फिरतांना त्यांच्या डोळ्यासमोर
प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्रच उभे राहिले. आदर्श राजा,
आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ, अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येत आल्याबरोबरच त्यांना लहानपणची रामसीतेची
भक्ती, रामायण प्रेम, वीरभक्त श्री
हनुमानवरची गाढ श्रद्धा आणि आईच्या तोंडून ऐकलेल्या रामाच्या कथा सारे सारे आठवले
असणारच. काही दिवस इथे त्यांनी रामायत संन्याशांच्या समवेत श्रीरामनामसंकीर्तनात
घालवून पुढे ते ऑगस्ट१८८८ मध्ये लखनौ- आगरा मार्गाने पायी पायी चालत वृंदावनच्या
दिशेने निघाले.
लखनौला त्यांनी बागा, मशिदी, नबाबाचे प्रासाद बघितले. आग्र्याला आल्यावर तिथल्या शिल्प सौंदर्याचा
जगप्रसिद्ध नमुना ‘ताजमहाल’ मोगलकालीन
इमारती, किल्ले पहिले. मोगल साम्राज्याचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर
उभा राहिला. लखनौ आणि आग्रा या ऐतिहासिक स्थळं सुद्धा त्यांच्या मनात भरली. कारण ती भारताच्या
इतिहासाच्या पर्वाची महत्वाची खूण होती आणि स्वामीजी त्याबद्दल पण जागरूक होते.
म्हणून एक वैभवशाली साम्राज्याची स्मृती म्हणून ते पाहत होते.
शिवाची काशी पाहिली, श्रीरामची अयोध्या पाहिली
आता भगवान श्री कृष्णाच्या वृंदावनला स्वामीजी पोहोचले. राधा कृष्णाची लीलाभूमी असलेल्या
वृंदावनात, मर्यादित परिसरात असलेले विविध प्रकारचे, भिन्न काळात बांधले गेलेले वास्तूकलेचे, अनेक
मंदिरांचे नमुने त्यांना पाहायला मिळाले. वृंदावनला ते बलराम बसुंच्या पूर्वजांनी
बांधलेल्या कुंजामध्ये राहिले. तिथे यमुनेच्या वळवंटात असो की भोवताळच्या परीसरात
असो सगळीकडेच, श्रीकृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी येतोय असे
वाटावे अशा काव्यात्मक आणि भक्तिपूर्ण वातावरण त्यांनी अनुभवले. गोवर्धन पर्वताला
त्यांनी प्रदक्षिणा घातली. तेंव्हाच त्यांनी मनाशी संकल्प केला की, कोणाकडेही भिक्षा मागायची नाही. कोणी आपणहून आणून दिले तरच त्या अन्नाचा
स्वीकार करायचा. हे बिकट व्रत त्यांनी घेतले. एकदा तर त्यांना पाच दिवस उपाशी
राहावे लागले होते. पण इथे त्यांनी दोन वेळा परमेश्वर भक्तीचा ईश्वरी अनुभव घेतला
आणि श्रीकृष्णाची भक्ती आणखीनच दृढ झाली.
पुढे
ते हरिद्वारला गेले. वाटेत जाता जाता ते हाथरस च्या स्थानकावर बसले असताना, त्यांना
थकलेल्या अवस्थेत स्थानकाचे उपप्रमुख असलेले शरदचंद्र गुप्त यांनी पाहिले. आणि, “स्वामीजी आपल्याला भूक लागलेली दिसते आपण माझ्या घरी चलावे” अशी विनंती
केली. स्वामीजींनी लगेच हो म्हटले आणि त्यांच्या घरी गेले. स्वामीजींचे
व्यक्तिमत्व बघून शरदचंद्र गुप्त आकर्षित झाले होते ,
त्यांनी स्वामीजींना काही दिवस इथे राहावे असा आग्रह केल्याने ते खरच तिथे राहिले.
सर्व बंगाली लोक संध्याकाळी एकत्र जमत. आपला धर्म आणि समाज यावरील
सद्यस्थितीबद्दल स्वामीजी बोलत. आपल्या
मधुर आवाजात गीतं म्हणत. येणारे सर्व बंगाली मोहित होऊन जात. त्यांच्यातील भांडणे
जाऊन एकोपा निर्माण झाला.
शरद चंद्र गुप्त ,स्वामीजींचे पहिले शिष्य |
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You
Tube च्या
या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.
No comments:
Post a Comment